फेस्टिव्हल : चित्रपटांची दिवाळी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई फिल्म फेस्टिव्हल विविध भाषांतल्या उत्तम सिनेमांमुळे लक्षात राहिला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई फिल्म फेस्टिव्हल विविध भाषांतल्या उत्तम सिनेमांमुळे लक्षात राहिला. लांबलचक रांगा, गर्दी, सिनेमांविषयी चर्चा, संमिश्र प्रतिसाद अशा गोष्टी या फेस्टिव्हलमध्ये झाल्या नसत्या तरच नवल. या फेस्टिव्हलमधील विविध भाषिक सिनेमांमधून विविध विषयांवरील चर्चेत रंगलेल्या सिनेप्रेमींची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली.

चित्रपट.. दृक् श्राव्य माध्यम असलेली आनंद देणारी कलाकृती. आपल्याकडे जितके क्रिकेटप्रेमी आहेत तितकेच किंबहुना कदाचित थोडे जास्तच चित्रपटप्रेमी आहेत. म्हणूनच दर शुक्रवारी थिएटरकडे वळणारी पावलं भरपूर असतात. या चित्रपटप्रेमींमध्येही बरीच वर्गवारी करता येईल. रहस्यमय सिनेमे आवडणारा वर्ग, प्रेमकथांच्या प्रेमात पडणारे काही जण, अ‍ॅक्शन सिनेमांचे चाहते असलेले काही, ऐतिहासिक सिनेमांचा अभ्यास करणारे काही असे अनेक वर्ग होतील. पण, अशा विविध बाजातले सिनेमे एकाच उपक्रमांतर्गत आणि एका आठवडय़ात सलग बघायला मिळाले तर..? कल्पनाच भन्नाट वाटते ना.. पण, ही कल्पना दरवर्षी प्रत्यक्षात उतरते ती ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान. निमित्त असतं मुंबई फिल्म फेस्टिव्हलचं, अर्थात मामि फिल्म फेस्टिव्हलचं..!

दसरा झाला की जसं दिवाळीचे वेध लागतात तसंच सिनेप्रेमी दिवाळीच्या आधी होत असलेल्या या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट बघत असतात. जिओ मामि सतराव्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलची ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात दणक्यात सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हृतिक रोशन, अनुराग कश्यप, कल्की कोएलचिन, किरण राव, अनुपमा चोप्रा, नीता अंबानी अशा अनेकांच्या उपस्थितीसह फेस्टिव्हलला सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कथा-पटकथा लेखक सलीम-जावेद या जोडीला सिनेसृष्टीतील त्यांच्या कारकीर्दीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.

हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलीगड’ या सिनेमाने फेस्टिव्हलची सुरुवात झाली. बॉलीवूडमधले अनेक दिग्गज या सिनेमासाठी उपस्थित होते. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने ठिकठिकाणी मोठाल्या रांगा दिसू लागल्या. यंदा हा फेस्टिव्हल मुंबईत पाच ठिकाणी आयोजित केला होता. मुंबईच्या विविध भागांत राहणाऱ्या सिनेप्रेमींसाठी त्यांच्या सोयीचं ठिकाण असावं हा त्यामागचा उद्देश. असं असलं तरी काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे एखाद्या सिनेमाचं स्क्रीनिंग रद्द होण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत होते. असे झाल्यास तिथून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला लागणारा वेळ तसा कमी नव्हता. त्यामुळे फेस्टिव्हलच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी सोयीचं असलेलं ठिकाण अनेकदा गैरसोयीचं वाटू लागलं होतं. पण, यातूनही सिनेप्रेमी चित्रपटांनाच महत्त्व देताना दिसत होते. सगळ्या गैरसोयी बाजूला सारून सिनेमाला प्राधान्य देणारा प्रेक्षकवर्ग दिसून येत होता. एखाद्या विशिष्ट सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या एक एक तास आधीपासून लांबलचक रांगा, त्या सिनेमाविषयीची चर्चा, त्याला मिळालेल्या पुरस्कारांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण असं चित्र बघायला मिळत होतं. एखाद्या सिनेमाविषयी तो चांगला असल्याची चर्चा होऊनही तो फारसा चांगला नसल्याची खंत काही प्रेक्षकांमध्ये दिसून येत होती. तर काही सिनेमांची अजिबात चर्चा न होताही तो सिनेमा बाजी मारून जायचा.
lp16

आपली एखादी गोष्ट हरवली की ती मिळेस्तोवर आपल्याला चैन पडत नाही. मग शक्य असतील त्या सर्व जागी आपण तिचा शोध घेतो. तरी सापडत नसेल तर जमेल तशी स्वत:ची समजूत काढत विषयाला पूर्णविराम देतो. पण, मनात ती अस्वस्थता कायम असते. विषय जुना झाला तरी दुसऱ्याचं असंच दु:खं समोर आलं की पुन्हा तो जुना विषय नव्याने दिसू लागतो. ती अस्वस्थता वाढत जाते. याच भावनेचं सुंदररीत्या चित्रण केलंय ते ‘तकलूब’या फिलीपाइन्स सिनेमात. हा सिनेमा फिलिपाइन्समधील ताक्लोबॅन या शहरात आलेल्या हैयान चक्रीवादळामुळे झालेल्या मनुष्यहानीवर भाष्य करतो. चक्रीवादळात हरवलेल्या तीन मुलांचा शोध त्यांची आई म्हणजे, बेबेथ घेतेय. एरवीन आणि त्याचा मोठा भाऊ चक्रीवादळात आई-वडिलांना गमवल्याचं सत्य लहान बहिणीपासून लपवताहेत. तर लॅरीने याच चक्रीवादळात त्याची बायको गमावली आहे. हे तिघेही चक्रीवादळाशी संबंधित आहेत. बेबेथ शोध घेतेय, एरवीन सत्य लपवतोय तर लॅरी सत्य पचवतोय. तिघांचेही जगण्याचे मार्ग भिन्न. पण, जगणं थांबवत नाहीयेत. सिनेमाची कथा साधी, सरळ आहे. तशीच तिची मांडणीही साधीच. बेबेथच्या डोळ्यातली आगतिकता दिसते, तर एरवीनचा तिच्या बहिणीपासून सत्य लपवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रकर्षांने जाणवतो. पुन्हा चक्रीवादळाची चाहूल लागते तेव्हा समुद्रकिनारी असलेल्यांची एकमेकांना मदत करण्याची तडफड दिग्दर्शकाने अचूक टिपली आहे. सिनेमाच्या उत्तरार्धात बेबेथच्या तीन मुलांपैकी दोघांचे कप खाली पडून फुटण्याचा एक प्रसंग आहे. बेबेथने तिच्या मुलांचा शोध थांबवावा हे सुचवणारा हा प्रतीकात्मक प्रसंग लक्ष वेधून घेतो. संवादाशिवाय हा प्रसंग खूप काही सांगून जातो. सिनेमाला वेग आहे. काही घडत नाही असं वाटत असतानाही सिनेमा कंटाळवाणा वाटत नाही.

‘फ्रॉम अफार’ हा आणखी एक स्पॅनिश सिनेमा वेगळा ठरतो. पन्नास वर्षीय एक माणूस, अरमांडो हा तरुण मुलांना पैसे देऊन फक्त त्यांची सोबत मिळवत असतो. हा त्याचा नेहमीचा कार्यक्रम. पण, एक दिवस तो एल्डर या तरुणाला भेटतो. अरमांडो नेहमीप्रमाणे त्याला पैसे देऊ करतो आणि सोबत यायला सांगतो. हा एल्डर म्हणजे त्याच्या एरियातला गुन्हेगारी गँगचा लीडर असतो. त्याच्या बंडखोर स्वभावामुळे अरमांडोचं तो सुरुवातीला काहीच ऐकत नाही. पण, कालांतरानं त्या दोघांचंही आयुष्य बदलून जातं एकमेकांच्या सोबतीमुळे. दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचं फ्रस्ट्रेशन असतं. सिनेमाच्या एका टप्प्यावर ही दोघांचे फ्रस्ट्रेशन बाहेर पडतात आणि सिनेमा उत्तरार्धात वेगळं वळण घेतो. जागतिक सिनेमांमध्ये अनेकदा कमी संवाद आढळून येतात. काही संवाद नसलेले प्रसंग प्रेक्षकांना समजून घ्यावे लागतात. त्याचा अन्वयार्थ प्रेक्षकांना स्वत:ला लावावा लागतो. असंच ‘फ्रॉम अफार’मध्ये आहे. दोघांचंही फ्रस्ट्रेशन नेमकं काय हे सिनेमात शब्दातून मांडलं नाही. अन्वयार्थ लावायची हीच ती गोष्ट.

lp17

जसं संगीताला कोणतीही भाषा नसते. त्याची भाषा म्हणजे सूर-ताल-लय हीच असते. तसंच सिनेमाचंही आहे. सिनेमाची भाषा म्हणजे त्याची कथा, पटकथा, सिनेमाटोग्राफी अशा अनेक गोष्टी. यात संवादही महत्त्वाचे असतातच, पण संवाद नसतील किंवा संवादांची भाषा माहीत नसेल तर सिनेमाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा ठरतो. ‘जर्नी थ्रू चायना’ या सिनेमाबाबत तसंच झालं. या सिनेमाचं स्क्रीनिंग सुरू झालं. सिनेमाच्या सुरुवातीच्या पाचेक मिनिटांतच संवाद सुरू झाले. चित्रपट फ्रेंच आणि चायनीज भाषेतला असल्यामुळे अर्थातच संवाद समजत नव्हते. असे इतर भाषिक सिनेमे बघताना भाषेची तशी अडचण येत नाही, कारण त्यामध्ये सबटायटल्स असतात. पण, ‘जर्नी थ्रू चायना’ या सिनेमामध्ये सबटायटल्सच नव्हते. काही  तांत्रिक अडचण असेल म्हणून तो सिनेमा दहा मिनिटं झाल्यानंतर थांबवण्यात आला. पुन्हा सुरू केल्यावर तसंच झालं. सबटायटल्स नाहीत. दुसऱ्यांदा बंद केला. तीस ते चाळीस मिनिटे सिनेमा सुरूच केला नाही. सबटायटल्स नाहीयेत असं कळलं. शेवटी त्याशिवाय सिनेमा बघायचं असं प्रेक्षकांनी ठरवलं. खरंतर अशा प्रकारच्या गैरस़ोयीवर प्रेक्षक नाराजच होते. पण, शेवटी सिनेमावरचं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देईना. सिनेमा पूर्ण झाल्यावर प्रत्येकजण आपापला सिनेमाविषयीचा दृष्टिकोन घेऊन बाहेर पडत होतं. फ्रान्समध्ये राहणारी एक साठीतली बाई चीनमध्ये झालेल्या तिच्या मुलाच्या निधनाने दु:खी आहे. अचानक ओढवलेल्या मृत्यूमुळे तिला धक्का बसलाय. पण, त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित व्हावेत म्हणून ती चीनच्या प्रवासाला निघते. तिथे ती त्याचे अंत्यविधी करतेच, पण तिला स्वत:लाच स्वत:चे विविध पैलू दिसू लागतात. अशी खरंतर फेस्टिवल्समध्ये दाखवले जाणारे सिनेमे हे काहीसे बौद्धिक असतात. पण, खरंतर मानवी भावभावनांवर भाष्य करणारे अधिक असतात. प्रेम, क्रोध, मत्सर, द्वेष, आनंद, दु:खं अशा विविध भावना सिनेमातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून दिसून येतात. काही सिनेमे संवादांवर केंद्रित असतात. तर काही सिनेमांमध्ये मोजकीच वाक्यं असतात. या दोन्हीची उदाहरणं या सिनेमात बघायला मिळाली. ‘डॉग लेडी’ हा कमी संवाद असलेला सिनेमा तर ‘राइट नाऊ राँग देन’ हा संवादांचा सिनेमा. ‘डॉग लेडी’ या सिनेमाची सिनेमाटोग्राफी चांगली. ‘राइट नाऊ..’ या सिनेमाची मांडणी थोडी हटके आहे. दोन्ही सिनेमांच्या कथा बऱ्या आहेत. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. असाच एक वेगळ्या धाटणीचा  सिनेमा म्हणजे ‘द अमिना प्रोफाइल’. डॉक्युमेंटरी स्टाइलमध्ये असलेल्या या चित्रपटाला प्रचंड वेग आहे. सिरीअन-अमेरिकन अमिना अरीफचा ‘अ गे गर्ल इन डॅमेस्कस’  हा ब्लॉग अल्पावधीतच असंख्य जण फॉलो करू लागतात. काही कारणांमुळे हा ब्लॉग चर्चेतही राहतो. यावरील काही पोस्ट्स आक्षेपार्ह आढळल्यामुळे या ब्लॉगची लेखिका कोण याचा शोध घेतला जातो. अमिना आहे तरी कोण हा शोध सुरू होतो. या  शोधाचा प्रवास म्हणजे हा सिनेमा आहे. वेगाने पुढे सरकणारा हा सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो आणि टिकवतोही.

चित्रपटगृहांच्या आवारातील चर्चेचे सिनेमे अनेक होते. यात विशेष म्हणजे इंडिया गोल्ड आणि  इंडिया स्टोरी या विभागातले सिनेमे जास्त होते. ‘चौथी कूट’, ‘रिंगण’, ‘आयलंड सिटी’, ‘उम्रिका’, ‘विसारनाई’, ‘हरामखोर’, ‘द हेड हंटर’ हे त्यापैकी काही सिनेमे. सिनेमांच्या स्क्रीनिंगच्या आधी एक-एक तास येऊन रांगेत उभं राहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या प्रचंड होती. सिनेमांसाठी बुकिंग केलेल्यांची एक रांग आणि बुकिंग न केलेल्यांची एक रांग असं असूनही काही सिनेमांसाठी गर्दी दिसत होती. ‘चौथी कूट’, ‘रिंगण’, ‘आर्यलड सिटी’, ‘हरामखोर’ या सिनेमांसाठी गर्दीचं चित्र पाहायला मिळत होतं. ‘चौथी कूट’ या सिनेमाचं दोन वेळा स्क्रीनिंग ठेवलं होतं. अशीच तुफान गर्दी  दिसत होती ती क्लोजिंग फिल्मसाठी. या वर्षीची क्लोजिंग फिल्म होती ‘वन प्लस वन’ ही फ्रेंच फिल्म. खरंतर या सिनेमाचं एकच स्क्रीनिंग होणार होतं. पण, त्यासाठी करावं लागणारं बुुकिंग अवघ्या काही मिनिटांतच हाउसफुल झालं. म्हणून आयोजकांनी त्याच सिनेमाचा आणखी एक शो ठेवण्याचं ठरवलं. दोन्ही शोजना तुडुंब गर्दी झाली. ‘क्लोजिंग फिल्म’चा मान मिळाला म्हणजे सिनेमात नक्कीच दम असणार असा अनेकांचा समज. त्यामुळे तो सिनेमा बघण्याचा हट्टही अनेकांचा तसाच होता. अखेर या साऱ्या गोंधळाला पूर्णविराम लागला. सिनेमा अर्धा ते पाऊण तास उशिरा सुरू झाला. सिनेमाची कथा खूप साधी. पण,  मांडणी आणि विषयाची हाताळणी जरा वेगळी. न सांगताही सांगून गेलेल्या गोष्टी या सिनेमातही होत्या. फ्रेंच संगीतकार एका भारतीय सिनेमाला संगीत देण्यासाठी भारतात येतो. तिथे त्याची एका फ्रेंच तरुणीशी मैत्री होते. या मैत्रीचा प्रवास म्हणजे ‘वन प्लस वन’. यातला नायक प्रेक्षकांना आकर्षित करतो. त्याच्यातला हजरजबाबी आणि मिश्कील स्वभाव दिग्दर्शकाने चांगला मांडलाय. सिनेमाची भाषा फ्रेंच असून कथा ऐंशी टक्क्यांहून जास्त भारतात फिरते. त्यामुळे ही एक वेगळी संगती बघायला मिळते.

‘धीपन’ आणि ‘द हेड हंटर’ या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची चांगली प्रतिक्रिया मिळाली. भारताच्या पूर्वेकडील भागातील एका जंगलातील आदिवासी माणसाची कथा म्हणजे ‘द हेड हंटर’. तो राहत असलेलं जंगल त्या भागातील अत्यंत धोकादायक जंगल आहे. त्यामुळे सरकार काही भागातील जंगल साफ करुन एक रस्ता करण्याचं योजतात. पण, जंगलात एकटाच राहणारा तो आदिवासी मात्र सरकारला विरोध करतो. सरकारी नोकरांपैकी एक जण त्या आदिवासी भाषा जाणतं, समजतं. त्यामुळे तो त्याच्या परीने ही अडचण हाताळण्याचे त्याच्या साहेबांना सुचवतो. हळूहळू बाहेरच्या जगाची ओळख करून देत, सवय लावत सिनेमाचा नायक त्या आदिवासी माणसाला जंगलातून बाहेर काढतो. एका हॉटेलमध्ये आदिवासी माणसाची राहण्या-खाण्यापिण्याची व्यवस्था करून देतो. तोवर तिकडे जंगलातून मार्ग काढण्याचा सरकारचा मार्ग मोकळा होतो. सरकारचं काम झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडलं जातं. आदिवासी शहरात आल्यानंतरचा नवखेपणा, निरागसता, समाधानी वृत्ती असं सगळं काही दिग्दर्शकाने टिपलं आहे. सिनेमाचा विषय फार वेगळा नाही. पण, मांडणी आणि दिग्दर्शनामुळे सरस ठरतो. या सिनेमात सगळ्यात जास्त लक्षात राहिली असेल ती सिनेमाटोग्राफी. जंगल म्हटलं की, सहसा मोठे प्राणी, नेहमीचे ठरलेले कीटक, पक्षी असे दाखवले जातात. पण, या सिनेमात वेगवेगळ्या कीटकांवर लक्ष केंद्रित केलंय. एका कोळ्याने त्याचं जाळं केलंय आणि तो त्यावर बसलाय असं एक दृश्य आहे. या दृश्याच्या मागे आदिवासी झाडावर टेकून झोपल्याचं थोडं अस्पष्टपणे दिसतंय, असा एक प्रसंग आहे. त्या कोळ्याने केलेल्या जाळ्यावर दुसरा मोठय़ा आकाराचा कोळी येऊन बसल्याचा त्यापुढचा प्रसंग आहे. या संपूर्ण प्रसंगात एकही संवाद नाही. पण, हा प्रसंग अत्यंत सूचक भाष्य करतो. ज्याप्रमाणे पहिल्या कोळ्याच्या घरावर दुसरा कोळी येऊन बसला तसंच त्या आदिवासीच्या घरावर म्हणजेच जंगलावर सरकार अतिक्रमण करतंय, हे ते सूचक भाष्य. सिनेमाटोग्राफीसोबत या सिनेमाचं संगीत आणि पाश्र्वसंगीतही सुंदर. अनमोल भावेने दिलेल्या संगीताने सिनेमा आकर्षक वाटतो.

श्रीलंकेतील युद्ध टाळण्यासाठी तिथून एक माणूस, एक बाई आणि एक लहान मुलगी असे तिघे एक कुटुंब असल्याचं दर्शवतात आणि पॅरिसमध्ये स्थलांतर करतात. ‘धीपन’ हा सिनेमा या तिघांभोवती फिरतो. इथे ते छोटी-मोठी कामं करत जगताहेत. मुलीला शिक्षण देताहेत. पण, काही काळानंतर इथेही पुन्हा युद्धसदृश संघर्ष द्यावाच लागतोय. पण, या संघर्षांतून जाताना एकमेकांशी रक्ताचं नातं नसलेले तिघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. सिनेमातल्या कलाकारांचा अभिनय उत्तम झालाय. भारत-पाकिस्तान फाळणीवर अनेक सिनेमे झाले. त्यापैकीच ‘गर्म हवा’ हा एक सिनेमा. १९७३ साली आलेला हा चित्रपट फाळणीवर वेगळ्या प्रकारे भाष्य करतो. फार आक्रमक वगैरे न होता फाळणीमुळे होणारे पडसाद सहन करणाऱ्या आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या कुटुंबाची ही कहाणी आहे. फाळणी हा विषय घेऊन केलेल्या इतर सिनेमांपैकी ‘गर्म हवा’ हा उत्तम सिनेमा आहे, अशी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे अशा जुन्या सिनेमांवरही प्रेक्षागृहात गप्पा, माहिती देणं-घेणं, चर्चा असं सतत सुरूच होतं.

सतरावा मुंबई फिल्म फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात पार पडला. बडे सेलिब्रेटी, उद्योजक, समीक्षक, सिनेप्रेमी अशा अनेकांच्या उपस्थितीत फेस्टिवल रंगला. राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांचे विविध भाषिक सिनेमे बघून खऱ्या अर्थाने सिनेप्रेमींची दिवाळी साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही..!

लघुपटांची मेजवानी

सतराव्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमधलं विशेष आकर्षण ठरलं ते ‘डायमेन्शन्स मुंबई’ हा विभाग. खरंतर हा विभाग दरवर्षीच लक्षवेधी ठरतो. कारणही तसंच आहे. या विभागात एकाच थीमवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेली क्रिएटिव्हिटी दिसून येते. नेहमी ‘वेगळं काहीतरी’च्या शोधात असलेली तरुणाई ‘डायमेन्शन्स मुंबई’साठीही काहीतरी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ शोधण्याचा प्रयत्न करत असतात. काहींचा प्रयत्न यशस्वी होतो तर काहींचा फारसा नाही. पण, दिलेल्या संकल्पनेवर विविध नजरेतून बघण्याचा आणि ते मांडण्याचा प्रयत्न करतात हेही चांगलंच. ठरवून काहीतरी हटके करायला न जाता साध्या, सोप्या गोष्टींतून बरंच काही सांगून जाणारी गोष्ट त्यांना जास्त भावते. म्हणूनच युवा पिढीने ‘डायमेन्शन्स मुंबई’ या विभागांतर्गत असलेल्या मुंबई या थीमवर वेगवेगळ्या पण, साध्या-सोप्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकला. रोजच्या जगण्यातल्या गोष्टी, भावना, वस्तू अशा अनेक बाबींचा इथे विचार झालेला दिसतो. पाच मिनिटांच्या लघुपट आणि माहितीपटांद्वारे मुंबईचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न तरुणाईने यशस्वीरीत्या केला आहे.

मुंबई.. हा शब्द उच्चारला तरी असंख्य गोष्टी डोळ्यांसमोर येतात. लोकल ट्रेन, वडापाव, टॅक्सी, रिक्षा, धावपळ, बहुभाषिक लोक, मोठमोठाले टॉवर्स, बॉलीवूड, समुद्र, चौपाटी, ऐतिहासिक वास्तू, बम्बय्या हिंदी आणि दहशतवादी हल्ले.. मुंबई भुरळ पाडणारं शहर. स्वप्नांची नगरी. लांबून जितकी आकर्षक दिसते तितकीच तिच्या जवळ गेलं की नवख्या माणसाला घाबरवून सोडते. पण, त्याच घाबरलेल्या माणसाला आधार देऊन तिथेच जगायलाही शिकवते. कोणत्याही ठिकाणच्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट. कोणत्या बाजूचा कसा आणि कशासाठी उपयोग करून घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. मुंबईचंही तसंच आहे. चांगलं ते घ्यावं आणि वाईट ते सोडून द्यावं असंच आहे इथेही. स्वप्न बघणारे असंख्य लोक रोज या नगरीत प्रवेश करतात. सुरुवातीला त्यांना इथल्या गोष्टींचं अप्रूप वाटतं, मग त्या ओळखीच्या होतात, मग त्यांच्याशी मैत्री होते आणि मग सवय..! या सवयीमुळे या गोष्टी अनेकांच्या जगण्याचाच एक भाग होऊन जातात.

लघुचित्रपट म्हणजे शॉर्टफिल्म हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. दिवसागणिक ते अधिकाधिक प्रभावी होत जाणार आहे. कमी शब्दांत किंवा शब्दाविनाच कमी वेळात गोष्ट मांडण्याचं माध्यम म्हणून ‘शॉर्टफिल्म’चं महत्त्व वाढतंय. कोणताही लघुपट प्रेक्षकांनाही विचार करायला लावतो. त्यात न सांगितलेल्या काही गोष्टी प्रेक्षकांना शोधायच्या असतात. ‘डायमेन्शन्स मुंबई’मधल्या अनेक शॉर्टफिल्म्स अशा प्रकारे समोर येतात. ‘वडापाव’, ‘काली पिली’, ‘मीट द वॉइस’, ‘सस्ता बच्चन’, ‘टेल्स फ्रॉम मेरवान्स’ अशा काही माहितीपटांनी आणि ‘नवाझ’, ‘बॉम्बे विझन’, ‘घालीन लोटांगण’ या लघुपटांनी  लक्ष वेधून घेतलं. खरंतर या विभागातल्या सगळ्याच शॉर्टफिल्म्स लक्षात राहण्यासारख्या होत्या. कारण प्रत्येकातून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न होता. ‘प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणारी लोकल…’ असा आवाज मुंबईकर रोज ऐकतो. या आवाजानुसार आपली दिशा ठरवतो. इतर गोष्टींप्रमाणेच हा आवाजही सवयीचा होतो. पण, हा आवाज नेमका आहे कोणाचा हे सांगणारा माहितीपट म्हणजे ‘मीट द वॉइस’. सरला चौधरी आणि गणेश श्रीनिवास हे दोघे या आवाजाच्या मागचे सुरुवातीचे चेहरे. या माहितीपटात त्यांचा प्रवास, अनुभव दाखवला गेला. या नोकरीची आलेली संधी, नोकरीसाठी झालेली त्यांची निवड, नोकरीचा प्रवास, अनुभव हे सगळं त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलं. यामध्ये विशेष म्हणजे गणेश श्रीनिवास हे अंध आहेत. एका दृष्टिहीन माणसाने आपल्या आवाजाने इतरांना दिशा दाखवणं म्हणजे कमाल! मुंबई आणि लोकल ट्रेन या समीकरणाप्रमाणेच आणखी एक समीकरण सगळ्यांना तोंडपाठ आहे. मुंबई आणि वडापाव हे ते समीकरण. मुंबईत आलोय आणि वडापावचा आस्वाद घेतला नाही तर तुम्ही कितीही जिवाची मुंबई केली तरी खऱ्या अर्थाने मुंबईची मजा अनुभवलीच नाहीत असंच म्हणावं लागेल. वडापाव. मुंबईतलं असं खाणं ज्यामुळे कमी पैशात, कमी वेळात एखाद्याचं पोट भरतं. स्वस्त आणि मस्त या दोन्हीत बसणारं एकदम योग्य असा पदार्थ. मुंबईत धावपळ करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरलेला वडापाव नेमका आला कधी, कुठून, कोणाकडून याविषयीचा माहितीपट म्हणजे ‘वडापाव’. हा माहितीपट जवळचा वाटतो. अशोक वैद्य यांनी सुरू केलेला वडापाव हा मुंबईची ओळख बनला. मुंबईत गल्लोगल्ली असलेल्या वडापावच्या गाडय़ा, तिथे चालणाऱ्या व्यवसायाचे महत्त्व अशा सगळ्यावर भाष्य करणारा ‘वडापाव’ खास वाटतो.

लघुपट हे प्रभावी माध्यम असलं तरी ते प्रेक्षक म्हणून आपण समजून घेण्याचंही माध्यम आहे. त्यामुळे त्यातलं ‘अनसेड थिंग्स’, ‘बीटविन द लाइन्स’ हे प्रेक्षकांना शोधावं आणि समजून घ्यावं लागतं. ‘बॉम्बे विझन’, ‘नवाझ’ हे दोन लघुपट याच पठडीतल्या आहेत. मुंबईतले दहशतवादी हल्ले कधीच कोणताही मुंबईकर विसरू शकणार नाही. या हल्ल्यांमुळे मुंबईकर आणखी जागरूक झाले. पण, आजही संशयाची नजर काही वेळा वर येतेच. कारण आजही मुंबईकर स्वत:ला इथे पूर्णत: सुरक्षित मानत नाही. यावरच भाष्य करणारा लघुचित्रपट म्हणजे ‘बॉम्बे विझन’. सीएसटीहून निघणारी शेवटची ट्रेन. कर्जतची. शेवटची म्हणून अनेकांची त्यासाठी धावाधाव. एक प्रवासी आत डब्यात बसलेला असतो. पुढच्या स्टेशनवर दुसरा एक प्रवासी चढतो. पहिला प्रवासी दुसऱ्या प्रवाशाकडे संशयाच्या नजरेने बघतो. कारण तो मुस्लीम असतो. दुसरा प्रवासी पहिल्याकडे पाणी मागतो. पहिला ‘नाही’ असं सांगतो. दुसरा त्याची मोठी बॅग वर ठेवून पुढच्या स्टेशनवर उतरतो. पहिल्याला वाटतं की तो बॅग वर ठेवून खाली उतरला म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी आहे. या विचाराने अस्वस्थ झालेला पहिला प्रवासी ट्रेन सुरू झाल्यावर त्याच स्टेशनवर घाबरून उतरतो तर दुसरा प्रवासी त्याच वेळेत ट्रेनमध्ये चढतो. इथे फिल्म संपते. तात्पर्य, केवळ संशयाने आणि शाहनिशा न केल्याने पहिल्याची शेवटची ट्रेन जाते आणि दुसऱ्याला शेवटची ट्रेनही मिळते आणि पाणीही मिळतं. मुंबईकरांची असुरक्षित असण्याची भावना यातून दिसून येते. पण, असुरक्षित वाटत असतानाच आपली विचारशक्ती आपण शाबूत ठेवली पाहिजे हे महत्त्वाचं आहे.

अशीच एक फिल्म म्हणजे ‘नवाझ’. खरंतर फिल्मच्या नावावरून पटकन डोळ्यासमोर येतो तो नवाझुद्दिन सिद्दिकी. अत्यंत हुशार अभिनेता. ही शॉर्टफिल्मही त्याच्याबाबतीतच आहे. त्याच्या एका चाहत्याची कथा आहे यात. नवाझ नावाचा उभारता कलाकार नवाझुद्दिन सिद्दिकीसारखा होऊ पाहतोय. त्यांच्या मुलाखती, सिनेमे बघून अभिनय शिकणारा, त्याचं अनुकरण करणारा नवाझ ऑडिशनसाठी दारोदारी भटकतोय. अनेक ठिकाणहून नकार येऊनही त्यातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्मीही त्याला नवाझुद्दिनच्या मुलाखतीतून मिळते. एकदा तो एका रिक्षेने ऑडिशनला जातो. ऑडिशनचं ठिकाण येतं. तो उतरतो. पैसे किती झाले विचारतो. रिक्षावाला म्हणतो, ‘‘ऑडिशनला जातोयस ना, पैसे नको देऊस.’’ नवाझला कळत नाही. रिक्षावाला तसाच जातो. तर त्या रिक्षेच्या मागे लिहिलेलं असतं ‘राजेश खन्ना’. फिल्म इथे संपते. यातलं ‘बीटवीन द लाइन्स’ खूप काही सांगून जातं. अर्थात यातून सकारात्मक, नकारात्मक यापैकी कोणता विचार पुढे घेऊन जायचा हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन. अभिनय क्षेत्रात काही होऊ शकलं नाही म्हणून रिक्षा चालवतो हा नकारात्मक विचार घ्यायचा की अभिनय क्षेत्रात काहीही झालं नाही तरी आयुष्य थांबत नाही, काम करत राहायचं असा सकारात्मक विचार करायचा हे ठरवणं महत्त्वाचं आहे. हे ‘बीटवीन द लाइन्स’ शोधणं, समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि ते शोधून काढण्यासाठी फिल्मकर्त्यांनी वाव दिला पाहिजे. चार ते पाच मिनिटांच्या कालावधीत त्यांना त्यांचं संपूर्ण कौशल्य दाखवावं लागतं. कथा, दिग्दर्शन, सिनेमाटोग्राफी, संकलन, पाश्र्वसंगीत असं सगळ्यासाठीच कालावधी कमी असतो. पण, तरीही त्यात नेमक्या गोष्टी नेमक्या पद्धतीने बसवण्याचं चोख काम त्यांना करावं लागतं. ‘डायमेन्शन्स मुंबई’मधल्या तरुण फिल्ममेकर्सनी ही चोख कामगिरी फत्ते केली.

यंदाच्या डायमेन्शन्स मुंबईमध्ये माहितीपटावर आधारित फिल्म्स चांगल्या विषयांवर केल्या होत्या. ‘सस्ता बच्चन’, ‘मिमोज’, ‘काली पिली’, ‘टेल्स फ्रॉम मेरवान्स’, ‘अ वाइज क्रॅब’ या माहितीपटांनीही लक्ष वेधून घेतलं. या सगळ्याचे विषय अगदी साधेसोपे होते. पण, मांडणी, सादरीकरण उत्तम असल्यानं त्या रंजक बनल्या. ‘सस्ता बच्चन’ या माहितीपटाच्या नावातच विषय कळतो. अमिताभ बच्चन यांच्याशी निगडित ही फिल्म आहे. बिग बींसारखा दिसणारा, त्याचं अनुकरण करणाऱ्या शशिकांत पेडवाल यांच्याबद्दलची माहिती या लघुपटात आहे. अमिताभ यांच्यासारखं दिसणं, अनुकरण करणं, त्यांच्यासारखं वावरणं, तसे कार्यक्रम करणं, त्यांच्या भेटीचा अनुभव, सुरुवात असं सगळ्याची माहिती त्यांनी या लघुपटात दिली आहे. लघुपटातही माहितीपट करणंही आव्हानात्मक असतं. माहितीपट असला तरी केवळ माहिती देताना ती रंजक कशी होईल याकडेही लक्ष द्यावं लागतं. केवळ विशिष्ट व्यक्तीची किंवा वस्तूची माहिती गोळा करून ती दाखवणं एवढंच काम नसतं. तर त्याची मांडणीही महत्त्वाची ठरते. तसंच काही वेगळं तंत्र वापरून किंवा वेगळी हाताळणी करता येईल का, हेही बघितलं जातं. ‘सस्ता बच्चन’मध्ये शेवट ‘अग्निपथ’मधला लोकप्रिय संवादाबाबत असा प्रयोग केला आहे. अमिताभ यांच्या आवाजातला तो संवाद आणि शशिकांत पेडवाल यांनी काढलेल्या अमिताभच्या आवाजातला संवाद एकत्र एकाच वेळी ऐकवण्यात आलाय. हा प्रयोग नवा नसला तरी या माहितीपटात चांगला जमून आलाय.

‘कुणाल’, ‘मिमोज’, ‘दरबदार’, ‘सिली शीप’, ‘मिनिमम सिटी’ हे जरा वेगळ्या पठडीतले लघुपट आणि माहितीपट बघायला मिळाले. एकुणात, दरवर्षीप्रमाणे यंदाही फेस्टिव्हलमध्ये ‘डायमेन्शन्स मुंबई’ हा विभाग लक्षात राहिला. दरवर्षी ‘मुंबई’ हीच थीम असली तरी मुंबईचे किंवा मुंबईमधले विविध पैलू दाखवण्याचं कौशल्य तरुण मंडळी दाखवत असतात. त्यामुळे सतराव्या मामि फेस्टिव्हलमध्ये चित्रपटप्रेमींना मुंबईवर आधारित लघुपटांची मेजवानीच मिळाली होती.

बॉलीवूडकरांची मांदियाळी

दरवर्षी काहीना काही वेगळं देण्याचा मामि फिल्म फेस्टिवलचा प्रयत्न असतो. सिनेप्रेमींसाठी आकर्षक सिनेमे आणि कार्यक्रम दाखवण्याकडे फेस्टिवल आयोजकांचा कल असतो. या वर्षी संपूर्ण एक दिवस बॉलीवूडकरांसोबत घालवण्याचा आनंद सिनेप्रेमींना घेता आला. ‘मूवी मेला’ हा अनोखा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. दिग्दर्शक-निर्माता-लेखक राजकुमार हिरानी आणि लेखक-निर्माता अभिजात जोशी या जोडीच्या क्रिएटिव्ह गोष्टींच्या गप्पा एका मैफलीत रंगल्या होत्या. या गप्पांमधून सिनेसृष्टीत येऊ पाहणाऱ्या इच्छुकांना मार्गदर्शनही मिळत होतं. यानंतर काही वेळ अनेकजण बालपणात हरवून गेले होते. कारण होतं ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाचं रियुनियन. अनिल कपूर, श्रीदेवी, सतीश कौशिक, अफताब शिवदसानी, अहमद खान, हुझान खोदैजी, करण नाथंद, बोनी कपूर अशी सिनेमाली कलाकार मंडळी या कार्यक्रमासाठी अवतरली होती. सिनेमातल्या आठवणी, किस्से, सिनेमा बनण्याची प्रक्रिया या साऱ्याच्या गप्पा तिथे रंगल्या होत्या. ‘मिस्टर इंडिया’सारख्या एव्हरग्रीन सिनेमातल्या कलाकारांना एकत्र बघणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं हा आनंद सिनेप्रेमींनी चुकवला नाही. कबीर खान, दिबाकर बॅनर्जी आणि झोया अख्तर या लेखक-दिग्दर्शक-निर्माता असलेल्या त्रिकुटाचा संकल्पनांच्या वैविध्यांवर, ते करत असलेल्या प्रयोगांवर, सृजनशीलतेवर आधारित गप्पांचा कार्यक्रम रंगला होता. या तिघांनीही वेगळ्या धाटणीचे सिनेमे देऊन इंडस्ट्रीत नाव कमवलं आहे. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्याची संधी चित्रपटप्रेमींनी हुकवली नाही.

दीपिका पदुकोणचा आठ वर्षांचा प्रवास तिने उलगडून सांगितला, तर वरुण धवनने त्याला घडवलेल्या सिनेमांबद्दल भाष्य केलं. या दोघांच्याही चाहत्यांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. बॉलीवूडमध्ये तरुण पिढीची साखळी आता हळूहळू मोठी होताना दिसतेय. या साखळीतले काही कलाकार उत्तम अभिनयाचा वारसा निश्चितच पुढे नेतील. अशाच काहींना एका कार्यक्रमात एकत्र आणण्याचं काम फेस्टिवलने केलं. परिणिती चोप्रा, आलिया भट, कीर्ती सनन, आदित्य रॉय कपूर, आयुषमान खुराना, अर्जुन कपूर या तरुण कलाकारांची मतं जाणून घेता आली. बॉलीवूडची पुढची पिढी म्हणून येणाऱ्या आव्हानाबद्दल प्रत्येकाने आपापले विचार मांडले. लोकप्रिय संगीतकारांपैकी एक म्हणजे प्रीतम. त्याने संगीत दिलेली गाणी आजही लक्षात आहेत. त्याच्या अशाच काही लोकप्रिय गाण्यांबद्दल आणि सिग्नेचर टय़ुन्सबद्दल त्याने प्रेक्षकांशी संवाद साधला. असा बॉलीवूडमय एक दिवस दिमाखात पार पडला.

मराठी सिनेमांची संख्या कमी

गेल्या वर्षी म्हणजे सोळाव्या मामि फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारली होती. ‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘नागरिक’, ‘रंगा पतंगा’, ‘सिद्धांत’ हे मराठी सिनेमे गेल्या वर्षी स्पर्धेत होते. यातल्या काहींनी पुरस्कारही मिळवले आहेत.  या यादीत ‘ख्वाडा’ हाही सिनेमा होता. पण, काही कारणांमुळे या सिनेमाचं स्क्रीनिंग फेस्टिवलमध्ये होऊ शकलं नव्हतं. पण, ‘किल्ला’, ‘कोर्ट’ या सिनेमांसोबत ‘ख्वाडा’नेही राष्ट्रीय पुरस्कारावर बाजी मारली होती. प्रत्येक सिनेमांचा विषय आणि बाज वेगळा होता. त्यामुळे हे सिनेमे फेस्टिवलमध्ये आलेल्या मराठी-अमराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्याबाबत तशी चर्चाही होतच असायची. यंदाही चर्चा ऐकू आली. पण, या वेळी चर्चेचा सूर वेगळा होता. ‘फेस्टिवलमध्ये म्हणावे तितके आणि म्हणावे तसे मराठी सिनेमे नाहीत’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. विशेष म्हणजे अमराठी प्रेक्षकांकडून या प्रतिक्रिया जास्त ऐकायला मिळत होत्या. यावरून एक लक्षात आलं की, मराठी सिनेमे फक्त पुरस्कारांपर्यंत न पोहोचता खऱ्या अर्थाने अमराठी प्रेक्षकांपर्यंतही पोहोचत आहेत. पण, फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी असल्याची खंत अनेकांना जाणवत होती. यंदा ‘कौल’, ‘रिंगण’ वगळता मराठी सिनेमे दिसले नाहीत. त्यामुळे मराठी सिनेमांची चांगल्या अर्थाने चर्चाही झाली नाही. एवढं मात्र नक्की, फ्रेंच, स्पॅनिश, इरानी अशा इतर भाषिक सिनेमांसोबतच प्रेक्षक आतुरतेने मराठी सिनेमांची वाट पाहतोय.

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
Twitter: @chaijoshi11

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai film festival