scorecardresearch

मनमुक्ता : आरोग्यपूर्ण ‘ती’

मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना देण्यात येणाऱ्या हिणकस वागणुकीविषयी हल्ली लिहिलं-बोललं जातंय.

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर इथं वसतिगृहातल्या मुलींच्या संदर्भात घडलेली घटना म्हणजे आपल्या समाजाचा आरसाच आहे. एकीकडे मंगळावर यान पाठवणारे आपण स्त्रियांच्या मासिक पाळीसारख्या घटनेकडे कसे बघतो, यातूनच आपल्या समाजाचा दुटप्पीपणा लक्षात येतो.

‘ती’ वेळेच्या आधी आली तरी काळजी आणि उशिरा आली तरी  चिंता, ‘ती’ येईपर्यंत तिची वाट बघायची आणि आली की, तिला  नावं ठेवायची.. किती त्रास म्हणून दर महिन्याला तिला कोसायचं.. मासिक पाळीची कथा ही अशी आहे. तिच्याविषयी बोलायचीच चोरी त्यामुळे चर्चा तर बाजूला ठेवा.

मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना देण्यात येणाऱ्या हिणकस वागणुकीविषयी हल्ली लिहिलं-बोललं जातंय. या स्तंभातूनही याविषयी यापूर्वी लिहिलं आहे. पण गेल्या महिन्याच्या शेवटाला उत्तर प्रदेशातून एक विचित्र बातमी आली होती आणि पुन्हा एकदा या सगळ्याचा स्त्री आरोग्याच्या दृष्टीने विचार करावासा वाटला. अर्थात अशा बातम्या आपल्याकडे अधूनमधून येतच असतात. अशा बातम्या ऐकल्यावर धक्का बसतो, पण नंतर या धक्क्य़ाचीही सवय होते. त्याची सवय होणं हेदेखील कधीकधी फार खुपतं.. तर बातमी होती मुझफ्फरनगरमधल्या एका मुलींच्या वसतिगृहाची. या वसतिगृहातील मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग दिसले. ही कुणाची अस्वच्छता हे सिद्ध व्हावं म्हणून तिथल्या लेडी वॉर्डनी सर्व मुलींना कपडे काढून उभं राहायला सांगितलं. कुणाची मासिक पाळी सुरू आहे आणि कुणामुळे हे डाग दिसताहेत याची तपासणी करायचा हा उद्योग मुलींनी घरी सांगितल्यावर माध्यमांपर्यंत पोचला आणि सगळीकडे पसरला. इंटरनेटवर या बातमीच्या निमित्ताने अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या. त्यावर अनेक जण व्यक्त झाले. पुन्हा एकदा स्त्रियांना पाळीच्या दिवसात मिळणाऱ्या अमानवी वागणूक याची चर्चा झाली.

वॉर्डनवर कारवाईची मागणी सर्व थरांतून झाली. तिला निलंबितही करण्यात आलं. पण तिचं या प्रकरणातलं स्पष्टीकरण थोडं विचार करायला लावणारं होतं. कुठल्याही आरोपीप्रमाणे तिचं म्हणणंही हे सगळं प्रकरण खोटं, मुद्दाम रचलेलं कुभांड आहे आणि आपल्या प्रतिस्पध्र्यानी मुलींना भडकवून आपल्याविरोधात केलेलं कारस्थान आहे.. असंच आहे. वॉर्डन म्हणते की, वसतिगृहातील ११- १२ वर्षांच्या सर्व मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता नसते. कित्येकींना याविषयी माहिती नसते. प्रथम पाळी यायचं हे वय आणि या वयात या मुली पालकांपासून दूर वसतिगृहात राहात असतात. त्यांच्यापैकी कुणाला पाळी सुरू झाली तर कळायला हवं, त्यांनी सांगायला हवं म्हणून मी त्यांना वेगळं बोलावलं होतं. कपडे काढण्याचा प्रकार झाला नाही, हे कारस्थानच वगैरे ती वॉर्डन सांगते त्यात किती तथ्य आणि मुलींच्या आरोपांमध्ये किती तथ्य हा तपासाचा भाग असला तरी या वयातील मुलींमध्ये पाळीविषयी असणारी अजाणता, अपसमज हा विषय खोटा नाही.

खरं तर एकूणच आपल्या देशात मासिक पाळीविषयी किती जागरूकता आहे याविषयी शंका वाटते. अगदी आपापल्या घरात राहणाऱ्या, आई-वडिलांच्या लाडक्या मुलीलाही पाळीविषयी नेमकं काय ज्ञान दिलं जाईल याबाबत काही सांगता येत नाही. बहुतेकता पहिल्या पाळीच्या वेळी ती नैसर्गिक गोष्ट आहे यावर भर देऊन त्यामागचं विज्ञान समजावून देण्याऐवजी आपल्याकडच्या घराघरांमध्ये पाळीमुळे येणारी सामाजिक-धार्मिक बंधनं लादण्याची, ती समजावण्याचीच पालकांना घाई झालेली असते. पाळीविषयी नकारात्मक भावनेला अशी घरापासूनच सुरुवात होते.

एका सर्वेक्षणानुसार मासिक पाळीदरम्यान पुरेशी स्वच्छता न पाळल्याने होणारे विकार किंवा आजार यांचा ७० टक्के भारतीय स्त्रियांना कधी ना कधी त्रास होतो. हे वास्तव भीषण आहे. या सगळ्याचं मूळ पुन्हा एकदा पाळी ही लाजिरवाणी गोष्ट आहे या मानसिकततेत आहे. मासिक पाळी हा कसा अजूनही टॅबूचा विषय आहे, निषिद्ध आहे, अपवित्र आहे, घाण आहे याविषयी.. अर्थात या विरोधात हल्ली वारंवार बोललं जातंय. सोशल मीडियावरून मुली व्यक्त होताहेत, पण याविषयीचा पारंपरिक पगडा एवढा जबरदस्त आहे की, व्यक्त होणाऱ्यांपैकी, ते वाचणाऱ्यांपैकी किती मुली, स्त्रिया पाळीच्या दिवसात नॉर्मल आयुष्य जगू शकतात हा मात्र प्रश्न आहे. टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात लागली तरी पटकन तोंड फिरवणारे किंवा चॅनल बदलणारे घरातले मोठे आपल्या वागण्यातून याविषयीच्या भावना लहानांपर्यंत कळत-नकळत बिंबवत असतात.  ‘ते चार दिवस’ – असं म्हणून या दिवसाविषयी चारचौघात बोलायचीही बंदी असते आपल्याकडे. त्यामुळे मुलगी पहिल्यांदा वयात येते, त्या वेळी पाळीच्या दिवसांमध्ये शारीरिक स्वच्छतेची, आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगणारी तिची आई किंवा इतर कुणी मोठी स्त्री याविषयी बाहेर वाच्यता कशी नको हेच आधी सांगत बसते. मागच्या पिढीतल्या स्त्रिया ज्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात वाढल्या त्याचा त्यांच्यावर एवढा प्रभाव असतो की, त्यातून पाळीची गोष्ट कशी लपवून ठेवायची, कसं बाजूला बसायचं, देवाला कसं शिवायचं नाही आणि तुझा कसा विटाळ होऊ शकतो याचीच जास्त ‘शिकवण’ या पिढीची आई देते. स्वच्छतेच्या संस्कारांचं काय, हा गौण मुद्दा.

त्यातून मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरणं ही आजच्या काळातही गरज नसून ऐश समजली जाते. एक तर सॅनिटरी नॅपकिन्सच्या किमती जास्त आहेत. विदेशी ब्रॅण्ड्सचे आपल्यापर्यंत जाहिरातीच्या माध्यमांतून पोचणारे नॅपकिन्स तर महिन्याचं बजेट कोलमडेल अशा चढय़ा भावात विकले जातात. कित्येक घरांमधून सॅनिटरी नॅपकिनची काय गरज, कपडा वापरा.. आम्ही नाही वापरला आयुष्यभर? असा सूर असतो. मुळात ७२ टक्के भारतीय स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं परवडतच नाही आणि उरलेल्यांपैकी १२ टक्के स्त्रियाच ते वापरतात, असंही एक सर्वेक्षण सांगतं. आता नव्या करप्रणालीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सवर ‘जीएसटी’ रद्द करावा अशी मागणी करणारी एक याचिका आसामच्या खासदार सुश्मिता देव यांनी दाखल केली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी याची दखल घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पर्यावरणस्नेही सॅनिटरी नॅपकिन्सला करमाफी देण्याची मागणी केली आहे. विघटन होऊ शकतील असे सॅनिटरी पॅड्स करमुक्त असावेत, असं मनेका गांधींनी म्हटलंय. असं झालं तर सॅनिटरी नॅपकिन्सची किंमत थोडी कमी होऊ शकते.

पाळीदरम्यानची शारीरिक स्वच्छता हा विषय प्रामुख्याने विचार करायचा विषय आहे. आपल्या देशात अजूनही अशा पॅड्सऐवजी कपडा, प्लॅस्टिक, वाळू काय वाटेल ते वापरून या चार दिवसांचा प्रश्न मिटवला जातो. या साधनांमुळे आवश्यक स्वच्छता पाळली जाते का हा मुद्दा येतो. या चार दिवसांत त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील मुलींची शाळा बुडते, कॉलेजला त्या जात नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरण्याचीच त्यांच्यावर बंदी येते. मुळात हा प्रश्न नाही, हे निसर्गनियमाप्रमाणे येणारं चक्र आहे यासाठी आधी जागरूकता निर्माण व्हायला हवी. धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन या चार दिवसांतल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. इतर शारीरिक बदलांप्रमाणे हा अपरिहार्य भाग आहे आणि त्यासाठी स्त्रीला वेगळी वागणूक देण्याची आवश्यकता नाही. त्याविषयी बोलणं गुन्हा नाही आणि लाजिरवाणं तर नक्कीच नाही, हे बिंबवलं गेलं तरच टॅबू नष्ट होऊ शकेल आणि मुझफ्फरनगरच्या वसतिगृहात झाले तसे अश्लाघ्य प्रकार होण्याचे थांबतील.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Muzaffarnagar hostel case warden allegedly stripped seventy girls to check if they were menstruating