मुंबईपासून ७०-८० किलोमीटरवर सफाळे इथं एक चित्रशिबीर अलीकडेच पार पडलं. स्थानिक लोकांचं आणि शिबिरार्थीचं चित्रकलेशी नव्याने नातं जोडण्याचा हा उपक्रम रंग-रेषांचं एक नवं रूप दाखवून गेला.

पानांकडे बघता बघता

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

झाडे मला म्हणाली

अरे तुझी कुऱ्हाड

लोखंडाची असली तरी

दांडा आमच्याच फांदीचा असतो..

तशी तुझ्या अंतिम यात्रेलाही

आमचीच लाकडं असतात..

त्यामुळे संपलो आम्ही

तर संपशील तूही घुसमटून

फक्त चुकून राहिलेल्या

सुक्या बीजांडापासून

आम्ही पुन्हा जन्माला येऊ शकतो

तुला मात्र एकदा संपल्यावर

उगवता येणार नाही कधीच

एवढेच फक्त जरा लक्षात घे..

निसर्गाचं माणसाशी असलेलं अतूट नातं माणूस विसरायला लागलाय म्हणून त्याच्या भावना व्यक्त करणाऱ्या या ओळी आहेत चित्रकार आशुतोष आपटे यांच्या.. आपलं संकुचित जग, जगण्याच्या आखीव चौकटी भेदून बाहेरचं जग पाहायला लावणारी दृष्टी आणि क्षुद्रपणाची आपली जाणीव अधिक तीव्र करणारा भोवताल जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली कलासाक्षरता आज समाजात दिसत नाही. मला कलेतलं, चित्रातलं काही कळत नाही असं म्हणून सर्वसामान्य माणूस चित्र किंवा चित्रप्रदर्शन बघायला जात नाही. पण चित्रंच जर त्याच्यापर्यंत आली आणि चित्रकार त्याच्या गावात येऊन चित्र काढताना दिसला तर त्याच्या मनात कुतूहल निर्माण होतं. अक्षराची जशी तोंडओळख होते तशी चित्राचीदेखील तोंडओळख होऊ शकते. या विचारातूनच चित्रकार प्रदीप राऊत आणि आशुतोष आपटे यांनी चार दिवसांचे निसर्ग-चित्रण शिबीर सफाळे, जिल्हा पालघर इथल्या निसर्गरम्य परिसरात आयोजित केलं होतं. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध शहरी-ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी, कलाशिक्षक तसंच चित्रकार मिळून चौसष्ट जण सहभागी झाले होते. मथाणे, तांदूळवाडी, सफाळे, गिराळे इथल्या वैशिष्टय़पूर्ण लोकेशन्सवर जाऊन केलेली लॅण्डस्केप्स, चित्रकलेतल्या दिग्गज मंडळींची प्रात्यक्षिके, चर्चा, कलेतले नवे प्रवाह जाणून घेण्याची ही अपूर्व संधी शिबिरार्थीना मिळाली.

शिबिराच्या पहिल्या दिवशी मथाने मुक्कामी परस्परांशी ओळख होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर सायंकाळी या साऱ्या मंडळींशी मनमोकळा संवाद साधला संगीतकार कौशल इनामदार यांनी.. शब्द आणि चित्र यातलं नातं आणि त्यांचा सोबतीनं चालणारा प्रवास गाण्यातल्या मनोरंजक उदाहरणांनी स्पष्ट करून साऱ्यांची मनं जिंकली. नैसर्गिक क्षमता आपल्यात असतातच, पण त्याला कारागिरीची जोड लागते, प्रशिक्षण लागतं. तसाच ‘श्रोत्यापासून रसिक होण्यापर्यंतचा प्रवास’ हा ‘कारागिरापासून कलाकार’ होण्याच्या प्रवासाइतकाच खडतर असतो. रसिकत्व हे कुणी कुणाला बहाल करत नाही तर ते आपलं आपल्यालाच कमवावं लागतं. गाण्याच्या चालीचा आणि चित्राचा संबंध स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘‘मला चाल सुचते ती दुसऱ्या एखाद्या चालीवरून असं नाही तर एखाद्या सिनेमावरून सुचते तशीच एखाद्या चित्रावरूनही सुचते. माझ्या संगीत-शिबिरामध्ये मी विद्यार्थ्यांना गायतोंडेंची चित्रं दाखवतो. कारण गाण्यामध्ये आणि चित्रामध्ये एक मूळ समान धागा आहे. दोघांचाही हेतू अ‍ॅस्थेटिकली स्पेस भरणं हा आहे. गाण्याला दोन पदर-जो ठेका आहे तो टाइम आहे आणि दुसरा सूर जी स्पेस आहे. चित्रकार म्हणून तुम्ही ती स्पेस भरायची आहे. उत्तम कलाकार होण्यासाठी उत्तम तऱ्हेने ऐकायला पण शिकावं लागतं’.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या गप्पा-गप्पांच्या मैफलीपूर्वी सफाळ्यातल्या ‘अंतरंग’ या संस्थेच्या कलाकारांनी भावगीत गायनाच्या अत्यंत सुरेल कार्यक्रमानं उत्कृष्ट वातावरणनिर्मिती करून श्रोत्यांची आणि कौशल इनामदार यांची वाहवा मिळवली.

माणसाच्या जाणिवा प्रगल्भ होत जाताना आपल्या लहानपणी शाळेत शिकलेल्या चित्रकलेच्या तासाचा ठसा त्याच्या मनावरून पुरता पुसला गेलेला नसतो. वर्गाच्या छोटय़ाशा खिडकीतून दिसणारा भवताल, आभाळाचा तुकडा, झाडा-पानांची तुरळक झलक, डोंगर, माती, नदी यांचं दुर्लभ दर्शन एवढय़ा ऐवजावर निसर्गचित्र काढायचं असतं. बंदिस्त आखीव चौकटीतून बाहेरचं तुकडय़ा-तुकडय़ातलं जग लॅण्डस्केपमध्ये उतरवायला सांगणारी शाळांशाळांमधल्या चित्रकलेच्या तासाची ही असते चित्तरकथा!

अशा बंदिस्त जगण्यातून जेव्हा कुणाला खुल्या आभाळाखाली निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेल्या ठिकाणांवर प्रत्यक्ष लॅण्डस्केप करायला मिळतं तेव्हा नेमकं  काय घडतं ते या शिबिराìथनी उत्स्फूर्तपणे केलेल्या लॅण्डस्केप्समधून प्रतिबिंबित होत होतं.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच स्वच्छ आणि निर्मनुष्य मथाणे बीचवर विजय आचरेकर आणि मनोज सकळे या दोन नामवंत चित्रकारांची जलरंग माध्यमातील प्रात्यक्षिकं सुरू झाली. या प्रात्यक्षिकांनंतर चित्रकारांनी विद्यार्थ्यांच्या मनातल्या अगदी साध्या साध्या प्रश्नांनाही मनमोकळी उत्तरं दिली. मनोज सकळे म्हणाले, ‘‘प्रत्येकाची चांगल्याची संकल्पना वेगळी असते. चित्र चांगलं वा वाईट असं ठरवता येत नाही. आपल्याला हे चित्र करताना आनंद झाला का ते जास्त महत्त्वाचं. चित्रकाराला कुठं थांबायला हवं ते कळलं पाहिजे. स्पॉट हाच तुमचा एलिमेंट असायला हवा. उत्तम रचनाचित्र व्हावं पण रचना, रंगसंगती विसरून आपण गुंतून जातो स्पॉटमध्ये. ऑइल, अ‍ॅक्रिलिक, वॉटर, पोस्टर रंगाच्या या साऱ्या माध्यमांचा डोळस वापर करा. प्रत्येक माध्यमाचं स्वत:चं असं सौंदर्य आहे.’’

या प्रात्यक्षिकांनंतर संध्याकाळपर्यंत सफाळे स्टेशनच्या वर्दळीच्या परिसरात, आपापल्या जागा निवडून तिथंच बसून सफाळ्यातल्या लोकजीवनाची झलक दाखवणारी अनेक लॅण्डस्केप्स चित्रकारांनी काढली. या वेळी ग्रामस्थ मंडळी आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या दिवशी या चित्रकारांना एवढय़ा मोठय़ा संस्थेनं आपल्या गावात चित्रं काढताना पाहून कुतूहलानं जवळ जात त्यांची चित्रं न्याहाळू लागली, त्यांना प्रश्न विचारू लागली. रोजच्या जगण्यात अनेक गोष्टी ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत त्या चित्रांतून रेखाटल्या जाताना पाहून त्यांना आनंद होत होता. गावात आलेल्या या पाहुण्यांचं स्वागत करावं या भावनेतून ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना पाणी, चहा, खायला आणून देणं असं आदरातित्य केलं.

उदरनिर्वाहाचं साधन तसंच रोजच्या जगण्यासाठी लाकूम्डफाटा जंगलातून आणून विकणाऱ्या आदिवासींची संख्या या भागात खूप आहे. आपण करत असलेली निसर्गाची हानी शब्दांनी जी पोहोचवता आली नव्हती ती या निसर्गचित्रांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचली. पंचवीस कि.मी. परिसरात सर्वानी ही चित्रं काढली. त्यामुळे चित्रं कशी काढतात हे या गावकऱ्यांना दिसलंच, पण भोवतालचा निसर्ग टिकवला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. राज्याच्या वेगवेगळ्या शहरी आणि ग्रामीण भागातून आलेली ही चित्रकार मंडळी परतताना आपला गाव त्यांच्यासोबत घेऊन जातील ही जाणीव त्यांना झाली. निसर्ग आणि इतिहासाच्या दृष्टीनं हे फार मोलाचं काम शिबिरातून साध्य होतं.

शिबिराचा दुसरा दिवस आशुतोष आपटे यांनी त्यांच्या ‘आपटय़ाची पाने’ या आगामी काव्यसंग्रहातील कविता वाचून स्मरणीय केला.

एका नव्या उत्सुकतेनं उजाडला शिबिराचा तिसरा दिवस. तांदूळवाडी परिसर.. डोंगर, किल्ला, शाळा वाडी अशी लोकेशन्स पाहून लॅण्डस्केपसाठी सर्वानी बैठक जमवली. वाडीतल्याच एका लोकेशनवर जे. जे. चे प्रा. अनिल नाईक अ‍ॅक्रिलिक माध्यमातील प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवत होते. याच वेळी इतर लोकेशन्सवर चित्रकार विश्वनाथ साबळे, नानासाहेब येवले, गजानन शेळके, सुरेंद्र जगताप, प्रा. अनिल अभंगे यांनीही विविध माध्यमांतील प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांचा हुरूप वाढवला. प्रा. अनिल नाईक यांनी काढलेलं निसर्गचित्र हा एक संदेश होता. त्यांच्या मते निसर्गचित्र कसं बघावं किंवा ठरावीक अँगलनेच बघावं असा एक साचा तयार झालाय. त्यामुळे बघत जरी तुम्ही असलात तरी चष्मा मात्र त्यांचा असतो. रूढ परंपरांचा चष्मा काढून ठेवला पाहिजे. लॅण्डस्केपचा जो सांगाडा असतो तो अशाच गोष्टींनी भरा गेला आहे. त्याला ओपननेस मिळत नाही. माझ्या चौकटीत मला स्वातंत्र्य असलं पाहिजे त्यात फेरफार किंवा एकाच दृश्याची पुनर्रचना करण्याचं. चित्र ‘आपलं’ होण्यासाठी स्वत:चा पर्सनल टच व्हायला लागतो. कवींची, साहित्यिकांची किंवा चित्रकारांची बेसिक्स काही वेगळी नसतात. ती कधी बदलत नाहीत.

lp17बरेचदा कृती या कृतीच राहतात. त्याला आपण कलाकृती म्हणत नाही. कृती आणि रियाज यातला फरक बाईक यांनी स्पष्ट केला. कृती म्हणजे तीच कृती पुन्हा पुन्ह आणि रियाज म्हणजे शोध घेणे, नवनव्या शक्यतांचा!.. आणि शक्यता तेव्हाच येतात जेव्हा आपलं भांडं रिकामं असतं. आधीचं ज्ञान खूप असलं तरी ते रितं करण्यासाठी हे रियाज असतात. स्वत:ला शून्यापर्यंत आणता आलं पाहिजे. रोज मला काहीतरी नवी गोष्ट शिकायला मिळावी जी मला याआधी माहीत नसेल, कालपर्यंत माहीत नव्हती. असं झालं की मग आपण इनोसंट असतो, क्युरियस असतो, पॅशनेट असतो.. आणि मग सगळ्या गोष्टी येण्याच्या शक्यता वाढतात. कलाकृती चांगली की वाईट हे काळच ठरवतो. व्हिजन घेऊन आलेले कलाकार दृष्टे असतात. हे त्यांचं दृष्टेपण सर्वसामान्यांना सहजी कळत नाही.

शिबिरातलं असं मुक्त चिंतन विद्यार्थी, कलाशिक्षक आणि चित्रकार यांच्यावर खूप प्रभाव पाडणारं ठरलं. विचारांचं आदानप्रदान, नव्या प्रवाहांची चाहूल, आपल्या मर्यादा आणि उणिवांचं सजग भान, रुंदावणाऱ्या कक्षा, विस्तारू पाहणारी क्षितिजे असं बरंच काही साऱ्यांना सापडत जात होतं. ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी या मंथनामुळे भारावले होते.

याच दिवशी संध्याकाळी ‘आयबीएन लोकमत’चे महेश म्हात्रे यांनी चित्राशी त्यांची नव्यानं झालेली ओळख आणि चित्रकलेशी जुळलेल्या नात्याचा प्रवास शिबिरार्थीसमोर उलगडला. वाडा येथे लहानपण गेलेल्या म्हात्रे यांनी चित्रासंदर्भात समजत गेलेल्या अनेक गोष्टींचे श्रेय मित्रवर्य आशुतोष आपटे यांना दिले. गावात शिकताना सारवलेल्या जमिनीवर बसून ‘देवा तुझे किती सुंदर आकाश..’ ही कविता आपण शिकलो त्या कवितेतली निसर्गाबद्दलची कृतज्ञता, सौंदर्याचं वर्णन या साऱ्यांची आठवण त्यांनी जागवली. चित्र साक्षरता ही जगण्यासाठी किती आवश्यक आहे हे शहरात आल्यानंतर उमगलं. कारण उत्सवातून, दिवाळीसारख्या सणातून रांगोळ्या, कुलपरंपरेतल्या रेखाटनांमधून चित्रकला यापूर्वी भेटली जरी असली तरी कळत मात्र नव्हती हे त्यांनी मोकळेपणानं कबूल केलं. चित्र-संवेदना ही प्रत्येकाच्या मनात असते ती फक्त बाहेर यावी लागते. आज समाजात अ‍ॅस्थेटिक सेन्स हरपत चाललेला दिसतो. तो शाळेपासूनच रुजायला हवा. नजरेला सौंदर्य जसं दिसलं पाहिजे तसंच अशा गोष्टी खटकल्याही पाहिजेत. या शिबिराद्वारे ग्रामीण भागापर्यंत पोचण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे, अधिक मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात गेला पाहिजे. हे रिव्हर्स ब्रेन ड्रेन आहे, शहरातू गावाकडे गेलं पाहिजे..

महेश म्हात्रे यांच्या विचारांना दुजोरा देत कवी श्रीधर तिळवे म्हणाले, युरोपमध्ये बॅक टू नेचर ही चळवळच सुरू झाली. प्रॉमिनंट कला म्हणून लँडस्केपला लोक तितकंसं मानत नाहीत.

पण जसजसा निसर्गाचा ऱ्हास होत जाईल तसं तसं लँडस्केपचं महत्त्व वाढत जाईल. कारण निसर्गचित्र हे केवळ चित्रच उरणार नसून तो एक ऐतिहासिक दस्तावेज बनत जाणार आहे. कवितेची बाग या आशुतोष आपटे यांच्या सफाळ्यातल्या नावीन्यपूर्ण मांडणीशिल्पाचे कौतुक करताना कवितेची फक्त बागच न राहता तिचे जंगलच व्हावे तसंच चित्रकारीतेचंही जंगल झालं पाहिजे असा विचार मांडला. या वेळी एक वेगळ्या क्षेत्रातल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल असणारे (जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे विद्यार्थी आणि चित्रकार) केदार बापट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. कलेची साधना करतानाही कलाकारानं अखंड सतर्क राहणं कसं गरजेचं आहे ते काही उदाहरणं आणि त्यांचा सैन्यदलातील अनुभव सांगून पटवून दिलं. शहरातल्या वास्तव्यात, श्रमांमध्ये, प्रवासामध्ये आपली सर्जनशीलता विसरून जातो. शिबिरातल्या कलाकारांना निसर्ग चितारण्यासाठी जिथं निसर्ग अजूनही शाबूत आहे, अशा या गावातच यावं लागलं. इथं जी २ी१ील्ल्र३८ स्र्४१्र३८  आहे ती शहरात मिळणार नाही. सजग राहून एखादी गोष्ट करायला घेतली तर पूर्णत्वाला नेल्याशिवाय थांबू नका असं त्यांनी राऊंड द क्लॉक काम करणाऱ्या भारतीय सैन्यदलाचे उदाहरण देत सांगितलं.

lp16

मुंबईपासून केवळ ७० ते ८० कि.मी. अंतरावर गजबज, कोलाहल कमी होत विरारला संपतो आणि निसर्ग सुरू होतो. सफाळ्यासारखा निसर्गरम्य परिसर, नारळी पोफळीच्या बागा, वाडी, समुद्रकिनारा, गावकऱ्यांचं शांत आयुष्य अशा वातावरणात शहरातून आलेली विद्यार्थी चित्रकार मंडळी छान स्थिरावली. पुण्याच्या अभिनवची गौरी काटे समुद्र, आकाश पाहून हरखलीच. तिच्या लॅण्डस्केप्समधून तिनं टिपलेली निसर्गाची वेगवेगळी रुपडी डोकावत राहिली. धुळ्याचे कलाशिक्षक के. बी. साळुंके मुलांना कलेचा आनंद घ्यायला शिकवतात. चित्रांविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांना चित्रप्रदर्शनांना घेऊन जातात. आपल्याबरोबरच एक रसिकही तयार व्हावा यासाठी प्रयत्नशील असणारा हा चित्रकार!

या शिबिरातून प्रत्यक्ष स्पॉटवर जे वातावरण होतं ते पकडण्याचा प्रयत्न आम्ही लॅण्डस्केप्समधून केला. हा अनुभव अतिशय सुंदर होता. इतर सर्वाची विविध माध्यमे, कामं पाहता आली आणि मान्यवरांची प्रात्यक्षिकं दिशादर्शक ठरली. विद्यार्थी, चित्रकार, मान्यवर आणि कलाप्रेमी यांना एकत्र आणणारी अशी शिबिरं अधिकाधिक व्हावीत, असं प्रातिनिधिक मत व्यक्त केलं सुशील यादव या नाशिक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनं..

 

आता साऱ्यांना वेध लागले होते शिबिराच्या शेवटच्या दिवसाचे.. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांचं जलरंगातल्या लॅण्डस्केपच्या प्रात्यक्षिकामुळे आसमंत भारल्यागत! या क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळणं हे अतिदुर्मीळ.. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, कुतूहल दाटलेलं दिसलं. इतक्या मोठय़ा कलाकाराचा सहज वावर, प्रात्यक्षिक सुरू असतानाची त्यांची तंद्री, आत्ममग्नता, त्यांची शैली, माध्यम, त्यांचे विचार एकूणच सहवास ही पर्वणीच ठरली.

वासुदेव कामत म्हणाले, ‘‘चित्र-साक्षरता येण्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागतील. आपला समाज आणि कलाकार यांनी एकमेकांशी संपर्क ठेवून कला समृद्ध करायला पाहिजे. आज जगातली माणसं ताजमहाल, कुतुबमिनार, घाट, मंदिरं, खजुराहो बघायला दूरदेशीहून येतात, पण आपली आर्ट गॅलरी किंवा आपल्याकडच्या चित्रकाराचं आजचं चित्र बघायला किती जण येतात? असं का होतं? कारण आपण एकेकटे कलाकार काम करतोय. एकत्र येऊन काम करणं ही आपली मनोवृत्ती नाही. जी काही मोठी वास्तू, शिल्पं झालीयेत ती ‘एका’ माणसाची नसून पिढय़ान्पिढय़ा चाललेलं काम आहे. आपण कलाकारांनीसुद्धा एकत्र येऊन कलेचं बळ दाखवलं तर आपलं काम बघायला लोक येतील. अशा प्रकारच्या शिबिरांतून एकत्रित कलेचं बळ पाहायला मिळतं.’’

चित्रकाराचं चित्र विकत घेऊन घरामध्ये लावायला उदासीन असणाऱ्या समाजाबद्दल टिप्पणी करताना ते म्हणाले, ‘‘घरात चित्र लावणं हेच माणसाला डेड इन्व्हेस्टमेंट वाटते. उंची फर्निचरसाठी माणूस लाखो रुपये खर्च करतो, पण भिंतीवरचं चित्र मात्र त्याला कुणीतरी प्रेझेंट द्यावं असं वाटतं. स्वत: विकत घेऊन त्याला ते भिंतीवर लावावंसं वाटत नाही. खरं तर आपण जेव्हा भिंतीवर चित्र लावतो तेव्हा संपूर्ण इंटिरियरला उठाव तर येतोच, पण तिथं राहणाऱ्या माणसाच्या मानसिकतेबद्दल, त्याच्या कलाप्रियतेबद्दल खूप काही जाणता येतं. उंची फर्निचरमुळे तो श्रीमंत वाटेलही, पण रसिक वाटणार नाही. रसिकता जर घरात शिरायला हवी असेल तर कोपऱ्यात एखादं शिल्प, भिंतीवर एखादं चित्र लागायला पाहिजे. भिंत ही चित्रांसाठी भुकेलेली असते. तिचं चित्राशी नातं जडतं.’’

अशा प्रकारच्या निसर्ग-चित्रण शिबिरांचं महत्त्व अधोरेखित करताना कामत म्हणाले, ‘‘चित्रकाराला प्रोफेशनल गायडन्सदेखील आवश्यक आहे. व्हॅन गॉगबद्दल आम्हाला खूप आदर आहे, पण आपण सगळ्यांनी व्हॅन गॉगप्रमाणेच व्हावं आणि फकीर राहावं असं मला वाटत नाही, पण त्याची पेंटिंगची जी भूक होती, जिज्ञासा होती त्या पद्धतीनं स्वत:ला व्यस्त ठेवून भरपूर काम करा. मुलांना शिकवण्यासारखं खूप आहे. कधीतरी त्यांना आर्टगलरी, म्युझियम दाखवावं. त्यांना चित्र-प्रदर्शनात शिरण्यापूर्वी बाहेरच थांबवून आत गेल्यावर तुम्ही काय बघणार आहात याबद्दल माहिती द्यावी. ऑइलपेंट चित्र, वॉटरकलर चित्र किती लांबून बघायचं, फ्रेमिंग करणं का आवश्यक आहे हे सांगावं. घरात तुम्ही काढलेलं चित्र आईबाबांपाशी हट्ट करून फ्रेम करून घरात लावायला सांगा, असंही मुलांना आपण सांगू शकतो.’’

lp18

गिराळे इथल्या वासुदेव कामत यांच्या प्रात्यक्षिकानं या निसर्ग-चित्रण शिबिराची सुयोग्य सांगता झाली. सफाळ्यातलं चार दिवसांचे हे शिबीर आयोजित करणाऱ्या चित्रकार प्रदीप राऊत आणि आशुतोष आपटे यांना सफाळ्यातले रसिक ग्रामस्थ संतोष बंधू राऊत, उपसरपंच दीपेश पाटील, ‘अंतरंग’ संस्थेचे कार्यकर्ते, प्रगती प्रतिष्ठान यांना कुठल्याही अपेक्षेविना अक्षरश: लागेल ती मदत अत्यंत आपुलकीने केली. गिराळे येथील शिबिराच्या जागेचे सुशोभीकरण इको फ्रेंडली पद्धतीने करून राजश्री आपटे यांनी छान वातावरण निर्मिती केली होती. परिसरातील ग्रामस्थांचा यातला उत्स्फूर्त सहभाग हा सुखावणारा होता. अत्यंत अनौपचारिक अशा या निसर्ग-शिक्षण देणाऱ्या शिबिराच्या शेवटच्या दिवशी शिबिरार्थीनी केलेल्या सर्व लॅण्डस्केप्सचं प्रदर्शन ग्रामस्थांसाठी खुलं ठेवलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. या परिसरातल्या शाळांमध्येही अशी शिबिरं भरवावीत, अशी मागणी शाळा आणि कलाशिक्षकांकडून होऊ लागली हे चित्र नक्कीच आशादायक आहे. खेडय़ापाडय़ात कलासाक्षरता-चित्रसाक्षरता निर्माण व्हावी हा शिबिराचा उद्देश सफल झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. निसर्गातच राहणाऱ्या या मंडळींना कला डोळसपणे दाखवण्याचे काम या शिबिराने केले. ग्रामस्थांची कलेशी जवळीक साधली गेली आणि शहरातून आलेल्या शिबिरार्थीची रोजच्या धकाधकीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यामुळे मरगळ झटकली जाऊन प्रफुल्लित मनांनी सारी मंडळी घरी परतली.
स्मिता थोरात –