देवी विशेष : देवीच्या वाहनांमधील प्रतीकात्मकता

देवतांच्या मूर्तिविज्ञानात प्रत्यक्ष देवता प्रतिमेइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देवतेचे वाहन. वाहन म्हणजे वहनाचे साधन.

durga-devi
देवतांना इच्छागामित्व असले तरीही वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची वाहने दिलेली आहेत.

डॉ. मृणालिनी नेवाळकर – response.lokprabha@expressindia.com
देवतांच्या मूर्तिविज्ञानात प्रत्यक्ष देवता प्रतिमेइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देवतेचे वाहन. वाहन म्हणजे वहनाचे साधन. वह् या संस्कृत धातूला ल्युट् (अन) प्रत्यय लागून, पुढे प्रयोजक रचना झालेले हे रूप. जवळपास सर्वच धर्मामध्ये उपास्य देवतेचे अतिमानवी सामथ्र्य दाखवण्यासाठी अधिकचे अवयव (चार हात, तीन डोळे, सहा मुखे, इ.) दाखवले जातात, तसेच त्या त्या देवतेचे विशेष गुणधर्म किंवा कौशल्ये दाखवण्यासाठी विशिष्ट प्राणी किंवा पक्ष्याच्या वाहनाचाही संबंध जोडला जातो.

देवतांना इच्छागामित्व असले तरीही वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची वाहने दिलेली आहेत. देवतेच्या स्वत:च्या दैवी वेगात, वाहनाचाही वेग मिळवल्यास तिचे आशुगामित्व, अर्थात भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून जाण्याचे सामथ्र्य दिसून येते. देवतेच्या स्वत:च्या बळात आणि क्षमतांमध्ये त्या वाहनाची क्षमताही भर घालते.

देवतेसोबत तिच्या आसन/वाहनाचाही अवतार होतो असेही उल्लेख सापडतात. विष्णूने रामावतार घेतल्यावर शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला, कृष्णावतारात बलरामाचे रूप घेतले, वगैरे. अनेकदा, मुळात त्या प्राणी/ पक्ष्याचीच उपासना आदिम समाजात केली जात असते, आणि नंतर त्याचे एखाद्या देवतेशी आसन/वाहन म्हणून एकीकरण झाले असेही दिसून येते.

ही वाहने देवतेच्या आख्यायिका आणि उपासनेचाही भाग असतात. गणपतीच्या कथांमध्ये येणारा मूषक, किंवा कार्तिकेयाच्या उपासनेत त्याचे वाहन असणाऱ्या मोराच्या पिसाचा वापर. देवांच्या स्तुतिस्तोत्रांत आणि श्लोकांतही वाहनांचा संदर्भ बरेचदा येतो.

संस्कृत सुभाषितांत शिवाच्या गळ्यातील सर्प गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला खायची इच्छा करतो, तर कार्तिकेयाचा मोर त्या सर्पाच्या मागे लागतो. पार्वतीच्या सिंहाला गजमुख गणपती आणि शिवाचा नंदी यातील नेमके कोणते सावज हेरावे हे कळत नाही! रस्त्यात मांजर सामोरी आल्यावर स्वत:चा प्रथमपूजनाचा मान सोडून देऊन, गणपतीच तिने मूषकाला खाऊ नये म्हणून तिची आराधना करतो.

एकंदरीत देवतेचे वाहन तिच्या सामर्थ्यांचे, गुणावगुणांचे, आणि कार्यक्षेत्राचे प्रतीक म्हणून त्या त्या देवतेचा अविभाज्य भाग असते. त्या देवतेच्या ध्वजावरही ते वाहन प्रतीकस्वरूपात दाखवले जाते. देवीच्या विविध स्वरूपांचे पुराणांमध्ये, माहात्म्यग्रंथांमध्ये, स्तोत्रादिकांमध्ये जे वर्णन सापडते; आणि प्रत्यक्ष मूर्तीमध्ये आणि उपासनेमध्ये जे प्रतिबिंब पडलेले दिसते, त्यात वाहनांचे प्रचंड वैविध्य आढळते. त्यातही अर्थातच प्रतीकात्मकता आहे. 

आदिशक्तीची सर्वात प्रमुख तीन रूपे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या पत्नीस्वरूपात पुजल्या जाणाऱ्या सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती. बहुतेकदा एखाद्या पुरुषदेवाची शक्ती/ स्त्रीस्वरूप म्हणून येणाऱ्या देवतांना त्या देवाचेच वाहन दिलेले दिसते. सरस्वती ब्रह्माप्रमाणेच हंसवाहिनी आहे. बुद्धीची, विवेकाची, वाणीची, कलाकौशल्यांची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या सरस्वतीस नीरक्षीरविवेक जाणणारा, मानसगामी, डौलदार हंस वाहन म्हणून शोभतो.

सरस्वतीच्या ‘कुन्देन्दुतुषारहारधवल’ निष्कलंकतेला हंसाचे शुभ्रत्व साजणारे आहे. ही शुभ्रता पावित्र्याचे, प्रकाशाचे, सत्त्वप्रधान तेजाचे, आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. सरस्वतीची रूपे मानल्या जाणाऱ्या गायत्री, सावित्री, शारदा आदी देवतांचेही वाहन हंसच आहे. अष्टमातृकांपैकी ब्रह्मदेवाची शक्ती असणारी ब्रह्माणीही हंसगामिनीच आहे.

काही वेळा मोरही सरस्वतीचे वाहन म्हणून येतो. कलांची आणि सौंदर्यपूर्णतेची देवता म्हणून ऐन वसंतात सरस्वतीची उपासना केली जाते. त्यादृष्टीने नृत्यकुशल, देखणा, राजेशाही मोरही तिचे वाहन म्हणून योग्यच आहे. कामक्रोधादिषङ्रिपूरूप सर्पाचे भक्षण करणारा मयूर आत्मिक उन्नतीचा आणि संयमाचा सूचक आहे. कुमार कार्तिकेयाची शक्ती असणारी कौमारी ही मातृकाही कुमाराप्रमाणेच मयूरवाहना आहे.

विष्णुपत्नी लक्ष्मीचे वाहन म्हणून मुख्यत्वे हत्ती, घुबड आणि क्वचित सिंह यांचा उल्लेख येतो. लक्ष्मी सुबत्ता-धन-धान्य-संतती-संपत्ती-विजय-आनंद-कीर्ती-शांती आदी ऐश्वर्याची देवता आहे. त्यादृष्टीनेच गजराजासारखा राजेशाही, डौलदार प्राणी तिचे वाहन कल्पिला गेला असावा. तो सुफलनाचे, शारीरबळाचे, कार्यमग्नतेचे आणि उदंड समृद्धीचेही प्रतीक आहे. विश्वाच्या स्थितीची जबाबदारी असणाऱ्या विष्णूच्या पत्नीसाठी हे सर्वस्वी योग्य वाहन आहे. लक्ष्मीप्रमाणेच इंद्राणी शचीही गजारूढा आहे. साक्षात देवांची राणी असल्याने, आणि ऐरावतारूढ इंद्राची पत्नी असल्याने पौलोमी शचीचे गजवाहनत्व ओघानेच येणारे आहे.

सामान्यत: अपशकुनी समजल्या जाणाऱ्या उलूक/ घुबडाला लक्ष्मीचे वाहन म्हणून मान आहे. लक्ष्मी पार्थिव ऐश्वर्याप्रमाणे बुद्धिसंपदेचीही कारक देवता आहे. हिंदीत उल्लू याचा अर्थ मूर्ख असा केला जात असला, तरी एकांतात राहणारे घुबड वास्तविक सूक्ष्म निरीक्षणाचे, आणि अंधारातही पाहू शकण्याचे, अर्थात विवेकनिष्ठ ज्ञानाचे सूचन करते.

‘या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी’ हा नियम घुबडालाही लागू पडतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ऐश्वर्याच्या देवतेचे वाहन अनासक्ती आणि वैराग्याचे प्रतीक असणे, ही गोष्ट ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी’ शिकवणारी आहे. गुप्तकाळात लक्ष्मी सिंहवाहिनी मानली जात असावी असे तत्कालीन नाण्यांवरून म्हणता येते. हे गुप्तांच्या शौर्याचे प्रतीक असावे. मातृकांपैकी विष्णूची शक्ती असणारी वैष्णवी मात्र विष्णूप्रमाणेच गरुडावर बसणारी आहे.

एरवी सिंह हा मुख्यत्वे पार्वतीचे आणि तिची रूपे असणाऱ्या जगद्धात्री, चंडिका, स्कंदमाता, कात्यायनी, कौशिकी, कामाख्या आदी देवतांचे वाहन आहे. दुर्गा, काली, महिषासुरमर्दिनी, कूष्मांडा आदि उग्रावतारांचेही वाहन म्हणूनही काही वेळा सिंहच दाखवला जातो. या देवता सृष्टीच्या लयाच्या कारक असणाऱ्या शिवाची शक्ती म्हणून येतात. त्यामुळे शौर्याचे, निर्भयतेचे, संहाराचे प्रतीक असणारा सिंह त्यांचे वाहन कल्पिलेला आहे.

यांपैकी अनेक देवता स्वत: दैत्यसंहारक कुशल योद्धा म्हणूनच येतात. त्यामुळे त्यांचे शौर्य आणि शत्रूवर सहज विजय मिळवू शकण्याचे सामथ्र्य दाखवण्यासाठी सिंहवाहनत्व ही उत्तम खूण आहे. अष्टमातृकांपैकी एक असणारी नारसिंहीही सिंहवाहिनी आहे. तीदेखील विनाशकारिणी उग्रदेवताच आहे. शिवाय अर्धमानव-अर्धसिंहस्वरूप नरसिंहावताराची शक्ती म्हणूनही सिंहच तिचे सुयोग्य प्रतीक ठरतो.

निर्भयता, शौर्य आणि संहारकता दाखवणारे दुसरे वाहन म्हणजे वाघ. व्याघ्रारूढा दुर्गा, महिषासुरमर्दिनी, चंद्रघंटा, कूष्मांडा ही पार्वतीची रणकर्कश रूपे विख्यात आहेतच. गणेशाची मुलगी समजली जाणारी संतोषीमाता आणि गुजरात, मध्य प्रदेश येथील लाडकी लोकदेवता आनंददात्री हरसिद्धीमाताही व्याघ्रवाहनाच आहेत. त्यामुळे केवळ सुखसमाधानाचा वर्षांव करण्याचेच नव्हे तर भक्तांचे रक्षण करण्याचेही सामथ्र्य या देवतांमध्ये असल्याचे म्हणता येईल.

अष्टमातृकांपैकी महेश्वर शिवाची शक्ती असणारी माहेश्वरी मात्र शिवाप्रमाणेच वृषभारूढा, नंदीवाहना मानलेली आहे. नवदुर्गापैकी एक असणारी महागौरीही वृषभवाहना किंवा गोवाहना म्हणवते. या देवतांचे वृषवाहनत्व वासनांचे आणि तामसिक गुणांचे प्रतीक असणाऱ्या वृषभावर ताबा मिळवून त्यावर स्वार होण्याची क्षमता सुचवते.

समृद्धी आणि सुबत्तेचे प्रतीक असणारे आणखी एक वाहन म्हणजे गाय. हिंदू परंपरेने गाय ही सर्व देवतांचे परमपवित्र अधिष्ठान मानलेली आहे, शिवाय कामधेनूच्या रूपकातून तिचे मानवसमाजासाठीचे उपकारकत्वही स्पष्ट केले आहे. मातृतत्त्व आणि नवनिर्मितीची खूण असणारी गाय भूमी/ भूदेवीचे वाहन आहे. पुराणांत येणारी पृथूराजाने पृथ्वीरूप गाईचे दोहन करून सर्व वृक्षवेलींची, फळाफुलांची आणि अन्नधान्याची निर्मिती केल्याची कथा पृथ्वी आणि गाईचे एकत्व दाखवणारी आहे.

नवदुर्गापैकी शैलपुत्री गाईवर आरूढ झालेली असते. काही वेळा हरसिद्धी आणि संतोषी माताही गाईंसोबत दाखवल्या जातात. गोवर्गापैकीच म्हैस ही यमाची शक्ती यमी हिचे वाहन आहे. तसेच वराहावताराची शक्ती असणारी वाराही ही मातृकाही म्हशीवर आरूढ झालेली असते. तेथे मातृत्व आणि पुष्टीसोबत शारीरबलाचेही सूचन झालेले दिसते.

आदिशक्तीचेच एक प्रकट स्वरूप म्हणजे नदीदेवता. मानवी वापरासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवणाऱ्या नद्यांना पौराणिक साहित्यात आणि लोकपरंपरांमध्ये मातृरूपात पुजले जाते, यात नवल नाही. त्यांच्या प्रतिमांमध्येही वाहन महत्त्वाचे ठरते. गंगा, गोदावरी, नर्मदा वगैरे नद्यांचे वाहन मगर असून, यमुनेचे वाहन कासव मानले जाते. नद्यांमध्ये सापडणाऱ्या मगर किंवा कासवाला तिचे वाहन समजणे ओघानेच येणारे आहे.

पाण्याची/ समुद्राची देवता असणाऱ्या वरुणाची शक्ती वारुणी हीदेखील मकरवाहना मानलेली आहे. अनेकदा मकर अर्धमानवी, अर्धपशुस्वरूप किंवा अर्धमत्स्यही मानला जातो. मगरीत स्थिरबुद्धी, संकटांवर मात करण्याची अक्कलहुशारी हे गुण दिसतात, तर कासव विवेकनिष्ठ बुद्धीचे, मातृत्वाचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक समजले जाते.

कालरात्री, शीतला, अलक्ष्मी, मेसाई, वगैरे अशुभसूचक, दु:खदैन्याच्या आणि आजारांच्या कारक देवतांचे वाहन गाढव आहे. खर किंवा गर्दभ हे यातनांचे, सहनशक्तीचे, आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. या देवतांचा प्रकोप होऊन त्यांनी यातना देऊ नयेत म्हणून त्यांच्याबद्दल दाखवण्याच्या सेवाभाव आणि विनम्रतेचे सूचन त्याद्वारे होते.

दशमहाविद्यांपैकी एक असणारी, वार्धक्य, वैधव्य, स्मशानवास आदी अनिष्ट गोष्टी दाखवणारी धूमावती ही महाविद्या मृत्यू आणि परलोक, पितृलोक, आदी सुचवणाऱ्या कावळ्यावर आरूढ होते. तर शिवदूती आणि चामुंडा शृगालवाहना आहेत. कोल्ह्य-लांडग्यांच्या कुळातील हा प्राणी भयंकरपणा, अभद्रपणा, संताप आणि हिंस्रतेचे प्रतीक मानला जातो.

अनेक पुरुषदेवता अश्वारूढ असल्या, तरी स्त्रीदेवतांमध्ये मात्र खंडोबाच्या पत्नी म्हाळसा आणि बाणाईच अश्ववाहना आहेत. भक्तांच्या मदतीला वेगाने धावून येण्याचा स्वभाव अश्वगतीतून सुचवला आहे. भैरवी किंवा योगेश्वरी भैरवाप्रमाणेच कुत्र्याशी जोडलेली आहे. मीनाक्षी आणि रती या प्रणयसूचक देवता सुफलनाचे प्रतीक असणाऱ्या पोपटावर बसलेल्या दाखवल्या जातात. बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी गुप्तपणे येऊन त्याचे भविष्य लिहून जाणारी षष्ठी किंवा सटवाई दबकेपणाने फिरणाऱ्या मांजरावर बसून येते. तर सर्पमाता मानली जाणारी मनसादेवी सर्पावरच आरूढ होते.

या सर्वात आगळेवेगळे वाहन असणाऱ्या दोन देवता म्हणजे कुबेराची शक्ती असणारी कौबेरी ऊर्फ भद्रा, आणि नैर्ऋत्य दिशेची अधिष्ठात्री निर्ऋती. या देवता मानववाहना मानलेल्या आहेत. कुबेरपत्नी यक्षिणी असल्याने ती मंगल आणि अमंगल दोन्हीची कारक आहे, तर नैर्ऋत्येतही पश्चिम-दक्षिण या दोन दिशांचे द्वित्व आहे. मंगल-अमंगल उभयात्मक स्वभाव केवळ मनुष्यांतच दिसत असल्याने कदाचित त्यांना मनुष्यवाहन मानलेले असावे.   

आदिमायेच्या नानाविध स्वरूपांतून दिसणाऱ्या तिच्या सर्वशक्तिमत्त्वास तिच्या विविध वाहनांद्वारेही पुष्टी मिळते. सजीव सृष्टीतील वेगवेगळ्या पाळीव आणि वन्य प्राण्यांवर ताबा मिळवून त्यांचा वाहन म्हणून प्रयोग करण्यातून तिचे सामथ्र्यही स्पष्ट होते. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे सर्वाभूती परमेश्वर पाहणाऱ्या आपल्या परंपरेने वाहनस्वरूपात देवतांशी जोडून या पशुपक्ष्यांनाही दैवीपण मिळवून दिले आहे हे निश्चित!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navratri 2021 lokprabha special issue devi vishesh importance of devi riding on different animals dd

ताज्या बातम्या