scorecardresearch

तापसीच्या फिटनेसने नेटकरी अवाक

रश्मी रॉकेट या आपल्या आगामी चित्रपटासाठी ती फिटनेसचे विविध फंडे आजमावत आहे.

तापसीच्या फिटनेसने नेटकरी अवाक

-जय पाटील
तापसी पन्नूच्या सुपरफिट लूकची सध्या समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली आहे. रश्मी रॉकेट या आपल्या आगामी चित्रपटासाठी ती फिटनेसचे विविध फंडे आजमावत असून, त्यासंदर्भातली छायाचित्रही रोज इन्स्टाग्रामवर अपलोड करत आहे. याआधीही तापसीने खेळाडूंच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र या चित्रपटातील तिचा लूक फारच प्रभावी असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांतून उमटत आहेत.

रश्मी रॉकेटमध्ये तापसी कच्छच्या वाळवंटातल्या रश्मी नावाच्या अनेक आव्हानांवर मात करत, जिद्दीने पुढे आलेल्या अँथलीटची भूमिका साकारत आहे. तिने सोमवारी रनिंग ट्रॅकवर उभी असल्याचे छायाचित्र अपलोड केले होते. मंगळवारी तिने धनुरासनातील आणि बुधवारी गेट सेट स्थितीतील छायाचित्र अपलोड केले. या चित्रपटासाठी तिने खास डाएट सुरू केले असून चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी सहकुटुंब पर्यटनासाठी गेली असतानाही तिने ते डाएट कायम ठेवले होते. आपली शरीरयष्टी पाहूनच अँथलीटची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात तयार व्हावी, म्हणून तिने आहार आणि व्यायामावर खास लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते.

अँथलीट सारखे दिसण्यासाठी आहारात केवळ प्रथिने असून चालणार नाहीत. त्यामुळे सध्या आपल्या आहारात कर्बोदकं, प्रथिनं, तंतूमय पदार्थ आणि अन्य पोषक घटकांचा उत्तम समतोल आहे, असं तिने म्हटलं आहे.

भरपूर वर्कआउट केल्यामुळे बांधेसुद झालेल्या तिच्या पाठीची आणि पायांची, पायावरील नव्या टॅटूची छायाचित्रही सध्या व्हायरल होत आहेत. तापसी एरवीही अतिशय फिट दिसते. मात्र या चित्रपटासाठी तिने घेतलेली मेहनत तिच्या छायाचित्रांतून प्रतिबिंबित होत आहे. त्यामुळे रश्मी रॉकेटविषयी तिचे चाहते, नेटकरी यांच्याबरोबरच फिटनेसप्रेमींमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2020 at 20:39 IST

संबंधित बातम्या