scorecardresearch

वारसा : पिंगळीचा प्राचीन वारसा

प्राचीन वारसा स्थळांची विपुलता असूनही परभणी जिल्हा दुर्लक्षित राहिला आहे.

39-lp-rajasthanप्राचीन वारसा स्थळांची विपुलता असूनही परभणी जिल्हा दुर्लक्षित राहिला आहे. परभणीच्या पूर्वेस ११ कि.मी. अंतरावर पिंगळगदा नदीच्या काठावर पिंगळी हे गाव आहे.  गावात पिंगळेश्वराचे यादवकालीन (हेमाडपंती) शैलीचे त्रिदलीय मंदिर आहे. मंदिरास पश्चिम, दक्षिण व उत्तरेस तीन गर्भगृह आहेत. पैकी पश्चिमेकडील गर्भगृह मुख्य असून सध्या यामध्ये पिंगळेश्वराची मूर्ती व शिवलिंग आहे. परंतु गणेशपट्टीवरील ‘गरुडशिल्प’ आणि द्वारशाखेवरील वैष्णव द्वारपाल यावरून हे पूर्वी वैष्णव मंदिर असावे असा निष्कर्ष काढता येतो. दक्षिण व उत्तरेकडील गाभारे सध्या रिकामे आहेत. यापैकी एका गाभाऱ्यावर ‘मकरध्वज जोगी ७००’ असा शिलालेख दिसतो. मरकडी येथील मरकडेश्वर मंदिरावरही असा शिलालेख असल्याचा उल्लेख कनिंगहॅमने केला आहे. मंदिराच्या मंडोवरावर प्रत्येक गर्भगृहाच्या पाठीमागील बाजूस एक असे तीन मूर्तीहीन देवकोष्ट आहेत. भिंतीवर काही कामशिल्पही कोरलेली आहेत.

मंदिरालगतच एक विस्तीर्ण चौरसाकृती अशी ‘बारव’ आहे. बारवेस एकूण चाळीस पायऱ्या असून ती निमुळती होत जाते. शेवटून दोन नंबरच्या पायरीवर नऊ शिल्पे आहेत. बहुधा त्या ‘आसरा’ असाव्यात. या बारवेत चारही बाजूंनी खाली उतरता येते. बारवेमध्ये पाच विश्रामस्थळे आहेत. प्रस्तुत बारवेच्या प्रत्येक कोपऱ्यावर दोन-दोन अशी चार कोपऱ्यांवर आठ देवकोष्टं आहेत. पैकी एक देवकोष्ट भग्न झालेले आहे. या देवकोष्टात गणेश, नृसिंह, नागदेवता, चामुंडा, लक्ष्मीनारायण, विष्णू व दुर्गा यांची शिल्पे आहेत. बारवेला लागूनच काळ्या पाषाणाची अत्यंत सुंदर परंतु भग्न झालेली एक विष्णुमूर्ती पडलेली दिसते. अभ्यासक व संशोधक विद्यार्थी, इतिहासप्रेमी यांनी एकदातरी पाहावे असेच हे पिंगळीचे मंदिर व बारव आहेत.
निळकंठ काळदाते – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parbhani pingli village

ताज्या बातम्या