scorecardresearch

साद कवितेची : ‘माहिया’च्या निमित्ताने

साहित्यातील ‘काव्य’ हा प्रांत मला एक पुष्पवाटिके समान वाटतो.

साहित्यातील ‘काव्य’ हा प्रांत मला एक पुष्पवाटिके समान वाटतो. यातील निरनिराळी काव्यसुमने- अर्थात काव्य प्रकार- निरनिराळ्या फुलाप्रमाणे फुलत असतात. पौराणिक काळापासून रामायण-महाभारत यांसारखी महाकाव्ये, खंडकाव्ये तसेच संतांच्या रचना अभंग-ओवी अशा प्रकारच्या काव्यरचना नंतर मोरोपंतांच्या केकापासून क्रांतिकारक कवी केशवसुतांच्या आधुनिक कवितेपर्यंत चालत आलेला हा प्रवाह गीतरूपानेही लोकांना श्रवणसुख देत आला आहे. यातील सर्वात लहान काव्य प्रकार चारोळी! हाही लोकप्रिय झाला आणि आता जपानी हायकूच्या प्रेरणेतून जन्माला आलेला तीन ओळींचा काव्याविष्कार! तीन ओळीतच याचं मर्म साठलेलं असतं हे सर्वात नाजूक, सुंदर भावसुमन असे म्हणायला हरकत नाही.

गझलच्या क्षेत्रात नावाजलं गेलेलं एक नाव म्हणजे घन:श्याम धेंडे. मी अनेक कार्यक्रमात त्यांच्या गझल ऐकल्या आहेत.

जपानी हायकूशी साधाम्र्य असलेला एक अस्सल भारतीय काव्यप्रकार म्हणजे ‘माहिया’ पंजाबी लोकगीत! गुराखी गुरांना रानात घेऊन जातात तेव्हा झऱ्याकाठी, डोंगरावर, झाडाच्या छायेत बसून ते माहिया गुणगुणतात, निसर्गगीत वा प्रेमगीत! तीनच ओळीपण विशिष्ट अंगभूत लय आणि धून गण, वृत्त, मात्रा यांचं बंधन सांभाळून रचलेलं चिमुकलं गीत! तीन ओळीत सागर व्यापणारं, आभाळ पेलणारं असं त्याचं जे वर्णन केलं जातं ते जशा ‘माहिया’ आपण वाचत जातो तसं पटत जातं. रचनाही सुटसुटीत, पहिल्या ओळीत साधारण १२ मात्रा, शिवाय तिन्ही ओळींचा विशिष्ट क्रम साधलेला. पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधलेलं.

शास्त्रशुद्ध रचना, नीटस बांधणी, तीन ओळींच्या तिनोळ्याच त्या! हे स्वत: कवीने दिलेलं माहितीवजा स्पष्टीकरण आपल्यालाही माहियाच्या प्रेमात पाडते. हे वर्णन ऐकून आपणही या काव्य प्रकारात एखादी रचना करावी असा मोह अनेक जणांना- कवींना झाल्यावाचून राहात नाही.

या रचना वाचल्यावर मला स्वत:ला जाणवली ती एक गोष्ट म्हणजे पहिली आणि तिसरी ओळ यांना जोडणारी मधली ओळ! ही बेमालूमपणे जोडते पहिल्या आणि तिसऱ्या ओळीला, आणि त्यातून येणाऱ्या अर्थाला वजन प्राप्त करून देते. मलाही या माहिया वाचून काही  माहिया रचण्याचा मोह झाला. दोन देते उदाहरणदाखल,

१) किनारा दूर आहे
‘मांझी’ म्हणाला
माझा किनारा मी आहे.

२) राहू दे दूर किनारे
एक नाही
मिळतील मला सारे

गझलप्रमाणेच माहियाला मराठी पर्यायी शब्द नाही. या माहियातून अनेक विषय मांडता येतात. माही म्हणजे मासा! प्रेयसी असाही अर्थ आहे. माहिविषयी म्हणून माहिया! ‘माहिया’ या मोहक नावाप्रमाणे याची रचनाही मोहक वाटते. सच्ची वाटते.

या संग्रहाच्या प्रस्तावनेत माधव राजगुरू म्हणतात, ‘‘अल्पक्षरत्व हे काव्याचे वैशिष्टय़ आणि त्याचे सामथ्र्य या काव्यात आढळते. पहिल्या ओळीत सरळ कथन असते. पुढील दोन ओळी अशा येतात की त्यातील आशयामुळे पहिल्या ओळीला खोल अर्थ प्राप्त होऊन अंत:करणाचा ठाव घेतात. हा काव्य प्रकार घन:श्याम धेंडे यांनी मराठीत आणून तो यशस्वीपणे हाताळला आहे. हा ‘माहिया’ मराठीत यशस्वीपणे यावा, रुळावा असे घन:श्याम धेंडेना नक्कीच वाटते. आणि त्यांच्या या प्रयत्नास मराठी कवितेत मानाचे स्थान आणि यश मिळो, हीच इच्छा!

यातील काही अप्रतिम उदाहरणे-

१)     हे दु:ख कुणा सांगू
ठेवियले हृदयी
वेशीस कसे टांगू?

२)     देतील, दगा तेही
गैर तसे आपुले
देतील बघा तेही

३)     ते बाग जळाले का
काल मला बघता
खद्योत पळाले का

४)     मज भय नच युद्धाचे
शस्त्र अहिंसेचे
संदेशच बुद्धाचे

५)     मज याद तिची आली
काल जरी ओठी
फिर्याद तिची आली

६)     का ओल अशी गाली
ओघळले आसू
मज याद जशी आली

७)     नक्कीच प्रिया आली
जीव असा व्हावा
का आजच वर खाली

८)     तू शब्द नको तोलू,
शस्त्र दुधारी हे
रे व्यर्थ नको बोलू

९)     देतील बरे धोका
गैर तसे आपुले
साधून अरे मौका

१०)    रे प्रेम असे कोडे
सोडविले ज्यांनी ते लोक जगी थोडे

११)    हा देश विकायचा
हाच पिढीने का
संदेश शिकायचा

१२)    धंदाच शिकावा हा
आज कसा ऐना
अंधास विकावा हा

१३)    बघ नेत्र सजल झाले
याद तिची येता
साक्षात गजल झाले

१४)    ना पंथ ना पैशाचा
गर्व मला आहे
या भारत देशाचा

१५)    नित बुद्ध स्मरायचा
आणि जयंतीला
का स्फोट करायचा

१६)    रे देव कसा आहे
ईश्वर अल्ला वा
दे नाव तसा आहे

१७)    मी आक्रित घडताना
पाहियले आहे
खंजीरही रडताना

१८)    का वैर उगा धरता
काय जगी उरते
मग प्रेमवजा करता

१९)    तो पार्थ कुठे आता
कृष्ण तरी सांगा
नि:स्वार्थ कुठे आता

२०)    दु:खासह पळताना
सौख्य मला दिसले
क्षितिजावर/ढळताना

२१)    ही प्रीत पतंगाची
हार दिव्याची ना
वा जीत पतंगाची
नलिनी दर्शने

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2016 at 01:16 IST

संबंधित बातम्या