विजया जांगळे
लोकप्रभा दिवाळी २०२०

स्वत:ला शेतीप्रधान देश म्हणवतो तेव्हा त्यामागे कित्येक पिढय़ांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या ज्ञानाचं संचित असतं. त्या पिढय़ांनी निसर्गाला देवत्व बहाल केलं. त्याच्या प्रत्येक हालचालीचं सातत्याने निरीक्षण केलं. त्याला त्याच्या कलाने, गतीने वाढू देण्याएवढा संयम दाखवला. सारं काही इन्स्टन्ट मिळवण्याची घाई करण्यापेक्षा जे आहे ते दीर्घकाळ टिकवण्याएवढं शहाणपण त्यांच्यात होतं. हे शहाणपण आता आपल्या हातून निसटू लागलं आहे. आजच्या समृद्धीसाठी कायमचा कफल्लकपणा ओढवून घेतला जात आहे. अशा स्थितीत, या इन्स्टन्ट जमान्यातही काही गावखेडय़ांत, कडे-कपारींत दडलेल्या आदिवासी पाडय़ांत त्या शहाणपणाच्या खाणाखुणा आजही शिल्लक आहेत. या मातीतलं शुद्ध बियाणं त्या दुर्गम भागांत जपलं जात आहे. जमिनीत रसायनांची भेसळ न करता जुन्याच पद्धतीने वाढवलं जात आहे. शाश्वततेच्या वाटेवरच्या पाईकांविषयी..

‘पोरं म्हणायची.. आई याच्यात काईच पैसा नाई, फायदा नाई, तू हेरीच करत ऱ्हातेस, पण मी काम करत ऱ्हायले. या काळ्या मातीचं न्यान शिकले होते. आजूबाजूला सगळे हाब्रिड लावत होते. जमिनीचं पार नुकसान होत होतं. वडलांचा एक एक शब्द आठवायचा. लोक मला म्हणायचे हिला काय काम नाई, पण मी माझं काम करत ऱ्हायले..’ राहीबाई पोपेर त्यांच्या बियाणांएवढय़ाच अस्सल देशी आवाजात, गावरान शैलीत गप्पा मारतात. जानेवारीत त्यांना पद्मश्री जाहीर झाला. करोनामुळे तो अद्याप प्रदान करण्यात आलेला नाही, पण मातीत राबणाऱ्या या बीजमातेला त्याचं काहीच सोयरसुतक नाही. प्रत्येक गावात तिथल्या देशी वाणांची बँक सुरू व्हावी, आपल्या या बीजवारशाचं जतन व्हावं यासाठी मात्र त्या आग्रही आहेत. शेतकऱ्यांनी हायब्रिड बियाणं पेरणं बंद केलंच पाहिजे, यावर ठाम आहेत.‘हल्ली पावसाचा काही भरवसा राहिलेला नाही. त्यात हे हायब्रिडचं लोण. असं परकं बियाणं आपल्या दुष्काळी माळरानांवर पिकवणं कठीणच असतं. मग ते जगावं म्हणून शेतकरी महागडी खतं, कीटकनाशकं घेतो. जो जे सांगेल ते औषध शेतात फवारतो, कर्जबाजारी होतो आणि त्यानंतरही अपेक्षेप्रमाणे पीक आलं नाही, भाव मिळाला नाही, की आत्महत्या करतो. पारंपरिक पद्धतीने शेती केली, तर हे चक्र थांबेल,’ राहीबाई विश्वासाने सांगतात..

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)