scorecardresearch

उत्सव विशेष : पाऊस, धर्म आणि चातुर्मास!

उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाचा आणि निसर्गाचा संबंध आणखीन दृढ होत गेला.

चातुर्मासातील सारेच सण हे कृषी संस्कृतीशीच जोडले आहेत.  केवळ हिंदूच नाही तर बौद्ध व जैन धर्मातदेखील चातुर्मासाचा संबंध दिसून येतो.

शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com
उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाचा आणि निसर्गाचा संबंध आणखीन दृढ होत गेला. चातुर्मासातील सारेच सण हे कृषी संस्कृतीशीच जोडले आहेत.  केवळ हिंदूच नाही तर बौद्ध व जैन धर्मातदेखील चातुर्मासाचा संबंध दिसून येतो.

मानवाचा व निसर्गाचा संबंध निकटचा आहे. मानवाने स्वत:ला निसर्गापासून कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. तो स्वत: या निसर्गाचाच एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणूनच भारतीय सणांमध्ये या निसर्गाला अनुसरून व्रतवैकल्ये व सणांचा समावेश झालेला दिसतो. या व्रतवैकल्ये आणि सणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा काळ पार अश्मयुगापर्यंत मागे जाऊ शकतो. अश्मयुगीन मानव हा भटका होता. भूक व मथुन या त्याच्या दोन मूलभूत गरजा होत्या, उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर निसर्ग त्याची गरज भागवत होता. पाऊस, ऊन, थंडी अशी निसर्गाची विविध रूपे अनुभवत असताना मानवाला त्यामागील शास्त्रीय कारणे भटकंतीच्या त्या टप्प्यावर समजणे कठीणच होते. मग पाऊस का पडतो? विजा का चमकतात? असे प्रश्न त्याला पडू लागले. या प्रश्नांची उत्तरे आपल्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. मानव हा बुद्धिमान असला तरी तो तितकाच संवेदनशील प्राणीही आहे. बुद्धीपलीकडचे जे घडते आहे ते असे का घडते? यामागे काही तरी चमत्कार असावा, असे समजून निसर्गात होणाऱ्या या नसíगक बदलांना मानवाने सुरुवातीच्या काळात देवत्व बहाल केले. याचीच काही उदाहरणे आपल्याला हडप्पासारख्या आदिम संस्कृतींमध्येही जल, सूर्य, मातृउपासनेसारख्या विधींमधून पाहावयास मिळतात. याच उपासनेची पुढे विकसित व प्रगत रूपे आपल्याला भारतीय संस्कृतीत आढळतात. जगात इतरत्र आढळणार नाही असे निसर्गाचे पराकोटीचे महत्त्व भारतीय व्रतवैकल्यांमध्ये आढळते, परंतु त्यामागच्या शास्त्रीय कारणांचा मात्र आपल्याला विसर पडला आहे. हे सण, ही व्रतवैकल्ये श्रद्धा की अंधश्रद्धा, या वादात अडकून पडली आहेत.

सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, पाऊस हा सर्वाचाच आवडता ऋतू. या ऋतूत सृष्टीला नवचतन्य प्राप्त होते. हिरवा शालू नेसलेल्या नवविवाहितेप्रमाणे सृष्टीचे रूप खुलून दिसते. पावसाच्या या चार महिन्यांत निसर्गाचे सौंदर्य केवळ पाहण्याजोगे असते. उष्णतेने वैशाखात झालेला पृथ्वीचा दाह या काळात शमलेला असतो, वातावरणात शीतलता आलेली असते. आणि त्याचबरोबर चाहूल लागते ती निरनिराळ्या सणांची व व्रतवैकल्यांची. या काळात संपूर्ण भारतात उपासतापास सुरू होतात. पावसाचा चार महिन्यांचा काळ हा विशेषच असतो. निसर्ग व अध्यात्म बरोबरीने वाटचाल करतात, म्हणूनच पावसाळ्यात येणाऱ्या सणांचा व व्रतवैकल्यांचा समावेश चातुर्मास या संकल्पनेच्या अंतर्गत केला जातो.

आषाढ शुद्ध एकादशीपासून काíतक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून काíतक पौर्णिमेपर्यंतच्या चार महिन्यांच्या काळास ‘चातुर्मास’ असे म्हणतात. चातुर्मासाची सुरुवात होते ती आषाढ शुद्ध एकादशीपासून, ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. परंपरागत चालत आलेल्या कथांनुसार या दिवसापासून पुढील चार महिन्यांच्या काळात देव झोपी जातात. म्हणूनच या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या काळात श्री विष्णू क्षीरसागरात चिरनिद्रा घेतात म्हणूनच ही एकादशी विष्णुशयनी अथवा हरिशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. पुराणांमध्ये हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थानी वापरला जातो. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्य-चंद्र दिसेनासे होतात म्हणूनच या काळासाठी केलेला हरिशयन असा उल्लेख योग्यच वाटतो. या काळात विष्णू व इतर देव कार्यरत नसले तरी सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मदेव मात्र या कालावधीत आपले नवनिर्मितीचे कार्य करत असतो असे मानले जाते.

आता प्रश्न असा आहे की, चातुर्मास हा चार महिन्यांचाच का असतो? कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते. पौराणिक कथांनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. म्हणजेच देवांची रात्र कर्क संक्रांतीला म्हणजेच आषाढ महिन्यात सुरू होते. व येथूनच सुरुवात होते ती चातुर्मासाला.

भारतीय संस्कृतीत चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चातुर्मासाच्या कालावधीत आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन व काíतक या महिन्यांचा समावेश होतो. धार्मिक संकल्पनेनुसार या काळात देव झोपी गेल्याने कार्यरत नसतात, म्हणूनच व्रतवैकल्याद्वारे साधना करावी असे सुचविले जाते. त्या अनुषंगाने या काळातील व्रतवैकल्यांच्या नियमांचे प्रयोजन केलेले दिसते. या आध्यात्मिक व धार्मिक कारणांव्यतिरिक्त चातुर्मासाच्या प्रयोजनामागील नसíगक, भौगोलिक तसेच आयुर्वेदीय कारणमीमांसाही विशेष उल्लेखनीय आहे. म्हणूनच चातुर्मासाचा पावसाशी असलेला संबंध व शेतीशी असलेला संबंध जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

कृषी संस्कृती आणि चातुर्मास

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून शेतीचे भवितव्य हे पावसावर अवलंबून असते. पावसाचे चार महिने हे शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचे असतात. या काळात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीच्या प्रमाणावर शेतीची पुढील गणिते अवलंबून असतात. जून महिन्याच्या साधारण पहिल्या आठवडय़ात भारतात मान्सून दाखल होतो. हा मान्सून शेतीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच शेतकरी एप्रिल-मे महिन्यातच मान्सूनपूर्व जमिनीची मशागत करून घेतात. जून महिन्यात मनासारखा पाऊस झाला तर चांगल्या उत्पादनाची हमी शेतकऱ्याला असते. म्हणूनच आषाढ महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडून वाफसा झाला की पेरणी केली जाते. हे पेरणीचे काम एकदा पूर्ण झाले की त्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडे फारसे काम नसते. मग या काळात त्याला ओढ लागते ती विठ्ठलाची. विठ्ठलाच्या उपासनेचा दिवस म्हणजेच चातुर्मासातील पहिले व्रत आषाढी एकादशी. या दिवशी आपल्या आराध्याला भेटण्यासाठी वारकरी पंढरपुराकडे धाव घेतात. महत्त्वाचे म्हणजे वारीतील बहुतांश वारकरी हे शेतकरी असतात. ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातदेखील आपल्याला तत्कालीन शेतीव्यवस्थेविषयी व शेतकऱ्यांविषयी माहिती सापडते. यावरून लक्षात येते की, चातुर्मासातील आषाढी एकादशी व शेती यांचा खूप जवळचा संबंध आहे. ज्येष्ठात केलेल्या पेरणीनंतर आषाढात शेतकऱ्यांचे काम थांबते. शेतीसंदर्भात खूप महत्त्वाचे असे काही काम नसते, म्हणूनच या काळात देव शयनास जातात अशी संकल्पना दृढ झाली असावी. तर आश्विन महिन्यात पिकांची तोडणी केली जाते, व काíतकात मळणी होऊन देवोत्थानची म्हणजेच देवांच्या उठण्याची वेळ होते अशी परंपरा आहे.

असेच काहीसे इतर सणांच्या बाबतीतही आढळून येते. श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा करतात. हा सण नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे; या काळात नागाप्रीत्यर्थ कृतज्ञता व्यक्त केली जाते. याशिवाय िहदू धर्मात नागाला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. संपूर्ण भारतात या नागाची पूजा केली जाते. अगदी प्राचीन काळापासून मातृदेवतेच्या बरोबरीनेच नाग किंवा सर्पपूजा महत्त्वाची मानली गेली आहे. म्हणूनच महाराष्ट्रात बऱ्याच घराण्यांत कुलदेवता सातेरी देवी ही वारुळाच्या रूपात पुजली जाते व या घराण्यांचा प्रामुख्याने शेतीशी संबंध आढळून आला आहे. महाराष्ट्र वगळता आंध्र प्रदेश हे उत्तम उदाहरण ठरू शकते. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यतील भट्टीप्रोलू या गावात नागुलचौथी हा सण काíतक महिन्याच्या शुक्ल पक्षात मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो, या दिवशी षडाननाची पूजा केली जाते; परंतु षडाननाची पूजा त्याच्या मूळ रूपात न करता, नागासहित वारूळ या रूपात केली जाते व या दिवशी स्त्रिया संतानप्राप्तीसाठी व संतान रक्षणासाठी नागरूपी षडाननाकडे नवस करतात. यावरून असे लक्षात येते की शेती, नाग व मातृपूजा यांचा एकमेकांशी खूप निकटचा संबंध आहे. नागपंचमीनंतर श्रावणात वद्य अमावास्येला पोळा साजरा केला जातो. या वेळी शेतीची सर्व कामे आटोपलेली असल्यामुळे बलांना फारसे काम नसते. शेतकरी बलांना या दिवशी स्वच्छ धुऊन, त्यांच्या अंगाला िहगुळ, िशगाना बैंगड, गळ्यात सुंदर माळा घालून सजवतात. बलाला पुरणपोळीचा नवेद्य दिला जातो, काही शेतकरी पंधरा दिवस बलांना खायला घालून पुष्ट करतात व त्यांची मिरवणूक काढतात. म्हणूनच ऋषीपंचमीच्या दिवशी बलाच्या मेहनतीचे खाण्याऐवजी परसातल्या भाज्यांवर भर दिला जातो. बल पोळ्याच्या दिवशी ब्राह्मणघरात मातीचा बल करून त्याची पूजा केली जाते. मातीचा बल करून पुजण्याची परंपरा ही प्राचीन असून सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर भाजलेल्या मातीचे बल सापडलेले आहेत. नागाप्रमाणे बलालाही प्राचीन काळापासून मातृदेवतेच्या पूजनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यानंतर साजरी केली जाते ती नवरात्र, नवरात्रीत केल्या जाणाऱ्या घटस्थापनेचा व शेतीचा खूप जवळचा संबंध आहे. मातीच्या घटात द्विदल धान्य लावून नऊ दिवस त्या घटाची पूजा केली जाते, हा घट गर्भाचे किंवा जमिनीचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीनंतर साजरी केली जाते ती कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे नवान्न प्राशन करण्याचा दिवस. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज या महिन्यात झालेले असते. शेतात नवीन पीक येते. त्या नवीन पिकाचा- अन्नप्राशनाचा प्रारंभ करण्यासाठी हा मुहूर्त सांगितला आहे. या चातुर्मासातील सर्व सण व्रतवैकल्यांवरून लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या सर्वाचा शेती, पाऊस व मातृपूजेशी असलेला संबंध. मुळातच भारतीय संस्कृतीत भूमी व स्त्री यांना एकसमान मानलेले आहे, भूमीला नेहमीच मातृदेवतेच्या स्वरूपात पुजले जाते. अगदी अश्मयुगीन मानवही यापासून अलिप्त राहू शकला नाही. पावसाच्या या कालावधीत भूमीतून नवनिर्मिती होत असते त्यावरच संपूर्ण सृष्टीतील जीवजंतूंचे भरणपोषण होत असते. म्हणूनच या नवनिर्मितीचा कालावधी शेतीच्या वेगवेगळ्या पायऱ्यांनुसार सण व व्रतवैकल्यांच्या माध्यमातून साजरा केला जातो.

आयुर्वेद आणि चातुर्मास

चातुर्मासातील व्रतवैकल्यांच्या नियमांमध्ये मोठय़ा प्रमाणात आयुर्वेदातील अनेक बाबी समाविष्ट झालेल्या दिसतात. चातुर्मास हा पावसाळ्याचा कालावधी असल्याने अनेक आजार या काळात बळावतात. पूर्वी या काळात मुसळधार पावसामुळे लांबचे प्रवास टाळत असत, त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. पावसाच्या या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते, याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रत-वैकल्यांची मांडणी केलेली दिसते. या काळात एक तरी व्रत करावे असा दंडक सांगितला जातो. या व्रतांच्या उपासनेत एक वेळ भोजन करणे, कमी व हलका आहार करणे, मांसाहार टाळणे, कांदा-वांगी, चिंचा इत्यादी पदार्थ टाळावेत असे काही दंडक सांगितलेले आढळतात. मुळातच या कालावधीत पचनसंस्था मंदावलेली असते, त्यामुळे मांसादी पचायला जड असलेले पदार्थ टाळण्यास सांगितलेले आहे. पावसात रोग, जीवजंतूंचे प्रस्थ असते, प्राण्यांना या जीवजंतूंचा प्रादुर्भाव लवकर होतो, प्रादुर्भाव झालेले असे मांसग्रहण करणे हे कधीही अपायकारक ठरू शकते. असे असले तरी हे खाद्यपदार्थ टाळण्यामागे काही पौराणिक कथाही आहेत, चातुर्मासात कांदा व लसूण वज्र्य आहेत. त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. या कथेनुसार समुद्रमंथनातून निघालेले अमृत कोणाला मिळावे यावरून देव व असुर यांच्यात युद्ध सुरू झाले. या युद्धाचा अंत करण्यासाठी व देवांनाच अमृत प्राप्त व्हावे यासाठी भगवान विष्णू यांनी मोहिनीरूप धारण केले व देवांना अमृत प्राप्त करून दिले, परंतु राहूने देवांचे खोटे रूप धारण करून अमृत ग्रहण केले. हे मोहिनीरूपी विष्णूच्या लक्षात येताच, आपल्या सुदर्शन चक्राने राहूचे शिर त्यांनी धडावेगळे केले. त्या वेळी राहूच्या मुखातून अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले, या थेंबांचे कांदा व लसूण यांच्यात रूपांतर झाले. अमृतातून कांदा व लसूण निर्माण झाल्यामुळे त्यांच्या सेवनातून अनेक रोग बरे होऊ शकतात, पण हे अमृताचे थेंब राक्षसाच्या मुखातून खाली पडले म्हणून या कांदा व लसणाला उग्र दर्प आहे असे मानले जाते. म्हणूनच भगवंताच्या नवेद्यासाठी यांचा वापर केला जात नाही. असुर स्पर्शामुळे कांदा व लसूण यांना या काळात मांसासमान मानले गेले. म्हणूनच जो कांदा-लसूण खातो त्याचे मन व शरीर तामसिक स्वभावाचे होते. ते जास्त खाल्ल्यामुळे ध्यान, भजन, पूजेत मन लागत नाही व सर्व सेवा पतन होते. म्हणून कांदा-लसूण खाण्यास धर्मशास्त्राने मनाई केली आहे. कांदा व लसूण हे वीर्यवर्धक असल्याने चातुर्मासाच्या उपासनेच्या काळात तो वज्र्य मानला जातो.

चातुर्मासात िपपळ व तुळस यांचा पूजेत मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. तुळस ही कफ व वातशामक तसेच जंतुनाशक आहे. तुळस शरीरातील अग्नीस उत्तेजना देते, सर्दी-खोकल्यावर गुणकारी आहे. म्हणूनच पावसाच्या दिवसांत तुळशीचा जास्तीत जास्त वापर करणे हे फायद्याचे ठरते. चातुर्मासात िपपळाची पूजा करण्यास सांगितली जाते. िपपळाभोवती प्रदक्षिणा घालून ही पूजा केली जाते. िपपळाची साल औषधशास्त्रामध्ये अतिशय उपयुक्त मानली जाते. जुलाब, उलटय़ा, आव पडणे यांसारख्या आजारांवर िपपळाची साल ही रामबाण उपाय आहे. पावसाळी वातावरणात सर्दी, पडसे, उलटय़ा, जुलाब हे आजार नेहमीचेच असतात, त्याच अनुषंगाने पूजा साहित्यात तुळस व इतर पत्रींचा समावेश केलेला आहे. श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीच्या व्रतात, भाद्रपदातील हरतालिकेच्या व्रतात उद्यापनानंतर देवीला वाहिलेल्या पत्रींचा काढा प्रसाद म्हणून घ्यावयाचा असतो. श्रावणातील प्रत्येक व्रताच्या निमित्ताने स्त्रिया हातावर मेंदी काढतात, मेंदी ही पित्तशामक असते. मेंदीमुळे शरद ऋतूत होणारा पित्ताचा त्रास कमी होतो. आश्विनातील ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा दूर्वा वाहून केली जाते. तर भाद्रपद महिन्यात गणेश पूजनात दूर्वा महत्त्वपूर्ण असतात, दूर्वादेखील पित्तशामक आहेत म्हणूनच या काळातील पित्ताच्या त्रासावर दूर्वा उपयोगी पडतात. यावरून असे लक्षात येते की चातुर्मासातील प्रत्येक व्रतामागे वातावरणाचा सूक्ष्म विचार केलेला आहे.

जैन धर्म आणि चातुर्मास

जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि काíतक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात इतर वेळी एका गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते काíतक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चातुर्मासात यतीला वपन वज्र्य सांगितलेले आहे. त्याने चार महिने निदान त्यातील दोन महिने तरी तरी एकाच ठिकाणी राहावे, असे ‘धर्मसिंधु’ या ग्रंथात सांगितलेले आहे. चातुर्मास हा जैन धर्मासाठी महत्त्वपूर्ण असतो या काळात बाविसावे जैन र्तीथकर नेमिनाथ यांचा श्रावण महिन्यातच जन्म झाला व याच महिन्यात त्यांनी दीक्षा घेतली व आषाढात त्यांचे निर्वाण झाले. या नेमिनाथांचे विठ्ठलाशीही खूप जवळचे नाते आहे. िहदू मान्यतेनुसार चातुर्मासाची सुरुवात ही कृष्ण, विठ्ठल किंवा विष्णुपूजेने होते. चातुर्मासाच्या पूर्ण कालावधीत विष्णू निद्रेत असल्याने विष्णू, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा चातुर्मासात केली जाते. वैष्णवांप्रमाणे जैनांनीही विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. जैन धर्मात विठ्ठलाला नेमिनाथ मानले जाते. विठ्ठल व नेमिनाथ यांत रूप, गुण व चरित्र यांच्यामध्ये काही प्रमाणात साम्य आहे. नेमिनाथ हा जैनांचा बाविसावा तीर्थकर आहे. जैन परंपरेनुसार कृष्ण व नेमिनाथ हे दोघे परस्परांशी निकटचे संबंधित आहेत. त्या दोघांचा जन्म यदुकुळात झाला आहे. नेमिनाथ व कृष्ण हे दोघेही चुलत भाऊ होते. वसुदेवाचा पुत्र कृष्ण व वसुदेवाचा भाऊ समुद्रविजय याचा मुलगा म्हणजे नेमिनाथ. नेमिनाथांचे बालपण द्वारकेत गेले. कृष्ण गोरक्षक होता तर नेमिनाथ पशुरक्षक. कृष्ण व नेमिनाथ यांत चारित्र्यसाम्य व गुणसाम्य तसेच रूपसाम्यही आहे. जैन मूर्ती विज्ञानानुसार नेमिनाथांचा वर्ण काळा तर त्याचे एवामेवलांच्छन शंख आहे. यावरून असे लक्षात येते की, जैन व िहदू चातुर्मासात एक दुवा असावा.

बौद्ध धर्म आणि चातुर्मास

जैन धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही चातुर्मासाची संकल्पना आहे. बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार फार काळ एका ठिकाणी राहण्याची परवानगी भिक्खूंना नाही. एका ठिकाणी जास्त काळ वास्तव्य केल्यास त्या जागेविषयी ऋणानुबंध निर्माण होतात. केवळ पावसाच्या काळात एका ठिकाणी राहण्याची परवानगी असे. पावसाळी वातावरणात प्रवास करणे कठीण होते, म्हणूनच वर्षांवास ही संकल्पना विकसित झालेली दिसते. यातूनच बौद्ध धर्मात चातुर्मासाची प्रथा सुरू झाली. याशिवाय आषाढी पौर्णिमेला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार मायादेवीला या दिवशी गर्भधारणा झाली. म्हणून चातुर्मासातील हा दिवस बौद्ध धर्मात महत्त्वाचा मानला जातो. बौद्ध धर्मातील कथेनुसार शुद्धोधनाच्या एका राणीचे नाव महामाया होते, तर दुसऱ्या राणीचे नाव महाप्रजापती गौतमी होते. असे असले तरी दोन्ही राण्यांकडून राजाला अपत्यप्राप्ती झाली नव्हती. म्हणूनच अपत्यप्राप्तीच्या उद्देश्यपूर्तीसाठी चातुर्मासात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायादेवींनी राजवाडा स्वच्छ केला. घरात गोडधोड पदार्थ नवेद्यासाठी केले. नगरातील भिक्षूंना, गरिबांना दानधर्म केला व त्याच रात्री राणीला स्वप्नदृष्टान्त झाला. स्वप्नात सुमेध नावाचा बोधिसत्त्व हत्तीच्या रूपात आला व आपल्या सोंडेने सफेद कमळाचे फूल महामायेला देऊन तो बोधिसत्व, ‘माते, मी माझा शेवटचा जन्म तुझ्या कुशीत घेणार आहे’ असे म्हणून तो राणीच्या शरीरात सामावला. त्या स्वप्नाचा तिला अर्थबोध होईना. तिने राजाला स्वप्नाची माहिती सांगितली. राजा शुद्धोधनाने स्वप्नविद्य्ोत पारंगत असणाऱ्या आठ ब्राह्मणांना निमंत्रित केले. या आठ ब्राह्मणांनी महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला की, राजा, तुझी राणी पुत्रवती होणार आहे.

बौद्ध धर्मात चातुर्मासाची परंपरा फार जुनी आहे. चातुर्मासाच्या काळात जीवितीदेवीचे व्रत िहदू धर्मात सांगितले जाते, त्याचे मूळ बौद्ध धर्मात सापडते. श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी घरातील स्त्रिया मुलांच्या रक्षणार्थ जिवतीदेवीची पूजा करतात. ही जीविती म्हणजेच बौद्ध धर्मातील हारिती आहे. बौद्ध देवता मंडलातील देवी हारिती ही देवता पुराण वाङ्मयात जात हारिणी या नावाने उल्लेखिली आहे. हारिती म्हणजे जीवांचे हरण करणारी व जात हारिती म्हणजे  नवजात बालकांचे हरण करणारी या दोन्ही एकच आहेत. बुद्धाच्या दृष्टीमुळे हारिती जी जिवंतिका म्हणजेच जीवांचा अंत करणारी होती, ती जीवंतिका झाली म्हणजेच जीवांना राखणारी, रक्षण करणारी – जिवती बनली आणि घरोघरी जीविका म्हणून पुजली जाऊ लागली.

प्रत्येक धर्मानुसार चातुर्मासाची परंपरा वेगवेगळी असली तरी चातुर्मासाचा हा काळ उपासना करण्यासाठी व ती वाढविण्यासाठी अनुकूल असतो असे मानले गेले आहे, कारण धर्मशास्त्रानुसार या काळात केलेली उपासना ही विशेष फलदायी होते, म्हणूनच या चार महिन्यांत नामस्मरण करणे, धार्मिक ग्रंथ वाचून समजून घ्यावे, असे धर्मशास्त्र सांगते. असे असले तरी शरीर व मन यांना शिस्त लागण्यासाठी चातुर्मासातील काही नियम पाळावेत, त्यायोगे मनाला संयम करण्याची सवय लागते व मन सक्षम बनते. एकूणच संपूर्ण चातुर्मासाचा काळ हा निसर्गातील बदलांशी जोडला गेला आहे. विशेष म्हणजे चातुर्मासातील बरीच व्रते ही इतर दिवशी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या अमावस्या व पौर्णिमेला पाळली किंवा साजरी केली जातात. पावसाच्या संपूर्ण कालावधीत मन, शरीर व त्यांच्यावर होणाऱ्या नसíगक बदलांना अनुसरून चातुर्मासाचे प्रयोजन विविध धर्मानी केले आहे, हेच यातून लक्षात येते.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rain religion and chaturmas

ताज्या बातम्या