नटरंग, बालगंधर्व, बालकपालक, टाइमपास, मित्रा असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देत व्यवसाय आणि कला यांची यशस्वी सांगड घालून दाखवणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव यांचा नवा चित्रपट येतो आहे, बँजो.. महत्त्वाचं म्हणजे बँजो कलाकारांचं जीवन दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा बॉलीवूड प्रवेश होतो आहे.
‘नटरंग’ या लावणीप्रधान चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण, पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक अशी दमदार एन्ट्री रवी जाधव यांनी सहा वर्षांपूर्वी घेतली होती. आज वेगवेगळे चित्रपट दिग्दर्शित करत, निर्मिती-प्रस्तुती करत किंवा तरुण दिग्दर्शकांना नवनव्या विषयांसाठी पाठिंबा देत सर्जनशीलतेच्या सगळ्याच आघाडय़ांवर अग्रणी राहिलेला हा दिग्दर्शक अगदी कमी कालावधीत ‘बँजो’ या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये प्रवेश करतो आहे. व्यावसायिकता आणि आशयघनता या दोन गोष्टींची सांगड घालून यशस्वी चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांचा लौकिक आहे. ‘कधीतरी मराठीतून हिंदीत जाताना आपला पहिला चित्रपट कसा असेल असा विचार डोकावला तेव्हा माझ्या हिंदी चित्रपटाची कथा मराठीच असेल, हा निर्धार मनात पक्का होता,’ असं त्यांनी सांगितलं. योगायोगाने, त्यांचा पहिला मराठी चित्रपट हा संगीताशी-लावणी या लोककलेशी जोडलेला होता. तर पहिला हिंदी चित्रपटही लोप पावत चाललेल्या लोकसंगीताशीच जोडलेला आहे. यानिमित्ताने, ‘बँजो’च्या कथाकल्पनेपासून प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या अनुभवांबद्दल रवी जाधव यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘बँजो’ आज दिग्दर्शक म्हणून सुरुवात केल्यानंतर सहा वर्षांनी रुपेरी पडद्यावर येत असला तरी त्याची बीजं ‘नटरंग’च्या वेळीच रुजलेली होती, असं त्यांनी सांगितलं. ‘नटरंग’च्या वेळी आम्ही सोलापूरला गेलो होतो प्रसिद्धीच्या कार्यक्रमांसाठी.. तिथे लग्नाची वरात चालली होती. आणि तिकडे तो बँजो वाजत होता, अनवाणी पायाने ते वाजवत चाललेले होते, लोक पैसे फेकत होते. एकतर त्या वेळी ‘नटरंग’च्या निमित्ताने तो विषय मनात घर करून होता. आणि बँजो वाजवणारे लोक इतकी र्वष आपण पाहतो आहोत, ठाण्यात-मुंबईत.. त्या वेळी हे असं का करतात?, असे फेकलेले पैसे का उचलतात, यांचं जीवन काय आहे, असे अनेक प्रश्न मनात आले आणि तिथून संशोधनाला सुरुवात झाली. मग कळलं की अरे! बँजो फक्त महाराष्ट्रात वाजत नाही मग तो पंजाबमध्ये वाजतो, उत्तर प्रदेश-बिहारमध्ये वाजतो, गुजरातमध्ये वाजतो.. हैदराबादमध्येही वाजतो. लखनौला तर तो कव्वालींच्या सामन्यांमध्ये वाजतो. या सगळ्या माहितीमध्ये एकच समान धागा होता तो म्हणजे या बँजो कलाकारांना आदर मिळत नाही. त्या वेळी मग आम्ही जवळजवळ ५० बँजो ग्रुप्सशी बोललो, त्यांचं चित्रीकरण केलं. भारतात रस्त्यावर गाणी-बजावणी करणारी जी कलाकार मंडळी आहेत त्यांना ज्या प्रकारचं व्यासपीठ मिळायला हवं होतं तसं ते कधीच मिळालं नाही. त्यामुळे आधी ब्रास बँड वाजवणारी मंडळी होती, पण मग टेपरेकॉर्ड आलं, आता डीजे आहे यात ते कुठेतरी हरवले. आताही आपल्याकडे जी ढोल-ताशे, हलगी वाजवणारी मंडळी आहेत किं वा हे जे शब्द आहेत तेही नाहीसे होतील की काय, अशी भीती वाटते. या सगळ्याचा विचार मनात सुरू झाल्यानंतर आपण या विषयासाठी चित्रपट माध्यमातूनच काहीतरी क रू शकतो, हे जेव्हा उत्तर समोर आलं तेव्हा म्हणजे पाच वर्षांपूर्वी या चित्रपटाची सुरुवात झाली, असं रवी जाधव यांनी सांगितलं.
‘बँजो’ हिंदीतच का केला?, याविषयीही त्यांनी विस्ताराने सांगितलं. ‘बँजो’ची कथा लिहिताना एकेक गोष्ट आकाराला येत गेली. जसं रस्त्यावरचा एखादा कलाकार आहे त्याचीही अंतिम इच्छा काय असेल की त्याच्या गाण्यासाठी-संगीतासाठी त्याला व्यासपीठ मिळावं. हे व्यासपीठ किती मोठं असू शकेल, त्याच्या आजूबाजूचा माहौल काय असेल असं हळूहळू ती गोष्ट विस्तारत गेली. आणि मग झालं असं की हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स ‘नटरंग’पासून होत्या, पण त्या वेळी ठोस असं काही हातात नव्हतं. दुसरं म्हणजे काही योगायोगाच्या गोष्टीही असतात.. ‘नटरंग’ जेव्हा केला तेव्हा तमाशा तर के व्हाच गेला, आता त्याच्यावरचे चित्रपट कोणीही काढत नाही. काय होणार आहे तुमच्या या चित्रपटाचं, अशा उपहासात्मक प्रतिक्रिया होत्या. पण मी म्हटलं नाही, मला हा चित्रपट करायचाच आहे, याने नक्की काही गोष्टी बदलतील आणि खरंच या चित्रपटाने खूप गोष्टी बदलल्या. आजही जगभरातील लोक ‘नटरंग’शी जोडली गेली आहेत. परदेशात महिला नऊवारी नेसून त्यातील गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. आता ‘बँजो’च्या बाबतीतही सुरुवातील लोकांकडून अशीच उत्तरं मिळत होती. गंमत म्हणजे जे वाद्य महाराष्ट्रात गेली शंभर र्वष वाजतंय त्याचं नाव इथे लोकांना माहिती नाही, ती कला अजूनही आहे हेही त्यांच्या गावी नाही. पण बँजोची ही कथा सांगण्यासाठी भव्य व्यासपीठाचीच गरज होती. म्हणून मग हा चित्रपट हिंदीत करण्याचा निर्णय पक्का केल्याचं त्यांनी सांगितलं.

‘बँजो’चे प्रोमोज झळकल्यानंतर ‘काहीसा ‘रॉकस्टार’सारखा लुक या चित्रपटाला दिसतो..’ असं म्हणायचा अवकाश की ‘बँजो कलाकार हे एकप्रकारे रॉक आर्टिस्टच असतात,’ असं रवी ठामपणे सांगतात. मी घेतलेल्या ५० मुलाखतींमध्ये ४२ जणांचे केस हे लांब होते. का बरं तुम्ही केस लांब का ठेवता, असा प्रश्न विचारल्यावर ते छान वाटतं केस लांब ठेवल्यावर असं उत्तर देतात. म्हणजे त्यांना ठोस सांगता येत नसेल पण लांब केस, कपडे जुनाट असतील पण रॉकस्टारसारखे त्या रंगाचे-ढंगाचे कपडे, तशी शैली त्यांनी आपलीशी केलेली असते. त्यामुळे ते तसेच असतात. त्यांच्याकडे पैसेही नसतात, बरेचसेजण केवळ वेडापायी फावल्या वेळात हे बँजो वाजवण्याचं काम करतात. हे त्यांचं रंगीबेरंगी वास्तव आहे आणि मला जे ‘जे. जे.’तून शिक्षण मिळालं आहे त्याची जोड देत फ्रेमिंग, लाइटिंग वेगळी करत त्याला एक स्टाइलाज्ड लुक देण्याचा प्रयत्न केला आहे, असं ते सहजपणे सांगून टाकतात. ‘बँजो’चा नायक तराट म्हणून रितेश देशमुख पहिल्यांदाच रॉकस्टार लुकमध्ये लोकांसमोर येतो आहे किंबहुना त्याची केसांची स्टाइलही लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. यावर रितेश विनोदी भूमिकांमधून आणि ‘लय भारी’ अॅक्शन हिरो म्हणूनच लोकांना परिचित असला तरी बँजोची कथा लिहीत असतानाच त्याचा चेहरा नजरेसमोर होता, असं रवी जाधव यांनी सांगितलं. मला या चित्रपटासाठी मराठी संस्कृतीची माहिती असलेला, ज्याने बँजो वाजवणारे आजूबाजूला पाहिलेत, असा कलाकार हवा होता. ज्या वेळी रितेशचा ‘एक व्हिलन’ पाहिला त्या वेळी तर हीच आपली निवड आहे, हे ठाम झालं होतं. जी गोष्ट रितेशच्या बाबतीत घडली तीच नर्गिस फाखरीबद्दल घडली, असं ते म्हणतात. ‘‘न्यू यॉर्क हून मुंबईला आलेली मुलगी आम्हाला दाखवायची होती. नर्गिस तशीच आहे. शिवाय, ती या भूमिके वर जाम खूश होती त्याचं कारण तिच्याच शब्दांत सांगायचं तर पहिल्यांदा मला खोटा मेअकप चढवून भूमिका करायची नाही आहे. मी जशी आहे, जशी दिसते त्या पद्धतीने मला काम करायला मिळतं आहे, असं ती म्हणाली. नर्गिसचं बालपणही न्यू यॉर्कमध्ये गेलं, मग ती मुंबईत आली म्हणजे कुठेतरी चित्रपटाची जी नायिका आहे तिची कथा नर्गिसच्या खऱ्या आयुष्याच्या जवळ जाणारी असल्याने ती खूप आनंदात होती.’’
‘बँजो’चं चित्रीकरण वरळी गावात झालं आहे. वरळी गाव इतकं गजबजलेलं आहे की तिथे चित्रीकरण करताना अडचणी खूप येतात, मात्र तिथला चित्रीकरणाचा अनुभवच वेगळा असल्याचं ते सांगतात. मी स्वत: वरळी गावात लहानाचा मोठा झालो आहे त्यामुळे मुंबईचा तो भाग वेगळा आहे, खरा आहे. तिथे चित्रपटासाठी म्हणून एक जहाज उभं करायचं होतं. आणि त्यासाठी लागणारं लोखंडाचं सामान भरतीच्या वेळी शिवाजी पार्क चौपाटीवरून बोटीत घालून आणावं लागायचं. तास-तासभर त्याला लागायचा, पण गंमत अशी की तिथे जेव्हा बोट उभी राहिली तेव्हा समुद्रावर कोणाची तरी बोट आली म्हणून हाकाटी झाली आणि मग लोक लांबून केवळ ती बोट बघण्यासाठी यायचे. ते एक पर्यटनस्थळ बनलं होतं, अशी चित्रीकरणाच्या निमित्ताने अनुभवलेली गमतीशीर आठवणही त्यांनी सांगितली.
‘नटरंग’ ते ‘बँजो’ या प्रवासात दिग्दर्शक म्हणून वेगवेगळे विषय हाताळणारा हा सर्जनशील दिग्दर्शक, आपल्याला अजूनही आपली शैली गवसलेली नाही, असं म्हणतो. ‘नटरंग’नंतर मी ‘ढिंच्यॅक ढिंच्यॅक’ नावाची सेक्स कॉमेडी केली. ‘बालगंधर्व’ केला. पुन्हा मग ‘बालक पालक’सारखा लैंगिक शिक्षणाचा विषय हाताळणारा चित्रपट केला. ‘टाइमपास’ हा तर मराठीतला पहिला नववी-दहावीतल्या मुलांच्या प्रेमकथेवरचा व्यावसायिक चित्रपट होता. त्यामुळे जर मी ‘नटरंग’मध्ये अडकलो असतो तर ‘बालक पालक’ करू शकलो नसतो. आणि ‘बालक पालक’मध्ये अडकलो असतो तर ‘बालगंधर्व’ किंवा ‘मित्रा’सारखा लेस्बियनवरचा लघुपट करू शकलो नसतो. मला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला नसता. दिग्दर्शक म्हणून मी आजही सातत्याने नवनवीन काही चाचपडून पाहतो आहे असं सांगतानाच सातत्याने नावीन्याच्या शोधात असलेला हा दिग्दर्शक आपली एक ठरावीक शैली विकसितच होऊ नये, असं आग्रही मत मांडतो. शैलीपेक्षा सर्जनशीलतेवर, प्रयोगशीलतेवर भर देणाऱ्या या दिग्दर्शकाच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे ‘बँजो’चे सूर बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावरून देशभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणार का याची उत्सुकता प्रेक्षकांइतकीच रवी जाधव यांनाही आहे, याबद्दल शंका नाही.
रेश्मा राईकवार – response.lokprabha@expressindia.com
