संध्याकाळी सगळे जग उदास का होते? आणि त्यानंतरच्या अंधाराने जगातले सगळे संदर्भ कसे पुसून जातात? हे कोडे मनाला सुटत नाही. मग..सारे जगच आपआपले अस्तित्व विसरून अंधाराच्या कुशीत झोपी जाते.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

जगाच्या एका कोपऱ्यात अगदी छोटय़ा तुकडय़ाएवढय़ा झोपडीला जाग आली, आणि जगाच्या दृष्टीने अतिसूक्ष्म असणाऱ्या त्या मानवी जिवाने नाइलाजाने अंगावरचे पांघरूण बाजूला सारून आपल्यापुढील प्रचंड अडचणींनी समोर जाण्याची तयारी दाखवली. खरं तर डोक्यात तिडीक भरेल अशी ती झोपडी होती. गळके छप्पर, रॉकेल, धान्याचा, पाण्याचा प्रश्न, गरिबी, महागाई, बायकापोरांची कटकट याने ‘‘आयला आग का लागत नाही सगळय़ाला?’’ अशी भावना रघूच्या मनात आली.

‘‘आंघोळ गार पाण्याने की गरम?’’ नरम बायकी आवाज.

‘‘रोज कशी करतोय ? माहिती नाही?’’ चिडलेला आवाज.

‘‘नाही, थोडी सर्दी होती म्हणून..’’

‘‘माहिती आहे, किती काळजीची आहेस ते’’ वैतागलेला आवाज.

कारण खरंच रघूला सगळय़ाचा वैताग आला होता, तोच सूर्य, तेच उठणे, तीच आंघोळ, तेच जेवण, तीच फॅक्टरी, तेच काम, तेच प्रश्न सर्व तेच ते आणि तेच ते..ज्याला अंत नाही असे. जीवनाला कंटाळा आणणारे कदाचित मरेपर्यंत चालणारे.

जांभया देत रघूने ब्रश केले आणि डबा घेऊन रांगेत जाऊन उभा राहिला. रेशनपासून पोट साफ करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला रांगेत का उभे राहावे लागते? त्याबद्दल त्याची चिडचिड होती. तरीही त्याला कोणी तरी ‘हे असे का?’ असे विचारले असते तर..भारतातील ९० टक्के माणसाप्रमाणे ‘नशीब’ किंवा ‘मागच्या जन्माचे पाप’ हेच उत्तर त्याने दिले असते.

रघूने ‘‘बदाबदा पाणी ओतून घेऊन’’ म्हणतात तशी आंघोळ केली तोपर्यंत त्याच्या बायकोने रॉकेल, लाकूड, कोळसा, जाळ, धूर यांच्या आशीर्वादाने त्याचा डबा तयार केला. ‘‘मुलांची फी..’’ ती बुडली तर आपण बुडू या भीतीसारखा बायकी आवाज, त्यावर रागाचा कटाक्ष. अक्षम्य गुन्ह्य़ाकडे पाहावे तसे रघूने तिच्याकडे पाहिले.

‘‘घरातले धान्य..’’ सांगावे तरी पंचाईत न सांगावे तरी पंचाईत अशा स्थितीतला आवाज.

‘‘मग मी काय करू?’’ शब्दातून वैताग बाहेर.

दोन क्षण शांतता, कारण विचार चाललेला..कोणापुढे हात पसरायचे याचा.

‘‘पाहतो, कोणाकडे पैसे मिळतात का?’’ म्हणजे कोणी उपकार करतंय का? या अर्थी.

आणि रघू घरातून बाहेर पडला.

जगाच्या दुसऱ्या टोकाला तुकडावजा पण सुंदर आणि आलिशान बंगल्यात पहाट उगवली सकाळी बरोबर ५ वाजता नाजूक घडय़ाळातील नाजूक पक्षी आवाजात ओरडू लागला. ‘‘डार्लिग, उठायचं नाही का? व्यायामाची वेळ झाली’’ पक्ष्यापाठोपाठ नाजूक ओठातून नाजूक आवाजात शब्द बाहेर पडले. पण ते ऐकणारे कान नाजूक नव्हते. कारण रघुनाथशेठ स्वभावाप्रमाणे शरीरानेही मजबूत होते. जाग आल्यावर आपल्या श्रीमंती जगण्याची जाणीव होणे आणि त्यामुळेच जीवन सुंदर जाणवणे.  त्यांच्या मनात विचार आला ‘‘अहाहा.. एकंदरीत आणखी एक सुंदर दिवस उगवला तर?’’ मग ‘बेड टी’. या बेड टीमध्ये गरिबाचे जेवण झाले असते. मग दोन झोपडय़ा सहज मावल्या असत्या अशा टॉयलेटमध्ये नंतर एखाद्या मध्यमवर्गीयाचे घर झाले असते अशा बाथरूममध्ये आंघोळ. केवळ बटणावर आपल्याला हव्या त्या तापमानाचे पाणी. तेही मोरपिसाप्रमाणे, पाऊस पडल्याप्रमाणे शॉवरमधून पडत होते आणि तो साबण? एका गरीब माणसाचे कुटुंब एक दिवस सहज जगले असते.

पण या साऱ्याबाबत जर कोणी रघुनाथशेठना विचारले असते तर ‘‘माझ्या ठिकाणी कोणीही असता तर असेच वागला असता’’ किंवा ‘‘ही श्रीमंती काही फुकट आलेली नाही. आमच्या आजोबांनी कसे कष्ट केले? कशी गरिबी सोसली हे केले ते केले’’ अशी उत्तरे दिली असती.

बाथरूममधून बाहेर आल्यावर सगळय़ा जगाची खबर घेत म्हणजे पेपर वाचत नाश्ता. मग पत्नीबरोबर चर्चा.

‘‘मुलांची फी भरली?’’ बेफिकीर आवाज.

‘‘केव्हाच’’. तत्परता!

‘‘आणखी कशाला पैसे हवेत?’’ पैशाची गुर्मी.

‘‘माझ्याकडे कमी नाहीत’’ चेष्टेचे उत्तर पण तुलना माहेरसारखी. पण रघुनाथशेठ फालतू विषय समजून दुर्लक्ष करतात.

‘चलतो मी’ रघुनाथशेठ उठत म्हणाले.

‘‘संध्याकाळी लवकर या’’ लाडात आग्रह.

‘‘बघू..नवीन टेण्डर भरायचे आहे. मीटिंग आहे.’’

‘‘तुमचं आपलं रोजचंच.’’

‘‘म्हणून तर रोज हे सुख भोगतोय’’

‘‘तरीही या ना’’ बायकी आग्रह.

‘‘या बायका एवढय़ा मूर्ख कशा असतात?’’ हे वाक्य मनात ठेवून रघुनाथशेठ गाडीत येऊन बसले.

‘‘च्याआयला एवढे कष्ट करतोय पण साधी सायकल घ्यायला पण जमत नाही’’ चालून चालून पाय दुखल्यावर त्याची कळ हृदयात गेल्यावर हे विचार रघूच्या डोक्यात आले. त्यात भर म्हणून की काय मागून येणारी कार त्याला धडकताना थोडक्यात चुकली आणि न थांबता गेली. त्या वेळी जरा वेळ बाजूला उभे राहिलेला वैताग परत त्याच्या डोक्यात गेला ‘‘आयला, स्वत:ला कोण समजतात हे हरामखोर?’’ त्याचा वैताग चारचौघांना ऐकू गेला. ‘‘अशी गाडी मारणाऱ्यांच्या ७७वर हाणायला पाहिजे’’ तो आणखी जोरात ओरडला. पण प्रत्यक्षात त्या गाडीवाल्याला म्हणाला की स्वत:च्या जिंदगीला हे त्याला समजले नाही. पण चडपडण्यापलीकडे, दोन मिनिटे जागेवर उभे राहून शिव्या देण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता.

रघुनाथशेठ गाडीत बसले, त्याच्या शेजारी सेक्रेटरी बसला होता. त्याने टेण्डरची बोलणी सुरू केली. त्याचे शब्द बाणाप्रमाणे रघुनाथशेठच्या कानात गेले. गाडीची मऊ सीट त्यांना काटेरी लागू लागली.

‘‘आयला एवढी श्रीमंती असूनही काही उपयोग नाही. कधी जाईल सांगता येत नाही’’ एक निराशावादी विचार त्यांच्या मनात आला. आजचे टेण्डर बघा. हे टेण्डर हातून गेले की पैसा आणि पत दोन्हीही हातातून जाणार. त्यानंतर स्वत:च्या पत्नीसकट सगळे जग आपल्याला हातचा सोडून वागवणार. पण अशा टेण्डरमुळेच आज आपण इतके श्रीमंत आहोत. हे केवळ त्यांनाच माहिती होते. अर्थात श्रीमंतीच्या प्रदर्शनाने हे जगाला पण कळत होते. पण आपण काही श्रीमंती मुद्दाम दाखवत नाही. पण ती दिसते त्याला आपला काही इलाज नाही. असे त्यांना वाटत होते. तरीही शेवटी सगळा जुगारच. सर्व जिंदगी पैशात, त्यापेक्षाही रस्त्यावरून जाणारी माणसे बरी. किमान माझ्यासारखा जुगार तर खेळत नाहीत आणि त्यामुळे

रस्त्यावर येण्याची भीती नाही. अर्थात ऑलरेडी ते रस्त्यावरच आहेत. शिवाय जुगारात लावण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळे काही हरण्याचे दु:ख नाही. तेवढय़ात अचानक गाडी वळल्यामुळे त्यांना धक्का बसला.

‘‘ड्रायव्हर हळू’’ त्यांनी सूचना केली.

‘‘माणूस आडवा आला साहेब’’

‘‘साल्यांना रस्त्यावरून नीट चालता येत नाही. मूर्ख साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत म्हणूनच ते रस्त्यावर आहेत आणि मी गाडीत. आणि मग गाडीवाल्यांना शिव्या द्यायच्या.’’ त्यांच्या मनात आले. पण तेवढय़ात त्यांना टेण्डरची आठवण झाली आणि हृदयात कळ आली ही कळच एक दिवस आपला घात करणार. त्यांनी डोळे मिटून घेतले.

फॅक्टरीच्या दारात रघू पोहचला आणि फॅक्टरीची इमारत तो वॉचमॅन, आत जाणारे कामगार बघून त्याच्या पोटात गोळा उठला. हा पोटातला गोळा कधी तरी आपला घात करणार असे त्याला वाटले. रोज तेच काम. तेच ओरडून घेणे, तीच उपकाराची भाषा, तीच लाचारीची भाषा, आयला त्यापेक्षा मालकाचे बरे असते. ए.सी.मध्ये बसून आमच्याकडून काम करून घ्यायचे आणि दसपट पैसे मिळवायचे आणि चैनीत राहायचे आयला जिंदगी असावी तर अशी. असा विचार करत तो आत येऊन काम करू लागला. तेवढय़ात शेजारी फोरमन येऊन उभा राहिला. ‘रिजेक्शन जास्त होते’ फोरमनने कर्तव्य पूर्ण केले. रघूने केवळ त्याच्याकडे बघितले.

‘‘आज रिजेक्शन अजिबात नको’’ मालकाचे कुत्रे भुंकल्याप्रमाणे तो भुंकला.

‘‘बरं’’ सगळ्याविषयी घृणा रघूने व्यक्त केली. आणि कामात स्वत:ला झोकून दिले. हे सगळे कधीतरी संपणार की नाही हा विचार मात्र त्याचे डोके फिरवत होता.

फॅक्टरीच्या दारात गाडी थांबली. तसे फॅक्टरीची ती भव्य इमारत, दारात सलाम ठोकरणारा वॉचमॅन, दार उघडणारा ड्रायव्हर, आणि आपल्या येण्याने प्रत्येकाच्या मनावर आलेले दडपण, त्या दडपणाने बदललेले वातावरण आणि त्याला कारण असणारी आपली सगळ्यावरची मालकी या जाणिवेने रघूनाथशेठच्या मनात एक सुखद कळ उठली आणि हा आनंद फारच थोडय़ांना मिळतो या जाणिवेने निर्माण होणारी घमेंड, त्यामुळे त्याच्या हृदयातून आनंदाचे ओहोळ वाहू लागले. पण टेण्डर? ..टेण्डरची आठवण आली तसे हृदयातील सुखद कळेने दुखद कळेची जागा घेतली. ही कळ एक दिवस आपले काहीतरी बरेवाईट करणार. असा विचार त्याच्या मनात आला. पण वॉचमनच्या सलामाइतके त्याला महत्त्व देऊन ते आपल्या केबिनमध्ये गेले आणि खुर्ची फिरवून स्टाइलमध्ये खुर्चीत बसले रोजच्याप्रमाणे पॉश कपडे, पॉश राहणे यामुळे माणसाला एक प्रकारे आत्मविश्वास येतो. वागण्याची स्टाइल येते, हे त्यांना मनोमन पटले. त्याच स्टाइलमध्ये त्यांनी टेबलावरची बेल मारली. शिपाई आत आला

‘‘काय साहेब?’’ हात जोडल्याप्रमाणे शब्द

‘‘फोरमनला बोलव’’ स्टाइलबाज हुकुम

‘‘बर साहेब’’ शिपाईनिष्ठा बोलली. शिपाई गेला, फोरमन येईपर्यंत टेण्डरच्या विचारांची कळ. फोरमन आला

‘‘साहेब, आपण बोलावलं’’ गुलामी आवाज.

‘‘हो. अरे त्या प्रॉडक्शनचे रिजेक्शन कमी होतंय की नाही? की तुला कमी करू’’ प्रेशर.

‘‘तोच प्रयत्न चाललाय साहेब’’ प्रेशर सहन करण्याचा प्रयत्न.

‘‘पगार देण्याचा किंवा वाढवण्याचा मी फक्त प्रयत्न करत नाही तो प्रत्यक्ष देतो किंवा वाढवतोपण’’ कुकरमध्ये अन्न शिजवायला लागणारे पूर्ण प्रेशर.

‘‘होय साहेब, खर आहे, आजपासून सगळ व्यवस्थित होईल’’ नोकरीची चिंता बोलली.

‘‘हं. जा तुम्ही’’ कुकरची शिट्टी वाजली. ‘‘पगारवाढीसाठी लगेच येता’’ जाणाऱ्या फोरमनवर शेरा. वास्तविक पाहता नफा ज्यावेळी दुप्पट होईल त्यावेळी सरासरी ५० रु  पगारवाढ दिला जाई आणि हे फक्त रघूनाथशेठनाच माहिती होते. आणि अशा गोष्टी कोणाला माहिती करून द्यायच्या नसतात हेही त्यांना माहीत होते. तेवढय़ात शिपाई आत आला.

‘‘साहेब टेण्डरवाली माणसे आलीत’’ निरोप.

‘‘लवकर आत पाठव त्यांना’’ हे वाक्य त्यांनी लवकर घशाच्या आत पाठवलं. त्याऐवजी त्यांनी फक्त ‘‘बरं’’ म्हटलं. आणि चेहरा एकदम शांत ठेवला. कारण आपल्या कृतीत आणि बोलण्यात हावरटपणा जाणवला तर या शिपायाच्यात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही अशी प्रत्यक्षात कधीही अस्तित्वात न येणारी भीती त्यांना वाटली. ‘‘पाच मिनिटांनी त्यांना आत पाठव’’ रघूनाथ शेठ बेफिकीरपणे म्हणाले, ते त्यात यशस्वी झाले. कारण तशी सवय त्यांना होती. शिपाई गेला आणि ऑफिसमध्ये केवळ रघूनाथशेठ आणि टेण्डरचा ताण शिल्लक राहिला. या ताणावर काहीतरी इलाज केला पाहिजे. चांगल्या स्पेशालिस्टला भेटले पाहिजे. हे त्यांना तीव्रतेने वाटले आणि त्यांनी कोणत्यातरी रोगाचे निदान केले तर? उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी. आयला त्यापेक्षा हे सगळे थांबवले तर? नकोच ही कटकट. सगळं आयुष्य म्हणजे जुगार झालाय, हे सगळं विकावे आणि गप्प कोठेतरी नोकरी करावी. महिनाभर काम करायचे, ठरावीक तारखेला पगार घ्यायचा, आरामात जगायचे असा विचार त्यांच्या मनात आला. सहज त्यांची नजर समोरच्या खिडकीतून फॅक्टरीत गेली. दीडदोनशे कामगार तिथे राबत होते. केवळ दोन वेळच्या पोटासाठी. होय, केवळ दोन वेळच्या पोटासाठी. आपल्याकडे असणाऱ्या सुखसोयी त्यांच्याकडे नाहीत का? तर त्यांना युद्ध म्हणजे काय? माहिती नाही. युद्धात काहींनाच जय मिळतो. त्यापैकी मी एक आहे. पण जय सहज मिळत नसतो. समोरच्याचा पराभव करावा लागतो. कोणाचातरी पराभव ठरलेला असतो..पराभव.. पण आपला कधीतरी पराभव झाला तर?..बापरे हा विचार त्यांना मृत्यूपेक्षा भयानक वाटला. तेवढय़ात शिपाई आत आला ‘‘साहेब’’

‘‘हं, पाठव त्यांना आत’’ होऊ दे युद्धाला सुरुवात असे रघूनाथशेठच्या मनात आले. कारण युद्ध खेळल्याशिवाय विजय मिळत नाही हे जगाचे सूत्र आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते.

ती माणसे आत आल्यावर मिटिंग सुरू झाली. टेण्डरच्या कमी-जास्त रेटप्रमाणे रघूनाथशेठचा रक्तदाब कमी-जास्त होत होता. पण पुढच्या सरडय़ांच्या उडय़ा पैश्याच्या कुंपणापलीकडे जात नाहीत हे त्यांना माहिती होते. ते लोक रघूनाथशेटना ‘जय’

देऊन आणि स्वत:  पैसे घेऊन निघून गेले. बस्स शेवटी ‘जय’ मिळाला. यालाच लोक बिझनेस म्हणतात. किती ताण? अंगातली सगळी शक्ती संपल्यासारखे झाले त्यांना. आता शांतीची नितांत गरज होती. पण लगेच सर्व शांत शांत कसे झाले, हेच त्यांना कळेना. त्यांनी खिडकीतून वर्कशॉपवर नजर टाकली. फॅक्टरी शांत होती. सर्वजण गेले होते. शिपाई, वॉचमन तेवढे होते. ते बाहेर आले. शिपाई लाचारपणे उभा राहिला. ते वर्कशॉपमध्ये गेले. वर्कशॉपमधली यंत्रे, भिंती सगळेच शांत वाटत होते. जिवंत माणसाच्या संपर्काशिवाय निर्जीव वस्तूलापण चैतन्य येत नाही. अर्थात सजीव वस्तूलापण. खरच किती वेळ गेला? कसा गेला? हेही कळले नाही. एक टेन्शन तरी गेले. पण का कोणास ठाऊक, मुलाला डॉक्टर करावे की इंजिनीअर की आपल्यासारखा बिझनेसमन, हा विचार त्यांना छळू लागला. हा विचार आत्ताच का छळतोय? हे त्यांना समजेना. त्यावर आत्ता एक इलाज कोणता तरी बार गाठणे आणि ड्रिंक करणे आणि त्या बाटलीमध्ये स्वत: सकट सगळ्या टेन्शनना बुडवणे. रघूनाथशेठ बाहेर आले. गाडीत बसले. ‘‘रोजच्या बारकडे ने!’’ एवढेच म्हणाले. गाडीची चारचाके बारच्या दिशेने धावू लागली. इकडे सूर्य मावळत होता. हळूहळू अंधारत होते.

जगाची वेळ कशी सरकते हे रघूला कळत नव्हते, पण त्याचा वेळ हातातल्या कामामुळे सरकत होता. जगातल्या सगळ्या प्रश्नाहून मोठ्ठा प्रश्न त्याच्यापुढे होता. संध्याकाळी पैसे कोणाकडे मागायचे? तेवढय़ात टेण्डरवाली माणसे मालकाच्या केबिनकडे जाताना त्याने पाहिले. एक शिवी हासडून तो म्हणाला, ‘‘झाली सोय मालकाची १५ लाखांची, पण माझी ५०रु.ची नड आज भागणार नाही.’’ असेच सर्वावर चिडत म्हणजे पर्यायाने स्वत:वर चिडत त्याने दिवस काढला. आणि संध्याकाळी फॅक्टरी सुटल्यावर ‘पैसे कोणाकडे मागायचे?’ याची जी यादी केली होती, त्या सर्वाकडे पैसे मागितले आणि आपल्याहून ते सारे किती अडचणीत आहेत, हे त्याला कळाले. त्याचबरोबर आपल्यासारख्यांची मुले डॉक्टर इंजिनीअर का होत नाहीत? हेही कळाले. त्याचा वैताग दुप्पट वाढला. डोके दुखू लागले. एकजण तर म्हणाला, ‘‘हे बघ, शेवटचे १०रु. राहिलेत. येतोस काय हातभट्टी प्यायला’’ नाहीतरी १० रु.ने त्याची कोणतीच गरज भागली नसती. पण हातभट्टी प्याल्यावर या वैतागावर, डोकेदुखीवर शांती मिळणार होती. कारण १० रु. घरी नेऊन बायकोची कटकट शुद्धीत ऐकण्यापेक्षा शुद्धीत नसल्यावर कायच ऐकू येणार नाही. आणि झोपही चांगली लागेल. ‘‘चल येतो’’ त्याने मित्राला होकार दिला. आणि चार पावले हातभट्टीच्या दिशेने पडू लागली. सूर्य मावळत होता. हळूहळू अंधार होत होता.

संध्याकाळी सगळे जग उदास का होते? आणि त्यानंतरच्या अंधाराने जगाचे सगळे संदर्भ कसे पुसून जातात? हे कोडे मनाला उलघडत नाही. फक्त सारे जग आजचा दिवस विसरून अंधाराच्या कुशीत झोपी जाते उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार हे माहीत असूनही.
मिलिंद पोतदार – response.lokprabha@expressindia.com