‘प्रोजेक्ट मेघदूत’चा अंदमानातील मान्सूनचा अभ्यास करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. देशाच्या इतर भागापेक्षा अंदमानचा निसर्ग वेगळा आहे आणि म्हणूनच इथला मान्सूनही कसा वेगळा आहे हे या पाहणीत अभ्यासायला मिळालं.

आपल्या संस्कृतीत नदीला आईचे स्थान दिले आहे. ती आपल्या सर्व मुला-बाळांचे भरण-पोषण करते. ती कधीच कुठलाही भेद करीत नाही आणि सर्वाना एकसारखी माया देते.

आपल्या मुलांप्रमाणे ही आईसुद्धा मान्सून काळाची आतुरतेने वाट बघत असावी, कारण या काळात तिला तिचे खरे रूप परत मिळते आणि ती खळखळून वाहू लागते. वाहत राहणे हाच तिचा मूळ स्वभाव आहे. ती आपल्या पूर्ण क्षमतेने वाहते तेव्हा ती रुद्र रूप धारण करते. नदीला पूर येतो आणि मुले भयभीत होतात.

नदीचा पूर हा त्या काळात विध्वंसक जरी असला तरी तो पुढच्या काळासाठी बरेच काही देऊनही जातो. पुराबरोबरच नदीतून आलेला गाळ हा नदीकिनाऱ्याची जमीन सुपीक बनवतो. भारतात बिहार आणि पश्चिम बंगालचा बराचसा सुपीक भाग हा गंगा नदीच्या वर्षांनुवष्रे आणलेल्या गाळानेच तयार झाला आहे. पुराच्या काळात नदी पूर्ण क्षमतेने वाहते आणि गाळ वाहून नेते. एरवी आपण नदीला प्रदूषणाने विद्रूप करीतच असतो. मान्सूनच्या कालखंडात नदी काही काळाकरिता का होईना पण आपल्या खऱ्या सुंदर रूपात प्रकटते.

कालपोंग नदी ही अंदमानातून वाहणारी एकमात्र नदी आहे. तिचीही अशीच कहाणी आहे. मान्सून काळात पूर्ण क्षमतेने वाहणारी नदी उन्हाळ्यात आटते. या नदीला तसे प्रदूषण नाही. उत्तर अंदमानात असलेल्या सर्वोच्च उंचीच्या सँडल शिखरातून ही नदी उगम पावते. उत्तरेकडे फक्त ३५ किलोमीटरचा प्रवास करीत दिगलीपूरजवळ एरियन खाडी इथे समुद्राला भेटते. उंच पर्वत-शिखरावरून ही नदी फारच कमी अंतर कापून समुद्राकडे येते, त्यामुळे नदीचा प्रवाह खूप तीव्र आहे.

फक्त ३५ किमीच्या प्रवासात ती उत्तर अंदमानवासीयांना सर्व काही देऊन जाते. या नदीवर २००१ ला धरण बांधून पूर्ण झाले. आता याच नदीवर ५.२५ मेगावॅट क्षमतेचा कालपोंग जलविद्युत प्रकल्प उभारला गेला आहे. हा अंदमानातील पहिला आणि सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातून वर्षांला १४.८३ दशलक्ष युनिट्स विद्युतनिर्मितीची अपेक्षा आहे. पण अजून ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही.

पोर्ट ब्लेअर आणि संपूर्ण दक्षिण अंदमानला अजूनही डिझेल विद्युत प्रकल्पातून वीजपुरवठा दिला जातो. इथे विद्युतनिर्मितीसाठी मोठे डिझेल इंजिनवर चालणारे जनरेटर आहेत. या डिझेल प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात धुराने वायुप्रदूषण होते. डिझेल प्रकल्पाच्या तुलनेत जलविद्युत प्रकल्प पर्यावरणपूरक आहे. आणि पर्यायाने कालपोंग जलविद्युत प्रकल्प हा प्रदूषणविरहित विद्युत निर्मिती करण्यात यश मिळवतो. आज उत्तर आणि मध्य अंदमानाला या प्रकल्पाने विद्युत पुरवठा केला जात आहे.

कालपोंग नदीच्या धरणावरच उत्तर अंदमानची तहानही भागते. याच धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दिगलीपूरला केला जातो. या वर्षीच्या तीव्र उन्हाळ्याची झळ होतीच आणि पूर्व मान्सूनचा पाऊसही नव्हता. अशा परिस्थितीत उत्तर अंदमानला तीव्र पाणीटंचाई होती.

आज उत्तर आणि मध्य अंदमानाच्या मूलभूत गरजा म्हणजेच वीज आणि पाणी हे कालपोंग या एकमात्र नदीवर आणि पर्यायाने मान्सूनवर अवलंबून आहे.

प्रोजेक्ट मेघदूतच्या या सहाव्या वर्षीसुद्धा मान्सून आम्हाला बरेच काही शिकवून गेला. नवीन अनुभव, निसर्गाचे वेगळे संबंध हे सर्व काही त्यांनी आम्हाला दाखवले. हा बंगालच्या उपसागरावरच्या बेटांचा मान्सून काळातला अनुभव फार वेगळा होता.

अंदमान बेटे म्हणजे भारताचे एक सुंदर लघुरूपच आहेत. नुसते लघुरूपच नव्हे तर एक आदर्श रूपही आहेत. इथले लोक कमी गरजांत भागवून सुखात राहतात. इथे गुन्हेगारीही फारच कमी आहे. सर्वभाषीय लोक आपसांत िहदीतच संभाषण करतात. इथे आंतरजातीय संबंधही जुळतात आणि टिकवून ठेवले जातात.

परत निघायच्या आदल्या दिवशी पोर्ट ब्लेअरला मोठा पाऊस झाला. त्या संध्याकाळी पाऊस थांबल्यावर आम्ही जवळच असलेल्या वॉटर स्पोर्ट कॉम्प्लेक्सला गेलो. पश्चिमेकडील आभाळ पूर्णपणे तांबडय़ा-पिवळ्या रंगाने नटलेले होते. त्या आकाशाच्या रंगीत मंद प्रकाशापुढे उद्यानातील शोभेचे दिवेदेखील जणू लाजत होते.

मान्सून अभ्यासात पडलेली मोलाची भर, नवीन अनुभव आणि चांगल्या आठवणी घेऊन आम्ही भारताच्या मुख्य भूमीकडे परतायला निघालो. पुन्हा विमानातून मान्सून आमच्या साथीला होताच. परतताना विमानातून अंदमानातील सुंदर बेटे दिसत होती. थोडय़ा उंचीवर गेल्यावर ढगातून उत्तर सेंटिनल बेटावर पडणारा पाऊस दिसला. हे सगळे नयनरम्य दृश्य डोळ्यांत साठवून आम्ही मुख्य भूमीला परत आलो.

या वर्षी प्रोजेक्ट मेघदूतमध्ये बंगालच्या उपसागरावरून मान्सूनच्या अभ्यासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीतून परतीच्या मान्सूनबरोबर प्रोजेक्ट मेघदूतची टीम ऑक्टोबरमध्ये प्रवास करणार आहे.

(समाप्त)
नितीन ताम्हनकर – response.lokprabha@expressindia.com