अवतीभवती असलेल्या अनेक अर्थसंस्था आपल्या खिजगणतीतही नसतात. रुईची पाने किंवा अर्कपत्रांच्या हारांचा व्यवसाय शहरांमध्ये समाजात असलेल्या हनुमानावरच्या श्रद्धानिर्देशांकावर अव्याहत सुरू आहे. अनेक कुटुंबांचा आधार असलेल्या या व्यवसायाचे स्वरूप उद्योग संकल्पनेशी पूर्णत: भिन्न आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने अर्कपत्रांसोबत श्रद्धाव्यवहाराच्या अर्काचा अर्थ शोधण्याचा हा प्रयत्न एका निरीश्वरवाद्याच्या नजरेतून..

मुंबई-ठाण्यापासून गाडीने दोनेक तासांच्या अंतरावर असलेल्या सावरोली गावात पाऊल टाकताक्षणी चारही बाजूंनी गावाला असलेला उद्योगांचा वेढा सर्वात पहिला नजरेत आणि नंतर नाकात शिरतो. खडबडीत वाटेवर स्टील, रसायन, औषध आणि कित्येक गोष्टींची निर्मिती अथवा प्रक्रिया येथील कंपन्यांमध्ये तिन्ही त्रिकाळ सुरू असल्यामुळे महाकाय टँकर्स, ट्रक्स यांनी सदैव गजबजलेले धूळकेंद्री वातावरण या परिसराभोवती व्यापलेले असते. पाचशे-हजार उंबऱ्यांच्या या गावाचा मूळ व्यवसाय दूध आणि भातशेतीचा . गेल्या तपाभरात मात्र इथल्या जमिनींवर वाढत चाललेल्या कंपन्यांमुळे पूरक अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. इथल्या लोकांना सावरणारी आणि त्यांना उद्योगी बनवणारी. इथल्या कोप्रान नावाच्या कंपनीत एकदा नाही, तर दोनदा लागलेल्या आगीच्या घटनांनी गाव ढवळून निघाले होते. एक आग इतकी भीषण होती की, संपूर्ण गाव त्यात भस्मसात होण्याची शक्यता होती. त्यावेळी लोक घरे-दारे उघडी टाकून लांब जंगलात पळून गेल्याच्या त्या आगीच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. आता  कंपनीचे इथले युनिट बंद झाले असले, तरी इतर छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांमध्ये आग किंवा तत्सम दुर्घटनांचे अस्तित्व शिल्लक आहेच. स्थानिक वा राज्यीय वृत्तपत्रात लागल्याच तर छोटुकल्या बातम्यांइतके त्या घटनांना क्षणात विसरण्याइतपत महत्त्व असते. मुंबई-पुण्यापासून अगदीच जवळ असल्यामुळे उद्योगांनी या गावात तळी ठोकली. गावात आर्थिक सधनतेच्या खुणा तशा फार मोठय़ा नाहीत. तरी गाव भरपूर संपन्न आहे. भकास, मुर्दाड रूपातही शहरातील सुविधांच्या सगळ्या गोष्टी मुकाटय़ाने उपलब्ध आहेत. विठोबाच्या एका देवळाजवळ बोंबिल, सुकट विक्रीचा अजस्र व्यवसाय चालतो. त्यामुळे येथील ‘बोंबल्या विठोबा’ची दिवाळीनंतर तब्बल पंधरा दिवस चालणारी जत्रा फार दूरवर कीर्ती पसरवून आहे. या गावालगतच देशभरातील धनाढय़ांना आकर्षति करू शकेल अशी ‘सावरोली गोल्फ सिटी’ विविध कारणांनी अध्र्यावर थांबली आहे. खालापूरच्या शेतकऱ्यांनी ‘नयना’ प्रकल्पाअंतर्गत सामायिक विकासासाठीची योजना सिडकोकडे नुकतीच मांडली. शेतीतील उत्पन्न आणि जमिनींना कंपन्या देऊ पाहणारे उत्पन्न यातील तफावतीमुळे गावाला कंपन्यांची शेती उभारण्याचे स्वप्न पडणे स्वाभाविकच. हे दोन प्रकल्प पूर्णत्वास आले, तर ‘स्मार्ट सिटी’च्या संकल्पनेला मागे टाकण्याइतपत सावरोलीसह इथला आजूबाजूचा सर्व परिसर कात टाकण्याच्या वाटेवर आहे.

भविष्यात अतिस्मार्ट होऊ पाहणाऱ्या या सावरोली उद्योगनगरीच्या किंवा जगाच्याही खिजगणतीत नसलेला एक उद्योग कित्येक वर्षे अव्याहत सुरू आहे. सावरोली, धामणी, खरसुंडी, कुंभवली, वाशीवली, उंबरा, वावरी, खालापूर, चौक या खोपोलीलगतच्या गावांमधून मुंबई, ठाणे आणि पुण्यातील हनुमान मंदिरामध्ये वाहिली जाणारी हारांची रुई पाने (अर्कपत्रे) जमवली जातात. बुधवार ते शनिवार निव्वळ 44-lp-hanumanमेहनतीच्या भांडवलावर चालणारा व्यवसाय, त्याचे जडबंबाळ अर्थकारण आणि अवलंबून घटक हनुमानाच्या श्रद्धेवर शाश्वत आहेत. रामायणनामक मिथकातील या शक्तिदेवतेची उपासना करणाऱ्या समाजघटकांत सुशिक्षित, अशिक्षित, श्रद्ध, उपश्रद्ध सारख्याच प्रमाणात आहेत. आयुष्यावर पसरलेल्या साडेसातीची मात्रा कमी करण्यासाठी, शक्तिमान वर मिळण्यासाठी, आरोग्य संवर्धनशील राहण्यासाठी आणि अनंत अत्यावश्यक नवसांसाठी हनुमानाकडे गाऱ्हाणे घेऊन जाणारा भाविक जथा आठवडय़ातील एक दिवस प्रसंगी रांग लावून मंदिराबाहेर सज्ज असतो. हल्ली शहरांत वेळेच्या मर्यादेमुळे रांगा टाळण्यासाठी हारवाल्यांना पैसे देऊन त्यांनाच आपल्यावतीने हार घालण्यास सांगणारे ‘प्रॅक्टिकल भाविक’ तयार होत आहेत. भक्तिमार्ग कितीही बदलले असले, तरी श्रद्धा अबाध्य आहे. गंमत म्हणजे तंत्रज्ञानाचे आयुष्यावरील आक्रमण, संगणक-मोबाइल-स्मार्टफोन-फेसबुक- व्हॉट्स अ‍ॅपच्या युगातही तिला तडा गेलेला नाही. लोकांकडे सदसद्विवेकबुद्धी, सहिष्णु वृत्ती कितीही असली, तरी हनुमानच्या भक्तीला आणि त्यावर आधारलेल्या या व्यवसायाला जग आधुनिक होण्याची जराही भीती नाही.  पाच, सात, नऊ, अकरा आणि एकवीस पानांच्या भाविकांच्या नवसवकुबानुसार तयार होणाऱ्या या हारनिर्मितीची साखळी राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये विखुरलेली आहे. पण पाच ते दहा रुपयांमध्ये पाना-फुलांसह मिळणाऱ्या या हारांच्या निर्मितीमागे दडलेल्या हातांची कहाणी सहजसोपी नाही. आपल्या अवतीभवती विविधमार्गानी थोपविल्या जाणाऱ्या पेपर-मासिक-टीव्हीवरच्या झगमगीत उद्यमशील विजयी कहाण्यांच्या तागडीत त्यांचा समावेश करता येऊ शकत नाही. तरी हीदेखील एक प्रकारे ‘सक्सेस’ स्टोरीच. आपल्या नजरेच्या टप्प्यात असूनही सहजपणे निसटणारी.

पानांचा तारणारा व्यवहार!

सावरोली गावाच्या गणेश मंदिरासमोर लता संतोष पवार त्यांची आई सुमन डवरी यांच्यासह राहतात. त्यांचा पिढय़ान्पिढय़ा चालणारा मूळ व्यवसाय कल्हईचा. पण गेल्या कैक वर्षांमध्ये दूरदूरच्या नातेवाईकांमध्येही हा व्यवसाय करणारे शोधून सापडत नाहीत. लता पवार यांच्या आठ जणांच्या कुटुंबाचे सावरोलीत आलेल्या कंपन्यांमधील रोजगारावर कसेबसे भागत होते. सातेक वर्षांपूर्वी त्यांच्या पतीला अर्धागवायूने जेरीस आणले. त्यांची नोकरी सुटली आणि घरातील चार मुलांची जबाबदारी लता पवार यांच्यावर येऊन पडली. दहावी शिक्षण असलेल्या लता पवार ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांना गरज लागल्यास हार बनविण्यासाठी रुईची पाने आणून देऊ लागल्या. आता पवार स्वत: पाने पोहोचविण्यासोबत ठाण्यातील भास्कर कॉलनीजवळ असलेल्या हनुमान मंदिराजवळ हार विकण्यासाठी बसतात. बुधवार ते शनिवार त्यांचे वास्तव्य या व्यवसायानिमित्ताने ठाण्यात असते. बुधवार आणि गरज लागल्यास गुरुवार सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत धामणीपासून ते त्यांच्या आईसोबत रुईची पाने आणि फुले गोळा करतात. वडाप रिक्षा किंवा प्रसंगी चालत खरसुंडी, कुंभवली, वाशीवली, उंबरा, वावरी गावे पालथी घालतात. आठ ते दहा पोती भरून पाने या काळात तोडली जातात. सावरोली गावाजवळून एक नदी वाहते. प्रस्तावित गोल्फ सिटीजवळून वाहणारी आणि मायाजालावर पसरलेल्या त्याच्या जाहिरातयुक्त छायाचित्रात खूपच सुंदर दिसणारी ही नदी गावात मात्र अगदीच साधारणतेचे टोक गाठते. या नदीकिनाऱ्यापासून ते वावरीच्या अगदी टोकापर्यंत लता पवार पाने गोळा करण्यासाठी जातात.

‘ही पाने एकदा तोडली, की महिना ते दीड महिनाभर त्या झाडांजवळ पुन्हा जायचे नाही. त्या काळात पुन्हा आवश्यक तितकी पाने झाडावर तयार होतात.’ पवार सांगतात. त्यांनी पानांसाठी प्रत्येक भागाची व्यवस्थित विभागणी तयार करून ठेवली आहे. त्यानुसार दीड महिन्याखेरीज एका विभागात फेरी मारायची नाही हा शिरस्ता त्यांच्याकडून व्यवस्थित पाळला जातो. रस्त्याच्या कडेपासून त्रोटक जंगलांपर्यंत पानांना वर्षभर  तुटवडा नसतो. फक्त उन्हाळ्यामध्ये पाने लवकर सुकतात. तोडल्यानंतर त्यांचे चार दिवस जतन करणे थंडीत किंवा पावसाळ्यात सोपे असते. तितकेच उन्हाळ्यात कठीण होऊन बसते. या काळात त्यांच्यावर सातत्याने पाणी मारणे भाग असते. फुलांचे जतन करण्यासाठी फ्रिजचा आधार घेतला जातो. तोडून आणल्यानंतर पानांना धुवून त्यांची प्रतवारी केली जाते. लहान पानांचा हार २१ पानांसाठी उपयुक्त असतो. मोठय़ा पानांच्या आधारे पाच, अकरा पानांचे हार केले जातात, अशी माहिती लता पवार यांनी दिली. फूल आणि पानांच्या हारांना मागणी प्रचंड असते. नवसाला रुईची फुले माळूनही हार हनुमानला चढविले जातात. फुलांना आणि फुलांच्या हारांना मागणी मोठी असते.

एक निगरगट्ट वनस्पती

45-lp-hanuman‘उष्णकटिबंधीय देशात हमखास आढळणारी रुई भारतात दोन प्रकारांत मिळते. (कॅलोट्रोपिस जिगॅन्शिआ – Calotropis Gigantea आणि कॅलोट्रोपिस प्रोसेरा calotropis procera)  पैकी प्रोसेरा ही राजस्थानाव्यतिरिक्त देशात कुठेही सापडत नाही. आपल्याकडे सर्वत्र दिसणारी रुई जिगॅन्शिआ प्रकारची असते. ती अगदी कोणत्याही परिस्थितीत टिकून राहते.’ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर लट्टू यांच्या मते अपवादात्मक परिस्थितीमध्येदेखील बकऱ्या किंवा गुरे त्यांना तोंड लावत नाहीत, ते तिच्या चिकामध्ये असलेल्या विषामुळे. हे विष प्राण्या-पक्ष्यांच्या मेंदू आणि हृदयावर थेट परिणाम करीत असल्याने त्यांच्या वाटेला सहसा कुणी जात नाही.

रुई तुलनेने इतर वनस्पतींपेक्षा बऱ्यापैकी सुरक्षित असते. तिच्या फळांतून निघणारी बीजे मातीमध्ये पडल्यानंतर अत्यल्प पाण्याशिवाय ती मोकाट वाढू लागतात. शहर किंवा गाव, सुपीक अथवा नापीक असा भेद या वनस्पतीकडून केला जात नाही. अगदी उकिरडय़ावरही ती उत्तमरीत्या फुलू शकते. एखाद्या पडीक इमारतीच्या मोकळ्या जागेतही बीज पडल्यास ती छानपैकी वाढू शकते. रस्त्यांच्या कडेला अफाटपणे समांतर रेषेमध्ये कोणत्याही भागात ती फोफावते.  मुंबई, ठाणे, पुणे आणि शहर गावांमध्ये आता मोकळ्या जागा कमी असल्या, तरी शहराबाहेर पडल्यानंतर इतर झाडांइतकीच रुई तिच्या आकर्षक फिकट जांभळ्या फुलांनी लक्षात येऊ शकते. संपूर्ण कोकण पट्टा, घाटावर रस्त्यांच्या कडेला अनंत प्रमाणामध्ये त्यांचे अस्तित्व आहे.

कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, श्रीलंका, चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि आफ्रिकेतील काही राष्ट्रांमध्ये आपल्याकडे आढळणारी रुईच मोठय़ा प्रमाणात सापडते. त्यांची उंची दीड ते दोन मीटरहून अधिक नसते. पण कॅरेबियन बेटे, अमेरिकेतील किनारी प्रदेश, ऑस्ट्रेलिया आदी भागांत महाकाय वृक्षांसारखी रुईची झाडे सापडतात.

रुईच्या पानांतील पांढरट चीक हा उष्ण व डोळ्यांसाठी अत्यंत घातक असतो. गंमत म्हणजे विषारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा आपल्याकडे औषध म्हणूनही वापर केला जातो. सांधेदुखी, कफ, त्वचाविकार आणि बऱ्याच प्रकारच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतींत या पानांचा वापर होतो. पायात काटा रुतला, तर तो बाहेर काढण्यासाठी बाजूला सुईने कोरून रुईच्या पानांचा दोन थेंब चीक सोडल्यास पायात रुतलेला काटा अलगद बाहेर येतो.  सांधेदुखी, कफ, त्वचारोग यांच्यासोबत अस्थमा पळवून लावण्यासाठी भारतासोबत इतर आशियाई देशांमध्ये रुईचा उपयोग होतो. रुईची तीन प्रकारातील फुले असतात. अर्कमंदार, श्वेतमंदार, नीलमंदार. पैकी श्वेतमंदार म्हणजेच पांढऱ्या रंगाचे फूल गणपतीला प्रिय असल्याचे सांगितले जाते. खूप काळ टिकणाऱ्या दोऱ्यांच्या निर्मितीसाठी रुईची पाने वापरली जातात. कागद बांधणी उद्योगातही त्यांचा वापर केला जातो.

डॉ. चंद्रशेखर लट्टू यांच्या मते अजिबात नष्ट न होऊ शकणारी आणि शहरीकरणाच्या आक्रमणातही टिकून राहू शकणारी अशी ही एकमेव निगरगट्ट वनस्पती आहे. आपल्याकडे मारुतीसाठी हार बनविण्यासाठी पाने तोडणाऱ्यांकडून एक प्रकारे या झाडांची निगाच राखली जाते. या पानाफुलांची योग्य तितक्या प्रमाणात तोडणी केल्यामुळे त्यांचे नियंत्रण आणि संरक्षण एकाच वेळी होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरवरून एक बाई या व्यवसायासाठी ठाण्यामध्ये भास्कर कॉलनी येथील हनुमान मंदिराजवळ बसत असत. इतक्या लांबून फक्त रुईच्या पानांचे हार विकण्यासाठी ते तीन दिवस ठाण्यात ठाण मांडत. मात्र दीर्घ प्रवासाला कंटाळून त्यांनी लता पवार यांच्याकडे त्या मंदिराची वहिवाट सोपवून दिली. त्यानंतर आज लता पवार यांच्या संसाराला रुईच्या पानांच्या व्यवसायाचा मोठा आधार आहे. त्यांच्या पतींना सरकारकडून मदत म्हणून घरघंटी देण्यात आली असली, तरी घरातील सर्वाचे निभावून नेले जाते, ते हनुमानाच्या श्रद्धेपोटी चालणाऱ्या या व्यवसायामुळे. मंदिर मिळाल्यानंतर त्यांच्या घराला बऱ्यापैकी आर्थिक आधार मिळाला आहे. त्यांनी आपली दोन मुले कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी पाठविली आहेत. त्यांची आईदेखील रघुनाथ नगर येथील हनुमानाच्या देवळाजवळ हार घेऊन बसते.

खोपोलीजवळील सावरोली, धामणी, खरसुंडी, कुंभवली, वाशीवली, उंबरा, वावरी, खालापूर, चौक या खोपोलीलगतच्या गावांमधून मुंबई, ठाणे आणि पुण्यातील हनुमान मंदिरामध्ये वाहिली जाणारी हारांची रुई पाने (अर्कपत्रे) जमवली जातात. बुधवार ते शनिवार निव्वळ मेहनतीच्या भांडवलावर हा व्यवसाय चालतो.

46-lp-hanuman

कल्हईचा धंदा पूर्णत: ठप्प होण्याची चाहूल लागल्यानंतर ठाण्यातील अनिल पवार यांनी गोखले रोड नौपाडा येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराजवळ तब्बल ३५ एक वर्षांपूर्वी रुईच्या पानांच्या हारविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या अख्ख्या कल्हईवाल्या बिरादरीत हनुमानाच्या देवळासमोर हारविक्रीचा आरंभ अनिल यांनी केला. पुढे त्यांचा कित्ता गिरवत मोठय़ा प्रमाणावर नातेवाईकांनी या व्यवसायाला स्वीकारले. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातदेखील त्यांच्या नातेवाइकांनी या व्यवसायाचे अनुकरण केले. आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक
या शहरांमध्ये पूर्वाश्रमीच्या कल्हईवाल्यांचा मोठा वर्ग हनुमानाच्या व्यवसायाशी संबंधित आहे. पाने आणण्यापासून हार बनविण्यापर्यंत अनिल पवार यांचे आठ जणांचे कुटुंब बुधवारपासून शनिवापर्यंत त्यांना मदत करतात.

आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये पूर्वाश्रमीच्या कल्हईवाल्यांचा मोठा वर्ग मारुतीच्या श्रद्धेवर चालणाऱ्या रुईच्या हाराच्या व्यवसायाशी संबंधित आहे. दूरवरून पाने आणण्यापासून हार बनविण्यापऱ्यंत साऱ्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण घर राबते. त्यात नफा मोठा असला, तरी मेहनत तेवढीच कष्टदायक आहे.

मुख्य ठाणे शहरात कोणेएके काळी असलेला हरितपट्टा आज नामशेष झाला आहे. अनिल पवार यांनी हा हरितपट्टा हळूहळू नष्ट होताना पाहिला आहे.

‘पूर्वी पाने आणण्यासाठी लांब जावे लागत नसे. ठाणे शहरातच इतके जंगल आणि झाडी होती, की रुई मिळविण्यासाठी फार लांब जावे लागायचे नाही. आता मात्र पानांसाठी खूप दूरवर फेरफटका होतो’. अनिल पवार सांगतात.

झाडांनी आणि बऱ्यापैकी मोकळी जागा असलेल्या ठाणे शहरानजीकच्या  घोडबंदर रोड, वाघबीळ, कोलशेत, कापुरबावडी, ढोकाळी, माजिवडे, उपवन येथे ठाण्यातील सर्वात मोठय़ा बिल्डर्सचे महाकाय प्रकल्प गेल्या वीसेक वर्षांत उभारले गेले. संपूर्ण ठाणे चहुबाजूंनी इमारतींनी व्यापले. तेव्हा शहरालगत असलेल्या हिरवळीच्या पट्टय़ात रुई मिळणारी हामखास क्षेत्रच नाहीशी झाली.

अनिल पवार वाडा पट्टय़ात भिवंडी, आनगाव, मापोली, अंबाडीफाटा, कुडुंज आदी गावे करीत वाडय़ापर्यंत पानांसाठी दर आठवडय़ाला फेरी मारतात. या पट्टय़ातील पानांची उपलब्धता कमी वाटल्यास कळंबोली, तळोजा, उरण, कर्जत, खोपोलीतील सावरोलीपर्यंत त्यांचा पानांचा शोध चालतो. ठाण्यातील वाघबीळ परिसरामध्ये काढण्यास अत्यंत अवघड भागात रुई अत्यंत थोडय़ा प्रमाणावर शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘या धंद्यात मेहनत बरीच असली तरीही पैसाही आहे. संपूर्ण राज्यभरातील कल्हईवाल्यांपैकी मी हनुमानासमोर हार विकायला सुरुवात केली. तेव्हा पुण्यामधील नातेवाईकांत त्याविषयी अढी निर्माण झाली होती. आता या व्यवसायात अनेक सुशिक्षित   उतरलेत.’
 – अनिल पवार, रुई हार विक्रेते

तिन्ही मोसमाची पर्वा न करता साडेतीन दशके दर आठवडय़ाचा पाने शोधण्याचा हा फेरा त्यांना काही चुकलेला नाही. त्यांचा एक मुलगा कॉल सेंटरमध्ये नोकरीला आहे आणि दुसरा या व्यवसायात त्यांना मदत करतो. आता व्यवसायाने उत्तम जम बसविला आहे. या मोक्याच्या जागेत नवे आणि जुने हनुमानभक्त यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यातले कुणीही औषध म्हणून पाने, फुले आणि त्यांतील चीकाची मागणी करण्यासाठी घरी येऊन धडकत असतात. हे अगदीच मोठय़ा एकत्रित आणि सदैव पाहुण्यांची रेलचेल असलेले कुटुंब
हनुमानाशी कृतज्ञ आहेत. त्यांच्या वाडीत एकमेव फोर व्हिलर त्यांच्या मुलाची आहे, त्याचा त्यांना अभिमान वाटतो. अजूनही कळंबोली, पनवेल, तळोजा या पट्टय़ात आणि वाडय़ाच्या लांबवरच्या पट्टय़ात ते एकटेच रिक्षा करून पाने गोळा करायला निघतात.

47-lp-hanuman‘या धंद्यात मेहनत बरीच असली तरीही पैसा आहे. संपूर्ण राज्यभरातील कल्हईवाल्यांपैकी मी हनुमानासमोर हार विकायला सुरुवात केली. तेव्हा पुण्यामधील नातेवाईकांत, सासुरवाडीमध्ये काही प्रमाणात हा व्यवसाय करतो म्हणून अढी निर्माण झाली होती. आता सासुरवाडीच्या घरांतील अनेक सदस्य पुण्यात ठिकठिकाणच्या हनुमानाजवळ हारांचा व्यवसाय लावतात. या व्यवसायात अनेक सुशिक्षित बेकारही उतरलेत.’ ही नवी माहिती त्यांनी दिली. पाने आणण्यासाठी लागणारा प्रवास खर्च आणि दोऱ्याचा खर्च वगळता सारे मानवी श्रम या धंद्यासाठी लागत असल्यामुळे नफ्याचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारी किंवा खासगी नोकरीमध्ये तीनशे पासष्ट दिवस असंख्य ओझ्यांखाली दबून कमावणाऱ्या नोकरदार वर्गाहून अंमळ अधिक कमाई होत असली, तरी प्रत्येक व्यवसायाप्रमाणे कमाईसाठी येथेही धोके आहेतच.

आर्थिक उलाढाल
फक्त मुख्य ठाणे शहरामध्ये अंदाजे २५ ते ३० मोठी हनुमानाची  आणि १० ते १५ शनिमंदिरे आहेत. या सर्वासाठी आठवडय़ाला दीड दोन लाखांहून अधिक रुई पानांची आवश्यकता असते. इतर छोटय़ा शनि आणि हनुमान मंदिरांची संख्या शंभराहून अधिक आहे. मुंबईमध्ये कुलाब्यापासून ते मुलुंड, पनवेलपर्यंत आणि चर्चगेटपासून ते वसई-विरापर्यंत मोठय़ा हनुमान आणि शनिमंदिरांची संख्या हजारांहून अधिक आहे. गंमत म्हणजे या पट्टय़ाबाहेरच्या गावांत रुई पानांचे हार विकलेच जात नाहीत. या भागांत लोक हनुमानाला वाहण्यासाठी पाने तोडून घरीच हार बनवितात. त्याचे प्रमाणही नगण्य आहे. या हारांची खरेदी विक्री मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर शहर भागापुरतीच मर्यादित आहे. अन् आíथक उलाढालीची आकडेवारी ही गूढच आहे.

रुईची पाने तोडणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. या पानांचा जहरी चीक हातांमध्ये आणि नखांमध्ये रुततो. साबणानेही त्याचा १०० टक्के निचरा होत नाही. डोळ्यांमध्ये हा चीक गेल्यास तातडीने पाने गोळा करायची सोडून डॉक्टरकडे धावावे लागते. हा चीक प्रचंड उष्ण असल्याने डोळ्यांच्या पडद्यांना भीषण इजा पोहोचवू शकतो. पाने तोडताना निष्काळजीपणा दाखविल्यास डोळ्यात चिकाचा हलकासा कण जाऊ शकतो. अन् तसे झाल्यास सारे काही सोडून डॉक्टरांकडे पळावे लागते. उपचारांनंतरही डोळ्यावरची सूज काही दिवस उतरत नाही. डोळ्यात डॉक्टर टाकतात त्या ड्रॉप्सना पवार कायम स्वत:सोबत ठेवतात. नखांमध्ये गेलेला चीकही दुर्लक्ष केल्यास घातक ठरू शकतो. पाने तोडण्यात कितीही निष्णात असले, तरी चुकीने पानांमधील चीक डोळ्यांमध्ये जाण्याची भीती त्यांच्याजवळ कायम असते.

‘पावसाळ्यामध्ये गवतातून रुईच्या पानांना तोडणे अधिक अवघड होते. या पानांजवळ अनेकदा साप दिसतात. एक विशिष्ट प्रकारची कडकडून चावणारी गांधील माशी, विषारी कीटक आणि फुलपाखरे यांची पानांवर वस्ती असते. त्यांच्यामधून वाट काढत पाने मिळवायची असतात. उन्हाळ्यात चांगल्या प्रतीची पाने मिळविण्यासाठी लांबलांब फिरावे लागते. जहरी किडे, भुंगे, हिरव्या अळ्या यांचे पानांवर मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य असते. आणि ती मिळविल्यानंतर चार दिवस त्यांना ताजी ठेवण्यासाठी झगडावे लागते.’ असे पवार सांगतात. दीड ते 48-lp-hanumanदोन हजार हारांसाठी काही पोती भरून पाने त्यांना गोळा करावे लागतात. अर्थात ते अंदाजपंचे पाने गोळा करतात. त्यात कधी मोजण्याचा संबंध येत नाही. सावरोली गावातील लता पवार त्यांच्या नातेवाईक आहेत. अनिल पवार यांच्यासाठी पानांपासून हार बनविण्यासाठी अतिरिक्त मदत लागल्यास ती लता पवार करतात.

या पवार कुटुंबीयांसारखेच गेल्या दीड तपांहून अधिक काळ दहिसर येथे राहणारे गायकर कुटुंबीय फक्त रुईच्या पानांच्या व्यवसायात आहेत. ते पानांचे हार करून विकत नाहीत, तर असे हार करणाऱ्या छोटय़ा मोठय़ा व्यावसायिकांना फक्त पाने पुरवितात. हाजीमलंग गडाजवळील जंगल प्रदेश, कर्जत, पनवेल, खोपोलीजवळील सावरोलीपर्यंत छोटय़ा-मोठय़ा गावांमध्ये दर बुधवारी टेम्पोरिक्षा आणि सहा ते सात सहकारी बायका घेऊन त्या पाने तोडणीसाठी निघतात. अख्खा दिवस त्या आणि त्यांच्या सहकारी तब्बल ऐंशी हजारांहून अधिक पानांची पोती टेम्पोमध्ये रचत जातात. निव्वळ ठाणे शहर परिसरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शनी आणि हनुमानाच्या मंदिराजवळ बसणारे विक्रेते हे त्यांचे प्रमुख ग्राहक. त्यांच्याजवळील संपूर्ण ८० हजार पानांची पोती ठाण्यातील आठ ते दहा शनि-हनुमान मंदिराजवळ गुरुवारी दुपापर्यंत रिती होतात, असे इंदिरा गायकर यांनी सांगितले.

इंदिरा गायकर अठरा वर्षांपूर्वी दहिसर पट्टय़ातूनच कमळांच्या फुलांचा व्यवसाय करायच्या. त्यानंतर भाजीच्या व्यवसायातही त्यांनी जम बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र रुईच्या पानांच्या या अत्यल्प भांडवली आणि हमखास मोबदला देणाऱ्या व्यवसायात त्या स्थिर झाल्या आहेत.

शहर सोडले तर सुरू होणाऱ्या सगळ्याच भागांत रस्त्यांच्या कडेला नुसता रुईच्या पाना-फुलांचा अथांग सागर पसरला आहे. त्यामुळे या व्यवसायाला ओहोटी नसल्याचा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्याकडून वर्षभर ऐंशी हजारांहून अधिक पाने दर आठवडय़ाला दिली जातात. हनुमान जयंतीच्या दिवशी दीड लाखांहून अधिक पानांची मागणी करण्यासाठी त्यांना आणखी महिला सहकाऱ्यांची, आदिवासी पाडय़ांमधील लोकांची गरज भासते.

लता आणि अनिल पवार यांचीही हनुमान जयंतीच्या दिवशी पाने आणि हार बनविण्यासाठी मोठी तारांबळ उडते. त्यांच्याकडूनही दिवसाच्या मजुरीवर पाने तोडण्यासाठी माणसे बोलावली जातात.

या पाने वेचणाऱ्या कुटुंबांना मुंबई आणि पुण्याकडून येणाऱ्या पाने गोळा करणाऱ्यांचा जत्थाही ठिकठिकाणी भेटतो. पाने कुठे जास्त आहेत, या माहितीचे आदान-प्रदान त्यांच्यात सहसा केले जात नाही. तरीही यातला कुणीही झाड भुंडे होईस्तोवर पाने आणि फुले काढत नाहीत. प्रत्येक झाडातून ३० ते ४० टक्के पाने काढली जातात. ती महिन्याभरात येणार असल्याने पुढल्या वेळी त्याच जागी आल्यानंतर नव्या पानांऐवजी जुन्या पानांना काढण्यात येते. फायद्यासाठी झाडांना ओरपून काढण्याची प्रवृत्ती यातील कुणाच्यातच दिसत नाही. एखाद्या ठिकाणी दुसरा कुणीतरी पाने तोडून गेल्याची कल्पना आल्यास ते ठिकाण वगळून पाने तोडली जातात.

दादर पुलाखालच्या फुलबाजाराजवळ दर गुरुवारी रुईच्या पानांचा अखंड पुरवठा होत असतो. वसई, विरार, कर्जत परिसरातून आदिवासी प्रामुख्याने हा रुई पानांचा साठा गुरुवारी बाजारात आणतात. मुंबईतील सर्वच भागांत विखुरलेल्या देवळांमधील हार विक्रेते या बाजारातून रुईची पाने खरेदी करतात. मुंबईतील काही जण पाने गोळा करण्यासाठी जातात. पण फुलबाजारातून पाने आणणारा हारविक्रेत्यांचा वर्ग मोठा आहे. मात्र त्यात पानांचे भांडवल अतिरिक्त असल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी आहे. तरी रुईच्या पानांचा हार व्यवसाय मुंबई, ठाण्यातील शेकडो कुटुंबांचा जीवनव्यवहार सुरळीतपणे पार पडत आहे.

यातील गंमत म्हणजे दशकानुदशके व्यवसाय करण्याचा अनुभव असूनही नव्याण्णव टक्के पान किंवा हार विक्रेते ‘हनुमानाला रुईचीच पाने का ठेवतात’ याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यांच्या मनात हनुमानाविषयी अपार श्रद्धा आहे, तितकीच त्यांच्या व्यवसायावरही भक्ती आहे. गेल्या काही वर्षांत हारांची त्यासाठी लागणाऱ्या पानांची मागणी वाढली, त्यांचे उत्पादन आणि विक्री यात वृद्धी झाली, हे त्यांचे व्यावसायिक समीकरण जुळल्याचेही लक्षण आहे. हे अचाट अर्थार्जनाचे मॉडेल इतर कुठल्याही नफ्या-तोटय़ाच्या बाजारी संकल्पनेवर तोलता येऊ शकते.

लता पवार, अनिल पवार आणि गायकर कुटुंबीयांपैकी कुणालाच हनुमान आणि रुईच्या पानांचा संबंध जोडता येऊ शकत नाही. लोक पाने घेतात म्हणून ते ठेवतात हे यातले साधे गृहीतक असेल. पण हनुमानाला पाने वाहणाऱ्या १०० टक्के लोकांनाही ती आपण का वाहतो, याची कल्पना नसते. इथेही हार विक्रेते ती ठेवतात, म्हणून आम्ही घेतो, असे साधे गृहीतक असावे.

हनुमानाला रुईच का बरे?

हनुमानाची उपासना का करावी, याबाबत ज्याचा त्याचा स्वत:चा नियम असेल. भक्तिभाव असेल, अडचणी असतील किंवा आणखीही काही असेल. थोडा शोध घेतल्यास मायाजालावर मात्र उपासनेविषयी बरीच गमतीशीर माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यातील एक हनुमानाचे प्रगतिपुस्तकच सादर करते. त्यात म्हटले आहे की, इतर देवांच्या तुलनेमध्ये हनुमानाची प्रगट होण्याची शक्ती इतर देवांच्या तुलनेने १० टक्के अधिक म्हणजेच तब्बल ७२ टक्के आहे. वाईट शक्तींचा हनुमानाच्या जपाने नाश होतो, असे मानतात. मात्र कुठल्याही सुनामाच्या जपाने वाईटतत्त्व नष्ट होतेच. रोग निवारण, शक्तिवर्धन, सिद्धीप्राप्ती, पुत्रप्राप्ती, विवाह ठरविण्यासाठी मुलींनी उपासना करताना इतर उडीद, तीळ, तेल घटकांसोबत रुईच्या पानांचा हार आवश्यक आहे, असे सांगितले जाते.

मुलीच्या पत्रिकेत तिसऱ्या, सहाव्या, सातव्या व नवव्या स्थानी शनी असेल तर मुलीच्या भावाने व वडिलांनी हनुमानाला रुईचा हार घालावा असा समज आहे. हनुमानाच्या उपासनाविधीत रुईची पाने वापरतात. कारण त्या पानांमध्ये महलरेकापर्यंतची देवतांची शक्ती आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते, असेही म्हटले गेले आहे.

शनिदेव आणि हनुमान हे वेगळे आहेत. तरी साडेसातीत हनुमानाची उपासना का करावी, शनिलाही रुईच्या पानांचा हार का, तर रुईमध्ये देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे ती वाहिल्याने देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि चैतन्याचा लाभ भक्ताला लवकर येतो, असा एक समज आहे. अध्यात्म रामायणातील आधारानुसार हनुमानाच्या राशीला शनिपीडा झाली तेव्हा कैक महिने शनीला हनुमान सापडलाच नाही. नंतर जेव्हा शनि-हनुमान भेट झाली तेव्हा हनुमानाने त्याला आपल्या डोक्यावर बसण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या भक्तांच्या साहाय्याने हनुमानाने डोक्यावर बसलेल्या शनीला दगड मारायचे सांगून धडा शिकविला. बेजार होऊन शनी हनुमानाच्या राशीतून बाहेर पडला. मात्र आपल्यासोबत आपल्या भक्तांवर अवकृपा करू नये, याची हमी हनुमानाने शनीकडून घेतली. त्यामुळे साडेसातीग्रस्त व्यक्तीने शनीसोबत हनुमानाचीही पूजा करावी, अशा वदंता प्रचलित आहेत. धर्मग्रंथ अभ्यासकांच्या मते मात्र या सर्व कपोलकल्पित कथा आहेत. हनुमानाच्या गुणगौरवार्थ त्या शतकोनुशतके अतिशयोक्ती अलंकाराद्वारे सजविण्यात आल्या आहेत.

गुरुचरित्राच्या १६ व्या अध्यायामधील ११६ व्या शतकामध्ये रुईच्या पानांतील चिकामुळे व्यक्तीचे डोळे गेल्याचा उल्लेख आहे. महाभारताच्या पहिल्या पर्वामध्येही रुईच्या पानांचा उल्लेख केलेला आहे. काही अभ्यासकांच्या मते रुईच्या पानांमध्ये आयुवर्धनाचे तत्त्व आहे. त्यामुळे चिरंजीव असलेल्या हनुमानाला रुईची पाने वाहिल्याने आरोग्य सुधारते आणि आयुर्मान वाढते असाही समज आहे. कुणाच्या मते रुईच्या पानामध्ये सूक्ष्मलक्षी ११ वैशिष्टय़े आहेत. त्यातील काही म्हणजे चैतन्य, शक्ती आकृष्ट होते. त्या पानाभोवती शक्तीचे वलय असते. तारक शक्तीचे वलय पानाच्या मध्यमागी कार्यरत असते. पानाच्या कोपरांना हनुमानतत्त्वाचे कवच असते. पानांच्या शिरांच्या मध्यभागी शक्तीचे कण अस्तित्वात असतात. मात्र हीच वैशिष्टय़े वैज्ञानिक दृष्टीने पाहायला गेले, तर त्यातील विषरूप समोर येते. विशिष्ट जिवांना उपकारक म्हणून या विषतत्त्वाची निर्मिती झाल्याचे उलगडते. हनुमान आणि त्याला वाहणाऱ्या रुईच्या पानांबाबत समजांचा डोंगर द्रोणागिरी पर्वताहूनही मोठा ठरावा इतका आहे. प्रत्यक्षात रुईचीच पाने हनुमानाला, का याबाबत ठाम विवेचन कुणीच देऊ शकत नाही.

अर्कावलंबी जीव

रुईचे झाड कीटक आणि इतर वनस्पतींपेक्षा सुरक्षित असण्यामागे त्यातील विषतत्त्व कारणीभूत आहे. कुठलाही प्राणी, पक्षी पोट भरण्यासाठी रुईच्या वाटेला जात नाही. अगदी डासांचीदेखील या झाडाजवळ वस्ती नसते. त्याच्या पानांतील चीक हा प्राण्या- पक्ष्यांच्या शरीरात गेल्यास सर्वात पहिले त्यांच्या हृदयावर परिणाम होतो आणि नंतर डोक्यावर. त्यांना अस्वस्थ वाटू लागते आणि त्यानंतर या वनस्पतीची खोड न काढण्याचा पवित्रा त्यांच्याकडून घेतला जातो. मात्र काही कीटक, फुलपाखरे, विशिष्ट प्रकारचा नाकतोडा रुईचे हे विष अंगात भिनविण्यासाठी त्या पानांपाशी पाहायला मिळतात.

करडय़ा वाघ किंवा ‘प्लेन टायगर’ नावाचे फुलपाखरू या रुईच्या पानांवर विषासाठी अवलंबून असते. याच पानांवर फुलपाखरू अळी स्वरूपात असताना विष शोषून घेते आणि पानांतील विष फुलपाखरामध्ये पसरते. या फुलपाखराला कोतवाल, वेडा राघू, बुलबुल हे पक्षी कधीच भक्ष्य बनवत नाहीत. अज्ञानी पक्षी अगदी सुरुवातीला करडय़ा वाघ फुलपाखराला खायला सरसावते. पण गिळण्याआधीच ते लांब टाकले जाते, इतक्या भीषण प्रकारे त्या पक्ष्यावर फुलपाखराच्या विषाचा परिणाम होतो. नंतर तो पक्षी कधीही या करडय़ा वाघाच्या वाटेला जात नाही, असे फुलपाखरू आणि निसर्गतज्ज्ञ आयझ्ॉक किहिमकर यांनी सांगितले. याशिवाय पेंटेड ग्रासहुपर हा अतिशय सुंदर दिसणारा नाकतोडा पानांचा फडशा पाडत त्यातील विषाला आपल्यात पचवत असतो. त्याच्याही वाटेला कुणीच जात नाही, कारण त्याला मारल्यास उग्र दर्प भक्षकासाठी त्रासदायक ठरतो.

प्रत्येक जिवांची निर्मितीच अशा पद्धतीने झाली आहे, की अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याभोवती ती विशिष्ट प्रकारची संरक्षण कवच निर्माण करतात. अद्याप रुईच्या पानांवर संशोधन सुरूच आहे. मात्र त्याच्यावर अवलंबून जीवसाखळीतील घटक ठरवून दिला गेला आहे. रुईची झाडे ज्या प्रमाणात मुबलक आहेत, तितक्याच प्रमाणात त्यावर जगणारे विषारी कीटक, नाकतोडा, फुलपाखरू तग धरून आहेत. अन् त्यांनाही आगामी शतकांहून अधिक काळ विलयाची भीती नाही.

श्रद्धाविज्ञानाच्या नावाने..

१९९० नंतरच्या दशकात भारतीय जगण्यात जे द्रुतगती बदल आणि क्रांतिसदृश घटक आले, त्यात हनुमानावर तीन-चार टीव्ही मालिकाही होत्या. हनुमानभक्त माचोमॅन नायक असलेले कैक चित्रपटही येऊन गेले. तर एका पिढीला लहानपणापासूनच या सुपरहीरो देवाच्या करामती दाखविणारे अ‍ॅनिमेशनपट ढिगांनी पाहायला मिळाले. डिस्कव्हरी, हिस्टरी, अ‍ॅनिमल प्लानेटसारखी श्रद्धेसोबत प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या पातळीवर पडताळून पाहू देणारी यंत्रणा टीव्हीमध्ये सुरू झाली. त्यामुळे विचारांची प्रक्रिया व्हावी असे वातावरणही तयार झाले. पण त्याचा परिणाम फार झाला नाही, हे आजचे समाजचित्र सांगते.

संगणक आले आणि त्यानंतर हनुमानाच्या वायुवेगात व्यक्तीला जगाच्या कोपऱ्यात संवाद साधण्याची किमया इंटरनेट, मोबाइलद्वारे साधता आली. समाजमाध्यमांसारखे सजग, प्रभावी माध्यमाद्वारे कसल्याही विचारांचा प्रसार करण्याची हनुमानाइतकीच शक्तीही माणसाजवळ आली. एमटीव्ही, व्ही चॅनेलची व्यक्तीला एककल्लीपणाचा शाप देणारी संस्कृती फोफावली. त्यानंतरच्या काळात अंगावर आदळत चाललेल्या गॅझेट्सरूपी गंगेने माणसाला जगाशी खूप जोडून भरपूर एकलकोंडेपणाचा लाभ दिला. या काळातच सर्वच बाबतींत स्वनियंत्रण हरविलेली पिढी ही विज्ञानाच्या नावाने नात्यांबाबत, आदराबाबत, नीतिमत्तेबाबत, निर्लज्जपणाबाबत आधुनिकतेच्या एका टोकावर गेली. तर दुसऱ्या टोकाला तीच खूप मोठय़ा प्रमाणावर देवावलंबून बनू लागली. हे अवलंबित्वच आज हनुमानाच्या दारात कसल्या ना कसल्या शक्तीची आराधना करू लागणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ करू लागले आहे. पदार्थविज्ञान, भौतिकशास्त्रात आंतरराष्ट्रीय पदव्या घेऊन अमेरिकेची चाकरी करणाऱ्या मुलांचा अभिमान बाळगत त्यांच्या अमेरिकेतील प्रगतीसाठी एकवीस पानांचा हार हनुमानाला घालणारे जर्जर वृद्ध आहेत, तसेच परीक्षा काळात पेपर सेटिंगपासून अचानक पास करण्याच्या मागण्या हनुमानाकडे नवस करीत मांडणारी शाळकरी पोरेही सर्व शहरांच्या सर्व चौकांतील हनुमान मंदिरात सारखीच दिसतील. लग्न न ठरणाऱ्या मुलीच्या साडेसातीची मात्रा कमी करण्याचा विडा उचलणारे पालक आहेत. पगारवाढ, नोकरीबदल, पदवाढ मागणारे युवक आहेत. आजारी, कृश, आयुर्मान वाढविण्यासाठी हनुमानाच्या दारात कर्णकर्कश घंटानाद करणारे वयोवृद्ध आहेत. काहींच्या मते परंपरेनुसार चालत आलेली श्रद्धा हनुमानाच्या द्वारी त्यांना आणते. काही जण आई-वडिलांनी शिकविलेले संस्कार, हिंदूुत्वाची शिकवण हनुमानाच्या मूर्तीला आठवडय़ाला प्रदक्षिणा घालण्याचे चुकवत नाही. स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या छाया दिलीप विजयकर गेली अनेक वर्षे नौपाडय़ाजवळील हनुमानाला रुईच्या पानांचा हार घालतात. निव्वळ श्रद्धेपोटी. त्यांना हनुमानाला रुईची पाने का वाहतात, याची कल्पना नसल्याची खंत नाही. तरीही न चुकता त्यांचा हा भक्तीव्यवहार शनिवारी पार पडतो. जितेंद्र करमरकर हे देखील याच मंदिरात १९९१ पासून येतात. वाटला तर हार घेतात, अन्यथा नमस्कार करून पुढे जातात. गेल्या पिढीपासून चालत आलेली परंपरा म्हणून मी येतो. दर आठवडय़ाला जमवण्याचा प्रयत्न करतो. पण नाही येणे झाले, तरी मनातील भाव कमी होत नसल्याचे करमरकर सांगतात. वागळे इस्टेट येथे कामाला असलेले दीपक गुरनानी गेल्या २२ वर्षांपासून याच मंदिरामध्ये हनुमानाला हार घालतात. त्यांचा कोणताही नवस वगैरे नसतो. मनापासून देवाला पुजण्याची इच्छा त्यांना शनिवारी देवळापाशी आणते. या सर्वासोबत गेली तेहतीस वर्षे एकही दिवस न थकता, कसलेही मागणे घेऊन न जाता शनिमंदिरात पाऊल ठेवणारे सुहास पोतनीस नावाचे अजब रसायनही या निमित्ताने पाहायला मिळते. याबाबत त्यांची श्रद्धा ही की, जगात सर्व यंत्रणा शाश्वत आहेत. त्यात अंमळशाने बदल झाला, तर सारे ढासळून जाईल. पोतनीस आपल्या मनातील गोष्टी शनीला सांगतात. त्याच्याकडे काहीही न मागता. पण पोतनीस आणि निव्वळ मनातला खरा भाव घेऊन हनुमान-शनीला पुजणाऱ्या व्यक्ती विरळाच. समाजाचा श्रद्धानिर्देशांक नवस, मागण्यांनी कायम चढाच राहिलेला आहे. आठवडय़ाभरात विविध देवांना वाहिलेल्या वारांप्रमाणे त्याचा श्रद्धाबिंदू बदलतो इतकेच.

कितीही भले असले तरी, आत्ता आहे त्यापेक्षा चांगले आयुष्य प्रत्येकाला हवे आहे, ही आजच्या जगाची शोकांतिका आहे. गॅझेट्सनी तिन्ही त्रिकाळ एकमेकांच्या खूप जवळ असलेल्या नागरिकांमध्ये कधी नव्हे इतकी असुरक्षितता ठासून भरली आहे, हे खरेच. श्रद्धानिर्देशांक चढा असला तरी नारळ देऊन, रुईच्या पानांचा हार घालून, तेल-उडीद-तीळ वाहून खरोखरीच हनुमान टक्के प्रगट होतो का, हा प्रश्न निर्थक आहे.

पावसापाण्यात, उन्हातान्हात मुंबई-ठाण्यापासून तळोजा, पनवेल, ही हरितपट्टा हरविण्याकडे कल असलेली शहरे काही काळाने ठाण्याप्रमाणे रुईविरहित होतीलही, सावरोली नामक गाव गोल्फ सिटी किंवा उद्योग नगरीच्या आगमनानंतर भकासतेची कात टाकेलही. भविष्यातील विकासाच्या टोकदार अवस्थेतही हनुमानावरील श्रद्धेच्या अर्काचा अर्थ आजच्याइतकाच कायम राहील. परंपरेच्या नावाने, संस्कारांच्या नावाने किंवा असुरक्षिततेच्या नावाने सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या मनातला उत्तरोत्तर वाढत चाललेला श्रद्धानिर्देशांक पुढील काही शतके संपण्याची चिन्हे नाही. त्याचप्रमाणे  रुईच्या पानांवर अवलंबून असलेल्या प्लेन टायगर फुलपाखरू, पेण्टेड ग्रासहूपरसारख्या जीवांप्रमाणेच,   मुंबईपासून पुण्यापर्यंत या पानांवर  तगणाऱ्या कुटुंबांचा आधार संपणार नाही. हनुमानाच्या अजस्र शक्तीचेच ते आजवर न दिसलेले प्रतीक आहे का?
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com