डॉ. अनिल पाटील
लोकप्रभा दिवाळी २०२०

एखादी परिसंस्था तयार होण्यास काही वष्रे लागतात. जंगलासारखी परिसंस्था तयार होण्यास तर हजारो वष्रे लागतात. उष्ण कटिबंधात असणाऱ्या भारतात अनेक जंगल परिसंस्था असून सह्य़ाद्रीच्या रांगांमध्ये असलेली अनेक घनदाट जंगले याची उदाहरणे आहेत. कोणतीही परिसंस्था ही त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जैविक व अजैविक घटक एकत्र येऊन निर्माण झालेली असते. जमीन, माती, पाणी, प्रकाश, खनिजे यांच्या उपलब्धतेनुसार सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांची एक स्वयंचलित संस्था अनेक वर्षांच्या स्थित्यंतराने तयार झालेली असते. यातील प्रत्येक सजीव हा परस्पर सहजीवनामध्ये बांधलेला असतो. एकाचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी दुसरा सजीव कळत-नकळत मदत करत असतो. पूर्ण विकसित होऊन ‘क्लायमॅक्स’ स्टेजला पोहोचलेल्या परिसंस्थेमध्ये स्वत:ची अशी अन्नसाखळी, भूजैवरसायनचक्र, जलचक्र कार्यान्वित असते. खरं तर जंगलातील वनस्पती, प्राणी व मानव यांचे एक अतूट नाते आहे. उत्क्रांती आणि विकासाच्या टप्प्यांवर मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यात जंगले व वनस्पती यांचा मोठा वाटा आहे. आदिमानवापासून ते जंगलात अधिवास करणाऱ्या अदिवासींपर्यंत अनेकांनी जंगलातील अनेक वनस्पती मानवाच्या उपयोगासाठी शोधून काढल्या आहेत. वापरून सिद्ध केलेल्या या वनस्पती, मोठय़ा प्रमाणात अन्न, औषधी, लाकूडकाम, रंगकाम, तंतू, शेती कामासाठी वापरल्या जात आहेत.सह्य़ाद्रीच्या रांगांमध्ये आज मोह, उंडी, आसनी, करंबेळ, कंडोळ, कुंभी, कुसुम, पळस, पांगारा, रक्तगुंज, सावर, चांदांड, मुचकुंद, खैर, साग, हिरडा, बेहडा, बिब्बा, बेल, कवठ, अंजन, जांभूळ, ऐन यासारखे अनेक वृक्ष वाढत आहेत. त्या प्रत्येकाचे जंगलामध्ये असणे हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या जोडीनेच करवंद, बाकाळी, घाणेरी, कारवी यांसारखी झुडपे व सर्पगंधा, कुडा, डिके-माळी, धामण, उक्षी, मुरुडशेंग, ज्येष्ठमध, सागरगोटा, शिकेकाई यांसारख्या औषधी वनस्पती जंगले समृद्ध करीत आहेत. लोकवनस्पती विज्ञानातून झाडांच्या या बहुपयोगी योगदानाचे महत्त्व दृष्टीस पडते. परंतु यातील काही वनस्पती व प्राणी आज नाहीसे होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण सह्य़ाद्रीच्या रांगाच जैवविविधतेच्या बाबतीत ‘हॉट-स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)