scorecardresearch

Premium

माझी माय सरसोती

देवी सरस्वती म्हणजे विद्येची अधिष्ठात्री हे आपल्याला माहीत असतं.

माझी माय सरसोती

00-navratri-logo-lpदेवी सरस्वती म्हणजे विद्येची अधिष्ठात्री हे आपल्याला माहीत असतं. सरस्वतीचा दुसरा संदर्भ आहे लुप्त झालेल्या नदीचा. याशिवाय देवी सरस्वतीबद्दल प्राचीन साहित्यात कोणकोणते संदर्भ आले आहेत, याची चर्चा-

अप्रशस्ता इव स्मसि

Vighnaraj Sankashti Chaturthi In Pitru Paksha Tithi Today These Four Rashi To Get Bappa Blessing With More Money Love Astro
पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर विघ्नराजाची कृपा बरसणार; आजपासून तुम्हाला कसा होईल फायदा?
A different love story of Lakshman and Urmila
लक्ष्मण आणि उर्मिला यांची रामायणातील वेगळी प्रेमकथा !
yavatmal couple commits suicide, extra marital affair, yavatmal crime news
यवतमाळच्या झरीजामणीत विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या
Favourite Zodiac Signs of Lord Ganesha
गणपतीच्या प्रिय राशी कोणत्या? ‘या’ लोकांवर नेहमी असते बाप्पाची कृपा; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

प्रशस्तिमम्ब नस्कृधि।

आम्ही अज्ञात आहोत,

आम्हास विख्यात कर हे सरस्वति!

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला..’ या प्रार्थनेचे सूर प्रत्येक भारतीयाला परिचित असतात. अगदी लहानपणापासून सरस्वतीचे रूप सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असते. राजा रविवर्मा या प्रख्यात चित्रकाराने रेखाटलेली, हाती वीणा घेतलेली, शुभ्रधवल हंसावर आरूढ, शुभ्रवसना, सात्त्विक वदनाची ही देवी भारतीय परंपरेत विद्यादायिनी व कलोपासकांना मार्गदर्शन करणारी देवी म्हणून सुपरिचित आहे. गणपती विसर्जनानंतर आता नवरात्राची धामधूम सुरू होईल. नऊ दिवसांत मातृशक्तीचा उदो उदो होईल, महालक्ष्मी, दुर्गा, काली यांच्या बरोबरीने महासरस्वतीचाही जागर होईल; म्हणून सरस्वती प्राचीन काळापासून याच रूपात होती का, विश्वातील प्राचीनतम ग्रंथात ऋग्वेदातही ही अशीच होती का, तिचे पूजन कसे करतात, या नावाची एक नदीही होती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यांची उत्तरे शोधण्याचा हा स्वल्प प्रयास! सरस्वतीची त्रिविध रूपे ऋग्वेदापासून दिसतात; महानदी, वाग्देवी आणि देवी. या तीनही रूपांचा परामर्श घेऊ.

महानदी सरस्वती

सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यातच वैदिक भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला. ऋग्वेदात सरस्वती नदीवर तीन संपूर्ण सूक्ते आहेत (ऋग्वेद. ६.६१, ७.९५, ७.९६), शिवाय तिचे उल्लेख इतरत्र आहेतच. ‘महो अर्ण: सरस्वती’ असे म्हणत तिच्या प्रचंड जलसंचयाचे व घनगंभीर प्रवाहाचे वर्णन वेदांत येते. मार्गात येणाऱ्या पर्वतशिखरांना रोंरावणाऱ्या लाटांनी नेस्तनाबूत करीत ही डौलाने वाहते. गृत्समद ऋषी तिचे आवाहन ‘नदीतमे, अंबितमे, देवितमे’ असे करतात (२.४१.१६,१७). महाभारतकाळापासून ती हळूहळू लुप्त होऊ लागली व विसाव्या शतकापर्यंत ती लुप्तच मानण्यात आली. तिचा एक पूर्ववाही प्रवाह प्रयागक्षेत्री गंगा यमुनेला गुप्त रूपात मिळतो व त्रिवेणी संगम होतो अशी भारतीयांची श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. याचा शोध घेतला असता, भूगर्भात खरोखरीच असे अनेक प्रवाह आढळले व सरस्वतीच्या शोधमोहिमेला आरंभ झाला. अलीकडे पुण्याच्या डेक्कन विद्यापीठाने हरयाणा राज्यातील राखीगढ इथे उत्खनन केले तेव्हा शुष्क नदीपात्रात अनेक प्रागतिहासिक वस्तू, मानवी सांगाडे सापडले, ज्यांचा काळ इ.स. पूर्व पाच ते आठ हजार वर्षे इतका मागे जातो. एकेकाळी समृद्ध वैदिक संस्कृती इथे नांदत होती हे यावरून सिद्ध होते. सरस्वती शोध संस्थानच्या मतानुसार यमुना सरस्वती क्षेत्र, सरस्वती साबरमती क्षेत्र व राजस्थान साबरमती विभागात उत्खनन केल्यास १३०० कि.मी लांबीची सरस्वती नदी पुन्हा प्रवाहीत होऊ शकते. कुरुक्षेत्र हा प्रदेश पृथ्वीची नाभी होती. सरस्वती ही अत्यंत वेगवती नदी असून सप्त नद्यांची भगिनी होती असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दृषद्वती, शुतुद्री (सतलज), चन्द्रभागा (चिनाब), विपाट् (व्यास- बियास), इरावती (रावी) या नद्यांनी व अशा अनेक लहानमोठय़ा प्रवाहांनी हीस समृद्ध केले. खरोखरीच ही ‘सिन्धुमाता’ होती. हिच्या तीरावर वेदांतील पंचजनांचा विकास व उत्कर्ष झाला. ऋग्वेदकालीन राज्यकत्रे- मग ते भरतवंशीय असोत, कुरुवंशीय, मत्स्यवंशीय, पांचाल असोत अथवा ययातीचे पुत्र, सर्वानी हिच्या तीरावर यज्ञयाग केले, देवांसाठी आहुती दिल्या व आपले राज्य सुस्थिर केले. भरतकुळाचे आधीचे उपाध्याय होते, ख्यातकीर्त ऋषी विश्वामित्र. नंतर वसिष्ठांनी हे पद भूषवले व दहा राजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सुदासाला इंद्र व वरुणांच्या मदतीने युद्धात विजय मिळवून दिला. तत्कालीन शासक होते दिवोदास व सुदासासारखे लढवय्ये राजे. या भरतवंशीय राजांमुळेच हिला भारती हे नाव पडले. सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशात प्राचीन वैदिक संस्कृती बहरू लागली. मग जमिनीच्या कसाच्या जोडीने मानवी सुफलनाशीही सरस्वतीचे नाते जोडले गेले. गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रसूतीसाठी सरस्वतीची प्रार्थना केली आहे (ऋ. १०.१८४.२) पíशयन संस्कृतीतही सरस्वती अनाहिता या नावाने आढळते. आबान यश्त या जलदेवतेच्या स्तुतीत अनाहिता ही गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रजननासाठी उपास्य असल्याचे सांगितले आहे. मुळात निरंतर वाहणारा नदीचा प्रवाह हाच वंशसातत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच प्राचीन संस्कृतीत नद्या या जीवनदायिनी, पुत्रसंदायिनी मानल्या जातात. सरस्वतीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाभारतात युद्धाच्या समयी बलरामाने सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा केली त्याचे वर्णन आहे. दक्षाच्या शापाने चंद्राचा क्षय होऊ लागला तेव्हा त्याने सरस्वतीक्षेत्री स्नान केले व तो रोगमुक्त झाला, तसेच शंकराने ब्रह्महत्येचे पाप नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्री स्नान केले असे अनेकविध प्रसंग पुराणात क्षेत्रमाहात्म्य विशद करताना आले आहेत.

14-sarsvati-lp

सरस्वती नदी काही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली असली तरी पुराणांत विविध कथांमधून या लुप्त होण्याची कारणमीमांसा केलेली दिसते. पद्मपुराणात अशी कथा आहे की जेव्हा और्व ऋषीने निर्माण केलेला अग्नी सर्व विश्व ग्रासू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून सरस्वतीने नदीरूप घेतले व एका कलशात तो वडवाग्नी ठेवून ती पश्चिम समुद्राकडे निघाली, पापी जनांचा स्पर्श टाळण्यासाठी ती जमिनीखालून वाहू लागली, अग्नीचा ताप अस झाला की भूपृष्ठावर येऊ लागली. वामनपुराणात जरा वेगळ्या ढंगाने हा कथाभाग येतो. उत्तंक ऋषीच्या आश्रमाजवळ प्लक्ष वृक्षापासून सरस्वती उत्पन्न झाली. कुठे जायचे हे न कळल्यामुळे ती कुंठित झाली, तेव्हा मरकडेय ऋषींच्या मागोमाग जात ती प्रथम कुरुक्षेत्री गेली व नंतर दक्षिण दिशेस वाहत गेली. सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या मधील भूभागाला मध्यदेश म्हणजेच कुरुक्षेत्र अथवा ब्रह्मावर्त असे संबोधतात. समुद्रात तो वडवानल विसर्जति करताना ती हारिणी, कपिला, नंदा, अशा विविध प्रवाहांनी वाहिली असेही आढळ्ते. या सरस्वतीच्या उपनद्या असाव्यात. महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी. या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल.

वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.

वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

15-sarsvati-lp

बृहदारण्यकोपनिषदात वाणी धेनूच्या रूपात येते. स्वाहा, स्वधा, वषट् व हन्त हे तिचे चार स्तन आहेत. पकी स्वाहा व वषट् यांचे दोहन देव करतात, स्वधेचे पितर आणि हन्तचे मनुष्यमात्र! सरस्वती वाग्देवीच्या रूपात चतुर्वधि आहे, ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’; परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. शब्दाची भागवतातील व्याख्या आहे, अर्थाश्रयत्वंशब्दस्य द्र.ष्टुìलगत्वमेव च। तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु-आकाशाचा सूक्ष्म अंश घेऊन अर्थ व्यक्त करणारी वाणी वक्त्याचा, चतन्याचा निर्देश करते. वैखरी मुखावाटे प्रसृत होते, स्वर व्यंजनांचे लेणे लेवून येते. शांतिपर्वातील वृत्तानुसार एकदा याज्ञवल्क्यांनी चिंतन केले तेव्हा स्वरव्यंजनांचे दागिने घालून ओंकारध्वनी करीत सरस्वती अवतरली. वैखरी हे वाणीचे प्रकटरूप आहे, हेच रूप सर्वाना ठाऊक आहे, इतर तीन रूपे गुप्त असतात व तपचिंतनानेच साध्य होतात. मानवाच्या स्थूल, सूक्ष्म, कारणशरीराशी वैखरी क्रियाशक्ती, मध्यमा ज्ञानशक्ती तर पश्यन्ती (पाहणारी, द्रष्टी) इच्छाशक्ती या दृष्टीने संबंधित आहेत. परावाणी केवळ योगीजनगम्य आहे व तिथे शब्द आणि अर्थ अविभक्त असतात. शिवपार्वतीचे अद्वैत ‘वागर्थाविव संपृक्तौ’ असे कालिदास म्हणतो, तेव्हा हेच अभिप्रेत आहे. स्कंदपुराणात अंबुवाची राजाची कथा आहे. हा मूक होता, याने हाटकेश्वरी सरस्वतीत स्नान केले, तत्क्षणी त्यास वाचा प्राप्त झाली. मग त्याने तीरावरील माती घेऊन तिची पाíथव मूर्ती केली. तीर्थमाहात्म्य, वाचाप्राप्ती व देवीस्वरूप ही तिन्ही रूपे इथे दिसतात.

सरस्वती देवी

अंबुवाची राजाने सरस्वतीची चतुर्हस्त मूर्ती केली. तिचे चार हात सर्वव्यापित्व दर्शवितात. दोन उजव्या हातांत कमळ व अक्षमाला, तर दोन वामहस्तात पुस्तक व कमंडलू अशी मूर्ती सजली. कमळ हे सृजनाचे प्रतीक, अक्षमाला एकाग्रतेचे सूक्ष्म प्रतीक, पुस्तक हे ज्ञानप्राप्तीचे स्थूल साधन तर कमंडलू हे ज्ञानामृताचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गणपतीप्रमाणे सरस्वती ज्ञानासोबत कलांची अधिष्ठात्री मानली जाऊ लागली, तेव्हा तिच्या हाती वीणा आली, व ती संगीताचे, कलांचे प्रतीक झाली. अश्वतर राजा या सरस्वतीच्या पूजनाने संगीतात पारंगत झाला असे मरकडेय पुराणात आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र हंस तिचे वाहन समजले जाते. कलांची देवी म्हणून मयूर वाहन आहे तर सर्जकशक्ती म्हणून ती कमलासना आहे. द्विभुजा सरस्वती विष्णुपत्नी, विष्णुमाया म्हणून प्राचीन काळापासून विख्यात होती. विष्णूने प्रकृतिमुखर (स्वभावत: अत्यंत बडबडी) सरस्वती व चंचल लक्ष्मीला कंटाळून लाकडात प्रवेश केला (दारुभूतो मुरारि:) असे एक मजेदार सुभाषित आहे. मध्ययुगात ती चतुर्हस्ता झाली. मुळात ती ब्रह्मदेवाची कन्या. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता तिच्यावर भाळला व त्याने तिचा पत्नीत्वाने स्वीकार केला. सर्जनाच्या प्रक्रियेत नात्यांचा असा गुंता सर्व पुराकथांचा एक अविभाज्य घटक आहे. ब्रह्मदेव, विष्णू व शिवाचे एकत्रित तेज म्हणजे सरस्वती होय. म्हणूनच तिला त्रिकला असे म्हणतात. उत्तरेत विद्याप्रदा शारदा आणि दक्षिणेत शिवशक्तीच्या रूपात तिचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रातील शेवटचे तीन दिवस, सप्तमी ते नवमी महासरस्वतीचे मानले जातात. देवीभागवत आणि मरकडेय पुराणात देवीमाहात्म्यात तिला नीलसरस्वती असे म्हणून तिचे कालीशी तादात्म्य सांगितले आहे. बौद्धांनीही तारा देवीचे रौद्ररूप म्हणून नीलसरस्वतीचे वर्णन केले आहे. या रूपात ती दैत्यसंहार करते. दुष्टांचे निर्दालन व सुष्टांचे रक्षण हे दुग्रेप्रमाणेच तिचे कर्तव्य आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महेश्वरी म्हणून पहिले तीन दिवस सर्जकशक्तीचे आवाहन, नंतरचे तीन दिवस सौंदर्य व संपत्तीचे प्रतीक महालक्ष्मीचे स्तवन आणि शेवटचे तीन दिवस परम गुह्य़ज्ञानस्वरूप ब्रह्मविद्य्ोचे सरस्वतीचे ध्यान असा उपासनाविधी आहे. देवांच्या त्रिमूर्तीप्रमाणे देवीची त्रिमूर्ती अशा प्रकारे सिद्ध झाली. वैश्विक मातृशक्तीचे हे त्रिविध आविष्कार खूप लोभस आहेत. मत्स्यपुराणात सरस्वती, सावित्री व गायत्री या तिघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असे सांगून त्यांचे ऐक्य प्रतिपादित केले आहे. ब्रह्मदेवाच्या शुद्ध सत्त्वगुणापासून हिची निर्मिती झाली म्हणून् ही विमलेन्दुधवला आहे. दुर्गासप्तशतीत हिची विविध नावे येतात, महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती। आर्या ब्राह्मी कामधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी । माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंतपंचमीला हिचे विधिवत् पूजन करून विद्यारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात घरोघरी काढली जाणारी आकडय़ांची सरस्वती हे एक यंत्र आहे. त्यातून उद्भवणारे त्रिकोण श्रीयंत्राप्रमाणे चतन्याचे, ऊर्जेचे व गुह्य़ज्ञानाचे गाभारे आहेत. ही रांगोळी अमूर्ताकडे नेणारी सोपी व मूर्त पायवाट म्हणता येईल. यंत्राच्या जोडीने तंत्रशास्त्रही विकसित झाले व बीजमंत्रांनी ध्यान होऊ लागले.

बौद्ध परंपरेत ही वज्रवीणा, आर्यसरस्वती, वज्रसरस्वती या नावांनी तर जैन परंपरेत श्रुतदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबाहेर, आशियाई देशांत सरस्वतीची विविध रूपे व मूर्ती आढळतात. बहुतेक मूर्तीत सरस्वती वीणाधारिणी दाखवली जाते. बुद्धीची ग्रीक देवता अथेना किंवा रोमन मिनव्‍‌र्हा सरस्वतीचीच पाश्चात्त्य रूपे म्हणता येतील, कारण याही विद्या, वाणी व कलादायिनी मानल्या जातात. बुद्धिप्रदा शारदा हे सरस्वतीचे सर्वमान्य विशेषण! शरद् ऋतूशी संबंधित, काश्मीरमधील शारदापीठाशी संलग्न म्हणून शारदा. शिवाय ही सार+दा, श्रुतींचे सार देणारी आहे. ही केवळ सरस्+ वती, जलाशयांनी युक्त नाही, तर सार+स्व+ वती म्हणजे आत्मज्ञानाचे सारसर्वस्व देणारी चिद्घनचपला आत्मशक्ती आहे. ही ‘अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थकलाकामिनी विश्वमोहिनी’ आहे यात काय संशय!

सेयं शारदा सर्वदा सर्व+दा वर+दा सार+दा स्यात्।
डॉ. गौरी माहुलीकर – response.lokprabha@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saraswati

First published on: 30-09-2016 at 01:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×