स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
नवीन स्मार्टफोन घेताना परफॉर्मन्स, कॅमेरा, मेमरी याबरोबरच डिस्प्लेला किंवा मागील बाजूस असणाऱ्या काचेवर कोणत्या स्वरूपाचे सुरक्षा कवच आहे, हेदेखील पाहिले जाते. हल्ली ग्लास बॅक असणारे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध असल्यामुळे अशी सुरक्षा महत्त्वाची ठरते. या संदर्भात गोरिला ग्लास, आयपी सर्टिफिकेशन किंवा रेटिंग, स्प्लॅशप्रूफ, डस्टप्रूफ असे शब्द वापरले जातात. त्याविषयीची रेटिंग्स एका विशिष्ट परिमाणाच्या साहाय्याने दिली जातात. या परिमाणांविषयी सोप्या भाषेत समजून घेतल्यास नवा स्मार्टफोन खरेदी करताना नक्कीच फायदा होऊ शकतो 

डिस्प्लेसाठी सुरक्षा कवच

आजकाल मुख्य स्क्रीनबरोबरच ग्लासबॅक असणारे म्हणजेच मागेदेखील काच असणारे स्मार्टफोन पाहायला मिळतात. रोजच्या वापरात आपण स्मार्टफोन हाताळताना नकळत पडला किंवा त्यावर इतर वस्तू घासल्या गेल्या, तर स्क्रीनवर किंवा स्क्रीनच्या मागे ओरखडे येऊ शकतात यासाठी विशेष प्रक्रियेतून तयार केलेली काच स्मार्टफोन निर्माते वापरतात. यामध्ये सर्वात प्रचलित म्हणजे कॉर्निग गोरिला ग्लास. यामुळे आपल्या स्मार्टफोनला ओरखडय़ांपासून बऱ्याच प्रमाणात संरक्षण मिळू शकते. सध्या उपलब्ध असणाऱ्या गोरिला ग्लासचे ‘व्हीक्टस’ हे व्हर्जन स्मार्टफोन २ मीटर अंतरावरून खाली पडला तरी स्क्रीनचे नुकसान होणार नाही, अशी सुरक्षा पुरवते. याला वैज्ञानिकदृष्टय़ा ज्या एककामध्ये मोजले जाते त्याला ‘मोह्ज स्केल’ म्हणतात जी किमान शून्य ते कमाल दहापर्यंत असते. सर्वसाधारणपणे स्मार्टफोनमध्ये ७ ते ९ पर्यंत मोह्ज स्केलचे डिस्प्ले उपलब्ध आहेत. गोरिला ग्लास असणाऱ्या स्मार्टफोनलादेखील बाहेरून टेम्पर्ड ग्लासचे आवरण असणे उपयुक्त ठरते. याचे मुख्य कारण म्हणजे वाळू किंवा त्या स्वरूपाच्या पदार्थाचा मोह्ज इंडेक्स हा १० म्हणजे सर्वात जास्त असतो. ज्यामुळे आपल्या स्क्रीनवर ओरखडे उमटू शकतात.

Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! आता एक्सवर येणार ‘ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप’; जाणून घ्या सविस्तर…
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत
Indian Computer Emergency Response Team issues high severity warning For iPad iPhone and MacBook users
सरकारी एजन्सीने जारी केला इशारा; iPad, iPhone अन् ‘या’ युजर्सना हॅकर्सचा धोका

आयपी रेटिंग

स्मार्टफोनच्या तांत्रिक तपशिलात आयपी ५३, आयपी ६७, आयपी ६८ असे शब्द पाहायला मिळतात. ज्याचा ढोबळमानाने अर्थ असा की, आपल्या स्मार्टफोनला स्थायू पदार्थ (सॉलिड्स) आणि द्रव पदार्थापासून (लिक्विड्स) सुरक्षा कवच देण्यात आले आहे. आयपी म्हणजेच इनग्रेस प्रोटेक्शन. यामुळे आपल्या स्मार्टफोनच्या आत असे पदार्थ प्रवेश करत नाहीत.

आयपी रेटिंग कसे वाचावे

आयपी रेटिंग लिहिताना, आयपी आणि त्यापुढे दोन अंक लिहिलेले असतात. यातील पहिला अंक हा स्थायू पदार्थापासून मिळणारी सुरक्षा दर्शवतो, तर दुसरा अंक हा द्रव पदार्थापासून मिळणारी सुरक्षा दर्शवतो. काही वेळा पहिल्या अंकाच्या जागी ‘’ असे चिन्हदेखील पाहायला मिळते. याचा अर्थ स्थायू पदार्थापासून कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही.

स्थायू पदार्थासाठीचे आयपी रेटिंग

१ – ५० मिमीपेक्षा मोठय़ा आकाराच्या पदार्थापासून संरक्षण.
२ – १२ मिमीपेक्षा मोठय़ा आकाराच्या पदार्थापासून संरक्षण.
३ – २.५ मिमीपेक्षा मोठय़ा आकाराच्या पदार्थापासून संरक्षण.
४ – १ मिमीपेक्षा मोठय़ा आकाराच्या पदार्थापासून संरक्षण.
५ – यामध्ये धूलिकणांपासून प्राथमिक स्वरूपाचे संरक्षण मिळते, परंतु हा ‘डस्टप्रूफ’ या प्रकारात मोडत नाही.
६ – यामध्ये धूलिकणांपासून संपूर्ण संरक्षण मिळत असल्यामुळे याला ‘डस्टप्रूफ’ म्हटले जाते.

द्रव पदार्थासाठीचे आयपी रेटिंग

१ – यामध्ये पाण्याच्या थेंबांपासून संरक्षण मिळू शकते. हे केवळ स्मार्टफोनच्या वरच्या भागातूनच पाण्याच्या शिरकाव रोखू शकते. हे अगदीच प्राथमिक स्वरूपाचे संरक्षण असल्याने स्मार्टफोन्समध्ये वापरले जात नाही.
२ – फोनच्या पृष्ठभागावर १५ अंशातून पाण्याचा हलका फवारा आल्यास त्यापासून संरक्षण.
३ – ६० अंशातून पाण्याचा फवारा आल्यास संरक्षण. याला ‘स्प्लॅशप्रूफ’ असे देखील संबोधले जाते.
४ – यामध्ये ३६० अंशातून म्हणजेच कोणत्याही बाजूने पाण्याचा फवारा झाल्यास त्यापासून संरक्षण मिळते.
५ आणि ६ – ३६० अंशातून उच्चदाबाने पाण्याचा फवारा झाल्यास संरक्षण.
७ – यामध्ये पाण्याखाली १५ सेंटिमीटर ते १ मीटपर्यंत साधारण ३० मिनिटे स्मार्टफोन सुरक्षित राहू शकतो.
८ – हे सर्वात उच्च रेटिंग असून यामध्ये स्मार्टफोन पाण्याखाली अनेक दिवस सुरक्षित राहू शकतो.

आयपी रेटिंगची निवड

सर्वसाधारणपणे स्मार्टफोनच्या आत वरच्या बाजूस, सिमकार्ड ट्रे, चार्जिग पोर्ट, स्पीकरच्या बाहेरील कडा या सर्वाना एक किंवा दोन रबराचे आच्छादन असते ज्यामुळे धूलिकण किंवा पाण्याचा शिरकाव रोखला जाऊ शकतो. आयपी रेटिंग प्राप्त करण्यासाठी स्मार्टफोन निर्मात्यांना त्याची चाचणी करून घ्यावी लागते ज्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, म्हणून वन प्लससारख्या काही स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्या  स्मार्टफोनमध्ये सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करतात, परंतु अधिकृतपणे आयपी रेटिंग जाहीर करत नाहीत.

स्मार्टफोन्समध्ये सध्या आयपी ५३, आयपी ६७, आयपी ६८ ही तीन रेटिंग्ज पाहायला मिळतात. ज्यामध्ये आयपी ६७ हे डस्टप्रूफ-वॉटर रेझिस्टन्ट आणि आयपी ६८ हे डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ संरक्षण देते. आयपी ५३ हे डस्ट-वॉटर रेझिस्टन्ट या प्रकारात मोडते. सर्वसामान्य ग्राहकांसाठी आयपी ६७ हे रेटिंग असणारा स्मार्टफोन पुरेसा सुरक्षित ठरतो.

आयपी सुरक्षेच्या मर्यादा

आयपी रेटिंगचे एकक समजून घेतानाच, त्याच्या मर्यादादेखील समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आयपी रेटिंग हे सामान्यत: रसायनविरहित किंवा क्षारांचे प्रमाण कमी असलेल्या पाण्याला गृहीत धरून दिलेले असते, त्यामुळे समुद्राच्या किंवा रसायनमिश्रित पाण्याबरोबर तुलना करताना त्याचा तितकासा फायदा होत नाही. स्मार्टफोन वापरू लागल्यानंतर काही वर्षांनी हे सुरक्षा कवच कमकुवत होत जाते, म्हणजेच आयपी ६७ रेटिंग असणारा नवीन स्मार्टफोन जर पाण्यामध्ये पडला किंवा मोठय़ा प्रमाणात धूलिकणांच्या संपर्कात आला तर ज्या प्रमाणात सुरक्षित राहील, त्याच प्रमाणात काही वर्षे वापरल्यानंतर राहत नाही. तसेच स्मार्टफोन जर वारंवार पाण्याखाली किंवा पाण्याच्या संपर्कात आला तर आयपी रेटिंग तेवढे प्रभावी ठरत नाही, त्यामुळे आपल्या स्मार्टफोनला अगदी आयपी ६८ म्हणजेच सर्वोच्च दर्जाचे रेटिंग असेल, तरीदेखील त्याचा वापर हा काळजीपूर्वक करणे केव्हाही योग्य ठरते. असे सुरक्षा कवच हे केवळ मर्यादित आणि नकळतपणे होणाऱ्या पाण्याच्या किंवा धूलिकणांच्या शिरकावासाठी वरदान आहे.