तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर समाजमाध्यमे सहजपणे सामान्य माणसाच्या आवाक्यात आली, त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक ठरली. पण असे असले तरी त्यावरून जे जे काही प्रसृत होते ते पाहता आपला सामाजिक बालिशपणाच उघडा पडत चालला आहे, असे दिसते.
गेल्या चार-पाच वर्षांत एखादा विषय वर्तमानपत्रात जितका चर्चिला जात नाही, तितका तो समाजमाध्यमांवर अधिक चघळला जातो. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपूर वापर म्हणावा असा हा प्रकार. घटना कोणतीही असो, गावपातळीवरची असो की आंतरराष्ट्रीय स्तरावरची आपल्याला व्यक्त व्हायलाच हवे अशी अगदी ठाम धारणा झालेला एक मोठा वर्ग सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर अगदी हमखास सापडतो. अर्थात कोणत्याही घटनेवर व्यक्त होणे हा मूलभूत मानवी स्वभाव. इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता तेव्हा गावचावडीवर किंवा पिंपळाच्या पारावर अगदी मुक्तपणे कोणत्याही विषयावर पिंका टाकत या स्वातंत्र्याचा आनंद घेतला जायचा. शहरात असाल तर सोसायटीची बाग किंवा कोपऱ्यावरचा नाका ही कोणत्याही विषयावर गोलमेज परिषद भरल्याच्या आवेशात चर्चा करायची हक्काची जागा. पण इंटरनेटच्या वाढत्या वापरानंतर अगदी बांधावरच्या शेतकऱ्याच्या हातीदेखील स्मार्टफोन आला. कालपर्यंत गावच्या चावडीवर रंगणाऱ्या गप्पा पाहता पाहता इंटरनॅशनल चावडीत रंगू लागल्या. अर्थातच कट्टय़ावरच्या मर्यादित श्रोतृवर्गाचा विस्तार झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाइक्स, रिअॅक्टचा प्रतिसाद लिहिणाऱ्यांना नवी स्फूर्ती देऊ लागला. फेसबुकच्या लाल ठिपक्यांची गर्दी वाढू लागली. स्टेट्स अपडेट न करणारा आणि प्रतिक्रिया न देणारा म्हणजे असंवेदनशील अशीदेखील संभावना होऊ लागली. इंटरनॅशनल चावडीवर स्वघोषित पंडितांची गर्दी वाढू लागली. अर्थात चावडी म्हटल्यावर हे सारे अपेक्षितच असते. पण गाव चावडीचा परीघ आणि इंटरनॅशनल चावडीचा परीघ यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. आणि इथेच अनेक महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होत जाते.
मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media