scorecardresearch

Premium

यशाची योजना : सॉफ्टवेअर निर्मितीची सुविधा

संगणकासाठी आवश्यक असणारी विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स तयार करणं, हा सध्याच्या काळातला एक अतिशय महत्त्वाचा उद्योग आहे.

laptop-keyboard
संग्रहित छायाचित्र

डॉ. गिरीश वालावलकर – response.lokprabha@expressindia.com
संगणकासाठी आवश्यक असणारी विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स तयार करणं, हा सध्याच्या काळातला एक अतिशय महत्त्वाचा उद्योग आहे. वेगवेगळय़ा कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर्सची मागणी सातत्याने वाढत आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारची सॉफ्टवेअर्स निर्माण केली जात आहेत. अनेक अद्ययावत बहुराष्ट्रीय कंपन्या यात आघाडीवर आहेत. त्याचबरोबर देशपातळीवरच्या किंवा अगदी स्थानिक कंपन्यासुद्धा या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा मोठय़ा कंपन्या सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी महागडी अत्याधुनिक साधनसामग्री वापरतात. त्यासाठी अनेक निपुण अभियंते आणि तंत्रज्ञांना उत्तम पगार देऊन नोकरीवर ठेवतात. मध्यम आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कंपन्या त्या मानाने मर्यादित साधनसामग्री आणि मोजके अभियंते आणि तंत्रज्ञांच्या साहाय्याने, एखाद्या मध्यम किंवा लहानशा कार्यशाळेत, विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स तयार करतात. पण ज्याला संगणकाचं ज्ञान आहे आणि उद्योजक बनण्याची मनापासूनची इच्छा आहे, असा एखादा तरुण केवळ एका संगणकाच्या साहाय्याने, एका छोटय़ा खोलीतसुद्धा नवीन आणि उत्तम सॉफ्टवेअर विकसित करू शकतो. तो संगणक ही त्याची ‘मशिनरी’ आणि ती खोली हा त्याचा ‘कारखाना’ असतो. त्या कारखान्यात विविध सॉफ्टवेअर्सचं ‘उत्पादन’ केलं जातं.    

संगणक कार्यान्वित व्हावा आणि त्याने अपेक्षित कार्य पूर्ण करावं यासाठी संगणकाला दिली जाणारी माहिती आणि सूचना म्हणजे ‘सॉफ्टवेअर’! संगणकाच्या आपल्याला प्रत्यक्ष दिसणाऱ्या आणि स्पर्श करता येऊ शकणाऱ्या मॉनिटर, स्क्रीन, कीबोर्ड, हार्ड डिस्क किंवा माऊस या भागांपेक्षा, म्हणजेच हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअर पूर्णपणे वेगळं असतं. म्हणूनच संगणकाच्या इतर भागांच्या उत्पादन प्रक्रियेपेक्षा सॉफ्टवेअर निर्माण करण्याची किंवा विकसित करण्याची प्रक्रिया आणि साधनसामग्री पूर्णपणे वेगळी असते. हार्डवेअरचं उत्पादन करण्याचे कारखाने बऱ्याच प्रमाणात इतर इलेक्टॉनिक उपकरणं उत्पादन करणाऱ्या कारखान्यांसारखे असतात.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्या प्रक्रियेची आणि साधनसामग्रीची स्वत:ची वेगळी वैशिष्टय़े असतात. सुरुवातीच्या काळात सॉफ्टवेअर हे संगणकावरच म्हणजे संगणकाच्या हार्डडिस्क किंवा तत्सम हार्डवेअरच वर ‘लिहिलं’ जाई. संगणकांची खरेदी-विक्री सॉफ्टवेअरसहितच केली जाई. त्यानंतर तयार झालेलं सॉफ्टवेअर ‘फ्लॉपी डिस्क्स’ आणि पुढे ‘सीडी’ आणि ‘डीव्हीडी’वर लिहून त्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जाई. आता मात्र सॉफ्टवेअरची खरेदी-विक्री इंटरनेटच्या माध्यमातून होते आणि ते थेट ग्राहकाच्या संगणकावर किंवा मोबाइलवर डाऊनलोड केलं जातं.

सॉफ्टवेअर निर्माण करण्याची प्रक्रिया आजही अतिशय वेगाने प्रगत होत आहे. सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने संगणकशास्त्रातील नव्या कल्पना शोधणं, त्या कल्पनांना योग्य ते स्वरूप देणारा आराखडा तयार करणं, त्या आराखडय़ानुरूप संगणकाच्या भाषेतील आणि संगणकावर लिहिता किंवा डाऊनलोड करता येईल, अशी  माहिती आणि सूचना तयार करणं या सर्वाचा समावेश होतो. त्याचबरोबर, तयार झालेलं सॉफ्टवेअर ग्राहकांना सहजतेनं वापरता येईल याची खात्री करून घेणं, ते ग्राहकांच्या संगणकापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा तयार करणं आणि ते सॉफ्टवेअर वापरताना ग्राहकांना अडचणी आल्या तर त्या सोडवण्याची व्यवस्था करणं हासुद्धा सॉफ्टवेअर निर्मितीचाच भाग मानला जातो.

सॉफ्टवेअर विकसित करणं हे कॉम्प्युटर इंजिनीअर, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर यांचं विशेष कौशल्य मानलं जातं. मोठय़ा किंवा मध्यम कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी एक टीम असते. ते सर्व परस्परसहकार्याने काम करतात. मोठय़ा कंपन्यांमध्ये या सर्व तंत्रज्ञांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यांच्यामधील सुसंवादातून चांगल्या दर्जाचं सॉफ्टवेअर योग्य वेळेत मिळायला मदत होते. लहान कंपन्यात आणि विशेषत: तरुण उद्योजकांनी सुरू केलेल्या कंपन्यांमध्ये एकाच व्यक्तीवर, बहुतेक वेळा त्या उद्योजकावरच, सॉफ्टवेअर विकसित करण्याची जबाबदारी असते.

सॉफ्टवेअरचे ‘सिस्टीम सॉफ्टवेअर’ आणि ‘अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’ असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सिस्टीम सॉफ्टवेअर्स ही संगणक कार्यान्वित करण्यासाठी आणि तो व्यवस्थितपणे सुरू ठेवण्यासाठी वापरली जातात. याखेरीज संगणकाची हार्डडिस्क, माऊस किंवा कीबोर्डसारखी हार्डवेअर्स जास्तीत जास्त कार्यक्षमतेने चालवण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर्सचा उपयोग होतो. आपण सर्वच जण नेहमी वापरत असलेली ‘िवडोज’ ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअरचं उत्तम उदाहरण आहे. अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर्स ही ग्राहकांची विशिष्ट कामं पूर्ण करण्यासाठी तयार केली जातात. ग्राफिक्सची सुविधा देणारी ‘कॅनव्हा’ किंवा अकाऊंट्सची सुविधा पुरवणारी ‘टॅली’ ही उत्तम अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. याखेरीज आपल्या संगणकाच्या बाहेर जाऊन, इतर संगणकांशी संवाद साधून, ग्राहकांना तात्काळ आणि घरबसल्या खरेदी-विक्रीची सुविधा पुरवणारी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट किंवा दूरच्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्याची सुविधा देणारं फेसबुक ही ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. याखेरीज ‘प्रोग्रॅम सॉफ्टवेअर’, ‘एम्बडेड सॉफ्टवेअर’, ‘ड्रायव्हर सॉफ्टवेअर’ असेही सॉफ्टवेअरचे काही प्रकार आहेत. ही सर्वच सॉफ्टवेअर्स सर्वसाधारणपणे एकाच प्रकारच्या साधनसामग्रीतून आणि एकाच कार्यशाळेत निर्माण करतात.   

नव्या प्रकारचं सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्या अनेक नवनवीन कल्पना सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट कंपन्या, संगणक क्षेत्रातले अभियंते व तंत्रज्ञ आणि या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणारे उद्योजक या सर्वानाच सातत्याने सुचत असतात. पण आपल्याला सुचलेल्या कल्पनेवर सॉफ्टवेअर निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची उपलब्धता, निर्माण झालेल्या सॉफ्टवेअरची ग्राहकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता आणि त्या सॉफ्टवेअरची बाजारपेठ याचा संपूर्ण विचार करून मगच ते सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात करावी. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी अपेक्षित असलेला खर्च, तयार झालेलं सॉफ्टवेअर ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची विक्री करणं यासाठी येऊ शकणारा खर्च, याचा योग्य अंदाज बांधावा. कित्येक वेळा कल्पना उत्तम असते. त्यावर आधारित सॉफ्टवेअर योग्य खर्चात तयारसुद्धा होतं पण त्याची विक्री करण्यासाठी खूप जास्त खर्च येतो. हा खर्च करण्याइतकं भांडवल नसेल तर एक उत्तम सॉफ्टवेअर तयार असूनसुद्धा ते विकलं जात नाही. कंपनीला तोटा सहन करावा लागतो. तसंच आपण निर्माण करत असलेलं सॉफ्टवेअर पूर्ण करण्यात काही न सोडवता येणाऱ्या तांत्रिक  अडचणी असतील तर निर्मितीप्रक्रिया वेळेवर थांबवून दुसरं सॉफ्टवेअर विकसित करण्यास सुरुवात करावी.

१९७७ च्या सुमारास संगणक आणि सॉफ्टवेअर क्षेत्राचा नुकताच उदय होत होता. तेव्हा अमेरिकेतल्या लॅरी एलीसन या अब्जाधीश गुंतवणूकदाराचं लक्ष या क्षेत्राकडे गेलं. त्याने बॉब मिनेर या तंत्रज्ञाच्या साहाय्याने ‘सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज’ नावाची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी सुरू केली. त्या वेळी आयबीएम ही संगणक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी होती. आयबीएमने ‘डेटाबेस’ म्हणजे वेगवेगळी माहिती, संगणकात साठवण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित केलं होतं. एलिसन आणि मिनेर यांनी ते सॉफ्टवेअर कॉपी करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण आयबीएमने आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काही सिक्रेट कोड्स घालून ठेवले होते. त्यामुळे एलिसन आणि मिनेरना त्याची कॉपी करता आली नाही. मग त्यांनी कॉपी करण्याचा नाद सोडला आणि स्वत:च वेगळं सॉफ्टवेअर विकसित केलं. त्यांच्या सॉफ्टवेअरलासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एलिसननं आपल्या कंपनीचं नाव बदलून ‘ओरॅकल कॉर्पोरेशन’ ठेवलं. कंपनी वाढत गेली. गेल्या वर्षी कंपनीने ३ लाख ४४ हजार कोटी रुपयांची उलाढाल केली. आज भारतातसुद्धा ओरॅकलच्या अनेक शाखा आहेत आणि हजारो भारतीय तरुण त्यात वेगवेगळी सॉफ्टवेअर विकसित करत आहेत. आज सॉफ्टवेअर हा गाडी, फ्रिज आणि वॉिशग मशीनपासून, अवजड यंत्रांपर्यंत सर्वच गोष्टींना अधिक कार्यक्षम करणारा घटक झाला आहे. इंटरनेटचा वापर आणि डिजिटल व्यवहार अधिकाधिक वाढत आहेत आणि त्याच प्रमाणात सॉफ्टवेअर्ससुद्धा अधिकाधिक वाढत जाणार आहेत. सर्वाधिक विक्री होऊ शकणाऱ्या आणि प्रचंड फायदा मिळवून देऊ शकणाऱ्या सॉफ्टवेअरचं उत्पादन मर्यादित साधनसामग्रीच्या साहाय्याने, अतिशय कमी खर्चात, एखाद्या छोटय़ाशा खोलीतसुद्धा करता येतं. सॉफ्टवेअरच्या निर्मितीतली ही सर्वात मोठी सुविधा आहे!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Software development facility yashachi yojana dd

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×