01youthस्टार्ट अप या संकल्पनेने आजच्या तरुणाईला भुरळ घातली आहे, कारण त्यात त्यांना त्यांच्या भविष्याची वाट सापडते आहे. म्हणूनच स्टार्ट अप कंपन्यांच्या विश्वाचा वेध घेणारं नवंकोरं, ताजंतवानं सदर-
‘कुछ कर दिखाना है यार..!’, ‘एक हट के आयडिया सुचलीए..’, ‘काही तरी स्वत:चं करू या या ना.. आपणच आपले बॉस!!!’ हे आणि यांसारखे अनेक संवाद आपण अनेकदा तरुणाईकडून ऐकतो. काही वर्षांपूर्वी असे बोलणाऱ्यांची एकतर खिल्ली उडवली जायची नाही तर त्यांना ‘हे उद्योगाचं वेड डोक्यातून काढून टाक बाबा. आपल्यासारख्यांची कामं नाहीत ही.. कोण धोका पत्करेल, त्यापेक्षा चांगली नोकरी बघा. वेळच्या वेळी पगार, प्रमोशन.. लाइफ सेटल्ड..!’ असले ‘सुरक्षित’ सल्ले देऊन परावृत्त केलं जायचं. आज ही परिस्थिती सकारात्मकरीत्या बदलते आहे. उच्च शिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास, स्वत:च्या कल्पनेवर असलेला विश्वास, आपल्या क्षमतांची जाणीव, समविचारी मित्रांची साथ यामुळे आजची तरुणाई कल्पनेच्या बळावर नवनवे उद्योग करायचा केवळ विचारच नाही तर प्रत्यक्ष धाडसही करते आहे. असा प्रयत्न करणे म्हणजेच आजच्या भाषेत ‘स्टार्ट अप बिझनेस’ होय.
गेल्या एक-दोन वर्षांत आपल्याकडे हा शब्द सातत्याने ऐकू येतोय. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया’ची घोषणा केली तेव्हा अनेकांनी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला असावा. त्यानंतर या संकल्पनेने अधिक सुस्पष्ट आकार घेत भारतीय उद्योग आणि तरुणाईमध्ये एक आश्वासक चित्र निर्माण केलं. त्याचं फलित म्हणजे २०१५ साली भारतीय आणि विदेशी कंपन्यांनी या क्षेत्रात ८.४ बिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली आहे. यात ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर आहेत. स्टार्ट अप हा शब्द एक वेळ नवा असेल (विशेषत: भारतीयांसाठी); पण ही संकल्पना फार जुनीही नाही. गेल्या दशकभरात स्टार्ट अप उद्योगाने चांगलेच बाळसे धरले आहे. या स्टार्ट अप उद्योगांचे मालक कोणी अनुभवी उद्योगपती नसून नुकतेच उच्चशिक्षण संपवून स्पर्धात्मक जगासाठी सज्ज झालेले २५ ते ३० या वयोगटातील तरुण आहेत, जे कदाचित त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच पिढीचे उद्योजक असावेत. त्यांच्या कल्पनेवर त्यांचा दृढ विश्वास आहे, उद्यमी वृत्ती आहे. त्यांच्या कल्पनेचे सामथ्र्य ओळखत त्यांच्या पंखांत बळ भरण्यासाठी पारखी नजर असणारे उद्योगपती आणि त्यांचे बलाढय़ उद्योगसमूह गुंतवणूक करण्यासाठी सज्ज आहेत. एका अहवालानुसार एक बिलियन डॉलरपेक्षा अधिक मूल्य असणाऱ्या जागतिक ६८ स्टार्ट अप कंपन्यांपैकी ११ भारतीय आहेत, ही बाब उत्साहवर्धक आहे. २०१५ साली तंत्रज्ञान क्षेत्रात १२०० स्टार्ट अप्स सुरू झाले. ज्यात २०१४ च्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली. या आकडेवारीमुळे स्टार्ट अप उद्योग क्षेत्रात भारत हा अमेरिका आणि ब्रिटनपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला असून त्याने इस्राइल आणि चीनलाही मागे टाकले आहे. २०१५ साली या क्षेत्रात भारतात ५ ते ६.५ बिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली.
भारताला ‘स्टार्ट अप’ची जागतिक पंढरी म्हणून नावारूपास आणण्याचा विद्यमान पंतप्रधानांचा मानस आहे. त्या दृष्टीने येत्या १६ जानेवारीला केंद्र सरकार एक व्यापक कृती आराखडा सादर करणार असल्याचे पंतप्रधानांनी २७ जानेवारीच्या आपल्या रेडिओ संवादात सांगितले होते. त्यानुसार देशभरातील महाविद्यालये आणि उच्चशिक्षण संस्थांतील युवकांशी संवाद, संपर्क साधला जाईल. ‘स्टार्ट अप’रूपी उद्योगबाळाच्या पोषणासाठी आवश्यक ते वातावरण अर्थात सुलभ वित्तपुरवठा आणि करनियम, नवोद्योजकांना भांडवल उभारणी आणि व्यवसायवृद्धीच्या आड येणाऱ्या जाचक नियमांपासून सुटका, इनक्युबेटर सेंटर्सची उभारणी (उद्योगाच्या आणि उद्योजकांच्या सर्वागीण विकासाकरिता शैक्षणिक संस्थांतील मार्गदर्शन केंद्रे) यांसारख्या अनेक मुद्दय़ांचा त्यात समावेश असेल.
स्टार्ट अप उद्योग सुरू करणाऱ्या अनेकांची शैक्षणिक पाश्र्वभूमी अभियांत्रिकी आणि उद्योग व्यवस्थापनाची आहे (एकत्रितरीत्या सुमारे ६१ टक्के). शिवाय त्यातील ९१ टक्के उद्योजक हे पुरुष तर केवळ ९ टक्के स्त्रिया आहेत. मात्र २०१४ सालच्या तुलनेत स्त्रियांच्या संख्येत ५० टक्के वाढ झाली आहे. सर्व जण देश-विदेशांतील नामांकित शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी आहेत. आज दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू ही तीन मुख्य शहरे भारतीय स्टार्ट अप हब्ज झाली आहेत, मात्र चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, जयपूर, चंदिगढ ही शहरेसुद्धा ‘स्टार्ट अप सिटीज’ व्हायच्या मार्गावर आहेत. स्टार्ट अप उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या अर्थाने अशासाठी महत्त्व आहे, कारण त्यानिमित्ताने देशात ‘ब्रेन गेन’ सुरू व्हायला मदत झाली आहे. देशी-विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांतील नोकरदार, अन्य उच्चपदस्थ आज नवनवे उद्योग सुरू करण्याचे धाडस करत आहेत आणि केवळ दमदार पदार्पणच नाही तर यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवान सेवा मिळवण्याची झालेली सवय, स्मार्टफोन्स- इंटरनेट सुविधा, खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन स्पेसला असलेली पसंती आणि युवाशक्ती हे घटक स्टार्ट अप इंडियाच्या वाढीसाठी पोषक तर आहेतच आणि त्यामुळेच आज बहुतांश स्टार्ट अप्स हे तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील आहेत. त्याच जोडीला फॅशन, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांतील स्टार्ट अप्स आघाडीवर आहेत. ‘फ्लिपकार्ट’, ‘स्नॅपडील’, ‘ओला’, ‘रेडबस’, ‘झोमॅटो’, ‘मिंट्रा’, ‘पेटीएम’, ‘प्रॅक्टो’, ‘बुक माय शो’ या संकेतस्थळांनी, त्यांच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सनी आज अध्र्याहून अधिक भारतीयांचे विशेषत: तरुणाईचे आयुष्यच व्यापले आहे. हे स्टार्ट अप्सच आहेत. त्यांचा व्यवसाय हा मुख्यत्वे ऑनलाइन स्पेसद्वारेच होतो.
स्टार्ट अप्समुळे दैनंदिन आयुष्यात नेमका काय बदल झाला, यासाठी एक उदाहरण घेऊ ; समजा एक व्यक्तीला कामानिमित्त अनोळखी शहरात जावे लागणार आहे. तो विमानतळावर उतरतो; पण टॅक्सीची वाट पाहत नाही तर प्रीपेड टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनद्वारे त्याने ती टॅक्सी आधीच बुक केलेली असते. अनोळखी शहरात त्याच्या राहण्याची चिंता नसते. कारण स्वस्त, माफक दरांत निवास सेवा देणाऱ्या हॉटेल्सची माहिती त्याच्या स्मार्टफोनवर असते. शिवाय त्याची खवय्येगिरीची हौस भागविणाऱ्या फूड जॉइंट्सच्या अ‍ॅप्लिकेशनमुळे परगावी त्याच्या खाण्याची आबाळ होत नाही. हे चित्र आज दिसू लागलंय. कारण ग्राहकांची नेमकी गरज ओळखून त्यांना पावलोपावली सेवा देणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची (जी मुळात स्टार्ट अप्स आहेत त्यांची) ही किमया आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होते.
स्टार्ट अप्स उद्योगांची संकल्पना केवळ तंत्रज्ञान, दैनंदिन सेवा, फॅशन, आरोग्य, शिक्षण याच क्षेत्रांशी संबंधित आहे असे नाही. समजा एखाद्या ‘टेकी’ला शहरी वा ग्रामीण समस्या छळत आहे आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तो आपल्या डोकेबाज मित्रमैत्रिणींच्या मदतीने त्यावर उपाय शोधण्यासाठी काही उपकरणं, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन शोधत असेल, तर तोदेखील एक स्टार्ट अप आहे. एकीकडे कॉर्पोरेटची चकचकीत, गळेकापू आणि ताणाची कार्यसंस्कृती आहे, तर दुसरीकडे स्टार्ट अप कार्यसंस्कृतीमध्ये पदांच्या चढत्या श्रेणीसाठी अटीतटीची स्पर्धा नाही, कामाच्या वेळेबाबत सुटसुटीतपणा आहे, नवीन विचार करण्याची मुभा आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्याचे स्वातंत्र्य आहे, ग्राहकांचा त्वरित मिळणारा प्रतिसाद यांमुळे ‘स्टार्ट अप’ची क्रेझ वाढतेय.
‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्यापैकी भारतीय शेतीची नेमकी काय अवस्था आहे ते सर्वज्ञात आहे. राहता राहिला प्रश्न व्यापार आणि नोकरीचा. शेवटी हा व्यक्तिगत निवडीचा प्रश्न आहे. मात्र सध्याच्या स्टार्ट अप उद्योगामुळे जे आश्वासक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे व्यापार हा ‘उत्तम’ आहे हा समज दृढ होण्यास नक्की मदत होईल. कुठल्याही उद्योगाची सुरुवात करताना ‘उद्यमी वृत्ती’, ‘भांडवल’, ‘जमीन’, ‘श्रम/ श्रमिक’ हे आधारभूत घटक असतात, हे आपण लहानपणी शाळेत अर्थशास्त्रात शिकलेलो असतो, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट असते ती ‘सर्जक कल्पना’, तिच्याविषयीचा दृढ विश्वास आणि तिला सत्यात आणण्याची विशाल दूरदृष्टी. याच भांडवलाच्या जोरावर जमशेदजी टाटा भारतीय उद्योगविश्वाचे पितामह होतात. नारायण मूर्तीमुळे भारतीय संगणकविश्वाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त होते. याच संकल्पनेच्या जोरावर फेसबुक, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल ही साम्राज्यं तयार होतात.
आज भारतीय स्टार्ट अप उद्योगाकडे पाहताना केवळ आर्थिक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. त्याला सामाजिक समता, युवा आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण अशा अनेक दृष्टिकोनांतून पाहावे लागेल. ‘भारत आणि इंडिया’तील दरी बुजवण्यासाठी ‘स्टार्ट अप्स’ दुवा ठरेल का, हेही यानिमित्ताने पाहणे योग्य ठरेल.
उद्या तुम्ही एखाद्या आर्टिस्टिक इंटिरिअर असलेल्या ऑफिसमध्ये जर नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलात आणि कॅज्युअल वेअरमधील एखाद्या कुल डय़ुड/ बेबने तुमची मुलाखत घेतली तर समजा दॅट इज युवर न्यू बॉस..! सो, किक स्टार्ट युवर न्यू इनिंग विथ स्टार्ट अप..!
(आकडेवारी संदर्भ : स्टार्ट अप इंडिया २०१५ नासकॉम-झिनोव्ह अहवाल)