स्मिता गालफाडे – response.lokprabha@expressindia.com
रोज रोज शाळेत जायचा तिला कंटाळाच यायचा. शाळेची वेळ झाली की पोट दुखायचे. डोके दुखायचे. घरातही कोणालाच कळायचे नाही. अशक्त- कृश म्हणून, लहान आहे म्हणून दुर्लक्षही करायचे सगळे. टायफॉइडच्या तापातून ती बरी होत होती. अधूनमधून शाळेत यायची. किरकोळ दिसणारी, काळीसावळी, अशक्त.. ती त्या पाचवीच्या वर्गात सगळ्यात शेवटी बसणारी. तिला समोर बसायचे भयच वाटायचे. अशक्तपणामुळे तिला धड उभेही राहता यायचे नाही. आईच्या कडेवर बसून ती शाळेत यायची. शाळेत येईपर्यंतचा रस्ता कापताना आईला दम लागलेला असायचा. तिला कडेवरून खाली उतरवले की आई क्षणभर पायरीवर बसायची. ती वर्गात बसेपर्यंत आई घरी जायचीच नाही.
खिडकीतून पाठमोरी आई तिला दिसायची. तिच्या घशाला कोरड पडायची. डोळ्यांच्या कडांवर पाणी साचायचे. सगळा वर्ग गरागरा फिरायचा डोळ्यांसमोर. शिकवायला सुरुवात झाली की तिच्या डोळ्यांवर झापड यायची. सततच्या २१ दिवसांच्या टायफॉइडने ती अशक्त झाली होती. वर्गात कोण काय शिकवतोय याकडे तिचे मुळीच लक्ष नसे. पाऊस सुरू झाला की तिला जरा ताजेतवाने वाटायचे. बाहेरचा पाऊस शीळ घालायचा. ‘पीर पीर पीर पीर पावसाची त्रेधातिरपिट सगळ्यांची’, ‘ये रे पावसा रुसलास का’, ‘आला आला पाऊस आला’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ असली भन्नाट गाणी तिला आठवायची. तिच्या ताईने तिला ती शिकवली होती. तिला ती गाणी पाठ झाली होती.




आताही ती भयातच वर्गात शिरली. ‘वाळली आली, वाळली आली’ वर्गातली टारगट पोरं ओरडली. मुली एकमेकींकडे पाहून खिदळल्या. तिच्या कृश शरीरयष्टीला ते ‘वाळली आली’ म्हणून चिडवायचे. तिला याचेच भय वाटायचे. का असे चिडवतात? हो, आहे मी वाळलेली. फार फार राग आला तिला सर्वाचा. काही दिवसांपूर्वी वर्गातल्या सुनीताने तिला वाळली म्हटले होते, इतका प्रचंड राग आला होता तिला. तिच्या रागीट चेहऱ्याकडे बघून जया म्हणाली, अरे, ‘रागाने माणूस लाल दिसतो, ही तर काळी जांभळी झाली’. सगळ्या मुलींचा घोळका तिच्याभोवती जमला. ‘आमची वाळली, काळी जांभळी’ मुलींनी ओरडून ओरडून धिंगाणा घातला. ती केविलवाणे पाहू लागली. नकोच शाळेत यायला. दुष्ट आहेत सगळे. कोण्णा कोण्णाशी नाही बोलायचे मला. ती तिरीमिरीतच तिच्या मागच्या बेंचवर येऊन बसली. पण कोण होते तिचे? तिने एकवार वर्गात पाहिले. सगळी मुले फळ्यावरचे काही तरी लिहून घेत होती. गणिताचे आकडे, वर्गमूळ, लसावि-मसावि. तिच्या डोक्यात त्यातले ओ की ठो घुसायचे नाही.
आज शाळेत येताना रिमझिम पाऊस होता. रमतगमत चालत जावे की जाऊच नये शाळेत? मस्त पावसाच्या झंझावातात सायकलवर चक्कर मारावीशी वाटली तिला. पण नको. आत्ताच तर आजारातून बरे झालोय आपण. उदास, निराश वाटायला लागले तिला. वर्गातही तिचे लक्ष लागेना. मघापासून मनात तरल पाऊसगाणे होते आणि ते गाता येत नाही, पावसात जाता येत नाही म्हणून हिरमुसलेली ती नाइलाजाने वर्गात बसली होती. गणिताचे सर वारंवार डस्टरने फळा पुसून टेबलवर बदडत होते. सगळीकडे धूळच धूळ. गाण्याच्या चालीत गणित पाठ करता आले असते तर? तिने नकळत डोळे मिटले. गणितात ढच आहोत आपण. कुठे पहिला नंबर येणार आपला. हॅ.. तिने वर्गात गणिताकडे दुर्लक्ष केले. मागच्या खिडकीतून गार वारे केसांशी खेळत होते. घरी जेवून ती औषधं घेऊन आली होती. तिचे डोळे पेंगुळले होते. ‘पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले’ सकाळीच तिने हे शब्द रेडिओवरच्या गाण्यात ऐकले होते. ती सकाळपासून विचार करत होती, माहेरी तर आपली ताई येते नागपंचमीला, दिवाळीला.. पाचूचे माहेर कोणते? पाचू हे मुलीचे नाव आहे का? ‘माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरू झाले’ या गाण्यातले हे शब्द ऐकण्यासाठी ती सकाळी रेडिओजवळ उभी असायची.
हे थेंबांचे फूलपाखरू पाहायला हवे कसे असते ते. आईला विचारायला हवे. विचारा-विचारातच तिने वर्गातल्या डेस्कवर डोके टेकले. ‘पिवळी, पिवळी, हळद लागली, भरला हिरवा चुडा’ ताईच्या लग्नात तिने हे गाणे ऐकले होते. ताईला लागलेली हळद, हिरवा चुडा तिला समजले होते ते सारे. मग सकाळी ऐकलेल्या गाण्यात ऊन हळदीचे आले असे का असेल. हळदीची उन्हं म्हणजे काय? तिच्या विचाराची शृंखला वाढतच चालली. पण ते शब्द मात्र तिला जाम आवडले होते.
तिच्या पाठीत दणकन् धपाटा बसला. ती खडबडून जागी झाली. तिची पाठ हुळहुळली. छातीत धडधडायला लागले. समोर गणिताचे पाटील सर उभे होते. ती भीतीने थरथरली. डोळ्यात पाणी आले. सगळा वर्ग हसत होता. पाटील सरांनी तिचा कान पकडला व करकच्चून पिरगाळला. ती विव्हळली.
‘कुठे होते लक्ष? कार्टे लक्ष कुठे होते? आणि वही कुठे? दाखव फळ्यावरची गणितं? गाणी गायला पाहिजे, अभ्यास करायला नको. दहा उठाबशा काढ,’ पाटील सर गरजले. ती धडपडत बेंचावरून उठली. उठता उठताच पुन्हा एक चपराक गालावर बसली. ती कोलमडली. गालाची आग व्हायला लागली. ‘ऊठ ऊठ, लाज नाही वाटत? जा िभतीजवळ उभी राहा’ ते ओरडले. ती बेंचचा आधार घेत िभतीकडे गेली. िभतीला पाठ टेकवून ती सगळ्या वर्गाकडे पाहात होती. सगळेच मागे मान वळवून खिदळत होते. ‘तास संपेपर्यंत उभी राहा इथेच. बिलकुल हलायचे नाही,’ पाटील सर बोलले व परत फळ्याकडे गेले. मुले चोरटय़ा नजरेने पाहात खाली मान घालून हसत होती.
अजूनही तिच्या पाठीतून कळ येत होती. घशाला कोरड पडलेली. तिने एक आवंढा गिळला. काल मराठीच्या अत्रे सरांनी तिला कविता म्हणायला सांगितली होती. ती तिने चालीत म्हटली होती. शाबासकी मिळवली होती. अत्रे सर तिला फार आवडायचे. ते सुट्टीवर असले की तिला अधिकच भय वाटायचे. कोणीच आपले नाही याची जाणीव व्हायची. आई-ताई आठवायची. दुपारी घरी पळून जावेसे वाटायचे.
मला गणितं करता येत नाहीत, समजतच नाही.. आवडतही नाहीत. मग काय करायचे? मार खात राहायचा का असाच? तिला समजतच नव्हते की गणित एवढे कठीण का असते. पाटील सरांचा जाड भिंगाचा चष्मा, हातातली छडी, कर्णकर्कश आवाज.. ती पुन्हा जागच्या जागी थरथरली.
मला गाता येते छान. माझ्यासारखे गाणे तर कोणालाच म्हणता येत नाही. राष्ट्रगीतही नीट म्हणता येत नाही यांना तर. त्यांना कोणीच का मारत नाही. रागावत नाही.. राष्ट्रगीत गाता येणे महत्त्वाचे नाही का?
तिला कळायचेच नाही काही. विचारांचे काहूरच माजले.
तिने दीर्घ श्वास घेतला. गणित मला आवडत नाही. मी गणित शिकणार नाही. मला गाता येते. मी फक्त गाणेच शिकेन. तिच्या विचारांनी तिलाच बरे वाटले. तिला पाठ असलेली असंख्य गाणी तिला आठवली. तिच्यात बळ आले. तिने ठरवले, अत्रे सरांनाच म्हणायचे तुम्ही गणित का शिकवत नाही? मला गणित शिकवा.
सगळी मुले बाहेर पडत होती. अरे, शाळाच सुटली वाटतं. तिचे दप्तर सावरत ती हळूहळू वर्गाच्या बाहेर आली. समोरच अत्रे सर मुख्याध्यापकांशी बोलत उभे होते.
तिने एकवार सरांकडे पाहिले. ‘शाळा सुटली रे बेटा. फार छान गातेस हां तू.’ सरांनी तिला थांबवले.
ती सरांकडे पाहात राहिली. ‘खरंच सर?’
‘अगदी खरं. या वर्षी गाण्याच्या स्पर्धेत तू भाग घे. पहिली येशील. दैवी देणगी मिळालीय बाळा तुला.’
‘सर, ही पोर फार छान गाते. नाव काढणार आपल्या शाळेचं,’ मोठय़ा सरांसमोर अत्रेसरांनी कौतुक केले. तिला फार आनंद झाला.
‘सर, पण मला गणित येत नाही ना,’ ती कसनुसे हसली. घाबरलीच ती. गणित येत नाही म्हटल्यावर आता अत्रे सरही आपल्याशी बोलणार नाहीत असे भय तिला वाटले.
‘गणिताचे काय इथे? तुला जे येते त्यातच तू पुढे जाणार बेटा. नको येऊ दे गणित,’ सर तिच्याकडे पाहून हसले.
‘सर, गणित शिकवाल मला? ते यायला हवे मला,’ ती नव्या आशेने पाहात म्हणाली.
‘गणिताचे का भय वाटते तुला? मी शिकवेन तुला गणित. पण गाणेच तुझी ओळख निर्माण करेल आणि गाण्याच्या शिकवणीलासुद्धा जा,’ सर हसत म्हणाले.
‘खरेच का सर?’
‘हो बाळा, अगदी खरे. बेटा, लता मंगेशकर जगात पुन्हा निर्माण होणार नाहीत. तू आमच्या शाळेची मंगेशकरच’ आणि सर खळखळून हसले. मोठे सरही हसले. तेही तिच्याकडे कौतुकाने पाहायला लागले.
तिने उडीच मारली. तिलापण सरांच्या विनोदबुद्धीचे कौतुक वाटले. ती मनापासून हसली. सरांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला तो स्पर्श आईसारखाच वाटला. तिला पसायदान पाठ झाले होते. रेडिओवर लागणारी पहाट गाणी तिला आवडायची. ती कान देऊन ती ऐकायची. खरेच तिला आज मोठ्ठय़ाने गावेसे वाटले. वाळून गेलेल्या पायात बळ आले. तिने मान वर करून अत्रे सरांकडे पाहिले. तिला त्यांचे डोळे आईसारखेच वाटले. तिचा चेहरा खुलला. आज तिला कोणी तरी चांगले म्हणाले होते. तिला नवा श्वास मिळाला होता. तिने लांबवर पाहिले. आई पायरीवर बसलेली होती. आईला पाहताच तिला हसू फुटले. ती धावतच आईकडे आली. ‘आई गं मी रोज शाळेत जाणार, खूप खूप गाणार, गणितंही करणार आणि अत्रे सर मला गणित शिकवणार आहेत,’ असं सांगत ती आईच्या कुशीत शिरली.
आई पण हसली. तिला कडेवर घेण्यासाठी आई खाली वाकली.
‘आई, मी आता कडेवर बसणार नाही. मी तुझा हात धरून चालेन. मी बरी झाले आई.’
आईला कळेचना. काय झाले हिला? पण तिला आनंदही झाला. ‘हो गं. गुणाचं कोकरू माझं’ आईने कौतुकाने तिचा हात हाती घेतला आणि दोघीही मायलेकी घराच्या दिशेने चालू लागल्या. वाळून गेलेल्या, शुष्क जमिनीतूनही अंकुराचा हुंकार येत होता.