एका स्वप्नाची पूर्ती…

सुरेश भट गेले तेव्हा त्यांच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी खूप काही करण्याच्या घोषणा झाल्या.

ग़ज़लसम्राट सुरेश भट यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चाहत्यांनी अमरावती जिल्ह्य़ात आष्टगाव इथं एक देखणं स्मारक उभारलं आहे. तिथे ग्रंथालय आहे, वेगवेगळे कार्यक्रम होतात. आता प्रतीक्षा आहे या स्मारकाच्या औपचारिक उद्घाटनाची.

जाणते ही बाग माझ्या
सोसण्याच्या सार्थकाला
मी येथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो…

मराठी साहित्याच्या मातीत ग़ज़लचे अमृताचे रोपटे रुजवून मराठी भाषा समृद्ध करणारे सुरेश भट हे जग सोडून गेले त्याला आता १४ वर्षे होऊन गेलीत. ग़ज़लरूपाने ते आजही आहेत आणि कायम राहणार आहेत. आम्ही ग़ज़लवाले तर सोडाच, पण जगाच्या पाठीवर मराठी भाषा जाणणारा असा एकही रसिक सापडणार नाही ज्याला सुरेश भट यांचा विसर पडला असेल.

सुरेश भट गेले तेव्हा त्यांच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी खूप काही करण्याच्या घोषणा झाल्या. भाषणे झाली. अगदी भरभरून-गहिवरून याबाबत बोलले गेले. पुढे लवकरच या घोषणा विरल्या, जोशही हळूहळू थंडावत गेला. वारसा सांगणारे आणि मानसपुत्र म्हणवणारेसुद्धा भटांच्या श्रद्धांजली सभांमधून या बेगडी भावनातिरेकाला मूक राहून जणू दुजोराच देत राहिले की, ‘सुरेश भटांनंतर मराठी ग़ज़ल संपली’..

आमचे ग़ज़लकार्य सुरेश भट जिवंत असतानाही निष्ठेने सुरू होते व ते गेल्यानंतरही सुरूच आहे. आधी वैयक्तिक पातळीवर व त्यानंतर १९९९ पासून ‘ग़ज़ल सागर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आम्ही भटांची ग़ज़ल सरिता प्रवाही ठेवण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करत आहोत. ग़ज़ल मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन, मफिली, परिसंवाद, शिबिरं, ग़ज़्‍ालोपयोगी पुस्तकांचे प्रकाशन, ‘ग़ज़ल सागर’ पाक्षिक, तरही मुशायरे, उर्दू-मराठी ‘ग़ज़ल संगम’ मुशायरे आणि अखिल भारतीय स्तरावरची ग़ज़ल संमेलने असे आमचे उपक्रम नित्याच्याच जोमाने व निष्ठेने सुरूच आहेत.

सुरेश भटांचे स्मृतिमंदिर आपल्याला उभारता येईल का, असा विचार मनात सतत घोळत होता.. मात्र मार्ग सापडत नव्हता. दरम्यान २०१३ साली आष्टगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती) या माझ्या जन्मगावी सातवे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन आयोजित केले. ते यशस्वी झाले. आठशे लोकवस्तीच्या आमच्या छोटय़ाशा खेडेगावात आठ हजारांवर लोक आले. त्यात ग़ज़लकार, ग़ज़ल अभ्यासक, ग़ज़ल गायक, साथसंगतदार, कार्यकत्रे व ग़ज़लचे रसिक चाहते असे सगळे होते. जणू ग़ज़लयात्राच भरली होती आमच्या आष्टगावात. या संमेलनाने दोन गोष्टी केल्या. आष्टगावला जगाच्या नकाशावर आणले आणि माझ्या मजबूत इराद्यांना अधिक मजबूत! कारण त्यातूनच सुरेश भट स्मृतिमंदिरासाठी आष्टगाव निश्चित झाले. कारण तेच मला सर्वतोपरी माझ्या आवाक्यातले वाटत होते.

पुढच्याच विदर्भ दौऱ्यात वर्धा गाठले. माझा ग़ज़लकार स्नेही संजय इंगळे तिगावकर याला घेऊन दत्ता मेघे यांच्या भेटीला गेलो. त्यांची सुरेश भट यांच्याशी असलेली मत्री व माझी ग़ज़लगायनाबाबतची चाहत या आधारावर मनातला विचार मी बोलून दाखवला व कागद त्यांच्या हातात ठेवला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दहा लाखांची मंजुरी दिली. जागेचा प्रश्न धाकटय़ा भावाने घन:श्यामने सोडवला. त्याची छान मोक्याची जागा ताबडतोब त्याने ग्रामपंचायतीच्या नावे खुशीखुशी लिहून दिली. खासदार कोटय़ाच्या अनुदानासाठी आवश्यक ती सगळी कागदपत्रे तयार होऊन सरकारदफ्तरी दाखल केली. दफ्तरदिरंगाईचा सामना करत काम सुरू झाले व जानेवारी २०१४ मध्ये भवन तयार झाले.

‘ग़ज़लसागर प्रतिष्ठान’च्या ग़ज़ल चळवळीतले सगळे चाहते, हमसफर मदतीचा हात घेऊन पुढे आले. कुणी रॅक्स-कपाटं, कुणी टेबल-खुच्र्या, कुणी वाद्यं, कुणी बिछायत तर कुणी ध्वनिक्षेपक असे करत करत ग्रंथालयं सज्ज होत गेली. अनेक मित्रांनी पुस्तकं दिली. मुंबईच्या माझ्या घरच्या लायब्ररीतली हजार-बाराशे पुस्तकं मी घेऊन आलो. ग्रंथालयासमोरच्या मोकळ्या जागेत मुलांसाठी बाग केली. छोटंसं कारंजं करून द्यायला मुंबईवरून रवी वाडकर आला. ग़ज़्‍ालेचं प्रतीक असलेलं हरीणसुद्धा त्याने करून आणलं. गावच्याच अमोलने सुरेश भटांचा एक छान अर्धपुतळा तयार करून दिला. मित्रांच्याच सहकार्याने बागेत मुलांसाठी घसरगुंडी, सी-सॉ, मेरी गो राऊंड, कॅरम असे खेळसुद्धा आले. मित्रांनी व घरच्यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी निरपेक्ष भावनेनं स्वीकारली. सुरेश भट ग्रंथालयाची नोंदणीसुद्धा झाली व अशा प्रकारे रीतसर काम सुरू झाले. अगदी उद्घाटनाची वाट न बघता.

उद्घाटनाची एक कथाच झाली. उद्घाटनाची तारीख ठरली २८ मार्च २०१५. दत्ता मेघे आणि सुशीलकुमार िशदे या दोघांनीही आनंदाने होकार दिला. आम्ही तयारीला लागलो. छान कार्यक्रम ठरवले. सुशीलकुमार िशदे यांचा दौरा-कार्यक्रम अमरावती पोलिसांकडे आला. जागा व परिसर तपासणीसाठी गावात पोलीस दलाच्या येरझाऱ्या सुरू झाल्या आणि सोहळ्याच्या दोन दिवस आधी ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली. तिने आमच्या मेहनतीवर आणि उत्साहावर पाणी फेरले. असो!

उद्घाटन बारगळले. मात्र ग्रंथालय व्यवस्थित सुरू आहे. पुस्तकांची आणि वाचकांची संख्या हळूहळू वाढते आहे. ग़ज़ल या विषयावरची भरपूर पुस्तकं व ग्रंथ आहेत. साहित्याच्या सगळ्याच प्रकारच्या पुस्तकांची संख्याही पुरेशी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी, लहान मुलांच्या गोष्टी, दैनिक वृत्तपत्रे असं सगळं आहे.

घरी जागेची अडचण असणाऱ्या मुलांना इथे शांतपणे अभ्यास करता येतो. आमच्या विनय वानखडेच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे वर्ग नियमितपणे सुरू आहेत. छोटेखानी मुशायरे, मफिली, चर्चा, विविध विषयांवरील व्याख्यानं इत्यादींचे आयोजन सतत केले जाते.

संगीत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा भरवून पंचक्रोशीतल्या मुलामुलींना प्रोत्साहित केले जाते. शेती, आरोग्य, पर्यावरण इ. बाबतीत मार्गदर्शनपर व समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळींना पाचारण केले जाते. दूरदूरवरून गाव व ग्रंथालयाला भेट द्यायला लोक येतात. या सगळ्या गोष्टी मला खूप आनंदित करतात. खरे तर गावची ओढ पूर्वीपासूनच होती आणि आता मी, गीता, भाग्यश्री आम्ही तिघेही आष्टगावकडे धाव घेण्याची संधीच शोधत असतो.

सुरेश भट ग्रंथालय व भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची औपचारिकता तेवढी राहिली आहे. तो सोहळाही लवकरच आयोजित करायचा आहे. कारण त्यानिमित्ताने आष्टगावात जमेल ग़ज़लनिष्ठांची मांदियाळी, ग़ज़्‍ालेचा उत्सव होईल आणि सुरेश भटांच्या स्मृतींचा जागर..

मैं अकेलाही चला था
जानिबे-मंज़िल मगर
लोग साथ आते गये
और कारवाँ बनता गया…

भीमराव पांचाळे – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suresh bat memorial

ताज्या बातम्या