चित्रांच्या आधारे भविष्य कथन करणारी ही कला १७ व्या शतकात उगम पावली असे मानले जाते. टॅरो म्हणजे ७८ कार्डाचा संच असतो. टॅरो कार्ड रीिडग म्हणजे केवळ त्या कार्डावरील चित्रांचा अर्थ लावणे नाही तर दुसऱ्याच्या मनात डोकावणे. टॅरो रीडर हा उचलण्यात आलेल्या कार्डावर प्रश्नाचं उत्तर दृश्य स्वरुपात वाचतो. या टॅरो कार्ड वाचनाच्या आणि दुसऱ्याच्या अंतर्मनात डोकावण्याच्या कौशल्याचा मिलाफ या प्रक्रियेत घडत असतो. १२ वर्षांत १२ राशींच्या बाबतीत काय घडेल हे टॅरोच्या माध्यमातून वर्तवण्यासाठी काही विशिष्ट कार्डाचा आधार घेण्यात येतो.

मेष (२१ मार्च ते १९ एप्रिल)

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
poet gulzar concept of india through poetry
भारताची गुलजार संकल्पना…
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

आरोग्य

यंदाचे वर्ष हे आरोग्यासाठी वास्तववादी असणार आहे. आपल्या दिवसभराच्या कामाची सांगड आरोग्याशी घालून तशाच जबाबदाऱ्या घ्याव्यात. रोजचा व्यायाम हा आपल्या दिनक्रमाचा भाग करा. आरोग्य सांभाळण्यासाठी भरपूर मेहनत घ्या, ही भविष्यातील येणाऱ्या वर्षांसाठीची गुंतवणूक असेल हे लक्षात ठेवा. तुम्हाला अ‍ॅलर्जी असणाऱ्या खाद्यपदार्थापासून कटाक्षाने दूर राहता येईल याची खबरदारी घ्या. भटकंतीसाठी स्वतंत्र वेळ काढा आणि ती आरोग्य रिसॉर्टना, आरोग्य आश्रमांना भेट देण्यासाठी राहील हे पाहा. याचा या वर्षी भरपूर फायदा होऊ शकतो.

करिअर

तुमचे करिअरचे कार्ड या वर्षी तुम्हाला सर्जनशील होण्याचा संदेश देत आहे. कामाच्या ठिकाणी नवनवीन कल्पना, योजनांचा वापर करा, त्यातून नक्कीच यश लाभेल. आपले कार्ड सांगतंय की अशा नवीन संकल्पना आपणास निश्चितपणे ठरावीक अंतराने मिळत जातील. म्हणूनच तुमच्या दोन कामांच्या मधल्या कालावधीत पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा. मोठय़ा जबाबदाऱ्या, प्रकल्प, वचनबद्धता टाळू नका, त्या टाळण्याचा प्रयत्न करू नका. या जबाबदाऱ्या तुमच्या फायद्यासाठीच आहेत. या संपूर्ण वर्षांत आळस पूर्णपणे झटकून टाका.

नातेसंबंध

नातेसंबंधांद्दलच्या सर्व शंका, भीती या वर्षी मनातून पूर्णपणे काढून टाका. एकदा का या शंका दूर केल्यात की तुमचे नातेसंबंध वेगाने वृद्धिंगत होईल. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे हृदय पूर्णपणे जिंकून घ्याल. कोणत्याही प्रकारचे व्यसन अथवा अतिआसक्तीपासून दूर राहण्याची खबरदारी घ्या. कारण असे कोणतेही व्यसन, अतिआसक्ती तुमच्या नातेसंबंधांना धोका पोहोचवू शकते. ‘मनातील सर्व शंका, भीती घालवून टाका आणि जुन्या सवयी बदला’ हे या वर्षीच्या नातेसंबंधांसाठीचे परवलीचे शब्द आहेत.

शुभ महिना –

मे महिन्यात बुद्धीचा वापर करा.

सप्टेंबरमध्ये तुम्ही आर्थिक उद्दिष्ट गाठू शकाल.

वृषभ (२० एप्रिल ते २० मे)

आरोग्य

या वर्षी तुमच्या अंत:प्रेरणांच्या सादेवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आरोग्याबाबत काही शंका, अडचणींमुळे तुम्हाला कुठे अडखळायला, अडकायला झाले तरी त्या लवकरच दूर होतील. संपूर्ण वर्षभर सकारात्मक मनोवृत्ती बाळगणे महत्त्वाचे आहे. नकारात्मकता आणि एकटेपणाचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. झोपेच्या बाबतीत काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे झोपेला शिस्त लावून घ्या.

करिअर

हे वर्ष तुमच्यासाठी खूप भाग्यदायी असल्याचे करिअर कार्ड सांगत आहे. कार्डानुसार या वर्षी एक नवी सुरुवात होणार असल्याचे सूचित होत आहे. मित्र आणि कुटुंबीय तुम्हाला प्रत्येक बाबतीत आधार देतील. तुम्हाला एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर हे वर्ष उत्तम आहे. नवीन उद्योगाची जोखीम घेण्याची ऊर्जा आपल्यामध्ये आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करावे. करिअरचे कार्ड खूप गोष्टींसाठी आधार देणारे आहे त्यामुळे आपल्या ध्येयावर, उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. करिअरमध्ये एका नव्या सकारात्मक आणि आशादायी टप्प्याची सुरुवात होत आहे.

नातेसंबंध

नातेसंबंधांच्या कार्डानुसार खूप आशादायी अशी स्थिती असणार आहे. आणि आपले नातेसंबंध सफलतेकडे जाणार असल्याचे सूचित होत आहे. पण नकारात्मक विचार किंवा भूतकाळातील घटनांची कटुता मनात धरून ठेवली जाणार नाही याची खबरदारी घ्या. अन्यथा कोणत्याही प्रकारच्या नातेसंबंधांना धक्का लागू शकतो. आपल्या जोडीदारावर स्वामित्त्व गाजवू नका. नातेसंबंध नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. नातेसंबंधांमध्ये सकारात्मकतेची गुंतवणूक करा.

शुभ महिना –

जानेवारी – तुमची ताकद वापरताना उद्दिष्टाबाबत स्पष्टता असू द्या.

ऑगस्ट – कोणत्याही अडचणीपासून पळू नका, तिचे निराकरण करा.

मिथुन (२१ मे ते २० जून)

आरोग्य

तुमचे आरोग्य मुळातच चांगले आहे. म्हणून ते गृहीत धरून वागू नका. नियमित व्यायाम आणि चालण्यातून आरोग्याला आधार द्या. आठ-नऊ आठवडय़ांतच त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागतील. पूरक  खाद्याच्या माध्यमातून आरोग्याला चांगला आधार मिळेल. या वर्षी तुम्हाला उत्तम आरोग्याचा आनंद घेता येईल.

करिअर

यावर्षी तुम्हीच तुमच्या करिअरसाठी निर्धारित केलेला रोड मॅप तुम्हाला प्रगतिपथावर घेऊन जाईल. मुख्यत: तुमच्या पर्यायांबद्दल तुमच्याकडे स्पष्टता असेल. करिअरचे टॅरो कार्ड सांगते की, तुम्ही जर तुम्ही स्वत:च आखलेल्या मार्गाने वाटचाल केली तर प्रगती आणि यश दोन्ही नक्की मिळणार आहे. तुम्ही तयार केलेला रोड मॅप म्हणजे केवळ स्वप्न नसून तो अंतिम ध्येयापर्यंत नेणारा आहे हे लक्षात ठेवा.

नातेसंबंध

या वर्षी तुम्हाला नातेसंबंधांच्याबाबतीत थोडी सावधानता बाळगावी लागणार असल्याचे तुमचे नातेसंबंध कार्ड दर्शवते. कार्डाने वर्तवलेल्या भविष्यानुसार तुम्हाला तुमच्या आयुष्यात नातेसंबंधांमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागेल, काही भांडणे होतील तर काही वेळा मतभेद अथवा मत बदलणे अशा गोष्टी घडू शकतात. नातेसंबंधांमध्ये अडकण्यापासून सावध राहा. त्यासाठीच सुरुवातीपासूनच नातेसंबंधामध्ये काय अपेक्षित आहे त्याबद्दल तुमचे मत स्पष्ट असू द्या. सर्वप्रथम तुमचे अंतर्गत वादविवाद सोडवा आणि तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. स्वत:वरच चिडणे बंद करा. तुमच्या नातेसंबंधांची काळजीपूर्वक जोपासना करण्याची गरज आहे.

शुभ महिना –

जुलै – तुमच्या कार्यात विजय मिळवाल.

मार्च – मज्जा करा.

कर्क (२१ जून ते २० जुलै)

आरोग्य

या वर्षी आपण आपली प्रकृती अतिशय उत्तम राखू शकाल. योग्य त्या पद्धतीने विश्रांती आणि आपल्या नियमित व्यायामातील शिस्त टिकून राहील याची खात्री करा. ठरावीक काळाने स्पा अथवा आरोग्य रिसॉर्टमध्ये जाऊन शरीराचे लाड पूर्ण करा. ठरावीक काळाने ब्रेक घेऊन, सुट्टीतल्या आरामाचा आनंद घ्या. जर तुम्हाला साहसी खेळाचा किंवा अध्यात्माचा आनंद घ्यायचा असेल तर ते जरूर करा. डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

करिअर

आपल्या कार्डानुसार आपण गेल्या काही वर्षांत खूप शिक्षण घेतले आहे, तसेच आपल्या क्षेत्रातील कठोर परिश्रम घेतल्यामुळे आपल्या कामाचा भरपूर अनुभव तुमच्या पाठीशी आहे. त्या जोरावर नजीकच्या काळात तुम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे, त्यामुळे छोटय़ामोठय़ा फायद्याच्या मागे धावून तडजोड स्वीकारू नका. आपण आपल्या वार्षिक उद्दिष्टांमध्ये यशस्वी होणे क्रमप्राप्तच आहे, त्यासाठी कोणाच्या संमतीची गरज नाही. करिअरबद्दलच्या आपल्या सर्व अपेक्षा या वर्षी पूर्ण होणार आहेत. आपण आजवर केलेल्या श्रमाचे चीज होण्याची वेळ आली आहे.

नातेसंबंध

येणारे वर्ष हे कर्क राशीच्या लोकांसाठी खूपच विस्मयकारक असे असणार आहे. तुम्ही खूप प्रेमळ आहात. काळजी घेणारा पिता होणे आपल्याला आवडते आणि प्रेमाने जोपासलेले हे नाते नक्कीच फलदायी ठरेल. आपण पाहिलेले घराचे स्वप्न, नातेसंबंध, लग्न अशा गोष्टी या वर्षी पूर्ण होतील. भूतकाळात रमण्यापेक्षा आणि भविष्यकाळाच्या चिंतेपेक्षा, वर्तमानकाळात जगून नातेसंबंधातील आनंद घ्या.

शुभ महिना –

जुलै – आनंददायी घटनांचा महिना.

सप्टेंबर – आरामदायी घटनांचे उत्तम उदाहरण.

सिंह (२१ जुलै ते २० ऑगस्ट)

आरोग्य

टॅरो कार्डानुसार तुम्हाला करिअर आणि नातेसंबंधांमध्ये सफलता मिळणार असल्यामुळे आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आळशीपणा झटकून टाका. प्रवासादरम्यान रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. रोज चालण्याचा व्यायाम करा आणि नियमित व्यायामाची शिस्त अंगी बाणवा.

करिअर

करिअरसाठी खूपच आशादायी, असे वातावरण टॅरो कार्ड दर्शवित आहे. या वर्षी तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल. तुमच्या प्रयत्नांना महत्त्वाकांक्षा आणि नियोजनाची जोड असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर करिअरच्या रोड मॅपबद्दल स्पष्टतादेखील हवी. एखाद्या स्त्रीची ऊर्जा (तुमची आई, बहीण, बायको, मुलगी किंवा मैत्रीण अशा कोणत्याही स्वरूपात) तुमच्या करिअरमध्ये खूप यश मिळवून देणारी ठरू शकते. या वर्षी तुम्ही ठरवलेली सर्व उद्दिष्टे पूर्व होतील. उगाच त्रयस्थांचे मार्गदर्शन घेण्यापेक्षा तुमच्या आतल्या आवाजानुसार पुढे जा. या वर्षी तुम्ही जेते असाल.

नातेसंबंध

या वर्षी तुम्हाला नातेसंबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. तुमच्या एखाद्या नातेसंबंधामध्ये काही खटकणाऱ्या गोष्टी असतील, काही गोष्टी काम करीत नसतील तर त्या शोधून त्यांचा अभ्यास करा आणि संघर्ष होणाऱ्या गोष्टी शोधून त्या नियोजनपूर्वक टाळा. नातेसंबंध टिकवण्यासाठी कधी तरी तुम्हाला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज भासल्यास तशी मदत घ्याच, तुम्हाला चांगल्या प्रभावी व्यक्तीकडून आधार मिळेल. लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी हे वर्ष उत्तम आहे.

शुभ महिना –

मे – करिअरमध्ये खूप मोठे फायदे होतील.

जून – तुमचे संवाद कौशल्य सफल होईल.

कन्या (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)

आरोग्य

आपण कोणत्याही गोष्टीबद्दल काटेकोर असता, त्यामुळे यावर्षीचे आपले आरोग्याचे कार्ड खूपच आशावादी आहे. आपण आपल्या व्यायाम, आहार आणि स्वच्छतेबद्दल खूपच जागरूक असल्यामुळे हे घडू शकेल. पण आपण आशावादी राहाल याची काळजी घ्या. सर्दी आणि खोकल्यासारखे किरकोळ आजारपण येऊ शकते पण त्याशिवाय मोठा आजार होणार नाही.

करिअर

करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला हे वर्ष लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे ध्येय साध्य करणे हे हे तुम्हाला सुलभ ठरेल. येत्या वर्षांत आपण एकाच वेळी अनेक कामं करू शकाल. मिळणाऱ्या सर्व संधींचा पुरेपूर वापर करा आणि तुमच्यातील सर्व संभाव्य ताकदीचा पुरेपूर वापर करा. यावर्षीचे तुमचे यश हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे असेल.

नातेसंबंध

येणाऱ्या वर्षांची सुरुवात ही खूपच लाभदायी असणार आहे. जे नव्याने नातेसंबंधांमध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यासाठी अनेक शुभसंकेत मिळतील. आपल्या कुटुंबीयांकडून खूप चांगला पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपला स्थिरता लाभू शकेल. येणाऱ्या वर्षांत तुम्हाला खूप विचारपूर्वक वचनबद्ध व्हावे लागेल, कारण यावर्षी आपली वचनबद्धता विवाहात रूपांतरित होणार आहे.

शुभ महिना –

फेब्रुवारी – आपला आतला आवाज खूप समर्थ असेल.

सप्टेंबर – अचानकपणे काही प्रेरणादायी कल्पना सुचतील

तूळ (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)

आरोग्य

हे वर्ष प्रामुख्याने आरोग्यदायी असणार आहे, पण पचनसंस्थेच्या काही अडचणी उद्भवू शकतील. अनियमित खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा, विशेषत: पावसाळ्यामध्ये अधिकच. नियमित व्यायामाच्या सवयीमध्ये खंड पाडू नका, त्या अजिबात सोडू नका.

करिअर

हे वर्ष खूप सकारात्मक गोष्टींची सुरुवात करणारे ठरेल. करिअरच्या नियोजनात आपली सर्व ताकद वापरा आणि सकारात्मक पद्धतीने वरच्या दिशेने जाणारे नियोजन करा. तुम्ही तुमचे ध्येय सहजपणे गाठू शकाल. सहकाऱ्यांच्या मत्सराशिवाय आणखी कोणतीही गोष्ट काळजी करण्याची गरज नाही.

नातेसंबंध

आपल्या राशीचे नातेसंबंधांचे कार्ड परिपूर्णता आणि यशस्वी होण्याचे सूचित करते. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीने जर खूप महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही खरी वेळ आहे. प्रत्येक नाते हे आयुष्यात प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्याचबरोबर नातेसंबंधांमध्ये योग्य तो समतोल असणे महत्त्वाचे आहे. दोन्हीकडून देवघेव करताना ती समान असायला हवी. तुमचे मित्रमंडळ आणि कुटुंबीयांचा आधार सकारात्मकपणे असाच पुढेदेखील सुरू राहणार हे लक्षात घ्या.

शुभ महिना –

ऑगस्ट – सकारात्मक वाढ होणार आहे.

एप्रिल – बाहेरच्यांकडून खूप आधार मिळेल

वृश्चिक (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)

आरोग्य

येणारे वर्ष एकंदरीतपणे आरोग्यदायी असणार आहे. कोणताही मोठा आजार उद्भवणार नाही. करिअरमधील घडामोडींसाठी तुमचे शरीर पूरकपणे कार्यरत राहील. कामाच्या लांबलेल्या तासांचा ताण ते सहजपण जुळवून घेऊ शकेल. नातेसंबंध तुटल्यामुळे आलेला अडथळा एकाग्रतेवर परिणाम करणारा ठरेल. पण त्यातून तुम्ही लवकरच बाहेर याल. योगा आणि चालणे यासारखा हलका व्यायाम तुमच्या प्रकृतीसाठी अत्यंत योग्य ठरेल.

करिअर

आपल्या क्षेत्रातील नवीन सुरुवात यावर्षी होणार आहे. त्यामुळे तुमचे भवितव्य खूपच आशादायी व उज्ज्वल असणार आहे. पण सर्व निर्णय तुम्ही एकटय़ानेच घेऊ नका. योग्य सल्ला व मार्गदर्शनानंतर मग पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. यश तुमचेच असेल.

नातेसंबंध

येणाऱ्या वर्षांत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांमध्ये विरोधाभासी घटना होणार आहे. त्यांच्या बाबतीत एक नातेसंबंध संपून दुसऱ्या नातेसंबंधांची सुरुवात होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंध संपण्यामुळे होणाऱ्या मानसिक वेदना, धक्का, ताण हा येणारच आहे, पण आशादायी विचार ठेवले तर एक नातेसंबंध संपून दुसरा सुरू होणे ही नव्या नातेसंबंधांची ही सुरुवात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. आणि मुख्य म्हणजे या नव्या नातेसंबंधांमुळे त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे.

शुभ महिना –

जुन आणि जुलै – गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम

धनू (२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)

आरोग्य

येणारे वर्ष हे करिअरच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल, त्यामुळे अर्थातच भरपूर थकावट होणार आहे. कामाच्या ठिकाणी सततचा तणाव असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्टीने हे आव्हान असणार आहे. आपल्या तंदुरुस्तीवर खूप सतर्कतेने लक्ष ठेवावे लागेल. आणि आरामासाठी वेळ काढावा लागेल. तसेच योगा करणे हितकारक ठरेल.

करिअर

तुमची सर्व सकारात्मकता करिअरमध्ये उत्कर्षांसाठी कामी आणावी लागेल. तुमच्या मेहनतीला फळ नक्कीच मिळेल. येत्या वर्षांत तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. तुमची वार्षिक ध्येये पूर्ण होतील. तुम्हाला अनेक नवीन संकल्पना सुचतील.

रिलेशनशिप

२०१८ या वर्षांत तुमच्या नातेसंबंधांची वाटचाल परिपूर्णतेकडे होईल. तुमच्या कुटुंबीयांसमवेत तुम्ही किमती वेळ घालवू शकाल. विवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी हे वर्ष लाभदायक आहे. आनंदी निर्णय घेतले जातील व नाते लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहचेल. आपल्या पालकांचा भक्कम पाठिंबा लाभेल. नातेसंबंधांमध्ये पुढे वाटचाल करून वचनबद्धतेकडे प्रवास सुरू होईल.

शुभ महिना  –

फेब्रुवारी – पालकांचा भक्कम पाठिंबा मिळेल.

सप्टेंबर – बचतीचे उद्दिष्ट गाठता येईल

मकर (२१ डिसेंबर ते २० जानेवारी)

आरोग्य

मिळूनमिसळून राहण्याची सवय लावून घेतली तर भावनिक अडचणी कमी होतील आणि या वर्षी चांगले आरोग्य लाभू शकेल. आपल्याला असलेला अपचनाचा त्रास यंदादेखील सुरूच राहील. आपल्या तीव्र भावनांना आवर घालण्यासाठी ध्यानधारणेचा आधार घ्या. त्यातून मिळणाऱ्या शक्तीमुळे आपल्याला मनाच्या शांतीची जाणीव होईल. हा काळ चमत्कारी असेल.

करिअर

येणारे वर्ष करिअरच्या बाबतीत खूपच फलदायी ठरेल. या वर्षी तुम्ही करिअरमधील खूप महत्त्वाचे करार करणार आहात. अनेकांना तुमच्या बुद्धिमत्तेची जाणीव होईल. अनेक वर्षांपासून अडकून राहिलेल्या गोष्टी मार्गाला लागतील आणि करिअरच्या भविष्याच्या दृष्टीने एक फलदायी योजना कार्यान्वित होईल. रिलेशनशिप आणि करिअरमध्ये योग्य तो समतोल साधणे महत्त्वाचे आहे.

नातेसंबंध

२०१८ या वर्षांत नातेसंबंधांमध्ये खूप काळजी घ्यावी लागणार आहे. नातेसंबंधांमध्ये वचनबद्ध होण्यापूर्वी थोडे थांबून खोलवर विचार करावा. एकतर्फी नातेसंबंधामध्ये सावध राहा. तुमची आवडनिवड पारखून पाहा, नातेसंबंधाची चिकित्सा करा आणि मगच निर्णयाप्रत या. या वर्षी कदाचित नातेसंबंधांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.

शुभ महिना –

जुलै – करिअरमध्ये खूप मदतकारक गोष्टी घडतील.

एप्रिल – गुंतवणुकीसाठी योग्य, विशेषत: स्थावर मालमत्तेत.

कुंभ (२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)

आरोग्य

आरोग्याच्या टॅरो कार्डनुसार आपणास या वर्षांत काही प्रमाणात अ‍ॅलर्जीचा त्रास संभवतो. कामाच्या ठिकाणी आपण खूपच परिश्रम घेत असल्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर नक्कीच होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षांत जरा जपूनच राहावे. आपल्या कामाच्या वेळा आणि त्यातून मोकळा वेळ काढण्याच्या वेळांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. शक्य तेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. सकारात्मक गोष्टींवरच लक्ष केंद्रित करावे.

करिअर

आपण करत असलेल्या प्रयत्नांना एका सूत्रात बांधण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणच्या बाबी कौशल्याने हाताळायला हव्यात. येत्या वर्षांत तुम्ही तुमच्या करिअरमधील एक महत्त्वाचे ध्येय गाठण्याची, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार करण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यालयातील इतरांसाठी तुम्ही प्रेरणादायी होऊ शकाल.

नातेसंबंध

२०१८ मध्ये आपण आपल्या नातेसंबंधांमध्ये समतोल सांभाळणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या साथीदाराला योग्य ती स्पेस द्यायला हवी. तुमच्या सततच्या उपस्थिताचा ओव्हरडोस होणार नाही ना याची काळजी घ्या. या वर्षांत आपण आपल्या जोडीदाराबरोबर भटकंतीला जाण्याची शक्यता आहे. त्या वेळचा काळ हा सुखद आठवणींचा आणि सकारात्मक राहील याची काळजी घ्या. वादविवादांना वाव मिळेल असे काहीही करू नका.

शुभ महिना –

मार्च – मित्रांबरोबर छान भटकायची संधी

ऑक्टोबर – कामाच्या ठिकाणी यश मिळेल.

मीन (२० फेब्रुवारी ते २० मार्च)

आरोग्य

२०१८ या वर्षांत आपण आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा वाढवायचे असेल तर अतिशय संयतरीत्या करावे. पाठीचे आणि पोटाच्या तक्रारींना या वर्षी तोंड द्यावे लागेल. स्वत:ला थोडा वेळ द्या आणि स्वत:बरोबरच आनंदी राहा. ध्यानध्यारणा, धार्मिक कार्यात सहभाग अशा तुम्हाला शांतता देणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा.

करिअर

येत्या वर्षांत कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांपासून सावध राहा. सहकाऱ्यांच्या मत्सरापासून जपावे लागेल. कामाच्या ठिकाणी आपण कितीही परिश्रम घेतले तरी आपल्या सभोवतालचे लोक आपल्या मेहनतीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न करतील. करिअरसंदर्भातील सर्व निर्णय हे खूप विचारपूर्वक आणि योग्य त्या चिकित्सेनंतर घ्यावेत. एकदम एखाद्या निर्णयावर उडी मारू नका.

नातेसंबंध

हे वर्ष तुमच्या नातेसंबंधांसाठी फलप्राप्तीचे असणार आहे. याआधीचा संभ्रम, पठडी बदलून येत्या वर्षांत नातेसंबंध जोपासण्यात आणि त्याचा आनंद घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असेल. कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमंडळी किंवा इतर नातेवाईकांबाबतदेखील हीच परिस्थिती असेल.

शुभ महिना –

सप्टेंबर – अनेक आनंददायी घटनांचा काळ.

फेब्रुवारी – सुसंधी प्रबळ होतील.
जागृती मेहता – response.lokprabha@expressindia.com