scorecardresearch

सेलिब्रिटी लेखक : हायड्रोलिक जॅक

अगदी ड्रायव्हिंग स्कूल जाऊन ‘लायसन्स’ मिळण्याइतपत गाडी मी शिकले होते.

सेलिब्रिटी लेखक : हायड्रोलिक जॅक

lp71समोरच्या गाडीने क्षणार्धात ब्रेक मारला; ‘मी सावध असल्यामुळे त्या गाडीचा पाश्र्वभाग वाचवू शकले.’  या समाधानात माझे दोन क्षण जात नाहीत तोच मागून येणारी गाडी मला समांतर येऊन क्षणभर रेंगाळली आणि जणू माझीच काहीतरी मोठी चूक झाल्यासारखी माझ्यावर क्षुद्र कटाक्ष टाकून भरधाव वेगाने निघूनही गेली. त्या अख्ख्या दिवसांच्या माझ्या सगळया हालचालींचा वेग मंदावला. दिवसभर तोच विचार. माझी काहीच चूक नसताना असं केलं असेल त्या चालकाने? का, असं म्हणू ‘पुरुष’ चालकाने? ‘मी’ गाडी चालवणारी एक ‘स्त्री’ होते आणि पुढच्या गाडीचा चुकलेला चालक हा एक ‘पुरुष’ होता, फक्त म्हणून त्या क्षणाच्या चुकीची भागीदारी मी ठरले का?

आम्हा बायकांच्या मनात सुरुवातीला गाडी हातात घेताना हा न्यूनगंड असावाच बहुधा. मला आठवतंय ना, माझी नवी कोरी गाडी शो रूममधून घरी आणताना मीही माझ्या एका ‘मित्रालाच’ बोलावून घेतला होतं. का! तर आपण स्वत: ती चालवत नीट घरी नेऊ शकू हा आत्मविश्वासच नव्हता. अगदी  ड्रायव्हिंग स्कूल जाऊन ‘लायसन्स’ मिळण्याइतपत गाडी मी शिकले होते. तरीही बरं का! म्हणा, आपल्याला ‘अशी’ गाडी शिकायला लागतंच काय; आपल्या शेजारी गाडी शिकवायला बसलेल्या चालकाच्या पायाखालचे एक्स्ट्राचे ब्रेक आणि क्लच छान कार्यरत असले की ‘आपल्याला गाडी जमलीय!’ असा छान आभास निर्माण करू शकतो आपण. लहानपणी शिकलेल्या ए, बी, सी, डीपैकी ए, बी, सीचा एक नवा अर्थ मात्र या प्रोसेसमध्ये कळतो आणि जो पाटीवर अक्षरं गिरवण्याइतका सोपाही नसतो, कारण लहानपणी हाताने गिरवलेल्या वर्णमालेचा धडा गाडी शिकताना पायाखालचं कोडं बनलेला असतो. एवरून एक्सीलेटर, बीवरून ब्रेक आणि सीवरून क्लच् असा.

असो, तर गाडी आल्यानंतर काही काळ मी ड्रायव्हरच ठेवला. मुंबईमध्ये ड्रायव्हर हा ‘माज’ या शब्दाला समानार्थी शब्द असावा आणि त्याचा संधी विग्रह; ‘आपल्या गरजेला कधीच उपलब्ध नसलेला असा जो तो,’ मग तो पगारी असो किंवा तीन चाकीचा मालक असो. तर हे आमचे महाशय कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक एक दिवस आलेच नाहीत. माझा सकाळी साडेसहा वाजताचा कॉल टाइम होता. (शूटिंगला पोहोचण्यासाठी कलाकारांना दिल्या गेलेल्या वेळेला ‘कॉल टाइम’ म्हणतात.) डिसेंबर महिना. थंडी नुकतीच तिचं अस्तित्व जाणवून द्यायला लागली होती, त्यामुळे सूर्यही निवांत होता. आता फक्त अंधार, दूधवाले, पेपरवाले आणि रस्त्यावरची कुत्री एवढीच काय ती साथ करतील. त्यातही माझा विश्वासच आहे की, कुत्र्यांचं एकंदरच वासाचं इंद्रिय इतपत कार्यरत असावं की आपल्याला त्यांची भीती वाटते हे हुंगून ते विशेषच सलगीने वागतात. त्यात घराजवळ रिक्षाही पटकन मिळायची नाही म्हणजे मग उशीर. या सगळ्या विचारांमध्ये मी कधी गाडीची चावी उचलून गाडी जवळ येऊन उभी राहिले कळलंच नाही. मग हो-नाहीचा हिशोब मांडत तिथेच काही क्षण घुटमळले आणि शेवटी धीर एकवटून गाडीत बसले. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हटलं आणि गाडीला चावी लावली. रस्ता रिकामा असल्यामुळे थोडं हायसं वाटत होतं, पण मजल तिसऱ्या गिअर पर्यंतचीच; त्यात इतक्या सकाळी सिग्नलही उठत नाहीत त्यामुळे गाडी थांबवून पुन्हा पहिल्या गिअरमध्ये टाकून उचलण्याचा प्रश्नच नव्हता. तर अशा प्रकारे सुखातच मी शूटिंगची वेळ गाठली. पार्किंग बाकी जमलं नाही अर्थात त्या क्षणी तेही जमावं हा अट्टहासच नव्हता. आमच्या एका लाइट दादांनी माझी गाडी पार्क केली. आपण स्वत:ला आणि इतरांना इजा न पोहोचवता नीट पोहोचू शकलो ही जाणीव आणि ‘स्वत:ची’ गााडी चालवण्याची भावना इतकी भारी होती की..बास! आता आपण इतक्या कष्टाने पै-पै साठवून विकत घेतलेली गाडी चालवण्याचा आनंद ड्रायव्हरला नाही विकायचा. आपणच अनुभवायचा हे निश्चित झालं. आज काहीतरी नवीन जमल्याची धुंदीच चढली होती मला. त्यातच पुढचा पूर्ण दिवस मी जो भेटेल त्याला सांगत सुटले होते, ‘आज मी स्वत: ड्राइव्ह केलं’, ‘मला गाडी यायला लागली’ आणि वेळ मिळेल तेव्हा हळूच खाली डोकावून गाडीला पाहत होते. यात अख्खा दिवस आनंदात पार पडला. पण आता निघायची वेळ आली होती. अचानक ट्रॅफिकच्या कल्पनेने माझं अवसान पार ढळलं. मी धीर करून पुन्हा एकदा गाडीत बसले आणि माझा भ्रमाचा भोपळा फुटला.

बापरे! अशक्य अनुभव. गाडी सुरू झाली आणि व्हिडीओ गेम खेळताना फस्र्ट लेव्हल पार केल्यावर काहीतरी एरर यावा आणि आपण डायरेक्ट टेन्थ् लेवलमध्ये जाऊन पोहोचावं तसंच वाटायला लागलं. लहानपणी पाहिलेला ‘जुमांजी’ सिनेमा आठवला, त्यातली पात्र जशी गेममधून बाहेर पडून साक्षात समोर उभी ठाकायची ना. अगदी तसंच झालं होतं हो! म्हणजे बघा हा! माझी गाडी, हा गेममध्ये मला रिप्रेझेंट करणारा छोटासा ‘उंदीर’ झाला, ट्रक, बस यांसारखी अवजड वाहनं ‘हत्ती’ आणि ‘डायनासॉर’ झाली. त्यांच्या पायाखाली आलोच तर डायरेक्ट गेममधून आऊट, रिक्षा म्हणजे मारक्या म्हशी झाल्या, ‘बाइक्स’ म्हणजे तर या गेममध्ये पावलोपावली पेरून ठेवलेले ‘सुरुंगच’. त्यांना चुकून स्पर्श झालाच तर दोघांचाही घात व्हायची भीती आणि माझ्या बरोबरीच्या गाडय़ा म्हणजे सतत कुरघोडी करून पुढे जाण्याची, जिंकण्याची धडपड करणारे माझे प्रतिस्पर्धी. बरं, खेळतानाही लेनची शिस्त ही पाळायलाचं हवी, तीन ‘लेन’ च्या रस्त्यावर पहिल्या लेनमध्ये राहावं इतका स्पीड घेण्याचं धाडसच नाही आणि तिसरी लेन पकडावी तर आपण डायरेक्ट जीवित हानीच करू इतके जवळून लोक चालतात. त्यामुळे मधल्या लेनला गत्यंतर नव्हते. जनरली आपला शत्रू हा समोरून चाल करून आपल्यावर येतो, पण इथले नियमच वेगळे. सगळेच आघात त्याच प्रवाहातून कारण त्याची दिशा एकच, नाहीच तर समांतर रेषेत आणि या आणीबाणीच्या गेममध्ये ‘लाइफ लाइन’ची सोयही नाही. माझा उंदीर तर बिचारा पार बावचळून गेला. त्याला काहीच सुधरेना, तेवढय़ात अचानक दोन ‘डायनासॉर’ चाल करून दोन्ही बाजूंनी भरधाव निघून गेले. हाताच्या तळव्यांना घाम फुटला, पण ते आपल्याला चिरडून गेले नाहीत या जाणिवेत हुश्श करेपर्यंत चार-पाच म्हशींनी मला चहोबाजूंनी घेरलं, चार पायांच्या म्हशींसारख्या या तीन पायांच्या म्हशीही बहुधा सतत कळपाने फिरत असाव्यात. त्याच्यातल्या दोन अंगावर येता येता राहिल्या. एकंदरच संध्याकाळी मुंबईचं जंगल पिसाळलेलं वाटत होतं, सुरुंगांना चुकवताना नाकीनऊ आले होते माझ्या. तेवढय़ात दोन प्रतिस्पर्धी एक-एक करून उजव्या बाजूने निघून गेले, मीही म्हटलं जावोत ना बापडे, इथे कोणाला जिंकायचंय. जीव वाचणं हेच काय ते जिंकणं होतं त्या क्षणी. ‘चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक’ म्हणणारी वाघ, सिंहाच्या तावडीत सापडलेली आजीबाई आठवली मला, जणू मला कानात म्हणून गेली, ‘‘आमच्या वेळी सोपं होतं बाई, सोंग घेऊन ‘लाइफ लाइन’ मिळून जायची आणि शत्रूही भाबडे होते. माणुसकी जपत वागायचे.’’ तर या अशा प्रकारच्या युद्धाला तोंड देत जीव वाचवण्याच्या धडपडीत निमूट वाट काढत, तमाम प्राणीजातीपासून स्वत:चे रक्षण करत आणि पावलोपावली येणारे सुरुंग चुकवत आमचा हा नवीनच भरती झालेला सैनिक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला. तिथलं शेवटचं वळण तसं लहानसंच होतं त्यामुळे सिग्नलची व्यवस्था नव्हती, तिथे गाडी वळवणार तोच, ‘लहानपणी खेळताना सोसायटीमधल्या सगळ्यात खडूस काकांच्या घरात अनावधानाने आपला चेंडू जावा आणि नेमका त्यांनीच तो पाहून डोळे वटारावेत’ तसा समोरून येणाऱ्या कारने ‘अप्पर लाइट’ दिला. त्यावेळी टेन्शनमध्येही ‘गाडय़ाही न बोलता व्यक्त होतात’ याने मजाच वाटली मला. त्या गाडीला आधी जाऊ दिलं. माझ्या गल्लीत वळले.

भाडेकरूंना सोसायटीत जनरली सावत्र वागणूक असते, आता मीही डोंबिवलीमधून करिअरसाठी राहत्या घरातून मुंबईमध्ये प्रस्थान केलेली भाडेकरू, त्यामुळे सोसायटीमध्ये गाडी पार्क करण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्यांदाच ही सावत्र वागणूक आवडली मला! पार्किंगची परीक्षा वाचली. रस्त्यावरचाच एक आडोसा हेरून मी येऊन थांबले. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. हातापायामध्ये त्राणच नव्हते, मेंदू थकला होता, पण मन शांत. झाल्या प्रकाराचा आढावा घेत होतं. हळूहळू पूर्ववत होत चाललेल्या माझ्या श्वासोच्छ्वासाला श्वासागणिक सुखावत होतं. ‘‘आपल्याला येणार नाही अशी वाटणारी गोष्ट नेटाने पूर्ण करून दाखवण्यात वेगळच समाधान असतं, नाही का?’’

‘फर्स्ट सक्सेसफुल ड्रायव्हिंग’चा आनंद मी माझ्या गाडीतच बसून गाडीशीच पहिल्यांदा शेअर केला आणि खरं सांगू का; त्या क्षणापासून अगदी आताच्या या क्षणापर्यंत माझ्या प्रत्येक भावनेची, सुख-दु:खाची पहिली साक्षीदार माझी गाडीच आहे. माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. सर्वात जवळची मैत्रीण. शूटिंगच्या वेळीअवेळी ऊनपाऊस सोसत संयमाने थांबून माझ्या हाताला धरून मला सुखरूप घरी आणणारी माझी पालकच झाली ती.

आज मात्र ड्रायव्हिंग हा माझा छान रुटीनचा भाग झालाय आणि तसंच माझ्या कामातही आज स्थैर्य आल्यामुळे शूटिंगची जागा, तिथली माणसं, कॅ मेरा, स्क्रिप्ट, हावभाव, विचार हेही रुटीनच होऊन गेलंय. मी माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कधीतरी ठेच लागून शहाणपण मिळवलं, तर कधी छान माणसांच्या रूपाने ‘लाइफ-लाइन’ मिळवून शिकत इथवर येऊन पोहोचले; पण अनपेक्षित मदतीने (लाइफ- लाइन) कायमचं हायसं वाटून दिलंय म्हणूनच त्या प्रत्येक वेळी मी मनाला बजावलंय; की शक्य होईल तिथे नवीन खेळाडूंसाठी आपण अनपेक्षित लाइफ-लाइन बनायचंच, त्यामुळे कधीतरी एखादं छोटं पात्र साकारायला आलेला सक्षम कलाकार जेव्हा नवीन ठिकाण, सेट आणि नवीन माणसांना बघून बावरून जातो तेव्हा मी आवर्जून त्याच्याशी बोलते. त्याला काम करता यावं यासाठी नाही. ते तो उत्तम करू शकणार असतो म्हणूनच तो तिथे आलेला असतो. पण त्याला नवीन ठिकाणी अनोळखी माणसांमध्ये आपलंसं वाटावं म्हणून. आज गाडी चालवतानाही मी ओव्हरटेक करणाऱ्या प्रतिस्पर्धीच्या यादीत आलेले असले तरी माझी नजर त्या बावचळलेल्या ‘नवीन छोटय़ा उंदराचा’ शोध घेतच असते;  त्यांना हरवून पुढे जाण्यासाठी नाही. त्यांची ‘लाइफ-लाइन’ बनण्यासाठी.

गाडी नवीन असताना माझ्या एका मित्राने मला एक वेगळच गिफ्ट दिलं होतं. ‘हायड्रोलिक जॅक’. माझ्या इतर मित्रमंडळींनी गणपती, कार फ्रेशनर, टेडीबेअर, उशा असे गिफ्टस् दिले असताना याने काय भलतंच दिलं असं वाटलं. पण एकदा शूटिंग संपवून घरी जाताना घोडबंदर रोडवर गाडीचं टायर पंक्चर झालं. बराच अंधार पडला होता. जवळपास एखादा मेकॅनिक असण्याची शक्यताही दुर्मीळ. मदतीसाठी काही गाडय़ांना विचारलं, पण कुणीच थांबेना. काय करावं कळेना. बाहेर उभं राहणंही धोक्याचंच. पटकन गाडीत बसले आणि गाडी आतून लॉक केली. डोकं शांत केलं आणि अचानक मला माझ्या गाडीतल्या ‘हायड्रोलिक जॅक’ची आठवण झाली, ‘मुलींना वापरण्यासाठी अत्यंत सोयीचा आहे, तुझं आयुष्य सोपं करेल तो’ असे माझ्या मित्राचे तो हायड्रोलिक जॅक गिफ्ट म्हणून देतानाचे शब्द आठवले. तडक गाडीतून उतरले. डिक्कीमधून तो काढला आणि खरंच एकटीनं टायर बदललासुद्धा. इतकं कौतुक वाटलं मला त्याक्षणी त्या मित्राचं. त्यावेळी या उपयोगी गिफ्टला ‘भलतंच’ म्हणून संबोधल्याची लाजही वाटली, यातच गाडीला चावी लावली आणि निघाले. पटकन मनात विचार येऊन गेला. ‘हायड्रोलिक जॅक’च्या रूपाने त्याने गेम सुरू होण्याआधीच एक ‘लाइफ लाइन’ माझ्यासाठी राखीव ठेवून दिली होती.

मग? या नवीन वर्षांत तुम्ही किती जणांच्या मार्गात ‘हायड्रोलिक जॅक’ बनणार आहात?
तेजश्री प्रधान – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2016 at 01:25 IST

संबंधित बातम्या