कोण म्हणतं, टीव्हीवरच्या मालिका निर्थक असतात म्हणून? टीव्हीतल्या बायकांसारखी कारस्थानं करू नयेत, चोवीस तास मेकअप करून आणि दागिन्यांनी मढून बसू नये हे शिकतोच की आपण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माणूस कायम विद्यार्थीच असतो’ असं थोरा-मोठय़ांनी सांगून ठेवलेलं आहे. आई-वडील, आजी-आजोबा, इतर वडीलधारी माणसं हे पहिले गुरू. मग शाळा-कॉलेज-क्लास यांचे शिक्षक यांचा क्रम, पण औपचारिक शिक्षण पूर्ण झालं तरी आपलं व्यावहारिक शिक्षण चालूच असतं ना ! मग आपले शेजारी, सहकारी, सहप्रवासी, आपल्याला भेटणारे दुकानदार, बँक आणि इतर सरकारी-खासगी कर्मचारी, रिक्षावाले, बस कंडक्टर असे किती तरी गुरू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आणि रूपात भेटत असतात. प्रत्येकाने दिलेला धडा आपल्याला उपयोगी असतोच असतो, पण विसाव्या शतकाच्या अखेरीस एक आभासी गुरू आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. तो सर्वव्यापी आहे. एकाच वेळी लक्षावधी-कोटय़वधी विद्यार्थ्यांना शहाणं करून सोडण्याचं विलक्षण सामथ्र्य त्याच्या ठायी आहे. जो नसला तर आपल्याला जेवण जात नाही, आपली मुलं-बाळं कासावीस होतात तो आपला टीव्ही. निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातली पोकळी थोडी तरी भरून काढतो तो टीव्ही.

बऱ्याचशा घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच जी अगदी मनोभावे, नेमून दिलेलं काम असावं इतक्या गंभीरपणे टीव्ही बघते. कोणत्या तरी एका वाहिनीची निस्सीम भक्त असते. त्या वाहिनीवरचे सगळे कार्यक्रम, मालिका न चुकता बघते. काही लोकांची निष्ठा राजकारणी लोकांसारखी फिरती असते. ते हातात रिमोट घेऊन सतत इकडे-तिकडे शोध घेत असतात. जिथे काही आवडीचं सापडतं, तिथे लगेच रमतात. माझ्यापुरतं बोलायचं तर अलीकडे राष्ट्रभाषेपेक्षा मला मातृभाषेतले कार्यक्रम जास्त रुचतात. महत्त्वाचं कारण म्हणजे ‘माय (मराठी) मरो आणि (हिंदी) मावशी उरो’ याला मी भिते. (इतर अनेक कारणं आहेतच, पण त्याची चर्चा आत्ता नको.) मीसुद्धा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा हातात रिमोट घेऊन इकडे तिकडे (म्हणजे टीव्हीच्या जाळ्यात) फिरत असते. फिरताना जे अमोल ज्ञान कण माझ्या कर्ण संपुटात आणि दृष्टीच्या टप्प्यात पडतात, ते मी अगदी मनोभावे जपून ठेवते. कारण कधी न कधी ते माझ्या उपयोगी पडणारच असतात.

टीव्हीवरच्या समस्त स्त्रिया बघावं तेव्हा अगदी टिपटॉप असतात. यांना घरात कामं नसतात का, असा एक अगदी मध्यमवर्गीय संस्कृतीला शोभेल असा प्रश्न कित्येकांच्या मनात आणि जाहीर चर्चेत असतो. तो असू द्या, पण त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की अगदी इतकं नटूनथटून राहण्याची गरज नसली तरी घरात वावरणाऱ्या बाईने किमान व्यवस्थित असलं पाहिजे. अवचित आलेल्या अभ्यागताचं स्वागत करताना चेहरा घामट, केस गळ्यात, कपडय़ांचा लाजिरवाणा अवतार असं असू नये. आणि घरातल्या माणसांनी तरी तिला नेहमी अशा गबाळ्या अवतारातच पाहायचं का? कुठे कार्याला किंवा बाहेर निघाली तरच ती व्यवस्थित दिसणार असं नसावं.

एखाद्या नायकाची आई खूप म्हणजे खूपच प्रेमळ असते. इतकी की चाळीस वर्षांच्या, दोन पोरांचा बाप असलेल्या आपल्या मुलाला ती अगदी प्रेमाने ‘बाळा’ म्हणते. सारखी आपली त्याची काळजी करते. ‘तू कितीही मोठा झालास तरी मी तुझी आईच राहणार आहे ना बाळा ?’ हे वैश्विक सत्य त्याला आणि आपल्याला दर भागात ऐकवते. त्या नवरा-बायकोला स्वत:चं वेगळं जग असतं, त्यातल्या सगळ्याच गोष्टी मुलं आईला सांगत नाहीत. त्यांचं खासगीपण आपण सांभाळलं पाहिजे, जरा काही रुसवे-फुगवे झाले तरी आपण लक्ष घालण्याची गरज नसते, हे काही केल्या त्या प्रेमस्वरूप मातेला कळत नाही. मुलांचं घराच्या बाहेरसुद्धा एक व्यावसायिक जग असतं. तिथे काय चालतं ते आपल्याला घरी बसून कळत नाही. त्यामुळे संध्याकाळी घरी आलेला मुलगा चिडचिड करत असला तरी त्याने आपली झोप उडवून घ्यायची गरज नसते, हे तर सांगून सुद्धा तिच्या पचनी पडत नाही. ती आपली ‘मुलं कितीही मोठी..’ याच संवादात अडकलेली असते. हे सगळं बघतांना इकडे आपल्या घशाशी भावनावशतेने आवंढा अडकतो, तिकडे तिचं ते गोड बाळसुद्धा अगदी सद्गदित होतं. याच साच्यात सापडलेली इतर अनेक नाती म्हणजे बहीण-भाऊ, नवरा-बायको वगैरे असाच प्रेमाच्या उकळ्या आणून पीळ आणतात. आता हा प्रेमाचा पूर टीव्हीचा पडदा फाडून घरात शिरणार आणि आपलं (बिच्चारं!) घर त्यात वाहून जाणार अशा भीतीने मग मी फट्कन च्यानलच बदलून टाकते, पण त्यामुळे मी एक महत्त्वाचा धडा शिकले. तो म्हणजे लग्न झालेल्या, स्वत:च बाप झालेल्या मुलावर प्रेम करावं, पण त्याचं चार लोकात हसं होणार नाही, ते टिंगलीचा विषय होणार नाही याची आणि त्याचबरोबर त्या प्रेमामुळे मुलाचा जीव गुदमरणार नाही याचीही काळजी घ्यावी. ते मुला-सुनेच्या आपसातल्या नात्याला आणि प्रेमाला बरं असतं. आईनेच नाही तर बरोबर काम करणाऱ्या सहकारी स्त्रीनेसुद्धा आपला प्रेमळपणा जरा आवरून घेतला पाहिजे. जोडय़ा जमवणं, सारखं दुसऱ्याच्या खासगी चौकशा करणं, भोचक सल्ले देणं एखाद्याच्या डोक्यात जाऊ  शकतं. घरचं कुटुंब नीट सांभाळलं तरी पुरे, जिथे जाल तिथे कुटुंब कशाला? अति कौटुंबिक असणं समोरच्या माणसाचा जीव गुदमरवू शकतं आणि त्याच्या समस्यांमध्ये भर घालू शकतं. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे, हा धडा आपल्या खासगी आयुष्यात फारच मोलाचा ठरू शकतो.

नायिकेची आई काही कमी प्रेमळ नसते. २५ वर्षांच्या स्वतंत्र (!) व्यक्तिमत्त्वाचे गोडवे गाणाऱ्या मुलीला अगदी हातात सगळं मिळावं यासाठी ती बिचारी अगदी पहाटेपासून राब राब राबते. पण शेवटी ‘मुली म्हणजे काय हो अंगणात बागडणाऱ्या चिमण्याच. दाणे टिपून उडून जाणार एक दिवस!’ ओळखीचा वाटतोय हा संवाद? प्रत्येक मालिकेत एकदा तरी मुलीच्या आई-बापांच्या तोंडी असतोच. किरकोळ शाब्दिक फेरफार सोडा. पण काही घरातले चिमणा-चिमणी आपली पिल्लू चिमणी केव्हा एकदा उडून जात्येय याची वाट पाहत असतात, हे वास्तव आजूबाजूला दिसत असतं. त्यामुळे हा संवाद ऐकताना क्रमाक्रमाने हसू येतं, वैताग येतो, उबग येतो आणि शेवटी रिमोट वापरणं इतकंच आपल्या हातात उरतं. आपल्या खऱ्या घरातल्या खऱ्या चिमण्या आपलं घरटं बांधतील तेव्हा त्यांची धांदल उडणार नाही इतपत ट्रेनिंग आईने- आईनेच- वेळेवर दिलेलं मुलीच्या हिताचं हा धडा समस्त ‘चिमण्यां’च्या आयांनी घोकला(च) पाहिजे.

मालिकेत एखादं पात्र अगदी आक्रमक असतं. न्याय-अन्याय, नीती-अनीती या सगळ्याची जाणीव जगात कुणाला असेल तर ती फक्त आपल्यालाच याची त्यांना अगदी पक्की खात्री असते. त्यामुळे काही कारणाने ते कुणावर नाराज झाले तर अगदी भयंकरच अस्वस्थ होतात. समोरचं माणूस काही तरी सांगायचा प्रयत्न करतंय, ते आपण ऐकून न घेता निष्कर्ष काढू नये, त्या माणसाची बाजू ऐकून न घेता मनात पक्का समज करून घेऊ  नये हे लक्षात येतच नाही. (त्यामुळे मग मालिकेचे १०० भाग वाढवायला संधी मिळते.) तेव्हा फक्त बोलणं चांगलं, अस्खलित आणि मुद्देसूद असणं पुरेसं नाही तर माणसाने चांगला श्रोता पण असलं पाहिजे. ‘ऐकण्याची’ तयारी पाहिजे. आपण व्यवहारात ‘ऐकायला’ शिकलो तर किती तरी तिढे सहज, चुटकीसरसे सुटतील.

एखादी कारस्थानी व्यक्ती एकावर एक डाव रचते आणि घरातली माणसं (बावळटासारखी) पुन:पुन्हा त्या डावांना बळी पडतात. एकाही माणसाला तर्कशुद्ध विचार करता येऊ  नये याचं फार आश्चर्य वाटतं. त्यात सगळ्या मालिकांतल्या सगळ्या पात्रांना अलीकडे ‘क्षमा करणे’ या रोगाची भयंकर लागण झालेली असते. म्हणजे क्षमा करणे हा फार मोठा गुण आहेच. पण एकावर एक गुन्हे करून, जिवावर उठलेल्या माणसाला सुद्धा पोलिसात न देता क्षमा करायची म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास म्हणायचा, की स्वत:बद्दल घमेंड म्हणायची की संतत्व प्राप्त झालंय म्हणायचं? फाडफाड मुस्कटात मारणं हा उपाय प्रत्येक वेळी आणि प्रत्येक माणसाला लागू पडत नाही ना! (कोणी, कोणाला, किती वेळा थोबाडीत मारल्या याची स्पर्धा जाहीर झाली तर कोण जिंकेल ? आणि बक्षीस नाही मिळालं तर त्यांना थोबाडीत खावी लागेल का?) आपण इतकंच लक्षात ठेवायचं की डोळे, कान आणि बुद्धी यांचा योग्य मेळ साधायला हवा. क्षमा वगैरे एका मर्यादेपर्यंत ठेवायचं. मर्यादा ओलांडली की कपाळमोक्ष ठरलेलाच. कुणावरही अगदी नवऱ्यावरही आंधळा विश्वास किंवा अकारण अविश्वास दाखवू नये, हे मालिकेच्या नायिकांना कळत नाही आणि मालिका मारुतीच्या शेपटासारखी लांबते. पण खऱ्या आयुष्यात मात्र आपल्याला विश्वास आणि अविश्वास यांचं रास्त प्रमाण सांभाळावं लागतं. हे प्रमाण चुकलं तर आपलं होणारं नुकसान आभासी नसेल, खरं असेल.

याशिवाय काही सुभाषित मौक्तिकंसुद्धा सापडतात या जाळ्यात. म्हणजे एकदा एका मालिकेतली सासू म्हणाली की आईचं नख खुपलं-लागलं तरी दुखत नाही. पण सासूचं बोट लागलं तरी जखम होते. याला म्हणतात ‘वैश्विक सत्य.’ दुसऱ्या एका मालिकेची नायिका तिच्या कर्कश आईला ठणकावत होती की माझ्या नवऱ्यावर जावई म्हणून तुझा हक्क असला तरी त्याच्या आईपेक्षा जास्त नाही. कारण त्याची आई-आजी आणि कुटुंबातल्या इतर स्त्रियांनी त्याच्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या आहेत, त्या तू खाल्लेल्या नाहीस. तेव्हा हक्काची भाषा आवरती घे. इतकं शहाणपण असलेली मुलगी म्युझियम पीस म्हणावी इतकी दुर्मीळ. त्यामुळे एरवी मालिका बकवास असली तरी त्या भागापुरती ती आवडते. पण ज्या तरुण मुलींनी (आणि त्यांच्या आयांनी) हे वाक्य मनावर कोरून ठेवावं त्यांनी हे पाहिलेलं असलं तरच या मोत्याचं मोल. खोटं बोलण्याचे तोटे एक आजीबाई सांगतात ते मात्र पटतात. कुणाशी केव्हा आणि काय खोटं बोललं ते विसरलं गेलं तर मोठाच घोळ. पण खोटं बोलायचं नाही म्हणजे खऱ्याचा अतिरेक करायची पण गरज नसते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सात्त्विकता आणि आक्रमकता या दोन्हीचा अतिरेक घातकच हे आपल्याला दुसरीकडे कुठे शिकायला मिळणार? कुकरी शोच्या संचालक  आणि पाककृती दाखवणाऱ्या पाहुण्या दोघीही केस पिंजारून आणि पदर-ओढणी फलकारत, रेशमी/ सिंथेटिक कपडे परिधान करून चुलीशी वावरत असतात. पण त्या शोचं चित्रीकरण होताना ते तुकडय़ात होतं आणि नंतर संकलित करून आपल्याला दाखवलं जातं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकघरात केस आणि पदर-ओढणी आवरून आणि सुती कपडे घालूनच वावरलं पाहिजे.

दत्ताने एकवीस गुरू केले असं म्हणतात. आपल्याला मात्र प्रत्येक मालिकेत एक गुरू आहेच. वर लिहिलेल्या पाठांशिवाय अनेक इतर पाठ आपल्याला मिळतातच. मी फक्त निवडक मराठी मालिका गुरूंबद्दल लिहिलंय. इतर मालिका आणि अन्य भाषिक वाहिन्यांवरच्या असंख्य मालिकांमधले गुरू त्यांच्या प्रेक्षकांना वेगवेगळे पाठ देतातच. शिवाय वर उल्लेख केलेल्या सुभाषित मौक्तिकांसारखी इतर अनेक मोत्ये सापडतात ती वेचून, घोकून अमलात आणायचा प्रयत्न करायचा. मालिका बघून बाकी नाही तरी हा फायदा होतोच आपल्याला.

राधा मराठे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv serials
First published on: 11-12-2015 at 01:23 IST