सून बेटा गुड मॉर्निग. कमॉन बेटा वेकप ना. आज मंडे, वीकचा फर्स्ट डे आहे. चला, स्कूलला जायचं आहे ना? माझा गुड बॉय आहेस ना तू? कमॉन. गेट रेडी फॉर स्कूल. आता सगळं फास्ट फास्ट कर. चल अजून ब्रश करायचंय, शॉवर घ्यायचाय, ब्रेकफास्ट करायचाय, बोर्नव्हिटा प्यायचंय. तुझा टिफिन, वॉटर बॉटल  रेडी आहे. ते घेतलं का? स्कूल बॅग घेतली का? शूज घातले का? स्कूल बस येईल. लेट नको व्हायला, नाही तर ते स्कूल बसवाले अंकल कन्टिन्यूअस हॉर्न वाजवत राहतील. स्कूलला लेट गेलास तर प्रिन्सिपल तुला पनिशमेंट देतील. क्लासरूमच्या बाहेर उभे करतील. कमॉन, झालं का सगळं? नाही तर तुझ्यामुळे तुझ्या मॉमला आणि डॅडला पण ऑफिसला लेट होईल. मग आम्हाला विदाऊट ब्रेकफास्ट ऑफिसला जावं लागेल. आणि हे बघ स्कूलमध्ये कम्प्लिट टिफिन खा. रिटर्न आल्यावर ग्रँडमा आणि ग्रँडपाला ट्रबल नाही द्यायचं. नो मिस्चिफ्स. टीव्हीवर कार्टून जास्त नाही वॉच करायचं. होम वर्क कम्प्लिट करायचा. इव्हिनिंगला मिल्क प्यायचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे संभाषण व्यवस्थित वाचलंत तर तुमच्या असे लक्षात येईल की, या संभाषणामध्ये ५० ते ६० टक्के इंग्रजी (अमराठी) शब्द वापरले गेले आहेत. हे ‘मराठीचे इंग्रजीकरण’ आहे. आपण याला कालानारूप बदल असे म्हणून याकडे दुर्लक्ष केले तर आपली माय मराठी भाषा लोप पावायला अजिबात वेळ लागणार नाही.

एकदा एका मराठी मित्राकडे गेलो होतो. त्यांचा मुलगा (वय १९-२० वर्षे) अभियांत्रिकीच्या पदवी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो मला माझ्या घरापर्यंत सोडण्यासाठी त्यांच्या चार चाकी वाहनाने निघाला होता. एके ठिकाणी मी त्याला उजवीकडे गाडी घे म्हणून सांगितले तर तो गोंधळून माझ्याकडे पाहू लागला व म्हणाला की, अंकल लेफ्ट ऑर राईट? त्या मुलाला उजवीकडे म्हणजे राईट हे सांगावं लागतं याचा अर्थ त्यांच्या पुढच्या पिढीला तर मराठीचा गंधच असणार नाही.

तुम्ही कोणाला धन्यवाद द्यायचे असतील तर काय म्हणता? थँक यू? एखाद्याला विनंती करायची असेल तर काय म्हणता? प्लीज? मराठीत याला ‘कृपया’ हा असा छोटासा आणि आटोपशीर शब्द आहे. मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, जर्मनीमध्ये जर्मन लोकं एकमेकांना ‘गुड मॉर्निग’ न म्हणता आवर्जून ‘गटेन मॉर्गेन’ म्हणतात. म्हणजे त्यांच्या भाषेतील ‘गुड मॉर्निग’. आपल्याकडे दोन मराठी व्यक्ती जरी भेटल्या तरीही ‘सुंदर सकाळ’ न म्हणता ‘गुड मॉर्निग’च म्हणतात. अजून एक उदाहरण देतो जर्मन लोक एकमेकांशी बोलताना ‘थँक यू’ न म्हणता ‘डंके’ म्हणतात. पण मराठी व्यक्ती एकमेकांना ‘धन्यवाद’ न देता ‘थँक यू’च म्हणतात.

आजच्या या युगात हे का विसरले जात आहे की मराठी ही एक फक्त भाषा नसून ती संस्कृती आहे. तिचे जतन करणे हे जगातील  सगळ्या मराठी माणसाचे आद्य कर्तव्य आहे.

ए मावशी, ए काकू, ए आत्या, ए मामी, ए मामा, ए काका यात जी आपुलकी, प्रेम, माया असतं ते आँटी किंवा अंकल या हाकेमध्ये वाटते का? ‘मी मार्केटमध्ये शॉपिंगला गेले होते, येताना चांगले दिसले म्हणून फिश आणले.’ या ऐवजी ‘मी जरा बाजारात खरेदी करायला गेले होते, येताना चांगले दिसले म्हणून मासे आणले.’ हे कधी ऐकले आहे? आता अजून एक वाक्य- ‘या वेळेला समर व्हेकेशनला ना आम्ही हिल स्टेशनला जाणार आहोत.’ याऐवजी ‘या उन्हाळाच्या सुट्टीत ना आम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाणार आहोत,’ हे म्हणणे काय कमीपणाचे वाटते? मार्केट, शॉपिंग, फिश, समर व्हेकेशन, हिल स्टेशन हे असं बोललं की, मराठी माणसाची पत (आजच्या मराठीत स्टेट्स)  वगैरे वाढते की काय? मला कोणी सांगाल का फिशची टेस्ट आणि ‘माशाची चव’ यात असा काय हो फरक (आजच्या मराठीत डिफरन्स) असतो?

मी म्हणतोय ते तुम्हाला फारसं पटत नाही?  ठीक आहे, हातच्या कांकणाला आरसा कशाला?

सुनील, वय वर्षे २८ ते ३०, उच्च शिक्षित, तो मराठी. त्याची बायको मराठी. त्याचे आई, वडील, सासू, सासरे सगळे मराठी. त्याला मी दिनक्रम सांग म्हटल्यावर त्याने विचारलं की अंकल दिनक्रम म्हणजे काय? मग त्याच्या मराठीत मी त्याला सांगितलं की बाबा तुझं डेली रुटीन  शॉर्टमध्ये सांग. (शॉर्टच. कारण त्याला ‘थोडक्यात’ हे कळाले नसते). आता त्याचा  दिनक्रम- ‘अर्ली मॉर्निग फाईव्ह ओ’ क्लॉकला उठतो. फ्रेश होतो. ब्रश करतो. वॉकिंगला जवळच्या गार्डनमध्ये जातो. तेथेच थोडे एक्झरसाईज करतो. बॅक टू होम. मग शॉवर घेतो, ब्रेकफास्ट करतो, लगेच ऑफिसला पळतो. नाईन टू सिक्स ऑफिस. बॅक टू होम बाय एट. थोडा वेळ टीव्ही मग डिनर. डिनरनंतर थोडं वॉक घेतो. टेन थर्टी आय गो टू बेड.’ थोडय़ा फार फरकाने आज मराठी व्यक्ती असंच मराठी कम इंग्लिश बोलतात. मराठीच बोलतात पण ज्यात मराठी अगदीच कमी असतं.

मराठी माणसे सर्रास बोलतात, अशी काही वाक्ये.

– मी वोटिंग (मतदान) करत नाही.

– कालच कटिंग करून (म्हणजे केस कापून) आलो.

– मी तर बाबा रोज शेव्ह करतो (म्हणजे दाढी करतो).

– अरे बाबा एक्झाम (परीक्षा)चे पेपर्स (उत्तरपत्रिका) मिळाले का? मार्कशीट (गुणपत्रिका) मिळाली का? रिझल्ट (निकाल) लागला का?

– काय सांगतोस आज पण टीचर (शिक्षक) अबसेंट (गैरहजर)?

-एक्झाम (परीक्षा)चं टाइमटेबल (वेळापत्रक) लागलं का?

– जरा फॅन (पंखा) लाव आणि पेपर (वर्तमानपत्र) दे.

अशा या साध्या साध्या वाक्यातदेखील इंग्रजी शब्द वापरण्याची काही गरज आहे का? आपणच मराठी नाही बोललो तर पुढच्या पिढीला मराठी शब्द कसे कळतील? मुलांचे शिक्षण कोणत्याही माध्यमामधून असले तरीही त्यांना आपल्या भाषेची सवय, तोंडओळख हवीच. मराठी आपली मायबोली (आजच्या मराठीत मदर टंग) आहे हे मराठी असूनही आपण कसे काय विसरतो?

आकाशवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांमधूनही असेच मराठी ऐकायला मिळते. ‘तुमचा आवडता हा नंबर वन शो’ हे सर्रास मराठी कार्यक्रमात वापरले जाते. तसेच ‘घेऊन आलो आहे तुमचा लाडका ब्रेकफास्ट शो. आता घेऊ या एक कमर्शियल ब्रेक’

मी आकाशवाणी (आजच्या मराठीत रेडिओ)च्या एफएम रेनबो, एफएम गोल्ड या वाहिनीचे (आजच्या मराठीत चॅनल)चे मराठी प्रक्षेपण जमेल तेव्हा आवर्जून ऐकतो.  अनेक वेळा मी त्या निवेदक/निवेदिका (आजच्या मराठीत रेडिओ जॉकी) यांना दूरध्वनी (आजच्या मराठीत टेलिफोन) करून कमीतकमी इंग्रजी वापरा अशी विनंतीही करीत असतो. काही निवेदक माझी विनंती ऐकून घेतात व इंग्रजी टाळू असे आश्वासन देतात, पण काही तरुण निवेदक अकारण इंग्रजी वापरण्याचे समर्थन करीत असतात. त्यांचे म्हणणे की काही कार्यक्रम हे न्यू जनरेशनही ऐकत असते त्यामुळे ते इंग्रजी वापरतात. पण ते हे विसरतात की हे नव्या पिढीचे कार्यक्रम ऐकणारेदेखील मराठी आहेत व ते मराठी कार्यक्रमच ऐकत आहेत. मग त्यांना उगाचच इंग्रजी ऐकवून आपल्या मराठीची अशी गळचेपी का? या उलट या निवेदकांनी कार्यक्रमात इंग्रजीचा वापर अत्यल्प अथवा शून्य केला तर, या नव्या मराठी पिढीच्या कानावर अनेकविध मराठी शब्द पडतील आणि त्यांनाही मराठीबद्दल गोडी लागू लागेल.

पण येथे मला आवर्जून सांगावेसे वाटते की एफएम रेनबोवरील बरेच निवेदक व निवेदिका अतिशय उत्कृष्ट व अस्खलित मराठीत कार्यक्रम सादर करतात. मी एका निवेदिकेला तिच्या अस्खलित मराठी सादरीकरणासाठी जेव्हा दूरध्वनी केला तेव्हा तिने सांगितले की ती मूळची तेलगू आहे, पण तिचे मराठी कोणत्याही मराठी माणसापेक्षाही शुद्ध होते, उच्चार स्पष्ट होते. याचे फार कौतुक वाटले.

मी सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांना (न्यूज चॅनल्स) विनंती केली होती की, आपल्या मराठी वृत्तवाहिन्या आहेत, आपण कमीत कमी इंग्रजीचा वापर करावा व त्याची सुरुवात ‘घेऊ  या एक छोटासा ब्रेक’च्या ऐवजी ‘घेऊ  या एक छोटीशी विश्रांती’ यांनी करा, पण अजूनपर्यंत एकाही मराठी वृत्तवाहिनीने हे अमलात आणलं नाही. तसेच अनेक मराठी चित्रवाहिन्यांवरील मराठी मालिकांमध्येदेखील अनेक वाक्यांमध्ये अकारण इंग्रजी शब्द वापरले जातात.

या अगोदरची मराठी पिढी अंदाजे ९५ टक्के शुद्ध मराठी बोलायची. आजची पिढी अंदाजे ६० ते ६५ टक्के शुद्ध मराठी बोलते. या पुढची पिढी बहुतेक २५ ते ३० टक्केच शुद्ध मराठी बोलेल, कारण त्यांनी बरेचसे मराठी शब्द लहानपणापासून ऐकलेच नसतील तर तो त्यांच्या काय दोष आहे? त्याच्याही पुढील पिढी बहुतेक ५ ते १० टक्केच शुद्ध मराठी बोलताना आढळेल. आणि मग ‘मराठी स्पीकिंग कोर्स ’सारख्या गोष्टींना तुफान मागणी येईल आणि हा कोर्स बहुतेक कल्पक अमराठी व्यावसायिकच चालू करेल कारण त्याचे मराठी हे बाकीच्यांपेक्षा चांगले असेल.

हे असेच चालू राहिले तर एक दिवस ‘दिवाळी’ हा ‘फेस्टिव्हल ऑफ लाइट्स’ होईल आणि चकली, कडबोळी, शेवच्या ऐवजी पिझ्झा, बर्गर, फ्रेन्च फ्राईज हे सगळं खाऊन भविष्यातील ‘दिवाळी’ साजरी नव्हे, एन्जॉय करावी लागेल.
सत्यजित शहा – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of english words in marathi
First published on: 26-02-2016 at 01:29 IST