‘गाजर का हलवा’ करणारी आई व्हिडीओ कॉलिंग करते; तर नवऱ्याची वाट बघणारी बायको नोकरीसाठी बाहेर पडते; हे बदलतं चित्र आहे हिंदी सिनेमांचं. या सिनेमांनी विशिष्ट चौकटीतून स्त्री-व्यक्तिरेखांना मुक्त केलंय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-व्यक्तिरेखा कणखर बनवणाऱ्या सिनेमांवर टाकलेली एक नजर.

घर कितीही सामान्य किंवा गरीब असलं तरी त्यातला मुलगा हा ‘हिरो’ दिसायलाच हवा. काही वर्षांपूर्वी असा पण होता सिनेमावाल्यांचा. आर्थिक स्थिती कितीही बेताची, हलाखीची असली तरी तो देखणा, कर्तबगार, सगळ्यातलं सगळं येणारा असायला हवा हा त्याच्यापुढचा नियम. पण सिनेमाला ‘हिरो’ असायलाच हवा. सिनेमा पुरुषप्रधान माध्यम मानलं जायचं. पण आता या मानण्याला काही काळ लोटला. काही अपवाद वगळता पूर्वीचे सिनेमे पुरुषप्रधान सिनेमांमध्ये मोडतात. आता मात्र यात बदल होतोय. स्त्रीप्रधान सिनेमे येण्याचं प्रमाण तर वाढलंच आहे; त्याशिवाय इतर विषयांच्या सिनेमांमधल्या स्त्री व्यक्तिरेखांच्या छटाही बदलताना दिसताहेत. प्रत्येक वेळी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी स्त्रीप्रधान सिनेमे बनवण्याची गरज नसते तर इतर सिनेमांमधूनही आजच्या स्त्रीचं व्यक्तिमत्त्व दाखवता येऊ शकतं हे काही सिनेमांनी दाखवून दिलंय. सिनेमातलं हे चित्रण सहजतेने स्वीकारायला हवं; हे प्रेक्षकांनीही दाखवून दिलंय. म्हणूनच ‘क्वीन’मधली रानी सगळ्यांना भावली, ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या शशी गोडबोलेने प्रेक्षकांना भावुक केलं तर ‘मर्दानी’मधल्या इन्स्पेक्टर शिवानीने अनेकींना हिंमत दिली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेल्या दोनेक वर्षांमध्ये आलेल्या हिंदी सिनेमांवर नजर टाकल्यास असं लक्षात येईल की, स्त्रीप्रधान सिनेमांव्यतिरिक्त इतरही काही सिनेमांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांनी आजच्या स्त्रीची स्वभाववैशिष्टय़े, छटा, पैलू दाखवले आहेत. काही वेळा सिनेमातली स्त्री बंडखोरही झाली आहे. पण तीही प्रेक्षकांनी स्वीकारली. रडूबाई, फक्त चवीपुरतं, सोशीक, सात्त्विक अशा चौकटीतून तिला काही सिनेमांनी मुक्त केलं.

सिनेमांमधली स्त्री-व्यक्तिरेखा या विषयावर चर्चा आधीही व्हायची. ती वारंवार होऊ लागली ती साधारण दोन-तीन वर्षांपासून. स्त्रीप्रधान सिनेमे पूर्वीच्या काळातही होऊन गेले. पण त्यांचे विषय बहुंताशी एखाद्या नायिकेला कसं संकटांना सामोरं जावं लागतं,  तिच्यावर अन्याय कसा झालाय, ती त्यावर मात कशी करते वगैरे विषय हाताळले जायचे. महिला सक्षमीकरणाची यात काही यशस्वी उदाहरणंही आहेत. पण कणखर, धैर्यशील याशिवायही तिच्यात विविध स्वभाव-पैलू आहेत. ते आता सिनेमांमधून दिसू लागले आहेत. बिनधास्त, मनमोकळी, मुक्त, बंडखोर, खंबीर, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी, हवं ते करणारी अशी असंख्य विशेषणं तिच्यात आहेत. ‘जब वुई मेट’मधली गीत म्हणजे करिना कपूर आठवते? ‘मैं अपनी फेवरेट हूँ’ असं सांगणारी. आवडली सगळ्यांना. त्या-त्या क्षणी हवं ते करणाऱ्या गीतसारखं कितीजणी प्रत्यक्षात करत असतील माहीत नाही, पण प्रेक्षकांनी तिला सहज स्वीकारलं हे नसे थोडकं. असंच ‘क्वीन’मधल्या रानी म्हणजे कंगणा रणोटचं. लग्नाच्या दोन दिवस आधी नवरा लग्नाला नकार देतो आणि म्हणून ती एकटीच हनिमूनला पॅरिसला जाते, ही गोष्टचं किती कौतुकास्पद आहे. म्हणजे यात कुठेही अहंकार न आणता ‘एका गोष्टीमुळे पॅरिसला जाण्याचं स्वप्नं मी का गुंडाळून ठेवू?’ असा प्रॅक्टिकल विचार त्यात आहे. लग्न मोडण्याचे प्रकार अनेकींबाबत घडले असतील, घडतही असतील, पण त्यातून योग्य तो आणि विचारपूर्वक मार्ग काढायला हवा. या सिनेमातही कुठेही ती किती बिचारी, अबला नारी वगैरे दाखवण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडला नाही. त्यामुळे ती कथा चांगलीच फुलत गेली. सिनेमाजगताचं हे बदलतं चित्र उल्लेखनीय आहे.

अलिया भट या अवखळ अभिनेत्रीच्या बऱ्याच सिनेमांमधली नायिका एकदम बिनधास्त दाखवली आहे.  मग तो सिनेमा ‘हायवे’ असो ‘टू स्टेट्स’ असो ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ असो किंवा ‘शानदार’ असो. सगळ्या सिनेमांमध्ये तिचं खुलं जगणं दाखवलं आहे. हम्प्टी शर्मामधली तिचं प्रेम स्पष्टपणे कबूल करणारी बिनधास्त मुलगी, हायवेमध्ये न घाबरता अपहरणकर्त्यांसोबत मनसोक्त हिंडणारी तरुणी, ‘टू स्टेट्स’मध्ये पालकांना तिचं प्रेम पटवून देणारी आणि वेळ आल्यावर त्यांचीच बाजू घेणारी समजूतदार मुलगी अशा अनेक छटा यात दाखवल्या गेल्या. प्रेक्षकांना त्या आवडल्या आणि त्या चांगल्या प्रकारे स्वीकारल्याही गेल्या. तो सिनेमा आहे त्यात सगळं स्वप्नवत दाखवलं जातं, असं सर्रास म्हटलं जातं. पण सिनेमा हा समाजाचंच प्रतिबिंब असतो हेही लक्षात घ्यायला हवं. या सिनेमातल्या स्त्री व्यक्तिरेखा काहीशा बंडखोर वाटतील, पण आजच्या तरुणींचंच प्रतिनिधित्व करणारं ते चित्र आहे.

16-lp-mahilaसिनेमातल्या फक्त नायिकांचंच रूप बदललंय असं नाही तर नायक-नायिकांची आईसुद्धा आता आधुनिक दिसू लागली आहे. ‘खुबसुरत’ या सिनेमातली आई फार मजेशीर आहे. सोनम कपूरच्या आईची भूमिका साकारलेल्या किरण खेरने उत्तम काम केलंय. सिनेमात ती तिच्या मुलीशी म्हणजे मिलीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असते. मुलीच्या प्रेमाविषयी त्या मोकळेपणाने चर्चा करतात. सिनेमात असे प्रसंग विनोदनिर्मितीसाठी असले तरी अशी आई आता ठिकठिकाणी दिसते. ‘गोबी के पराठे’ आणि ‘गाजर का हलवा’ करणारी पूर्वीच्या सिनेमांतली आई आता व्हिडीओ कॉलिंग, व्हॉट्स अ‍ॅपवर आली आहे. अशीच आई बघायला मिळाली ती ‘टू स्टेट्स’मधल्या अर्जुन कपूरच्या आईच्या रूपात. अमृता सिंगने टिपिकल सासूचा तोरा दाखवलाय खरा, पण मुलाचं प्रेमात पडणं, त्याच्याशी त्याच्याबद्दल बोलणं असं सारं काही त्यात दिसतं. ‘दिल धडकने दो’मध्ये तर सगळ्यांच्याच आई अतिआधुनिक दाखवल्या आहेत. अर्थात त्या सिनेमात तसं दाखवणं अपेक्षितच होतं. कारण विशिष्ट वर्गाची जीवनशैली उलगडणारा तो सिनेमा होता. पण तरी त्या सिनेमातल्या

स्त्री-व्यक्तिरेखा बघून महिलाप्रेक्षक वर्ग सुखावला. ‘पिकू’मधली पिकूची मावशीसुद्धा एकदम ‘कुल’ दाखवली आहे. ‘हसी तो फसी’मधली परिणीती चोप्राच्या मोठय़ा बहिणीची व्यक्तिरेखा एकदम वेगळी आहे. प्रॅक्टिकल असणाऱ्या तिला आयुष्यात काय हवं त्याबाबत ती एकदम स्पष्ट आहे. अशी बहीण, मावशी, आई आपल्या आजूबाजूला असतात. ज्या तशा नाहीत त्यांना असं वागायला आवडेलही. पण त्या प्रत्यक्षात तशा वागतील की नाही हा पुढचा मुद्दा. मात्र अशा स्वभावाच्या स्त्री-व्यक्तिरेखांना प्रेक्षकांकडून स्वीकारलं जातंय.

17-lp-kangana-dipikaस्त्रीप्रधान सिनेमांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. याचं प्रमाण आता वाढतंय असं म्हणायलाही हरकत नाही. विशेष उल्लेख करावा असे काही सिनेमे अलीकडे होऊन गेले. ‘डर्टी पिक्चर’, ‘कहानी’, ‘क्वीन’, ‘गुलाब गँग’, ‘देढ इश्किया’, ‘जझबा’, ‘एनएच १०’, ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’, ‘मसान’, ‘मर्दानी’, ‘मेरी कोम’ अशा काही सिनेमांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा उत्तम दाखवल्या आहेत. या वर्षांतही असेच काही स्त्रीप्रधान सिनेमे बघायला मिळणार आहेत. त्यापैकी ‘नीरजा’ गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. नीरजा भानोत हिच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडला. दुसरीकडे ‘जय गंगाजल’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. एक महिला पोलीस अधिकारी ती काम करत असलेल्या ठिकाणी कोणकोणते बदल घडवून आणते ते या सिनेमात असेल. धाडसी स्वभावाची स्त्री व्यक्तिरेखा प्रियांका चोप्राने साकारली आहे. या सगळ्याच स्त्रीप्रधान सिनेमांतून काही अपवाद वगळता ‘अन्याय झालेली स्त्री’ फारशी दाखवली नाही. हा बदल सकारात्मक आणि आशादायी आहे.

आगामी ‘की अ‍ॅण्ड का’ या सिनेमात करिना कपूर आणि अर्जुन कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. घरातली स्त्री नोकरी करणारी आणि पुरुष घरकाम करणारा असं यात आहे. आज अनेक जोडपी अशा तऱ्हेने जगतात. आर बाल्की या वेगळ्या विचारसरणीच्या दिग्दर्शकाचा तो सिनेमा आहे. त्यामुळे त्याकडून अपेक्षा करायला हरकत नाही. सिनेमाचा विषयही आजचा आहे. त्यामुळे त्यातली नायिकाही 17-lp-rani-mukharjiआजच्या आधुनिक विचारसरणीची दाखवली आहे. सिनेमा स्त्रीप्रधान नसला तरी त्यातली स्त्री-व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेते. संजीव कुमार आणि मौसमी चॅटर्जीचा ‘इतनी सी बात’ हा सिनेमा याच पठडीतला होता. पुरुषांनीच कमावणं योग्य हा समज होता. कालांतराने स्त्रियाही कमवून लागल्या. स्वावलंबी झाल्या. आता काळ आणखी बदलतोय. काही घरांमध्ये स्त्री कमवणारी आणि पुरुष घरकाम करणारा असं चित्र बघायला मिळतं. हा बदललेला काळ ‘कि अ‍ॅण्ड का’मध्ये बघायला मिळेल. चांगली साडी नेसून, नट्टापट्टा करून संध्याकाळी नवऱ्याची वाट बघणाऱ्या स्त्रीला ठरावीक चौकटीतून या सिनेमांनी बाहेर काढलं. जसं नवरा-बायकोचं नातं बदलत्या प्रवाहातून जातंय; तसंच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडंचंही आहे. रिलेशनशीप असणाऱ्या एखाद्या जोडप्यामध्ये बॉयफ्रेंड काही अडचणींमुळे कमवणारा नसतो. पण गर्लफ्रेंड कमवत असते. कठीण प्रसंगी, गरज असते तेव्हा ती त्याला आर्थिक मदत करते. पुरुषी अंहकार आता काही प्रमाणात कमी झालाय असं म्हणायला हरकत नाही. अशी गोष्ट सांगणारा ‘बेवकुफिया’ हा सिनेमा मध्यंतरी होऊन गेला. सोनम कपूर आणि आयुषमान खुराना हे दोघे आहेत त्या सिनेमात. त्याची नोकरी जाते. आणि नवीन नोकरी काही केल्या मिळत नाही. दुसरीकडे ती मोठय़ा हुद्दय़ावर असते. प्रमोशन घेते. अशा वेळी त्याला आर्थिक साहाय्य करणं तिला महत्त्वाचं वाटतं. अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. ‘दम लगा के हैशा’ हा सिनेमा खरं तर नव्वदीचा काळ रेखाटणारा. पण यात दाखवलेली नायिका अतिशय हुशार, स्वाभिमानी आणि स्पष्ट बोलणारी आहे.

सिनेमातलं स्त्रीचं हे बदलतं रूप सकारात्मक आहे. नेहमीच्या विशिष्ट चौकटीतून बाहेर काढत तिचं वेगळं रूप दाखवलंय सिनेमाने. ती बंडखोर आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आहे. ती मनमोकळी, मुक्त आहे. ती कुटुंबाला सांभाळत नोकरी करणारी आहे. असं सगळं असलं, ती स्वतंत्र दाखवली जात असली तरी ती स्वैराचार करत नाही हेही ठळकपणे दाखवलं जातंय. सिनेमात दाखवत असलेल्या गोष्टींचं प्रत्यक्ष आयुष्यात अनुकरण केलं जातं असं म्हटलं जातं. असं असलं तरी प्रत्येक वेळी ते शक्य असतंच असं नाही. सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या

स्त्री-व्यक्तिरेखांचं अनुकरण महिलावर्ग प्रत्यक्ष आयुष्यात करत असतीलच असं नाही. पण ते त्यांच्यासाठी मनोरंजनाचं ठरतंय आणि ते बघून त्यांना आनंद मिळतोय म्हणजेच त्यांनी ते स्वीकारलं आहे. येणाऱ्या काळात याचं प्रमाण वाढताना दिसेल. प्रत्यक्ष आयुष्यात जसं महिला पुरुषांची बरोबरी करताना दिसताहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसताहेत तसंच सिनेमांमध्येही स्त्री व्यक्तिरेखा आपला ठसा उमटवताना दिसताहेत. एकटय़ा नायिकेच्या खांद्यावर संपूर्ण सिनेमाची जबाबदारी पेलण्याइतकी कणखर स्त्री-व्यक्तिरेखा सिनेमातून दिसू लागली आहे. म्हणूनच आता खऱ्या अर्थाने हिरॉइनसुद्धा सिनेमाची ‘हिरो’ झाली आहे!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @chaijoshi11