विश्वनाथन आनंदला हरवत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने बुद्धिबळातलं विश्वविजेतेपद मिळवलं असलं तरी गेली पंचवीस वर्षे या खेळावर आपला ठसा उमटवणारा आनंद हरूनही जिंकला आहे, तो त्याच्यामुळे तरुण स्पर्धकांना मिळत असलेल्या प्रेरणेमुळे..

कोणत्याही खेळात विश्वविजेतेपद मिळविण्यापेक्षाही ते टिकविणे हेच खरे आव्हान मानले जाते. मात्र बुद्धिबळातील चमकता तारा म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने हे आव्हान मोठय़ा सक्षमतेने पेलवीत विजेतेपद राखले. त्याने भारताचा आव्हानवीर व पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या विश्वनाथन आनंद याला पराभूत केले. आनंदने ही लढत गमावली असली तरी या लढतीने पुन्हा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रास नवीन प्रेरणा दिली आहे यातच त्याचा विजय आहे.

चेन्नईत गतवर्षी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत आनंदला पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी आपल्याच देशात खेळण्याचे मानसिक दडपणच त्याच्यावरहोते हे या लढतीत पाहावयास मिळाले होते. यंदाची विश्वचषक लढत रशियातील सोची या सुंदर शहरात आयोजित करण्यात आली होती. विजेतेपद राखण्याचे दडपण कार्लसनवर होते. अर्थात या खेळातील ‘वंडरकिड’ म्हणून ख्याती मिळविलेल्या कार्लसन याने अतिशय संयम दाखवीत खेळ केला. त्याने ही लढत एक डाव बाकी असतानाच ६.५-४.५ अशा फरकाने जिंकली. चौसष्ट घरांच्या या खेळातील आपली हुकमत त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या लढतीत कार्लसन याने तीन वेळा डाव जिंकला तर एकदा आनंदने विजय मिळविला. उर्वरित सात डावांमध्ये बरोबरी झाली. गतवेळच्या लढतीत आनंदला एकदाही डाव जिंकता आला नव्हता. यंदा आनंदने एक डाव जिंकला ही त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.

आनंद याने गतवेळी चेन्नईत विश्वविजेतेपदाची लढत गमावली त्या वेळी आनंदचा अवतार संपला, भारतामधील बुद्धिबळ क्षेत्रातही मरगळ निर्माण होईल अशी सर्वत्र टीका झाली होती. त्याकडे दुर्लक्ष करीत आनंदने स्वत:च्या सरावावर लक्ष केंद्रित केले होते. त्याने आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तुल्यबळ खेळाडू फॅबिआनो कारुआना याने भाग घेतला नव्हता. आनंदने या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करीत प्रथम स्थान मिळविले. आनंदच्या या फिनिक्स भरारीने जगातील सर्व बुद्धिबळ पंडितांना आश्चर्यचकित केले होते. त्यामुळेच आनंद व कार्लसन यांच्यात पुन्हा होणाऱ्या लढतीविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती.

चेन्नईतील विश्वविजेतेपदा पाठोपाठ कार्लसन याने जलद व ब्लिट्झ या दोन्ही प्रकारच्या जागतिक स्पर्धेतील अजिंक्यपदावर आपली मोहोर नोंदविली. एकाच मोसमात ही तीनही अजिंक्यपदे मिळविणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे. त्यानंतर एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आनंदने कार्लसन याच्याविरुद्ध एक डाव जिंकला होता. अर्थात त्यानंतर आनंदला कार्लसनने पुन्हा हरविले होते. विश्वविजेतेपदाच्या लढतीत कार्लसन याचे पारडे जड होते. तरीही आनंदकडूनही तुल्यबळ लढतीची अपेक्षा होती. या लढतीत आनंदने तीन डाव गमावले, त्यामध्ये कार्लसनच्या तल्लख बुद्धिमत्तेबरोबरच आनंदने केलेल्या अक्षम्य चुकीचाही महत्त्वाचा वाटा होता. प्रतिस्पर्धी खेळाडूविषयी त्याने केलेले अंदाज खोटे ठरले व कार्लसनच्या चतुरस्र खेळाबाबत तो काहीसा गाफील राहिला. या तीनही डावांमध्ये विजयाची संधी असताना आनंदने विनाकारण धोका पत्करून केलेल्या चालीही त्याच्या अंगाशी आल्या. या लढतीमधील सातवा डाव तब्बल ११२ चालींनंतर बरोबरीत सुटला. या प्रदीर्घ चाललेल्या डावात कार्लसन याच्या कल्पकता, संयम, चिकाटी व जिगरबाज वृत्तीचा प्रत्यय आला. या डावात आनंद हा दोन प्याद्यांनी वरचढ होता. तरीही जिद्द न सोडता कार्लसन याने शेवटपर्यंत कडवी लढत देत आनंदला हा डाव बरोबरीत सोडण्यास भाग पाडले. दहाव्या डावानंतर कार्लसन याच्याकडे एक गुणाची आघाडी होती. त्यामुळे शेवटचे दोन डाव आनंदसाठी करो वा मरो असेच होते. आनंदने अकरावा डाव जिंकण्यासाठीच खेळ केला. त्याने २३ व्या चालीस प्याद्याची चाल खेळली व कार्लसनला लालूच दाखविण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ त्याने आक्रमणासाठी योग्य व्यूहरचना मिळावी या हेतूने कार्लसनचा उंट घेताना स्वत:च्या हत्तीचा बळी दिला. हीच त्याच्यासाठी घोडचूक ठरली. कार्लसन याने अतिशय संयमाने चाली करीत हळूहळू या डावावरील पकड मजबूत करीत आनंदचे डावपेच सपशेल उधळून लावले. पराभव अटळ आहे हे लक्षात येताच आनंदने शरणागती स्वीकारली. कार्लसन हा डाव लांबवीत खेळण्याच्या तंत्रात वाकबगार आहे. याउलट आनंद हा आक्रमक चाली करण्यात माहीर आहे. मात्र विश्वविजेतेपदाच्या लढतीत डावाच्या शेवटच्या तंत्रामध्ये आनंदकडून दडपणाखाली चुका होतात हेच पुन्हा येथे सिद्ध झाले आहे. वेळेच्या बंधनात चाली करताना व विजय अनिवार्य असताना खेळण्याच्या दडपणाखाली आनंदकडून हकनाक चुकीच्या चाली केल्या जातात हेही या वेळी दिसून आले.

कार्लसन हा केवळ २३ वर्षांचा खेळाडू आहे तर आनंद हा ४४ वर्षांचा आहे. तेराव्या वर्षीच ग्रँडमास्टर किताब मिळवीत कार्लसन याने आपल्या भावी कारकीर्दीची चाहूल दिली होती. आंतरराष्ट्रीय मानांकनात २ हजार ८८२ गुणांवर झेप घेणारा तो इतिहासातील पहिलाच खेळाडू आहे. त्याची ही कामगिरी पाहता तो अनेक वर्षे बुद्धिबळ क्षेत्रात आपली हुकमत गाजवील असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.

आनंदसाठी विश्वविजेतेपद मिळविण्याची कदाचित अखेरची संधी होती. फॅबिआनो कारुआना, हिकारू नाकामुरा यांच्यासह अनेक युवा खेळाडू जागतिक स्तरावर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बुद्धिबळात वय कधीही आड येत नाही असे म्हटले जात असले तरी गेल्या दोन वर्षांमधील आनंदची एकूण कामगिरी पाहता विश्वविजेतेपद हे त्याच्यासाठी दिवसेंदिवस दूर जात आहे असेच म्हणता येईल.

आनंद व कार्लसन यांच्यातील लढतीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर सर्व दिवस दाखविण्यात आले हीच या खेळाच्या दृष्टीने उत्तुंग झेप होती. त्याचप्रमाणे अनेक वाहिन्यांवरही या लढतीची क्षणचित्रे दाखविली जात होती. अनेक वेबसाइट्सवर, यूटय़ूबवरही ही लढत दाखविली जात होती. या सर्वच गोष्टींचा चाहत्यांनी मनमुरादपणे आनंद घेतला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी जसे वातावरण निर्माण केले जाते तसेच काहीसे वातावरण आनंद-कार्लसन लढतीच्या वेळी निर्माण झाले होते. खऱ्या अर्थाने हा खेळ घराघरात पोहोचण्यासाठी ही लढत पुन्हा उपयुक्त ठरली. आनंदने ही लढत गमावल्यामुळे या खेळाच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील पण त्यांना अजूनही आशा आहे की आनंद विश्वविजेतेपदावर पुन्हा मोहोर नोंदवील.

कार्लसन याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आणि त्यानंतर आनंदसारख्या बलाढय़ खेळाडूवर मात करीत प्रथमच विश्वविजेता होण्याची किमया केली. अव्वल मानांकनाबरोबरच विश्वविजेतेपद मिळविण्याचा अनोखा पराक्रम कार्लसन याने केला आहे. यंदाचे वर्ष त्यानेच गाजविले. आव्हानवीर ठरविण्यासाठी झालेल्या स्पर्धेत त्याने बाजी मारली. गृहपाठापेक्षा ऐनवेळी डावात होणाऱ्या बदलानुसार रणनीती बदलून प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण आणण्याची शैली त्याने दाखवून दिली. अनातोली कापरेव्ह, गॅरी कास्पारोव्ह व आनंद यांच्यासारख्या श्रेष्ठ विश्वविजेत्या खेळाडूंच्या मालिकेत आपण स्थान घेऊ शकतो हेही त्याने पुन्हा दाखवून दिले आहे. अनेक वर्षे जागतिक स्तरावर अव्वल स्थान टिकविण्याची क्षमता त्याच्याकडे आहे याचा प्रत्ययच त्याने घडविला आहे.

आनंदने गतवर्षी विश्वविजेतेपदाची लढत गमावल्यानंतर भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावर अनिष्ट परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर जागतिक कनिष्ठ स्पर्धा आयोजित करण्याचा मान पुणे शहरास मिळाला. या स्पर्धेस पुरस्कर्ते व प्रसिद्धी याबाबत संयोजक कुठेही कमी पडले नाहीत. ही गोष्ट लक्षात घेता आनंदच्या पराभवाचा अनिष्ट परिणाम भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावर झालेला नाही हे स्पष्ट झाले आहे. एक मात्र नक्की की आता भारताच्या पुढच्या पिढीतील खेळाडूंनी आनंदकडून स्फूर्ती घेत विश्वविजेतेपदापर्यंत कशी झेप घेता येईल या दृष्टीने सकारात्मक विचार केला पाहिजे. आनंदने गेल्या पंचवीस वर्षांत जागतिक स्तरावरील बुद्धिबळ क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे, त्यामुळे आता या खेळाविषयी आपल्या देशात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धाची संख्या वाढली आहे, सुविधा व सवलती मिळू लागल्या आहेत ही गोष्ट लक्षात घेता आता युवा खेळाडूंवर भारतीय तिरंगा जागतिक स्तरावर फडकविण्याची जबाबदारी आहे. नवीन वर्षांत कार्लसनचा आव्हानवीर ठरविण्यासाठी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी आनंद सहभागी होईल. आनंदचा सूर सध्या हरविला असला तरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तो पुन्हा उत्तुंग भरारी घेईल अशी अपेक्षा आहे. मात्र आनंदप्रमाणे आपणही उत्तुंग झेप घेण्यासाठी एकाग्रतने, निष्ठेने प्रयत्न केले पाहिजेत ही भावना पी. हरिकृष्ण, कृष्णन शशीकिरण यांसारख्या खेळाडूंनी जपली पाहिजे व त्याप्रमाणे चौसष्ट घरांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरच आनंदचा वारसदार आपल्या देशात निर्माण होऊ शकेल.