कव्हरस्टोरी
आम्हीही माणूसच आहोत…
साधारण तीन वर्षांपूर्वी आमची एका संस्थेच्या कार्यक्रमात भेट झाली. सोशल नेटवर्किंगमुळे ओळख वाढत गेली. भेटणे, बोलणे वाढत गेले. आम्हाला एकत्र राहण्याची गरज भासू लागली. आमचं असं एकत्र राहणं रूढ समाजाच्या चौकटीला मान्य होणार नव्हतं. मात्र आम्ही निर्णय घेतला. तीन वर्षांपासून आमचे नाते जुळून आले. तीन वर्षांपासून जरी आमचे संबंध असले तरी, दोन वर्षांपासून आम्ही एकत्र राहात आहोत. स्त्री-पुरुष नात्यापेक्षा आमचे नाते वेगळे असले तरी एखाद्या लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणेच आमचे घरातील वातावरण आहे. एकमेकातील गुणधर्म ओळखून भाजी आणणे, स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता राखणे अशी घरातील कामे आम्ही वाटून घेतली आहेत. आमची भांडणेदेखील भरपूर होतात, पण ती लगेच मिटतातदेखील.
आम्ही भाडय़ाच्या घरात राहात असल्यामुळे आम्हाला आमची ओळख लपवणे गरजेचे वाटते. शेजाऱ्यांच्या नजरेत आम्ही दोन अविवाहित मुलेच आहोत. कायदा असो वा नसो आपला समाज अजून अशी नाती स्वीकारण्यास तयार नाही, त्यामुळे समाजाच्या दृष्टीने काही प्रमाणात तडजोड ही करावीच लागते, पण त्यामुळे आमच्या खासगी आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. आमच्या जवळच्या मित्रमंडळींना आमच्या नात्याबद्दल माहीत आहे. आम्ही समलिंगी आहोत हे आमच्या आईवडिलांनादेखील माहीत आहे. मात्र आम्ही एकमेकांबरोबर नात्यात राहतो आहोत हे अजून सांगितले नाही. आम्ही आज जरी तिशीच्या आसपास असलो तरी फार काळ असे एकत्र राहणे समाजाच्या नजरेतून त्रासदायक ठरू शकते. दोन अविवाहित मुलं एकत्र राहात आहेत म्हटल्यावर राहायला जागादेखील मिळणे अवघड होऊ शकते.
समलिंगी व्यक्तींबद्दल बोलताना सर्वसाधारणपणे समाजाचा दृष्टिकोन हा सेक्स, सेक्स आणि सेक्स हाच असतो. आमच्याकडे सेक्स मॅनिक म्हणून पाहिले जाते. खरे तर आमचे प्रश्न केवळ शारीरिक नाहीत. त्यापलीकडे जाऊन मानसिक पातळीवरून याकडे पाहण्याची गरज आहे. शारीरिक फरक, लैंगिकतेतील फरक जरी असला तरी त्याही पलीकडे आम्ही माणूस आहोत. आम्हाला आवडीनिवडी आहेत, भावनिक, मानसिक गरजा आहेत. त्या आमच्या नात्यात आम्ही मिळवू पाहात आहोत. न्यायालयाने निर्णय देताना माणूस म्हणून आमच्या या गरजांचा विचार करायला हवा होता. केवळ सेक्ससाठी एकत्र येणारे जोडपे ही भावना यातून वगळून याकडे पाहणे गरजेचे होते. देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळणारी साधी वागणूकदेखील आम्हाला मिळत नाही. आम्हाला मिळते ती नागरिकत्वाची दुय्यम वागणूक, हेच आमचे खरे दु:ख आहे.  
(सुरक्षेच्या कारणास्तव नावे दिलेली नाहीत.)

दुजाभाव का देता?
शौविक घोष, पुणे<br />वयाच्या १६व्या वर्षी लक्षात आले की मला भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण नाही. सुरुवातीस मला स्वत:लाच हे स्वीकारायला बराच वेळ लागला. हे नैसर्गिक आहे की अनैसर्गिक यावर माझं तेव्हा काहीच मत नव्हतं. मी असा एकटाच आहे का, मी इतरांपासून वेगळा आहे का? असे अनेक प्रश्न तेव्हा मला सतवायचे. वयाच्या २१व्या वर्षी मला लक्षात आले की माझ्यासारखे अनेक लोक आहेत. समलैंगिक असणे हा आजार नाही हे मला तेव्हा लक्षात आले. मी माहिती मिळवत गेलो. जागतिक आरोग्य संघटनेने देखील आजारांच्या यादीत समलैंगिक असण्याचा समावेश केलेला नव्हता हे माझ्या लक्षात आले. सामाजिक दृष्टीने विचार केल्यावर तर जाणवले की आपल्याकडे विनाकारण या विषयांवर न बोलण्याचे बंधन घातले आहे. आधुनिक जीवनशैली आणि पाश्चात्त्य विचारांमुळे आपल्याकडे असे विचार आले आहेत असेदेखील सांगितले जाते पण ते त्यात काही तथ्य नाही. थोडक्यात काय तर एक पूर्णत: नैसर्गिक अशीच ही घटना आहे. अर्थात एकदा मला पटल्यावर हे माझ्या घरी पटवून देणे महत्त्वाचे होते. माझ्या आईपासून मी काहीच लपवून ठेवत नसे. त्यामुळे तिला हे पटवून देणे महत्त्वाचे होते. तिला जेव्हा हे मी सांगितले तेव्हा तिला सुरुवातीस धक्काच बसला होता. डॉक्टरांकडे जाऊन काही उपाय करू असेदेखील तिने सुचविले होते. मात्र हा आजार नसून यात अनैसर्गिक काही नाही हे तिला पटवून द्यायला मला तीन वर्षे लागली. त्यानंतर मी माझ्या जवळच्या अनेक मित्रांनादेखील सांगितले. त्यांनीदेखील मला समजावून घेतले. कोलकाताहून पुण्यात कामाला आल्यावर मात्र सुरुवातीस काही काळ कामाच्या जागी मी काहीसा गप्प गप्प राहात असे. फारसा कोणामध्ये मिसळत नसे. आपल्या देशात कामाच्या जागी बऱ्याच वेळा वैयक्तिक गप्पा बऱ्याच होतात. त्यामुळे कधी तरी कोणीतरी मला लग्नावरून छेडायचे, मात्र मी फारसा बोलायचो नाही. पण मग हळूहळू मी माझ्या कामाच्या संदर्भातील ग्रुपमध्ये काही लोकांना माझ्याबद्दल सांगितले. त्यांनीदेखील मला स्वीकारले आहे.
माझ्या बाबतचे हे सत्य माझ्या जवळच्यांनी स्वीकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर समलिंगी दबून राहतील, असे म्हटले जात आहे. पण मला वाटते की लोक तुम्हाला कसे स्वीकारतात हे महत्त्वाचे आहे. माझ्या आजूबाजूच्या लोकांनी स्वीकारल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यामध्ये फार काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. ते आम्हाला गुन्हेगार समजतील असेदेखील मला वाटत नाही. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीदेखील जे लोक आम्हाला पाठिंबा देत होते त्यांचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यांच्या नजरेत आम्ही गुन्हेगार नाही आहोत, न्यायालयाचा निर्णय काहीही असो. ज्यांनी आम्हाला स्वीकारलेच नव्हते त्यांच्याबाबत न्यायालयाच्या निर्णयामुळे काही बदल होईल असे वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता आम्हाला पोलीस पकडतील, हॅरेसमेंट होईल या भीतीच्या पलीकडे जाऊन आमच्या भावनांना धक्का पोहोचला आहे याचे सर्वात जास्त दु:ख आहे. आमच्या ओळखीवर एक प्रकारे डाग लागला आहे. आम्ही या देशात एक दुय्यम नागरिक आहोत ही संभावना यामध्ये दिसून येत आहे. आम्ही या देशाचे सामान्य नागरिक नाही आहोत का, सामान्य नागरिकाचे सन्मान आम्हाला का नाही मिळणार? हा दुजाभाव आम्हाला खटकणारा आहे, आमचा त्याला विरोध आहे. म्हणूनच या निर्णयाविरुद्ध आंदोलन करताना एक प्रकारे खूप छान वाटते आहे. कदाचित समाजात २००९च्या निर्णयानंतर आलेला मोकळेपणा नसेल, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आज देशात समलिंगी संबंधाची मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. माध्यमांनी आम्हाला साथ दिली आहे. काही समलिंगीनी हा निर्णय आल्यानंतरदेखील आपल्या घरी आपण समलिंगी आहोत हे सांगितले आहे आणि आजच्या परिस्थितीतदेखील ते घरच्यांनी मान्य केले आहे. आज देशातील १८ शहरांत समलिंगी व्यक्तींनी निदर्शने केली आहेत. भविष्यात मी कोणा समलिंगी व्यक्तीशी नातेसंबंधात राहणार की नाही हा भाग वेगळा, पण समाजात आमचे वास्तव स्वीकारण्याची गरज आहे.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

पुन्हा हरवणार मोकळेपणा…
टिनेश चोपडे, पुणे
साधारण सोळा-सतरा वर्षांचा असताना मला माझी लैंगिकता पुरेशी स्पष्ट होत नव्हती. स्त्रियांपेक्षा पुरुषांचे आकर्षण वाटायचे, पण याला समलैंगिकता म्हणतात हेच माहीत नव्हते. जळगावमध्ये त्याकाळी या विषयाबाबत फारशी चर्चादेखील होत नसे. इंटरनेटचा वापरदेखील जेमतेमच होता. घरी या विषयावर बोलणे शक्यच नव्हते. परिणाम नैराश्य. त्यामुळेच १२ वीच्या परीक्षेत कमी मार्क पडले. पुढे कॉलेजमध्ये जाऊ लागलो. बरोबरचा मुलांचा ग्रुप मुलींची थट्टामस्करी करायचा, मीदेखील सामील व्हायचो, पण ते मनापासून नसायचे. अशाच वातावरणात मी बीसीएस पूर्ण केले. पुण्यात आलो. येथे मात्र मला बरीच माहिती मिळत गेली. नोकरी करत असताना इंटरनेटचा वापर वाढला. माझ्याबद्दल मीच माहिती शोधत गेलो. तेव्हा मला लक्षात आले की मला जे पुरुषांबद्दल आकर्षण आहे त्याला समलैंगिकता म्हणतात. वयाच्या २१व्या वर्षी मला कळले मी गे आहे. पण मी या जगात एकटाच नाही हेदेखील लक्षात आले. माझ्यासारखे अनेकजण आहेत. माझ्या लैंगिकतेबाबतचा जो एक न्यूनगंड होता तो दूर झाला.
समपथिकच्या संपर्कात आलो आणि भरपूर माहिती मिळत गेली आणि लोक भेटत गेले. पुण्यात आल्यावर जेथे नोकरी करत होतो तेथील वातावरण फारसे कम्फर्टेबल नव्हते. तेथे जर कळले असते तर मला काढून टाकले असते. त्यामुळे मी ती नोकरीच सोडली. समपथिकमध्ये एड्स प्रिव्हेंशन प्रोजेक्टवर कामाला सुरुवात केली. आज या प्रोजेक्टचा मॅनेजर म्हणून काम पाहात आहे. दरम्यान २००९ साली दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर सर्वत्र एक आश्वासक वातावरण तयार झाले होते. मला स्वत:ला दुहेरी आयुष्य जगायचे नव्हते. माझ्या वयाचा विचार करता घरून लग्नासाठी विचारणा होत होती. ढोंगीपणा करून मला कोणा मुलीचे आयुष्य बरबाद करायचे नव्हते. तेव्हा मी माझ्या घरी आईवडिलांना सांगितले, मी गे आहे. आईवडिलांना त्रास झाला. एक मुलगा म्हणून त्यांच्या काही अपेक्षा होत्या, त्यांना धक्का बसला होता. आपल्या मुलाचे समाजाच्या लैंगिक चौकटीच्या बाहेरचे आयुष्य त्यांना काहीसे अनपेक्षित होते. पण ते हळूहळू याकडे समंजसपणे पाहू लागले आहेत. मलाच माझी लैंगिकता समजायला २३ वर्षे लागली होती, त्यांना हे समजण्यासाठी मी वेळ दिला आहे.
महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, मला हे कळायला, समजून घ्यायला इतका वेळ गेला. आजही देशात काही महत्त्वाची शहरे सोडल्यास सर्वत्र असे समजून घेणारे वातावरण, मोकळेपणा अजिबात नाही. जळगावसारख्या ठिकाणी आजदेखील तज्ज्ञ व्यक्ती नाहीत. हेल्पलाइनच्या माध्यमातून आम्हाला अनेक ठिकाणांहून असंख्य प्रश्न विचारले जातात. पण दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मध्यंतरी ज्या प्रमाणात या विषयाबाबत एक मोकळेपणा आला होता तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टिकून राहणार नाही अशी धास्ती वाटत आहे. माझ्या आईलादेखील या निर्णयामुळे खूप दु:ख झाले. मुलाच्या स्वातंत्र्यावर गदा येईल का असे तिला वाटू लागले आहे. हीच भीती समाजातील अनेक पालकांच्या मनात डोकावत आहे. गेल्या काही वर्षांत समपथिकच्या माध्यमातून आम्ही आयबीएम, इन्फोसीस अशा आयटी कंपन्यांमध्ये वर्कशॉप्स घेतली आहेत. समलिंगी व्यक्तींना जर कामाच्या ठिकाणी दुजाभावाची वागणूक मिळणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे. मात्र आताच्या निर्णयामुळे या प्रक्रियेलादेखील खीळ बसू शकते.
शब्दांकन : सुहास जोशी