कुरुंदवाडसारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या छोटय़ाशा गावात व्यायामशाळा चालवणाऱ्या प्रदीप पाटील यांच्या तीन शिष्यांनी या वेळच्या कॉमनवेल्थमध्ये अपेक्षा उंचावणारी कामगिरी केली. त्यांच्या या यशात मोलाचा वाटा आहे त्यांच्या गुरूचा..

ऑलिम्पिकमध्ये भारताला स्वातंत्र्यानंतर पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, राष्ट्रकुल स्पर्धा गाजविणारे सतपाल, कर्तारसिंग, हरिश्चंद्र बिराजदार या कुस्तीगिरांनी भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकविला. या खेळाडूंनी केवळ स्वत:च्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले. कोणत्याही राष्ट्रीय क्रीडा संस्थेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा परदेशात शिकून आलेल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची सुविधा नसतानाही या मल्लांनी गौरवास्पद कामगिरी केली. वेटलिफ्टिंगमध्ये कोणतीही तांत्रिक पाश्र्वभूमी नसताना केवळ आपल्या अनुभवातून अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडविण्याचे काम कुरुंदवाडसारख्या छोटय़ा गावात प्रदीप पाटील हे करीत आहेत.
ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ओंकार ओतारी, गणेश माळी व महेश ऊर्फ चंद्रकांत माळी या तीन खेळाडूंनी कांस्यपदक मिळवीत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केली. हे तीनही खेळाडू कुरुंदवाड येथील रहिवासी असून वेटलिफ्टिंगचे बाळकडू त्यांनी प्रदीप पाटील यांच्या हक्र्युलस व्यायामशाळेत घेतले आहे. या तीनही खेळाडूंच्या यशात पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचा सिंहाचा वाटा आहे. हे तीनही खेळाडू आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील संभाव्य पदक विजेते खेळाडू मानले जात आहेत.
प्रदीप पाटील यांना लहानपणापासून व्यायामाची विलक्षण आवड होती. महाविद्यालयीन दशेत असताना १९७८ मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसमवेत व्यायामशाळा सुरू केली. महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत त्यांनी एकीकडे या व्यायामशाळेत वेटलिफ्टिंग शिकविण्याचे कार्य अव्याहत सुरू ठेवले. आपल्या गावातील मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना वाईट सवयी लागू नयेत हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवीत पाटील व त्यांचे मित्र गावातील मुलांना नियमित व्यायाम करायला लावीत. हळूहळू पाटील हेच या सर्वाचे व्यायाम प्रशिक्षक झाले. त्यांच्या व्यायामशाळेची लोकप्रियता वाढत गेल्यानंतर त्यांना जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या शेतातच दहा हजार चौरस फूट जागेत ही व्यायामशाळा हलविली. तेथे चार हजार चौरस फूट जागेत वेटलिफ्टिंगकरिता स्वतंत्र कक्ष व उर्वरित जागेत अन्य व्यायामाची उपकरणे ठेवीत त्यांनी प्रशिक्षणाचे कार्य सुरू ठेवले आहे. प्रशिक्षणाचे कोणतेही शुल्क न घेता ते हे काम करीत आहेत. व्यायामशाळेचे जे काही शुल्क येते त्या रकमेचा संपूर्ण विनियोग केवळ व्यायामशाळेसंबंधी सुविधांकरिताच ते करतात.
पाटील यांनी स्वत: कधीही वेटलिफ्टिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला नाही किंवा या खेळाची अधिकृत प्रशिक्षण पदवीही घेतलेली नाही हे ऐकल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल. पुस्तकरूपी प्रशिक्षणापेक्षा अनुभव हाच आपला खरा गुरू असतो हेच तत्त्व डोळ्यांसमोर ठेवीत व विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा बारकाईने अभ्यास करीतच ते प्रशिक्षण देतात. आपल्या व्यायामशाळेत येणाऱ्या प्रत्येकाच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करण्याची सवय त्यांना तरुणपणीच लागली आहे. प्रत्येक खेळाडूकरिता त्यांनी स्वतंत्र दैनंदिनी ठेवली आहे. या खेळाडूची कौटुंबिक माहिती, त्याच्या दैंनदिन सवयी, आहाराबाबतची आवडनिवड आदी सर्व काही त्यामध्ये ते स्वत: लिहितात. अर्थात जे पुस्तकात वाचूनही कळत नाही असे तंत्र आपल्याला विविध खेळाडूंच्या तंत्रातून कळते. हे खेळाडू कोठे चुकतात, व्यायाम करताना त्यांना कोठे अडचणी येतात, केव्हा त्यांना वेदना होतात, त्यांना दुखापती केव्हा व कशामुळे होतात आदी निरीक्षणांमधूनच आपल्याला खूप काही शिकावयास मिळते हे तंत्र उपयोगात आणूनच पाटील काम करीत असतात.
अमेरिकेतील फिटनेसतज्ज्ञ
डॉ. मेल सेफ हे जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचे मार्गदर्शक मानले जातात हे पाटील यांच्या वाचनात कधी तरी आले. त्यांनी इंटरनेटद्वारे २००० मध्ये डॉ. सेफ यांच्याकडे संपर्क साधला व आपल्या कामाची माहिती त्यांना पाठविली. त्यांच्याकडून शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता वाढविण्याची माहितीदेखील पाटील यांनी मागितली. पाटील यांना खरोखरीच वेटलिफ्टिंगची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी डॉ. सेफ यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर मेल यांनी पाटील यांना इंटरनेटद्वारेच मार्गदर्शन सुरू केले. जणू काही एकलव्याप्रमाणेच पाटील हे डॉ. सेफ यांच्याकडून अधूनमधून माहिती घेत असतात.
खेळाडूंनी उत्तम नागरिकही व्हायला पाहिजे. त्यांना चांगल्या सवयी असल्या तर त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही अडचणी येणार नाहीत. व्यायामशाळेत खेळाडूंना मोबाइल वापरण्यास, पान-तंबाखू खाण्यास त्यांनी मनाई केली आहे. गावात एकाच दुचाकीवरून तीन खेळाडू एकत्र जाताना दिसले तसेच खेळाडूंनी विनाकारण जागरण केले तर त्यांना कडक शिक्षा करण्यास पाटील हे मागेपुढे पाहत नाहीत. खेळाडू हा अन्य लोकांसाठी आदर्श असतो, त्यामुळे त्याला चांगल्या सवयी आवश्यक आहेत. त्याने ‘आदर्श नागरिक’ व्हायला हवे, असे पाटील यांचे तत्त्व आहे.
उत्तेजक औषधे सेवन व वेटलिफ्टिंग यांचे अतूट नाते आहे असे भारतीय वेटलिफ्टिंग क्षेत्रात दिसून आले आहे. आपल्या व्यायामशाळेतील खेळाडूंनी उत्तेजकासारख्या अपप्रवृत्तींना बळी पडू नये म्हणून प्रत्येक खेळाडूची काही ठरावीक काळाने रक्त व लघवी तपासणी करण्याची सवय पाटील यांनी ठेवली आहे. अशा तपासणीमुळे खेळाडू शारीरिक क्षमतेत किती कमी पडतात, वेटलिफ्टिंगकरिता आवश्यक असणाऱ्या ऊर्जेत ते किती कमी आहेत याचीही माहिती मिळू शकते व पाटील हे त्यानुसार आपल्या खेळाडूंच्या आहाराबाबत योग्य ते बदल करू शकतात.
वेटलिफ्टिंगकरिता आर्थिक पाठबळ उभारणे ही काही सोपी गोष्ट नाही. मात्र त्यांनी आजपर्यंत त्यासाठी शासनाकडे कधीही अर्ज केलेला नाही. शासनाकडे अर्ज करताना खूप कागदपत्रे द्यावी लागतात तसेच हा निधी मिळविण्यासाठी खूप विलंब होतो. त्यामुळे त्यांनी कधीही शासनाकडे हात पसरलेले नाहीत. पाटील हे स्वत: तेथील एका बँकेचे संचालक आहेत तसेच तेथील रोटरी क्लबचेही वरिष्ठ पदाधिकारी आहेत. केवळ कुरुंदवाड नव्हे तर सांगली जिल्ह्य़ात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे वेटलिफ्टिंगकरिता त्यांना या संपर्कामधूनच खेळाडूंकरिता मदतीसाठी अनेक जण मदत करतात.
आणखी चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या सहा शिष्यांनी पदकांची लयलूट करावी व २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या शिष्यांनी पदकांची बोहनी करावी, असे पाटील यांचे ध्येय आहे. त्या दृष्टीने ते आतापासूनच पंधरा-वीस खेळाडूंवर लक्ष केंद्रित करीत आहेत. या खेळाडूंचा आहार, सराव, तंदुरुस्ती आदीबाबत त्यांनी नियोजन केले आहे व त्यानुसार त्याची अंमलबजावणी होत आहे ना, याची काळजीही ते घेत आहेत.
पाटील यांनी आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. असे असूनही ते अतिशय प्रसिद्धीपराङ्मुख आहेत. त्यांनी कधीही शिवछत्रपती पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही. आपल्या शिष्यांनी मिळविलेली पदके हाच आपला खरा पुरस्कार असतो. ऑलिम्पिकमध्ये आपल्या शिष्याने पदक मिळविले तर तो आपल्यासाठी खूप मोठा पुरस्कार असेल, असेच त्यांचे मत आहे.