विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

पश्चिम बंगालला आता युद्धभूमीचे स्वरूप आले असून येत्या तीन महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांपर्यंत तापमान चढेच राहणार आहे. भाजपानेही ममता बॅनर्जीना थेट आव्हान दिले असून गेल्या सहा महिन्यांपासूनच ममतांच्या बालेकिल्ल्याला जोरदार धडका देण्यास सुरुवात केली आहे. काही महत्त्वाच्या नेत्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाय आणखी बरेच महत्त्वाचे नेते आपल्या उंबरठय़ावर उभे आहेत, अशी आवई भाजपाने उठवली आहे. अशा प्रकारच्या मानसशास्त्रीय युद्धमोर्चेबांधणीत भाजपा वाकबगार आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये पाय रोवण्यास मदत झाली ती नंदिग्रामच्या आंदोलनामुळे. या आंदोलनाची आखणी सुवेंदू अधिकारी यांनी केली होती. आता तेच भाजपाच्या दावणीला आल्याने ममतांसाठी तो मोठाच धक्का मानला जातो. त्यातच सुवेंदूचे वडील शिशिर आणि भाऊ दिबेंदू हे दोघेही तृणमूलचे खासदार. त्यामुळे नंदिग्राम परिसरांत त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा प्रभाव आहे. नंदिग्रामचाच कर्ताकरविता नेता भाजपाकडे आल्याने तृणमूलच्या पायाचाच दगड निखळला असे चित्र निर्माण झाले. ज्या नंदिग्रामने तृणमूलच्या बंगालमधील विजयाचा पाया रचला तेच आता त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असे चित्र दिसू लागले. त्यातच सुवेंदू अधिकारी यांनी नंदिग्राममधून लढण्याचा मनसुबा जाहीर केल्यानंतर तर ममतांची पूर्ण कोंडी झाली असून समोर कडवे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र दिसू लागले.

दुसरीकडे भाजपाने नेहमीच्या पद्धतीनेच दुहेरी चाली खेळण्यास सुरुवात केली. विरोधकांचा पक्ष फोडायचा आणि महत्त्वाच्या नेत्यांना गळाला लावायचे म्हणजे त्यांचे नीतिधैर्य खच्ची होते आणि त्याच वेळेस ध्रुवीकरणही करायचे अशी भाजपाची दुहेरी नीती आहे. पश्चिम बंगालमध्ये या खेपेस मुस्लीम विरुद्ध हिंदू असे ध्रुवीकरण यानिमित्ताने पाहायला मिळेल. या सर्व चालींमधून भाजपाने खरोखरच कडवे आव्हान निर्माण केले खरे. मात्र नंदिग्राममधूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करून ममतांनी चतुराईने भाजपालाच प्रतिआव्हान दिले आहे.

ममतांचा हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकणारा आहे, शिवाय तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपाच्या वाटेने जाण्याचा विचार करणाऱ्यांना पुनर्विचार करायला लावणारा आहे. नंदिग्राममध्येच आंदोलन करून, आपण शेतकऱ्यांच्या तारणहार असल्याची प्रतिमा निर्माण करून त्यांवर आरूढ होत ममतांनी सलग ३४ वर्षे बंगालवर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवली होती. सध्या देशभरात शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा जोरात आणि चर्चेत आहे. त्याच वेळेस नंदिग्राममधून उमेदवारी जाहीर करत ममतांनी आपली ‘शेतकऱ्यांच्या तारणहार’ ही प्रतिमा आपल्या उमेदवारीने पुन्हा उंचावून त्या बळावर भाजपासमोर प्रतिआव्हान उभे केले आहे. या उमेदवारीतून ही लढाईअद्याप तेवढी सोप्पी नाही, असा संदेशच ममतांनी भाजपाला दिला असून ममतांची धार बिलकूल कमी झालेली नाही, असा संदेश त्याच कृतीतून त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना दिला आहे. ‘माँ, माटी, मानुश’ या नंदिग्रामातील त्यांच्या घोषणेने त्यांना सत्तास्थानी पोहोचवले, आता तीच घोषणा सत्तास्थानी राहण्यासाठी पुन्हा एकदा बुलंद करायची ही ममतांची खेळी आहे.

सध्या तरी शरद पवार वगळता राष्ट्रीय स्तरावर भाजपाला ममतांएवढा कडवा विरोध करणारा दुसरा नेता नाही. त्यामुळे त्या सत्ताकारण बंगालचे करीत असल्या तरी गेली काही वर्षे त्यांची नजर दिल्लीवरही खिळलेली आहे. नंदिग्राम हे ममतांसाठी आता तेवढे सोपे राहिलेले नाही. त्यांनाही कंबर कसून मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. त्याच वेळेस एकाच मतदारसंघापुरते मर्यादित न राहता राज्यावर लक्ष केंद्रित करण्याची दुहेरी कसरतही करावी लागणार आहे. असे असले तरी सध्या त्यांची ही चतुर खेळी भाजपाला मोर्चेबांधणीसाठी पुनर्विचार करायला लावणारी आहे एवढे निश्चित!