मुद्गल पुराण ही अशी रचना आहे ज्यात, राजा दक्षाला उद्देशून केलेला उपदेश आहे. पण तो राजासाठी नाही, तर त्याच्यासारख्या सगळ्यांसाठी आहे. व्यक्तीमध्ये सतत सुरू असलेल्या संघर्षांविषयी रूपकात्मक मांडणी करणारे हे पुराण गणेशाकडे बघण्याची आपली दृष्टीच बदलवून टाकते.
भगवान श्रीगणेशांना यथार्थरीत्या समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ग्रंथराज श्रीमद्मुद्गल महापुराण. नऊ खंड, ४२८ अध्याय आणि तब्बल २३१५० श्लोक इतका अफाट व्याप असलेला हा विशालकाय ग्रंथ.
केवळ संख्यात्मकदृष्टय़ाच नव्हे तर गुणात्मकरीत्याही अगाध, अथांग असे हे श्रीगणेशांचे शब्दरूप शिल्प. एकेका श्लोकाच्या विवरणार्थ स्वतंत्र एकेक पुस्तक प्रकाशित करावे अशा अक्षरश: शेकडो श्लोकांनी हा ग्रंथ ओतप्रोत भरला आहे.
सामान्यत: पुराणकथा म्हटले की अतिरंजित वर्णने, अतिशयोक्तीचा भडिमार, अतींद्रिय शक्तीचे चमत्कार, अकल्पनीय कथा अशीच काहीशी जनसामान्यांची प्रतिक्रिया असते. कथांना केवळ वरपांगी वाचल्यामुळेच ही प्रतिक्रिया निर्माण होते. केवळ वाच्यार्थालाच प्राधान्य देत वाचणाऱ्यांनी तयार केलेला हा ग्रह, तशाच स्वरूपात कथनही करणाऱ्यांनी अधिक दृढ केलेलाच आपणास पाहावयास मिळतो.
मात्र हे वास्तव नाही. पुराणकथा भाकड कथांचे भेंडोळे नाही तर हा अलौकिक वारसा आहे, हा सार्थ अभिमान जागृत करणारा ग्रंथराज आहे श्रीमुद्गलपुराण.
‘आध्यात्मिकता’ हा पुराणवाङ्मयाचा प्राण आहे. मात्र या ग्रंथात अद्वितीय, अलौकिक अध्यात्मविवेचना सोबतच समाजशास्त्रीय, नीतिशास्त्रीय, मनोवैज्ञानिक, मानव्य ़िवषयाची  आणि अनेक जागी वैज्ञानिक विवेचनाची अद्वितीय रेलचेल आहे. अशा स्वरूपाच्या विवेचनांचे सूत्रबद्ध आणि तरीही सुस्पष्ट कथन करणाऱ्या अगणित कथा हे श्रीमुद्गलपुराणाचे वैभव आहे. मृत्यूनंतरच्या स्वर्गाकरिता नाही तर याच जीवनाला स्वर्ग करण्याचा राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
मानवी व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च विकास आहे ईश्वरीस्वरूपात विलीनीकरण. येथे चमत्कार वा श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय नाही. ईश्वरीरूप होणे म्हणजे काय, तर अखंड आनंदरूप होणे. परब्रह्माचे वर्णन शास्त्र ‘सच्चिदानंद’ रूपात करते. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान. आपणास देह पातळीवरही काही ना काही अस्तित्व आहेच. मर्यादित का होईना ज्ञान आहेच. ते २४ तास आहेच. अडचण फक्त असते ती आनंदाची. आपणात आणि भगवंतात हाच फरक आहे. आपण २४ तास आनंदी नसतो आणि भगवान अखंड आनंदातच असतात. त्याच रूपात आपणही २४ तासांत आनंदी होण्याचा उत्तम उपाय आहे श्रीमुद्गलपुराण.
आपल्या या आनंदी नसण्याला कारण काय? शास्त्र सांगते ‘आत्मविस्मृती.’ खरं तर आपले मूळ रूप ‘आनंद’च आहे. केवळ शाब्दिक खेळ नाही. आनंद हे आपले स्वरूप असल्यामुळेच त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. दु:ख हे आपल्या स्वरूपाच्या विपरीत आहे आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी आपण अखंड प्रयास करतो.
ही दु:खमयता, हे दैन्य, हा त्रास, ही पीडा, ही बेचैनी, ही अशांतता, हे असमाधान माणसाच्या वाटय़ाला का येते? याची नेमकी चिकित्सा करताना श्रीमुद्गलपुराणाने प्रजापती दक्षाची कथा सांगितली आहे.
अर्थात कोणतीही कथा अभ्यासण्यापूर्वी एक गोष्ट शांतपणे मनी ठसविणे अत्यावश्यक आहे की अभ्यास ‘कथेचा’ नव्हे ‘कथनीयाचा’ करायचा असतो.
हा सिद्धान्त व्यवस्थित समजून घेतला तर आणि तरच श्रीमुद्गलपुराण किंवा अन्य कोणतेही पुराण यथार्थरीत्या कळू शकेल. ‘कथा कशी आहे’ याचा अभ्यास पर्याप्त नसतो. अभ्यासासाठी एक दृष्टी हवी. ‘कथा कशी आहे’ पेक्षा ‘ती तशी का आहे’ याचे चिंतन घडल्यासच कथेचा गूढार्थ उलगडू शकतो.
पुराणाच्या बहुतांश कथा या रूपकात्मक प्रतीकात्मक कथा असतात तथा त्यांची कथनशैली ही अनेकदा ‘अन्योक्ती’ स्वरूपाची असते.
अन्योक्ती हा संस्कृत वाङ्मयाचा एक विशेष प्रकार आहे. कोणत्यातरी प्राण्याला, पक्ष्याला वा निर्जीव पदार्थालाही उद्देशून काव्य केले जाते. उदा. ‘गर्दभान्योक्ती’मध्ये गाढवाला उद्देशून काव्य असते. आता गाढवाला काव्य समजेलच कसे? ते समजत नाही म्हणूनच तर ते गाढव ना? पण तरी काव्य असते. गाढवाला काव्य समजत नाही, पण हे त्या कवीला समजत नसते का? तरी काव्य का केले जाते? कारण सरळ आहे- कविता गाढवासाठी नाही तर जे गाढवासमान आहेत त्यांच्यासाठी असते. न दुखावता वाचकांचे, श्रोत्यांचे दुर्गुण त्यांच्या गळी उतरवत त्यांच्या निरसणार्थ प्रोत्साहित करणारा हा वाङ्मय प्रकार आहे.
पुराणांची रचना अशी अन्योक्ती स्वरूपाची असते. श्रीमुद्गलपुराण ही अशाच रूपात ‘दक्षान्योक्ती’ आहे. राजा दक्षाला केलेला हा उपदेश आहे. राजा दक्षासमान असणाऱ्या सगळ्यांकरिता. कसा आहे राजा दक्ष. श्रीमुद्गलपुराण सांगते दक्ष ‘अज मस्तकधारी’ आहे. त्याचे डोके आहे ‘बोकडाचे’.
सगळ्याच पुराणात ही अजमस्तकाची कथा आली आहे. श्रीशंकरांचा अपमान सहन न झालेल्या दक्षकन्या सतीने आत्मदहन केले. त्या विरहाने क्रोधाग्नीतप्त श्रीशंकरांनी वीरभद्राद्वारे दक्षयज्ञाचा विनाश केला. वीरभद्राने दक्षाचे मस्तकच कापले आणि यज्ञकुंडात फेकले. शेवटी सर्वानी स्तुती केल्यावर श्रीशंकर प्रसन्न झाले आणि दक्षास बोकडाचे मस्तक बसविण्यात आले.
ही कथा प्रतीकात्मक आहे. बोकडाचा विचार करताना त्याच्या आवाजाला आधारभूत धरले आहे. बोकडाचा आवाज आहे ‘मे-मे.’ संस्कृतमध्ये ‘मे’ हे अस्मद् सर्वनामाचे चतुर्थी आणि षष्ठीचे एकवचन आहे. त्याचा मराठीत अर्थ आहे मला आणि माझे.
आपल्यातील बहुसंख्य लोक दिवसभर फक्त मला-मला आणि माझे-माझे असेच करत असतात. याचे संस्कृत भाषान्तर ‘मे-मे-मे-मे’ असेच होते. अशा रूपात जो अविरत ‘मेमे’ करीत राहतो. तो ‘बोकड.’ तो राजा दक्ष. अर्थात आपण सगळेच दक्ष. पर्यायाने आपल्यासाठी आहे श्रीमुद्गलपुराण. आत्मविस्तृत दक्षात आत्मज्ञान देण्याकरिता केलेला उपदेश आहे श्रीमुद्गलपुराण. पर्यायाने आपणास सगळ्यांस परम आनंदी होण्याची सुसंधी आहे श्रीमुद्गलपुराण.
या पुराणाची रचनाच मोठी अद्भुत आहे. यात नऊ खंड आहेत. पैकी आठ खंडांत आठ विनायकांच्या कथा प्रधानविवेचन विषय आहेत. ‘अष्टविनायक’ ही मूळ संकल्पना आहे श्रीमुद्गल पुराणाची. गंमत म्हणजे केवळ वरपांगी पाहाल तर आठही कथा समानच आहेत. एकसुरीच आहेत. पण या कथा वाच्यार्थाच्या नाहीतच हे सांगण्याकरिता या आठ खंडांतील केवळ राक्षसांची नावेही पर्याप्त आहेत.
आठ खंडांतील आठ असुर आहेत अनुक्रमे मत्सरासुर, मदासुर, मोहासुर, लोभासुर, क्रोधासुर, कामासुर, ममासुर, अहंकारासुर. केवळ नावे पाहताच आपणास ध्यानी येईल की हे पुराण काही ‘आगळेच’ आहे.

आपल्याच आत विद्यमान विकारांना येथे असुर रूपात वर्णिले आहे. याचा तात्पर्यार्थ हाच की जर विकार अंतर्गत असतील, असुर अंतर्गत असतील तर त्यांच्या नियंत्रणार्थ प्रगटणारे विनायक बाहेरचे कसे चालतील? अर्थात आपल्याच आत विद्यमान असुरांचा आपल्याच आत विद्यमान दैवी सत्तेशी अविरत चालणारा संघर्ष आहे श्रीमुद्गलपुराण.
या आठही राक्षसांच्या कथा समान आहेत. हे सर्व राक्षस कोणत्या तरी देवतेपासून वा ऋषीपासून उत्पन्न झाले आहेत. मग ते ‘राक्षस असून’ तपश्चर्या करतात. अद्वितीय वरदाने मिळवतात आणि मग ठरलेली रीत आहे ‘स्त्रीमांसमदिरसक्त:।’ पुराण यालाच राक्षस म्हणते.
राक्षस ही वृत्ती आहे. समुद्रमंथनाची कथा पहा. जेवढी मेहनत देवतांनी केली तेवढीच दैत्यांनी केली. पण दोघांनी सेविले काय? देवता अमृत मिळेपर्यंत अखंड कार्यरत राहिल्या आणि दैत्य मात्र ‘दारू’ पिऊन मोकळे झाले. प्रतीकात्मक कथा आहे ही. दिवसभर मेहनत करून सायंकाळी दारूत मातीत घालतात ते दैत्य.
हे दैत्य प्रचंड उन्मत्त होतात. अगदी स्वर्गातून देवतांना हद्दपार करतात. मग निर्वासित देवता गणेशाराधन करतात. परिणामरूपात भगवान गणेश एकेका अवतारास धारण करतात.
त्या त्या विनायकांचा आणि राक्षसांचा संघर्ष होतो. गंमत म्हणजे एकही राक्षस मारलेला नाही. श्रीमुद्गलपुराणाचे हेच वैभव आहे. येथे राक्षसाचा वध नाही. का नाही? कारण तो संभवच नाही.
काम, क्रोधादिक विकारच येथे असुर आहेत. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे ते कोणत्यातरी देवतेपासून निर्माण झाले आहेत. त्याच्यातून प्रगटले म्हणजे त्यांच्यात होतेच ना? नसतेच तर आले कुठून असते? वेगळ्या शब्दात देवादिकांना, ईश्वर  महेश्वरांनाही जर हे विकार सुटले नाही तर सामान्यांची काय कथा?
काम सोडा, क्रोध त्याग, मत्सरापासून दूर राहा इत्यादी वाक्ये लोक धडाधड वापरतात पण श्रीमुद्गलपुराण शांतपणे विचारते की मुळात हे संभव तरी आहे का? जे सुटतच नसते त्याला सोडा म्हणण्याचा उपयोगच काय? श्रीमुद्गलपुराणाची ही नेमकी रचना पाहा. त्यात याच मूलभूत प्रश्नाला समोर ठेवत त्याचे समाधान दिले आहे.
या आठही राक्षसांसह युद्ध होते. त्या युद्धात राक्षसाची सेना, सेनापती, आमात्य, पुत्र इ. सर्व मारले जातात. या सगळ्यांची कथनीही प्रतीकात्मकच आहे. अर्थात या विकारांच्या साह्य़कारी घटकांचा विनाश करता येतो. या विकारांना जागृत तथा विकसित करणाऱ्या घटकांचा विनाश करता येतो आणि तोच संभव असतो. युद्धात असेच होते. हे सगळे मारले जातात आणि शेवटी मूळ राक्षस शरण येतो. हतबल झालेला तो शरण येतो आणि मोरया त्याला अभयही देतात.
साधकाला हेच संभव आहे. विकारांचे बळ नष्ट करता येते. त्यांना हतबल करता येते आणि मग उपासनेकरिता प्रेरक, उपयोगी रूपात वापरता येते. हे वापरण्याचे शास्त्र आहे श्रीमुद्गलपुराण.
श्रीगणेशांकडे पाहण्याची आपली आजवरची दृष्टी बदलवून टाकणारा अद्वितीय ज्ञानसागर आहे श्रीमुद्गलपुराण.
सर्वसामान्यांच्या दृष्टीने श्रीगणेश म्हणजे शिवपुत्र, पार्वतीनंदन तथा शिवगणांचे प्रधान एवढेच श्रीगणेशांचे स्वरूप. पण ही भूमिका पूर्ण निर्थक असून परब्रह्म परमात्मा श्रीगणेश हे‘शिवहरिरविब्रह्म जनक’ आहेत हे ठासून सांगणारा महाग्रंथ आहे श्रीमुद्गलपुराण.
श्रीगणेशांचे प्रत्येक नाव, प्रत्येक लीला, प्रत्येक अवतार, प्रत्येक कथा केवळ आणि केवळ परब्रह्मत्वाचेच स्पष्टीकरण कसे आहे याचे अद्भुत विश्लेषण आहे श्रीमुद्गलपुराण.
उदा. वक्रतुंड शब्दाचा वाच्यार्थ काय, तर वाकडय़ा तोंडाचा. हा अर्थ मोरयाला कसा लागेल? लोक म्हणतात सोंड वाकडी आहे, पण सोंड तर नाक आहे. मग वक्रतुंड म्हणजे काय? श्रीमुद्गलपुराण सांगते ‘वक्र’ म्हणजे माया. तिला जो तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतो तो परमात्मा वक्रतुंड. अशाच रूपात मोरयाच्या प्रत्येकच बाबीला एका वेगळ्याच रूपात जाणून घेण्याचा एकमेव मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
वरपांगी पाहणाऱ्यांना प्रश्न पडतो एवढा मोठा मोरया एवढय़ाशा उंदरावर बसतोच कसा? श्रीमुद्गलपुराण उंदराचा प्रतीकार्थ उलगडून दाखविते. उंदीर हे काळाचे तथा जीवात्म्याचे प्रतीक कसे आहे ते स्पष्ट करते व यांच्यावर सत्ता चालते त्या परमात्म्यास ‘मूषकध्वज’ संबोधिते.
गज मस्तक म्हणजे केवळ हत्तीचे डोके इतकाच अर्थ नाही. हत्तीचे डोके बालकाच्या धडावर बसेलच कसे? आकाराचा काही विचार नको कां? मग काय आहे ‘गजमस्तक’ श्रीमुद्गलपुराण सांगते गज शब्द जग च्या उलट आहे. जग आहे सादी, सान्त, सावयव, सगुण साकार. याच्या उलटे ते गज. अर्थात अनादी अनंत, निरवयव, निर्गुण, निराकार ते गज आणि तेच ज्यांचे मुख म्हणजे ओळखण्याची सोय आहे ते आहेत ‘गजानन!’
अशा रूपात श्रीगणराजांच्या ॐकार रूप परब्रह्मत्वाला ठायी ठायी अधोरेखित करणारा महाग्रंथ आहे श्रीमुद्गलपुराण.
आपल्या मनातील श्रीगणेशविषयक समस्त प्रश्नांचे शास्त्रीय उत्तर आहे श्रीमुद्गलपुराण आणि आपल्याला कधी पडलेही नसते अशा अनेक प्रश्नांचे समाधान आहे श्रीमुद्गलपुराण.
श्रीगणेशांना यथार्थरीतीने जाणून घ्यायचे असेल तर एक आणि एकच उपाय आहे श्रीमुद्गलपुराण.
response.lokprabha@expressindia.com

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?