श्वान आणि लांडगा या दोन्ही प्राण्यांच्या जीवाश्म आणि डीएनए यांच्या आधारे हे दोघेही एकाच जातकुळीतील असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पण तसे असेल तर नेमके कोण कोणापासून विकसित झाले यावर अनेक प्रवाद आहेत.

इमानदार प्राणी असलेल्या श्वानाविषयीचे माणसाचे प्रेम कधी लपून राहिले नाही. धनाढय़ व्यापाऱ्यापासून गरीब शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला श्वान पाळण्याची हौस असतेच. पण श्वान हा प्राणी कसा निर्माण झाला, याविषयी जीवशास्त्रज्ञांना नेहमीच कुतूहल राहिले आहे. कोल्हा, लांडगा आणि कुत्रा हे एकाच जातकुळीतील प्राणी आहेत, असे नेहमीच बोलले जाते. मात्र आता यावर करत असलेल्या शास्त्रज्ञांच्या संशोधनला यश आले आहे. पूर्व आशियात लांडग्यापासून श्वान विकसित झाला, असे संशोधन मे महिन्यात शास्त्रज्ञांच्या एका गटाने केले होते. मात्र शास्त्रज्ञांच्या दुसऱ्या गटाने हे संशोधन खोडून काढत युरोपमधील पश्चिम भागात हजारो मैल दूर श्वानाचे मूळस्थान आहे. जिथे लांडग्यापासून श्वानाची निर्मिती झाली.
श्वान आणि लांडगा हे एकाच जातकुळीतील आहेत, यावर संशोधकांचे एकमत झाले आहे. दोन्ही प्राण्यांचे जीवाश्म आणि डीएनए यांच्या आधारे ते या संशोधनापर्यंत पोहोचले आहेत. जगभरात काही ठिकाणी काही लांडगे माणसाळले आणि त्यांचे श्वान बनले. त्यांच्या शरीराच्या आकारातच नव्हे, तर त्यांच्या सवयींमध्येही बदल झाले. भटकंती करताना किंवा शिकारीला जाताना या प्रदेशातील माणसे लांडग्यांना घेऊन जात. कालांतराने या लांडग्यांच्या सवयीमध्ये आणि शरीररचनेत नैसर्गिक बदल होत गेले आणि हे लांडगे माणसाळले. हेच लांडगे पुढे श्वान म्हणून ओळखले जाऊ लागले, असे संशोधकांना वाटते.
शास्त्रज्ञांनी श्वान आणि लांडगा यांच्या काही जीवाश्मांचा अभ्यास केला आणि त्यांना या कोडय़ाचे उत्तर सापडले आहे. ३६ हजार वर्षांपूर्वीच्या काही जीवाश्मांमध्ये श्वान आणि लांडगा या प्राण्यांचे गुणधर्म सारखेच असल्याचे आढळले. लांडग्यांच्या काही अवशेषांमध्ये कुत्र्याचे गुणधर्म, तर कुत्र्याच्या काही अवशेषांमध्ये लांडग्याचे गुणधर्म आढळले. म्हणजे त्याच काळी लांडग्यांचे कुत्र्यांमध्ये रूपांतरण होत होते, असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. सर्वात प्राचीन जीवाश्म शास्त्रज्ञांना युरोपमध्ये आढळला. त्यामुळे युरोपमध्येच लांडग्यांचे श्वानामध्ये रूपांतरण झाल्याच्या निष्कर्षांपर्यंत शास्त्रज्ञ पोहोचले आहेत.
श्वानाचे मूळस्थान शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी १९९०मध्ये डीएनए या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यांनी जगभरातील विविध ठिकाणांवरील पाळीव श्वान आणि लांडगे यांच्या प्रजातींचे डीएनए घेतले. या दोन्ही प्राण्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे शोधण्यासाठी या डीएनएचा अभ्यास केला. यातून एक वेगळेच संशोधन उदयास आले, जे जीवाश्माच्या संशोधनापेक्षा वेगळे होते.
स्वीडनमधील ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत काम करणारे पीटर सॅव्होलॅनेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुत्र्याच्या डीएनएवर संशोधन केले आणि पूर्व आशिया हेच त्यांचे मूळस्थान असल्याचे सांगितले. आठ वर्षांनंतर म्हणजेच २०१०मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जनुकशास्त्र अभ्यासक रॉबर्ट वायने यांनी श्वानांच्या काही नव्या प्रजातींचा अभ्यास केला आणि मध्य पूर्व भागात (आखाती देश) श्वानांचे मूळस्थान असावे, असे सांगितले. सॅव्होलॅनेन यांच्या पथकाने अनेक श्वानांच्या डीएनएचा अभ्यास करून त्यांचे मूळस्थान शोधले, ते दक्षिण चीनमधील असावे, असे त्यांना वाटते.
सध्या श्वानाचे मूळस्थान डीएनएच्या आधारावर शोधले जात असून, शास्त्रज्ञ श्वान आणि लांडगा यांच्या जनुकांचा अभ्यास करत आहेत. सॅव्होलॅनेन आणि त्यांच्या चिनी सहकारी शास्त्रज्ञांना वाटते की, चीनमधील पाळीव श्वानांच्या जनुकांचे लांडग्याच्या जनुकांशी सर्वाधिक साधम्र्य आढळते. तब्बल ३२ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये लांडग्यांपासून श्वानाचे उत्परिवर्तन झाले, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. बऱ्याचदा श्वानांना माणसळवण्याचे श्रेय आपण शेतकऱ्यांना देतो. मात्र चीनमध्ये २० हजार वर्षांपूर्वी शिकाऱ्यांना सर्वप्रथम श्वानांचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे श्वानांना पाळण्याचे खरे श्रेय शिकाऱ्यांनाच दिले पाहिजे. रॉबर्ट वायने आणि त्यांच्या पथकाला मात्र हे मान्य नाही. सॅव्होलॅनेन यांच्या पथकाने ज्या डीएनएवर संशोधन केले आणि लांडग्यापासून श्वान निर्माण झाला, असे सांगितले, ते डीएनए श्वान आणि लांडगा यांच्या संकरातून तयार झालेल्या प्राण्याचे असावे, असे वायने यांना वाटते. या शास्त्रज्ञांनी अभ्यासलेली लांडगा आणि श्वान यांची जनुके हा प्राचीन संकरणाचाच प्रकार आहे. लांडग्यासोबत संकरण करण्यासाठी काही श्वानांची डीएनए पूर्व आशियातून मागवण्यात आली, असे वायने यांनी सांगितले.
वायने आणि त्यांच्या शास्त्रज्ञ सहकाऱ्यांनी आता श्वानांच्या मूळस्थानाविषयी नवाच अभ्यास मांडला. गेल्या २० वर्षांपासून हे शास्त्रज्ञ श्वानाच्या जीवाश्माचा आणि त्याच्या डीएनएच्या अंशावर संशोधन करत आहेत. जिवंत श्वान आणि लांडगा आणि त्यांच्या जीवाश्माच्या डीएनएवर त्यांनी तुलनात्मक पण व्यापक स्वरूपात संशोधन या शास्त्रज्ञांनी केले. रशिया आणि युरोपमध्ये सापडलेल्या या दोन्ही प्राण्यांच्या १८ जीवाश्मांचे डीएनए काढण्यात त्यांनी यश मिळवले. या डीएनएची आणि ४९ लांडग्यांच्या, ७७ श्वानांच्या आणि चार कोयॉट्सच्या (विशिष्ट प्रजातीचा कोल्हा) जनुकांशी त्यांनी तुलना केली.
मध्य पूर्व किंवा चीनमधील लांडग्यांचे श्वानांशी काहीही साधम्र्य नाही, या निष्कर्षांपर्यंत हे शास्त्रज्ञ पोहोचले आहेत. मात्र युरोपमधील श्वानांच्या डीएनएचे लांडग्यांच्या डीएनएशी साधम्र्य आढळल्याचे हे शास्त्रज्ञ सांगतात. पण आता वायने यांचे संशोधन सॅव्होलॅनेन खोडून काढतात. ‘‘वैज्ञानिकदृष्टय़ा हे अयोग्य संशोधन आहे. हे विज्ञानावर नाही, तर भूगोलावर आधारित संशोधन आहे,’’ असे सॅव्होलॅनेन यांनी सांगितले. ‘‘वायने यांच्या पथकाने केलेल्या संशोधनात पूर्व आशिया आणि मध्य पूर्व येथील जीवाश्मांच्या डीएनएचा समावेश नव्हता. ही या संशोधनातील मोठी त्रुटी आहे. तुम्हाला श्वानाचे मूळस्थान शोधायचे असेल, तर सर्व ठिकाणावरील श्वानांचा अभ्यास करणे गरजेचे आहे,’’ असे सॅव्होलॅनेन म्हणाले.
इंडियन एक्सप्रेसमधून साभार