0kedareजागतिक महिला दिन विशेष

आठ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन! स्त्रीत्व साजरे करण्याचा दिवस! आठ मार्चला यशस्वी महिलांचा सत्कार केला जातो. काही घरांमध्ये बायकोची, आईची आवडनिवड त्या दिवशी तरी पुरवली जाते. मला मात्र माझ्या ओपीडीत आलेल्या काही जणी या निमित्ताने आठवल्या.
सावित्री खाली मान घालून बसली होती. आम्ही तिला उदासीनतेच्या आजारावर ज्या गोळ्या द्यायचो त्याच ५०-६० गोळ्या खाऊन आत्महत्येचा तिने प्रयत्न केला होता. ती हळूहळू सांगू लागली. नवरा दारू पिऊन रोज मारत होताच. तो कामावर जातच नसे. सावित्री कामावर जाई. पण तिची नोकरी गेली. ती मुलाची फी भरू शकली नाही, त्याचे शिक्षण थांबले आणि ती प्रचंड निराश झाली. दुसरा काहीच मार्ग न सुचल्याने तिने गोळ्या खाल्ल्या.
१९ वर्षांच्या रितूला खरेतर खूप शिकायचे होते. नोकरी करून स्वत:च्या पायावर उभे राहायचे होते, पण एक स्थळ सांगून आले आणि घरच्यांनी लग्न करून दिले. तिची इच्छा तशीच मनात राहिली. नवरा जेमतेम दहावी झालेला होता. रितूला सारखी चक्कर येऊ लागली. ती अचानक बेशुद्ध पडायची. तिची दातखीळ बसायची. दोन-तीन तासांनी तिला जाग यायची. अशी आजारी मुलगी नको म्हणून सासरच्यांनी तिला माहेरी आणून टाकली. आमच्याकडे तिच्या मनातली निराशा, बेचैनी व्यक्त झाली. मन मोकळे करायला ठिकाण उपलब्ध नाही, त्यामुळे तिची घुसमट व्हायची आणि तिला चक्कर यायची.
मंजिरी उच्चविद्याविभूषित. उत्तम नोकरी करणारी. कापरेरेट क्षेत्रातल्या धकाधकीच्या आयुष्याला यशस्वीपणे सामोरी जाणारी. तिच्यासमोर संधी चालून आली. तीन महिने परदेशात प्रकल्प होता. पण ही संधी स्वीकारायला तिचे मन धजावेना. मुलगा, नवरा यांना एकटे सोडून जायचे कसे, अशा चिंतेने तिला गिळून टाकले. झोप येईना, भूक लागेना, कामावरचे लक्ष उडाले. छोटय़ा छोटय़ा गोष्टींची चिंता वाटू लागली. छातीत धडधडू लागे, घाम फुटे, हातपाय थरथरू लागत, श्वास कोंडे आणि तिला वाटे आपला प्राण जातोय की काय?
अशा अनेक जणी. उदासीनता (depression), अतिचिंता (Anxiety) असे त्यांचे मानसिक विकार होण्यामागे त्यांचे स्त्री असणेच कारणीभूत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या वरील उदाहरणांमध्ये स्त्रीचा मानसिक संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेले मानसिक रोग दिसतात. स्त्रीच्या मानसिक समस्यांचा विचार करताना सामाजिक घटक खूप प्रभावी ठरतात. तसेच तिची एक विशिष्ट मानसिकतासुद्धा स्त्रीमध्ये मानसिक विकार निर्माण करते.
स्त्री आणि पुरुष यांच्या मानसिक विकारांमध्ये खरेच फरक असतो का?
उदासीनतेसारखा आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट प्रमाणात आढळतो. पुरुषांपेक्षा अधिक संख्येने स्त्रिया आत्महत्येचा प्रयत्न करतात. अनेक अतिचिंतेचे आजार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येतात. आपत्तीनंतर होणारा दूरगामी मानसिक परिणाम (Post traumatic stress disorder) महिलांमध्ये जास्त प्रमाणात होतो. आपली मन:स्थिती व्यक्त करताना स्त्रीच्या शरीरावर बराच परिणाम झालेला आढळतो. एखादी महिला आज हे दुखते, उद्या ते दुखते, पचन नीट होत नाही, हातापायाला मुंग्या येतात इ. शारीरिक तक्रारी वारंवार करू लागली आणि शारीरिक आजार काही नसेल तर त्या तक्रारींमागे काही मानसिक कारण तर नाही ना हे तपासून पाहावे लागते.
स्त्रियांच्या मानसिक आजारांमागे तिच्यात होणारे शारीरिक बदल महत्त्वाचे ठरतात. स्त्रीच्या जीवनचक्रामध्ये पाळी येणे, गरोदर राहणे, कधी गर्भपात, कधी बाळंतपण आणि शेवटी पाळी जाणे असा महत्त्वाचा घटनाक्रम असतो. यातल्या प्रत्येक टप्प्यावर अंतरस्रावांमध्ये (Hormones) बदल होत असतात आणि स्त्रीच्या मन:स्थितीतही बदल होत असतात. पाळी सुरू होण्याच्या वयात म्हणजेच किशोरावस्थेत मुलींच्या मनावर प्रचंड ताण असतो. होणाऱ्या शारीरिक बदलांचा स्वीकार करायला शिकावे लागते. त्याच काळात घरातल्यांचे आणि बाहेरच्यांचे त्यांच्याशी वागणे बदलू लागते. ‘नीट बस. उगाच मुलांमध्ये क्रिकेट खेळायला जाऊ नकोस, आता लहान राहिली नाहीस’ अशा सूचनांचा सतत भडिमार होत असतो. त्यातच एखादा मुलगा आवडायला लागतो. हे आकर्षण की प्रेम असे द्वंद्व मनात सुरू होते. असे अनेक स्वाभाविक बदल होतानाच दहावी-बारावी अशा महत्त्वाच्या परीक्षा येतात. शिक्षणाची पुढची दिशा ठरवणे, त्यासाठी यशस्वी होणे या सगळ्याचा मनावर खूप ताण पडतो. प्रत्येक महिन्यात पाळी सुरू होण्याआधी चिडचिड, अस्वस्थपणा, सारखे रडू येणे (Premenstrual syndrome) असा त्रास सुरू होऊ शकतो. कधी कधी तर अपयशातून, प्रेमभंगातून निराशा येते आणि एखादी मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करते. लग्न झाले की पतीबरोबर सूर जुळावे लागतात, अन्यथा परिस्थिती कठीण होते. कुटुंबातही मिसळून जाणे जमले नाही तरी मानसिक ताण वाढतो. अशा परिस्थितीत बाळंतपणामध्ये उदासीनता निर्माण होऊ शकते. पाळी जाण्याचे वय म्हणजे स्त्री मध्यमवयीन असते. मुलांची प्राथमिक जबाबदारी संपलेली असते. आयुष्यातला संघर्षांचा काळ खरेतर संपलेला असतो, पण त्यातूनच रिकामपण येते, मनात पोकळी निर्माण होते, एकटेपण जाणवते. पाळी जाताना पुन्हा उदासीनता आणि अतिचिंता अशा मानसिक विकारांना तोंड द्यावे लागते.
आपल्या तक्रारी सहन करत राहायचे, कुणाजवळ बोलायचे नाही असे बऱ्याच वेळा घडते. असे न करता मनोविकार तज्ज्ञाची वेळेवर मदत घेतली तर परिणामकारक उपाय केले जाऊ शकतात आणि स्त्रीच्या जीवनाचा दर्जा उंचावतो. स्त्रीच्या आयुष्यातील अशा अनेक बदलांबरोबरच खरेतर स्त्रीची सामाजिक स्थिती तिच्या मानसिक समस्यांना जबाबदार असते. त्यांचा ऊहापोह पुढील लेखात.
डॉ. जान्हवी केदारे

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Narendra Modi opinion that textile industry is important in developed India
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा – मोदी