स्त्रियांमध्ये उदासीनता आणि चिंतेचे वेगवेगळे विकार पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आढळतात. स्त्रियांच्या शरीरात होणारे अनेक बदल उदा. पाळी येणे व जाणे, गरोदरपण, अंत:स्रावांमध्ये होणारे बदल इत्यादींचा स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. त्याचबरोबर स्त्रीच्या मानसिक स्थितीला विविध मनोसामाजिक घटक जबाबदार असतात.

स्त्रीचे दुय्यम स्थान : कितीही शिकली, कमावू लागली, तरी स्त्रीला नेहमीच घरात, कुटुंबात, समाजात कनिष्ठ स्थान असते. घरातले वडील, नवरा, भाऊ , मुलगा कोणीही असो, ‘तुला जमणार नाही, मी करतो’, बांगडय़ा भरल्या नाहीत अजून मी!’ असे सहजपणे म्हणतात. स्त्रीलाही असे वाटू लागते की आपण खरेच दुर्बल. आपल्याला घरातले जड सामान हलवण्यापासून करिअरच्या निर्णयापर्यंत बाबा, भाऊ किंवा नवरा यांचे ऐकले पाहिजे. पिढय़ान्पिढय़ा शिकवलेल्या या गोष्टीमुळे स्त्रीच्या मनात न्यूनगंड तयार होतो. घरात, नोकरीच्या ठिकाणी तिच्यावर अन्याय झाला तरी ती सहन करत रहते आणि अखेरीस निराश होते. तिला असे वाटू लागते की आपल्याला काही किंमतच उरली नाही.
स्त्रीची समाजमान्य भूमिका : वर्षांनुवर्षे समाजात पुरुष आणि स्त्री यांच्या विशिष्ट भूमिका ठरलेल्या आहेत. सगळे निर्णय घेणारा, कुटुंबाचा खर्च चालवणारा तो पुरुष आणि घरातल्या विविध जबाबदाऱ्या म्हणजे पत्नी, मुलगी, माता अशा आणि आवश्यकतेनुसार अर्थार्जनाची जबाबदारी घेणारी ती स्त्री. अर्थार्जन केले तरी त्या पैशाविषयी मात्र तिला स्वातंत्र्य राहत नाही. आजच्या आधुनिक युगात या बरोबरच शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यांच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्त्व विकास करताना तिची तारांबळ उडते. स्त्री आणि पुरुष यांच्या भूमिका सगळ्यांच्या मनात घट्ट बसलेल्या असल्यामुळे तिच्या प्रयत्नांचे कौतुक न होता बऱ्याच वेळा तिला टीकेला सामोरे जावे लागते. सर्व आघाडय़ांवर लढता लढता ती थकून जाते.
प्रतिकूल परिस्थिती : लहानपणी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले तर मोठे झाल्यावर मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते. बऱ्याच वेळा स्त्री अर्थार्जनासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते. तसेच बहुतांश ठिकाणी स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. गरिबीचा गैरफायदा घेऊन स्त्रीला नाडणारेही अनेक असतात. पुन्हा एकदा तिला अनेक चिंता खायला उठतात आणि उदास, निराश वाटते.
स्त्रीवरील अत्याचार आणि हिंसा : आज जगात १४-२० टक्के स्त्रियांवर कधी ना कधी लैंगिक अत्याचार झालेला असतो. लहानपणी लैंगिक अत्याचार सहन करावा लागला तर त्याचे मनावर दूरगामी परिणाम होतात. तिच्या मनात असुरक्षिततेची भावना कायम मनात घर करून राहते. आपल्या नातेसंबंधांविषयीसुद्धा ती कायम साशंक असते. तिच्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार येतात. ती व्यसनाधीन होण्याची शक्यता असते. एकूण तिच्यात व्यक्तिमत्त्व दोष निर्माण होतो.
लैंगिक अत्याचारपीडित स्त्रीला घडलेला प्रसंग विसरून आयुष्य मूळ पदावर आणणे कठीण असते. उदासीनता येते. वेगवेगळ्या गोष्टींची भीती मनात निर्माण होऊ शकते. खूप काळपर्यंत तोच प्रसंग पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येणे, जणू आपण तो पुन्हा जगतो आहोत असे वाटणे, झोप न लागणे, दचकायला होणे अशी विविध लक्षणे आढळतात. यालाच PTSD (Post traumatic stress disorder) म्हणतात. पीडित महिलांपैकी एक तृतीयांश महिलांना हा विकार होतो.
लैंगिक अत्याचाराबरोबरच स्त्रीला अनेक वेळा शारीरिक अत्याचाराला म्हणजेच हिंसेला सामोरे जावे लागते. एका संशोधनात १५-४९ वर्षे वयोगटातील ९९३८ स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यापैकी २६ टक्के महिलांनी नवरा मारतो असे सांगितले. असुरक्षिततेमुळे अतिचिंता, भीती, मनात अपराधीपणाची भावना, उदासीनता असा खोलवर मानसिक परिणाम होतो.
स्त्रीमना सक्षम हो :
स्त्रीच्या स्वभावाची काही वैशिष्टय़े आहेत- सहनशीलता, चिकाटी आणि कल्पकता. स्त्री सोशीक असते असे म्हणतात. म्हणजे तिच्यावर होणारे अत्याचार मुकाटय़ाने सहन करते. पण हीच सोशीकता किंवा सहनशीलता तिला बिकट परिस्थितीला तोंड देण्याचे सामथ्र्यही देऊ शकते. नवऱ्याचा मृत्यू असो की कुटुंबावर असलेला कर्जाचा बोजा असो, स्त्री चिकाटी सोडत नाही आणि आपल्या संसाराला ठिगळे लावत राहते. साधा रोजचा स्वयंपाक करतानाही ती कल्पकता वापरते. मग कुठलीही समस्या आली तर धीर न सोडता सामना करणे तिला नक्कीच शक्य आहे.
आत्मसन्मान आणि आत्मविश्वास स्त्रीच्या मनात निर्माण व्हावा आणि पिढय़ान्पिढय़ा अंगी बाणलेला न्यूनगंड दूर व्हावा यासाठी तिला स्वत:ला तर प्रयत्न केलेच पाहिजेत, परंतु समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. आपआपल्या कुटुंबामध्ये मुलगी आणि मुलगा यांना सामान वागणूक आणि समान संधी, स्त्रीविषयीचा आदर शिकवणे यातून हे प्रयत्न सुरू होतील. तसेच आर्थिक निर्णयांमध्ये तिला स्वातंत्र्य दिले की तिचे कुटुंबातील स्थानही उंचावते. जगातल्या विविध देशांतील विद्यपीठांमध्ये लिंग समानतेविषयी प्रशिक्षण देणे, स्त्रियांवरील अत्याचारांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात संवेदनशीलता निर्माण करणे असे कार्यRम राबवले गेले आहेत. स्त्रीला सुरक्षित वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने हे एक उपयोगी पाऊल आहे.
आपल्या कुटुंबातल्या स्त्रीला आर्थिक, भावनिक आधार देणे, तिला अत्याचारांपासून दूर ठेवणे यातून तिची मानसिक अक्षमता कमी होईल. ‘आता तू परक्या घरची. आम्ही काय मदत करणार?’ ही भूमिका बदलून ‘तू कधीही आधार माग आम्ही आहोत’ असे म्हणणे आवश्यक आहे.
स्त्रीचे स्वत:ची मानसिक क्षमता वाढवण्याचे वैयक्तिक प्रयत्न आणि समाजात तिच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार होण्यासाठी, मानसिकता बदलण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यातून तिचे मन सक्षम होईल यात शंका नाही.
डॉ. जान्हवी केदारे