टीव्हीवरच्या सास-बहू ड्रामेबाजीच्या भाऊगर्दीत आता एका नव्या ट्रेंडची भर पडतेय. प्रेमकथा, रडगाणं, कटकारस्थानं याबरोबरच काही चॅनल्सवर आता वेगवेगळ्या क्षेत्रांवर आधारित मालिका सुरू आहेत. तर नुकत्याच काही नवीन मालिका सुरू झाल्यामुळे हा ट्रेंड अधिक महत्त्वाचा ठरेल, असं दिसतंय.

एक मोठा बंगला.. त्यात राहणारं एकत्र कुटुंब.. फॅमिली बिझिनेस असल्यामुळे घरातल्या सरसकट सगळ्या बायका फक्त नाश्ता, जेवण, सण-समारंभाची कामं वगैरे एवढंच करण्यासाठी. यात एक अपवाद म्हणजे त्यातली सून. हिच्याच पुढय़ात संकटांची रांग आणि हिलाच काय ती संकटं एकटीने सोडवण्याची हौस. हे सगळं चित्र भारतीय टेलिव्हिजनच्या मालिकांमधलं. पण, आता जमाना बदललाय. हे चित्र मोजक्याच मालिकांमध्ये दिसेल. छोटय़ा पडद्याने आता आपला मोर्चा वळवलाय तो मालिकांच्या नायिकांच्या प्रोफेशनकडे. काही महिन्यांपूर्वी मालिका जरा रिअ‍ॅलिस्टिक होऊ लागल्या. घरात भरजरी साडी नेसून, दागिने घालून, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावरही तसाच मेकअप चेहऱ्यावर ठेवणारी नायिका घराबाहेर पडू लागली. बँक, कॉलेज, अ‍ॅड एजन्सी, प्रायव्हेट फर्म अशा ठिकाणी नोकरी करू लागली. पण, नायिकेचं प्रोफेशन तेव्हाही दुय्यमच होतं. महत्त्वाची होती ती मालिकेची कथा. नायिकेचा छळ, कौटुंबिक हेवेदावे, मतभेद, प्रेमकहाणी या सगळ्यांनी मालिकेची पाठ काही सोडली नाही. आता यात आणखी एक वेगळा ट्रेंड दिसतोय. मालिकांमध्ये आकर्षणाचा बिंदू ठरतोय तो नायिकांचं प्रोफेशन. मालिकांचे विषय नेहमीचे सास-बहूचे असले तरी त्यांचं प्रोफेशन हा मालिकांचा यूएसपी ठरतोय. ‘अस्मिता’, ‘दिया और बाती हम’, ‘एफआयआर’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘जयोस्तुते’, ‘एअरलाइन्स’ अशा मालिका या ट्रेंडची मुख्य उदाहरणं आहेत. यापैकी काही मालिकांचा विषयच त्यांच्या प्रोफेशनशी जोडलेला आहे तर काही मालिकांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे तरी त्यातल्या प्रोफेशनला अधोरेखित केलं जातंय.
भव्य हवेल्यांमध्ये नटून-थटून बसायचं. रात्र असो किंवा दिवस मालिकांच्या नायिकेच्या चेहऱ्यावरचा मेकअप मात्र उतरत नसे. भरमसाट दागिने घालून स्वयंपाकघरात काम करणाऱ्या नटव्या मालिकांमध्ये दिसायच्या. मग भाभो, दादीसा, बा असं हिंदीत तर मराठीत आईसाहेब, अण्णा असं करत घरभर त्यांच्या सेवेत रुजू व्हायचं. बास.. मालिकेतल्या नायिकेला एवढंच काय ते काम. अधेमधे तिच्यावर येणारी संकटं आणि त्याला ती सामोरं जाऊन जिंकलेली लढाई याचे एकामागे एक ट्रॅक्स सुरूच. ही परंपरा सुरू झाली ती ‘क्यूं की सास भी कभी बहु थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कसोटी जिंदगी की’ अशा काही ‘के’ फॅक्टर मालिकांमुळे. हे प्रेक्षकांना आवडतंय हे ओळखून अनेक र्वष ही संस्कृती छोटय़ा पडद्यावर सुरूच राहिली. बदलत गेला तो त्यातला प्रादेशिक बाज. या मालिकांमधली कुटुंबं कधी गुजराती, राजस्थानी, पंजाबी तर कधी मराठी. हळूहळू ट्रेंड सरकला तो रिअ‍ॅलिटी शोजकडे. त्यामुळे पुढे हळूहळू मालिकांमध्येही तो रिअ‍ॅलिस्टिक टच येऊ लागला. ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘अफसर बिटीया’, ‘नंदिनी’ अशा काही मालिकांमुळे मालिकांमधल्या नायिकांची इमेज बदलली. यामध्येही फॅमिली ड्रामा होताच. पण, यामध्ये त्यांचं प्रोफेशनचं पारडं अधिक झुकलेलं होतं. आता हाच ट्रेंड मोठय़ा प्रमाणावर दिसून येतोय.
मालिका या बहुतकरून स्त्रीप्रधान असतात. त्यामुळे मालिकेचा विषय नायिकेभोवती फिरणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण, त्यातही तिच्यासमोर येणारी संकटं आणि तिची त्याविरोधातली लढाई याशिवाय नायिकाप्रधान मालिका बनवण्याचा सिलसिला टीव्हीने सुरू केला़ नायिकेविरोधातली कटकारस्थानं, सास-बहू ड्रामा हे तर मालिकेत असायलाच हवं, कारण टीआरपी मिळवण्याचं चॅनलवाल्यांचं ते हक्काचं शस्त्र असतं. ‘दिया और बाती हम’ या मालिकेची कथाच मुख्य नायिकेवर आधारित आहे. पण, तिच्या स्वप्नांविषयी सांगणारी ही मालिका आहे. सुरुवातीला सासूचा छळ, करिअर घडवताना आड येणारी संकटं, सासरकडच्यांनी केलेली आडकाठी असं सगळं होतं. मात्र या सगळ्यावर मात करत मालिकेची नायिका संध्या आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण करते. मालिका म्हटल्यावर त्यात थोडा ड्रामा असतोच. त्यामुळे तिच्या या प्रवासाची कहाणी रंजकतेने मांडली होती. ‘मानसीचा चित्रकार तो’मध्येही अशीच कथा उलगडणार आहे. यातल्या नायिकेलाही आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे. त्यासाठीचा तिचा झगडा मालिकेतून दाखवला जातोय.
‘अस्मिता’ ही मालिका खरंतर क्राइम शोजच्या भागात मोडणारी. पण, यामध्ये फिक्शन टच दिलाय. महिला गुप्तहेर हा विषय आहे. या मालिकेने कमी वेळात लोकप्रियता मिळवली आहे. महिला गुप्तहेरांवर यापूर्वी मोजक्याच मालिका आल्या होत्या. पण, आजच्या सास-बहूच्या भाऊगर्दीत ‘अस्मिता’ प्रेक्षकांच्या भेटीस आली. मालिकेचे निर्माते संगीत कुलकर्णी सांगतात की, ‘वेगवेगळ्या पेशांवर आधारित मालिका करण्याचा ट्रेंड वास्तवाशी जास्तीत जास्त जवळ जाणारा आहे. त्यात माणूस रिलेट करतो. प्रत्येकजण जसा आपल्या कुटुंबामध्ये बुडालेला असतो. तसाच तो त्याच्या कामात, नोकरीतही असतो. घराप्रमाणे ऑफिसातही काही अडचणी असतात. तिथलंही एक जग असतं. ते दाखवण्याचा छोटा पडदा प्रयत्न करत आहे. माध्यमातून समाजाचं प्रतिबिंब नेहमीच दिसत असतं. त्यामुळे हा नवा ट्रेंड दिसतोय. अशा मालिकांमुळे नेहमीच्या मालिकांशी चांगली स्पर्धा होईल. या स्पर्धेची सुरुवातही चांगली झाली आहे.’ ‘एफआयआर’ ही मनोरंजनाची एक्स्प्रेस गेली आठ र्वष सुसाट धावतेय. यातली कथा चंद्रमुखी चौटाळा या महिला पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. या मालिकेला विनोदी छटा असली तरी पोलिसांचं आयुष्य दाखवलं जातं. या मालिकांचा बाज वेगवेगळा असला तरी सगळ्या मालिका या प्रतिष्ठित प्रोफेशन्सबाबत उलगडतात.
या ट्रेंडमध्ये दोन नव्या मालिकांची भर पडलीय. एक म्हणजे ‘जयोस्तुते’ तर दुसरी ‘एअरलाइन्स’ ही हिंदूी मालिका. वकिली पेशावर आधारित ‘जयोस्तुते’ ही मालिका स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झाली. प्रगती राजवाडे या भूमिकेत प्रिया मराठे वकिलाचा कोट चढवत कोर्टाची पायरी गाठणार आहे. तिची कौटुंबिक पाश्र्वभूमी, ध्येय, अन्यायाविरोधातला लढा, भावाचा तपास असं सगळं काही प्रगती राजवाडेचं आयुष्य उलगडून ‘जयोस्तुते’ मालिका कोर्टात रंगणार आहे. प्रगतीची भूमिका करणारी प्रिया मराठे सांगते की, ‘मला माझ्या आधीच्या भूमिकेची इमेज पुसायची होती. खलनायिका साकारल्यानंतर वेगळ्या भूमिकेच्या शोधात होतेच. ‘जयोस्तुते’सारख्या मालिकेला नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. वकिलाची भूमिका मी याआधी कधीच केली नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी ते आव्हानच होतं. सध्या वेगवेगळ्या पेशांवर आधारित मालिकांचा ट्रेंड सुरू आहे आणि याचा मीही एक भाग आहे ही चांगलीच गोष्ट आहे. वकिलाची भूमिका करताना त्यांची भाषा, देहबोली, ज्ञान, वाक्चातुर्य असं सगळंच शिकावं लागलं. खऱ्या कोर्टात गेले आहे पण, केसचं हिअरिंग पूण ऐकलं नाही. पण, वातावरणाची माहिती आहे. एखाद्या केसच्या हिअरिंगसाठी मी लवकरच खऱ्या कोर्टात जाणार आहे.’
‘एअरलाइन्स’ ही मालिका म्हणजे चर्चेचा विषय आहे. बिग बजेट असलेली ही मालिका पायलट्सच्या आयुष्यावर बेतलेली आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीमधल्या घडामोडींचा वेध घेणारी ही मालिकाही गेल्या महिन्यातच सुरू झाली. या मालिकेसाठी तयार केलेलं मोठं एअरक्राफ्ट हे या मालिकेचं आकर्षण आहे. ‘छोटय़ा छोटय़ा गावांमध्येही एअरलाइन्स अ‍ॅकेडमीचे पोस्टर्स, जाहिराती मी बघितल्या आहेत. तिकडे या क्षेत्राकडे ग्लॅमरस इंडस्ट्री म्हणून बघितलं जातं. तिकडच्या तरुणांना या क्षेत्रात काम करायचंय. ही अशी इंडस्ट्री आहे ज्याच्याशी प्रत्येकाचा काहीना काहीतरी संबंध येत असतो. माझ्या या मालिकेकडून खूप अपेक्षा आहेत. कारण एव्हिएशन इंडस्ट्रीवर आधारित असलं तरी त्यात एका मुलीचा संघर्ष दाखवला आहे. पुरुषप्रधान क्षेत्रात ती स्वत: कशी स्थिरावते हा तिचा संघर्ष दाखवला जाणार आहे’, असं या मालिकेचे निर्माते निखिल अल्वा यांनी सांगितलं.
अशा प्रकारे ‘दिया और बाती हम’मधून आयपीएस ऑफिसर, ‘अस्मिता’मधून महिला गुप्तहेर, ‘मानसीचा चित्रकार तो’मधून आयपीएस ऑफिसर, ‘एफआयआर’-मधून पोलीस असे प्रोफेशन्स दिसून येत आहेत. तर नुकत्याच सुरु झालेल्या ‘जयोस्तुते’ या मालिकेतून वकील आणि ‘एअरलाइन्स’मधून पायलट याही प्रोफेशन्सशी संबंधित कथा उलगडणार आहे. सास-बहू ड्रामेबाजी करणाऱ्या मालिकांना या कितपत स्पर्धा करतात हे कळेलच लवकर. तसंच यांनी बाजी मारली तर प्रेक्षकांच्या नव्या आवडीचाही अंदाज येईल.

हा ट्रेंड आवश्यकच-
मालिका कौटुंबिक आणि त्यात दाखवल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखांच्या प्रोफेशनचा भाग हे पूर्वी नव्हतंच असं नाही. पण, याचं प्रमाण कमी होतं. आता ते वाढू लागलंय. आधी मालिकांमधल्या गृहिणी अनेकदा गृहिणीच दाखवल्या जायच्या. आता मात्र मालिकेत हा चांगला बदल होतोय. महिलावर्ग आता उच्चशिक्षण घेऊन मोठय़ा प्रमाणावर नोकरी, व्यवसाय करतायत. हाच मुद्दा टीव्हीसारख्या प्रभावी माध्यमाने उचलून धरला. स्मॉलस्क्रीनने हा मुद्दा दुर्लक्षित केला असता तर माध्यमच दुर्लक्षित झालं असतं. त्यामुळे टीव्हीवर हा नवीन ट्रेंड सुरू करणं आवश्यकच होतं.
– संगीत कुलकर्णी, निर्माता, ‘अस्मिता’

वेगळ्या मालिकांना पसंती मिळेल
‘एअरलाइन्स’ या शोमुळे आम्ही टीव्हीत मोठा बदल घडवून आणू असं अजिबात नाही. पण, निश्चितपणे एक पाऊल पुढे जाऊ. रविवारी रात्री नऊ वाजता या आव्हानात्मक वेळेत हा शो सुरू आहे. शनिवार-रविवार हे दिवस रिअ‍ॅलिटी शो, टॉक शोजचे असले तरी आता त्या शोजलाही खूप गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ‘एअरलाइन्स’सारख्या शोजना नक्कीच पसंती मिळेल. ही २६ भागांची मालिका असेल. तसंच पुढे यात एव्हिएशन इंडस्ट्रीमधलेच वेगवेगळे विषय घेऊन सीझन्स करण्याचाही विचार आहे.
निखिल अल्वा, निर्माता, एअरलाइन्स