२९ एप्रिल हा ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. नर्तकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दिनी विविध कार्यक्रमांमुळे नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरूकता आणि लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होते.

lp73सर्वप्रथम परवा म्हणजे २९ एप्रिलला साजऱ्या झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या’ सर्वाना खूप खूप शुभेच्छा! ‘डेज्’ संस्कृती भारतातसुद्धा मुरायला लागली आहे. व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे, इ. सगळ्यांबरोबर नर्तकांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो ‘डान्स डे..’ ज्याप्रमाणे बाकीच्या डेज्च्या बाबतीत म्हटलं जातं की प्रेम, मैत्री, आई-वडिलांवरचं प्रेम साजरं करायला कोणत्या एका फक्त विशिष्ट दिवसाची गरज नसते, परंतु तरीही त्या दिवसाच्या निमित्ताने आपण अधिक चांगल्याप्रकारे ती गोष्ट साजरी करतोच! वर्षभर करत असलेल्या गोष्टीला अशा ‘स्पेशल डेज्’मुळे ‘स्पेशल’ महत्त्व प्राप्त होतं, हेही तितकच खरं.. त्यामुळे वर्षभर नृत्य करीत असलो तरी नर्तक-नर्तिकांसाठी २९ एप्रिल हा ‘स्पेशल’ दिवस असतो. हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. अनेकविध कार्यक्रम, चर्चासत्रे, फ्लॅशमॉब, कार्यशाळा, स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. त्या निमित्ताने नृत्याच्या क्षेत्रातील विविध कलाकार एकत्र येतात. नृत्याच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी प्रयत्न करतात, ज्यामुळे नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरूकता आणि लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होते.
–    ‘कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल डान्स’ (सी.आय.डी.) ही ‘युनेस्को’शी संलग्न असलेली सेवाभावी संस्था ‘पॅरिस’ येथे आहे. कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल डान्सची स्थापन १९७३ मध्ये झाली आणि १९८२ पासून ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ साजरा करण्यास त्यांनी सुरुवात केली. अत्यंत लोकप्रिय मॉडर्न डान्स आणि बॅले मास्टर ‘जॉन-जॉर्ज नोवेर (खींल्ल ॅी१ॠी२ ठ५ी११ी) यांचा जन्म २९ एप्रिल १९२७ रोजी झाला. त्यामुळे ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिनासाठी या महान फ्रेंच डान्सरचा जन्म दिन हे चांगले औचित्य साधता आले आहे. ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिना’चा मुख्य उद्देश हा आहे की, जगभरात नृत्यकला साजरी करणे, नृत्यकलेने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वाना ‘नृत्या’च्या द्वारे एकत्र आणणे आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावून नृत्यकलेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करणे! प्रत्येक नर्तक, नर्तिका, नृत्यसंस्था इ. आपापल्या परीने हा हेतू साध्य करण्यासाठी हातभार लावत असतात. विविध सामाजिक, राजकीय, बंधनांच्या पलीकडे जाऊन मनुष्याचा आयुष्यातील अतिप्राचीन आणि नैसर्गिक भाग- ‘नृत्य’ या कलेचा आस्वाद घेण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
जरी १९८२ साली हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली असली तरी भारतात मात्र गेल्या काही वर्षांत त्या दिनाचं महत्त्व आणि साजरा करण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. विविध नृत्यसंस्था पुढाकार घेऊन या दिनाच्या निमित्ताने विविध प्रयोगशील उपक्रम करताना दिसत आहेत. खरं तर असं म्हणतात की, नृत्य करायला वयाचं, भाषेचं, उंचीचं, कशाचंही बंधन लागत नाही. ही उपजत कला आहे, जी पुरातन काळापासून स्त्री-पुरुष करत आले आहेत. अशा सर्वव्यापक नृत्यकलेचा प्रचार होऊन अधिकाधिक लोकांनी यात सामील होणं आवश्यक आहे. नृत्यामध्ये अनेकविध प्रकार असतात. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार, बॉलरूम नृत्य, हिपहॉप, कंटेम्पररी नृत्य, बॉलीवूड, लोकनृत्य इ. अनेक नृत्यशैली विविध महोत्सवांत सादर केल्या जातात. मात्र ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिना’च्या निमित्ताने अशा अनेक शैली नर्तक-नर्तिका एकत्र येऊन जर ‘नृत्यकला’ या एका नावाखाली साजऱ्या केल्या तर, नृत्यकला क्षेत्र अधिक विस्तृत होईल आणि या दिनाचा उद्देश सफल होईल. याच विचारातून प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांनी ‘आंतरराष्ट्रीय नृत्य सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. २५ एप्रिलपासून या कार्यक्रमास सुरुवात झाली असून २ मे ला सांगता होणार आहे. याबद्दल सांगताना संदीप सर म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने विविध नृत्यशैली एकाच मंचावर सादर केल्या गेल्याने नृत्यक्षेत्रात एकजूट बनायला मदत होईल. जसा ‘फॅशन वीक’ साजरा केला जातो, त्याप्रमाणे आम्ही खूप मोठय़ा प्रमाणावर ‘डान्स वीक’ साजरा करीत आहोत. अभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले आणि अनेक बॉलीवूड कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याला मिळत आहे. जवळपास २५० हून अधिक नर्तन-नर्तिका या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. तर नृत्य दिनाच्या निमित्ताने घेतल्या गेलेल्या ‘महा नृत्य स्पर्धेत’ ६०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. कुर्ला येथील ‘फिनिक्स मार्केट सिटी’मध्ये हा ‘डान्स वीक’ आम्ही साजरा करीत अहोत व या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा प्रकारे स्ट्रीट डान्सपासून ते शास्त्रीय नृत्य आणि बॉलरूमपासून बॉलीवूडपर्यंत सर्वच नृत्यशैलींच्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी संधी विविध कार्यक्रमांत मिळाली आहे. पुण्यातील ‘आर्टस्फीअर’ या संस्थेने त्यांचा दुसरा वर्धापन दिन २९ एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या दिवशी साजरा केला व यामध्ये भरतनाटय़म, कथक, ओडिसी, बॅले, बेलीडान्स, कन्टेम्पररी डान्स, सालसा इ. नृत्यशैलींचे सादरीकरण झाले. ‘आर्टस्फीअर’च्या संस्थापक आणि नृत्यमहोत्सवाच्या संयोजक ‘अनुभा दोशी’ यांच्या मते, ‘आर्टस्फीअर’ही  संस्था सर्व कलाप्रकारांना एकाच छताखाली आणण्यासाठी आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी २०१३ मध्ये स्थापन करण्यात आली व आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने विविध नृत्यशैली एकाच मंचावर सादर झाल्याने हे सर्व कलाकार एकत्रित आले. ज्याचा फायदा निश्चितच नृत्य क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी होईल! त्याचप्रमाणे नृत्य दिनाची जागरूकता वाढल्याने विविध प्रायोजक, नृत्यसंस्थांनी या कार्यक्रमाला हातभार लावला, जेणेकरून नृत्यकलेचे संवर्धन आणि नृत्यक्षेत्राची प्रगती होण्यास सकारात्मक मदत होईल.’
–    ‘कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल डान्स’च्या अध्यक्षा ‘आल्कीस राफ्टीस’ यांनीही या वर्षी नृत्य दिनाच्या निमित्ताने असे आवाहन केले की, ‘नृत्यकलेबरोबर चित्रकला, शिल्पकला, नाटय़कला, संगीत अशा विविध कलांचा समन्वय केला तर नृत्य दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील कलाकारांचा संगम होण्यास मदत होईल व त्याचा परिणाम म्हणून नृत्यकला वृद्धिंगत होण्यास साह्य़ होईल.’
–    आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून विविध नृत्यसंस्थांनी कार्यक्रम आयोजित केले. विविध कलाकार, एकत्र आले, त्यामुळे एक सक्षम ‘डान्स कम्युनिटी’ तयार होण्यात व वाढण्यात नृत्य दिनाचं योगदान निश्चित मोठे आहे. कलाकारांबरोबरच या दिवसाला यशस्वीपणे साजरे करण्यात मोठा वाटा आहे तो नृत्यकलाप्रेमी रसिकांचा! या निमित्ताने आयोजित झालेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून रसिक प्रेक्षकांनी नृत्यकलाक्षेत्राला प्रोत्साहन दिले व नृत्यकलेवरचे प्रेम सिद्ध केले. शाळा, महाविद्यालये, नृत्यसंस्था, कार्यालये अशा विविध स्तरांवर अनेक प्रकारच्या कलाप्रेमींनी नृत्य दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला व समाजात नृत्यकलेचे महत्त्व व स्थान टिकवण्यास खारीचा वाटा उचलला. ‘डान्स इज हिडन लँग्वेज ऑफ द सोल’ असे म्हटले जाते. तसेच ‘टू डान्स, इज टू सेलिब्रेट लाइफ’ हे विधानही प्रचलित आहे. अशी आशा आहे. तुम्ही सगळ्यांनीसुद्धा आयुष्य नृत्याच्या माध्यमातून २९ एप्रिलला सेलिबेट्र केले असेल आणि ‘नृत्य’ या सर्वव्यापी भाषेतून एकमेकांशी ‘कनेक्ट’ झाला असाल. जर तुम्हाला या दिवसाबद्दल आधी माहिती नसेल, तरी काळजी करू नका. ‘इट इज नेव्हर टू लेट!’ ‘नृत्य’ करायला, नृत्य साजरे करायला काळ, वेळ, वय, इ. आड येऊ देऊ नका.. जस्ट स्टार्ट डान्सिंग अ‍ॅण्ड कीप डान्सिंग!
– तेजाली कुंटे

Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

lp74

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने विविध नृत्यशैली एकाच मंचावर सादर झाल्याने हे सर्व कलाकार एकत्रित आले. ज्याचा फायदा निश्चितच नृत्य क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी होईल!
– अनुभा दोशी
 
lp75‘फॅशन वीक’प्रमाणे आम्ही खूप मोठय़ा प्रमाणावर ‘डान्स वीक’ साजरा करीत आहोत. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत.
– संदीप सोपारकर