मुशाफिरी म्हणजे फिरणे किंवा भटकणे खरेतर. पण गेल्या २० वर्षांत या मुशाफिरी नावाच्या शब्दाचा अर्थच बदलला आहे. पूर्वी मुशाफिरी असे म्हटल्यानंतर प्रत्यक्षात पायी किंवा मग गाडीने भटकणे असे अभिप्रेत होते. पण आता ते तसे राहिलेले नाही. बसल्या जागीही बरीच मुशाफिरी आपण सारे जण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करत असतो. ही मुशाफिरी खऱ्या अर्थाने जगड्व्याळ असते. कारण आता जगच मुठीत सामावलेले आहे. या जगड्व्याळ मुशाफिरीची सुरुवात साधारणपणे १९९०च्या सुमारास इंटरनेटच्या आगमनासोबत झालेली असली तरी हे प्रकरण लोकांपर्यंत पोहोचण्यास तसे १९९५ साल उजाडावे लागले. मात्र या विषयाशी संबंधित कंपन्यांना तेव्हापासूनच जाग आली होती आणि मुशाफिरीच्या क्षेत्रातील शीतयुद्धाला सुरुवातही झाली होती. त्या शीतयुद्धानंतर गेल्या २५ वर्षांत अनेक लहानमोठी युद्धेही झाली. एरवी एखाद्या युद्धाची झळ सामान्यांना बसते पण हे युद्ध माहिती महाजालातील होते. त्यामुळे त्याची तशी झळ बसण्याची काही शक्यता नव्हती. किंबहुना ग्राहक हाच त्यातील महत्त्वाचा घटक होता. तोच या युद्धातील विजेता ठरविणार होता, आजही तोच निर्णायक असणार आहे. म्हणजे ज्याच्याकडे सर्वाधिक ग्राहक तोच जिंकणार. पण आजवर झाली ती युद्धे होती आणि आता होऊ घातले आहे ते महायुद्ध ठरावे!
टीम बर्नर्स ली यांच्या महत्त्वाच्या योगदानाने सुरू झालेल्या वर्ल्ड वाइड वेब म्हणजेच इंटरनेटला ब्राऊझर नावाच्या एका प्रोग्रॅमची गरज होती. तोच माध्यम असणार होता, जगाला जोडले जाण्याचा. सुरुवातीच्या काळात त्याच्यासाठी खूप वेगवेगळे प्रयत्न झाले, त्यात मोझ्ॉकने बाजी मारली. मग जगाची विभागणी मोझ्ॉक वापरणारे आणि न वापरणारे अशा दोन भागांमध्ये झाली. १९९४च्या आसपास परिस्थिती अशी होती की, भविष्यातील जग मोझ्ॉकच्या माध्यमातून संवाद साधणारे असेल, असेच सर्वाना वाटत होते. याच मोझ्ॉकच्या माध्यमातून जगात लोकप्रिय झालेला पहिला नेटस्केप ब्राऊझर अस्तित्वात आला. नेटस्केप नेव्हिगेटर म्हणून तो ओळखला गेला. नेटस्केपने मोझ्ॉकमधील उपयोगिता अनेक पटींनी वाढविण्याचे काम केले. त्याच वेळेस इतर अनेक ब्राऊझरही जन्मास येतच होते. बरोबर २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९५ सालच्या ऑगस्ट महिन्यात एक महत्त्वाची घटना घडली, ज्याने नंतर वेब जगताचे भविष्य आणि भवितव्य बदलण्याचे काम केले. ती पहिली ठिणगी होती मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्स्प्लोरर या ब्राऊझरची. िवडोज ९५ या मायक्रोसॉफ्टच्या नंतर लोकप्रिय ठरलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबतच त्याने धडाक्यात प्रवेश केला. इंटरनेट एक्स्प्लोरररूपी या ठिणगीचे रूपांतर नंतर युद्धात होण्याचे संकेत मिळाले.
१९९७ साली ऑक्टोबर महिन्यात नेटस्केपचे कर्मचारी सकाळीच आपल्या कार्यालयाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना इंटरनेट एक्स्प्लोररमधील ई मोठय़ा अक्षरात दहा फुटांमध्ये त्यांच्या कार्यालयाबाहेर ठेवलेला दिसला, सोबत लिहिलेले होते, मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांकडून सप्रेम, वी लव्ह यू! अर्थात नेटस्केपच्या कर्मचाऱ्यांनी तो लोगो जमीनदोस्त करून तिथेच मोझिलाचा डायनोसॉर लोगो वापरला आणि लिहिले नेटस्केप ७२, मायक्रोसॉफ्ट फक्त १८. ही बाजारपेठेतील आकडेवारी होती. १९९७ सालच्या ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टने एक्स्प्लोररची चौथी आवृत्ती बाजारात आणली तेव्हा ही घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी विंडोज या त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबतच एक्स्प्लोरर देण्यास सुरुवात केली आणि नंतर बाजारपेठेची गणिते बदलत गेली. मायक्रोसॉफ्टचे विंडोज जगभरातील ९० टक्के संगणकांवर आरूढ होते, साहजिकच त्याचा फायदा त्यांना झाला आणि मग नेटस्केपची पीछेहाट झाली.
दरम्यानच्या काळात मायक्रोसॉफ्टच्या मक्तेदारीविरोधात अनेक संस्था, संघटना एकत्र आल्या होत्या. त्यात मक्तेदारीला कडवा विरोध करणाऱ्या मोझिला फाऊंडेशन या ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संघटनेचा समावेश होता. त्यांनी मुक्त आणि विनाशुल्क मुशाफिरीसाठी मोझिला ब्राऊझर तयार करण्यास घेतला. आधीच्या नेटस्केपपासून सुरुवात केली. २००४ साली अस्तित्वात आलेल्या मोझिलाच्या फायरफॉक्सने नंतर २०१० पर्यंत लोकप्रियतेच्या बाबतीत एक्स्प्लोररला मागे टाकले होते.
दरम्यानच्या काळात माहिती महाजालामधील ‘शोधा’वरच लक्ष केंद्रित करून राहिलेल्या गुगलला भविष्यातील अर्थकारणाची दिशा लक्षात आली आणि मग त्यांनी क्रोम हा स्वतचाच ब्राऊझर बाजारपेठेत आणला. कोणत्याही मशीनवर वापरता येईल, अशी त्याची सुलभता ठेवली. तोपर्यंत इंटरनेटवरील शोधकार्य म्हणजे गुगिलग किंवा गुगल करणे असा शब्दप्रयोगच अस्तित्वात आला होता. २०१२ साली तर गुगल क्रोमने जगातील सर्वाधिक वापरला जाणारा ब्राऊझर असा मान मिळवला आणि आजवर तो अबाधित राखला आहे. सध्या गुगल क्रोम, मोझिला आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानावर इंटरनेट एक्स्प्लोरर अशी क्रमवारी आहे. दरम्यानच्या काळात मायक्रोसॉफ्टने शोध पर्यायांमध्ये म्हणजेच सर्च इंजिनमध्ये िबगही आणून पाहिले. पण बिंग तोंडावरच आपटले! अखेरीस आता गेल्या आठवडय़ात मायक्रोसॉफ्टने त्यांची विंडोज १० ही जगातील अतिअद्ययावत अशी ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणताना मात्र काटेकोर आणखी एक नवा डाव रचला. हा नवा डाव म्हणजे मायक्रोसॉफ्टची हुशार खेळी असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सध्या जरी हा वाद वाटत असला तरी भविष्यात मुशाफिरीच्या क्षेत्रात होणाऱ्या महायुद्धाची बीजेच त्यात रोवलेली आहेत, असे क्षितिजावर दिसू लागले आहे…
इंटरनेटवरची मुशाफिरी ती काय आणि त्यावरून रक्त न सांडणारे पण तरीही महायुद्ध व्हावे, असे त्यात काय दडले आहे, असा प्रश्न सामान्य माणसाला पडणे तसे साहजिकच आहे. त्यासाठी या महायुद्धाला लाभलेली पाश्र्वभूमी तपासून पाहावी लागेल, इंटरनेटच्या इतिहासाची पाने चाळावी लागतील. िवडोज ही मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम खूप आधीपासून जगात सर्वाधिक वापरली जाते आहे. या विंडोजनेच मायक्रोसॉफ्टसाठी जगाचे दरवाजे खुले केले आणि कंपनीला सर्वोच्च शिखरावर नेऊन बसविले. त्यानंतर आता करण्यासारखे काही नाही, असे वाटत होते. त्याच वेळेस इंटरनेटची लोकप्रियता वाढत गेली. सुरुवातीच्या काळात मायक्रोसॉफ्टचे याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गेल्या १० वर्षांत मायक्रोसॉफ्ट आणि कंपनीचे सर्वेसर्वा असलेले बिल गेट्स यांना वाटते आहे की, इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या दुर्लक्षामुळे कंपनीची गाडी चुकली ती चुकलीच. ती गाडी पकडण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक मार्गानी करून पाहिला, कधी त्याचे नाव िबग होते तर कधी नोकिया विकत घेऊन पाहिला. पण नाही जमले. आता ही वेळ अशीच दवडली तर भविष्यात क्षितिजावर राहणेही कठीण असेल, याची जाणीव आता मायक्रोसॉफ्टला झाली आहे. कारण भविष्यातील सर्वाधिक महसूल हा ऑनलाइनमधून येणार आहे. ब्राऊझर हे त्यासाठीचे प्रमुख माध्यम असेल. हा ब्राऊझर आता केवळ तुमच्या डेस्कटॉपवर असून भागणार नाही तर तो तुमच्या मोबाइलपासून टॅबपर्यंत आणि अगदी आता नव्याने आलेल्या परिधान करण्यायोग्य म्हणजेच वेअरेबल उपकरणांपर्यंत सर्वत्र असावा लागणार आहे. आताच बाजारपेठ काबीज केली नाही तर भविष्यात हे प्रकरण जड जाईल हे आता मायक्रोसॉफ्ट ओळखून आहे. आजही डेस्कटॉपवर असलेले त्यांचे राज्य त्यासाठी फायदेशीर ठरू शकते म्हणून ही मायक्रोसॉफ्टसाठी निर्णायक खेळी आहे.
सर्च इंजिनचा व्यवसाय जगावर राज्य करण्याची ताकद देतो, हे गुगलने दाखवून दिले आहे. ते राज्य केवळ राज्य न राहता तिथे अनभिषिक्त सम्राटच व्हायला हवे, या उद्देशाने गुगलने क्रोम नावाचा ब्राऊझरच जन्माला घातला. आता यंदाच्या म्हणजे २०१५च्या जून महिन्यात जाहीर झालेली जागतिक आकडेवारी असे सांगते की, क्रोम, फायरफॉक्स, एक्स्प्लोरर वापरणाऱ्यांचे प्रमाण अनुक्रमे ६४.८, २१.३ आणि ७.१ असे आहे. एक्स्प्लोररचे हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. भविष्यातील महसूल हा ब्राऊझरच्या माध्यमातून येणार असेल तर साहजिकच मायक्रोसॉफ्टचा यातून येणारा महसूल कमी असेल. हे मायक्रोसॉफ्टला परवडणारे नाही. दुसरीकडे आजही िवडोज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून वापरणाऱ्यांचे प्रमाण ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. साहजिकच हा नवा एक्स्प्लोरर िवडोजसोबत जोडला आणि अनिवार्य केला व इतर ब्राऊझर्स वापरताच येणार नाहीत अशी सोय अंतर्भूत करून ठेवली, तर मात्र इतरांची पंचाईत होणार आहे. नेमके हेच मायक्रोसॉफ्टने करून ठेवले असून त्याविरोधात आता मोझिला आणि इतर कंपन्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. अर्थात याच्याविरोधातही मक्तेदारीविषयक खटला उभा राहू शकतो, याची कल्पना मायक्रोसॉफ्टलाही असेलच पण दरम्यानच्या काळात जेवढा ग्राहकवर्ग मिळले तेवढा राखण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल. हरतऱ्हेचे प्रयत्न करून थकल्यानंतर अखेरचा म्हणून मायक्रोसॉप्टने या पर्यायाची निवड केली आहे. एकूणच वातावरण पाहता ही ब्राऊझरच्या विश्वातील महायुद्धाची ठिणगी ठरावी!
01vinayak-signature
विनायक परब

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप