lp13‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘ख्वाडा’ या चित्रपटांना २०१४ चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली काही वर्षे मराठी चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर सातत्याने उमटते आहे आणि त्यामागे आहेत या क्षेत्रातले तरुण, सृजनशील हात!

तरुण पिढी सगळ्याच क्षेत्रात तिच्या कौशल्याची कमाल दाखवत असते. त्यांच्यामधली सृजनशीलता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सतत काहीतरी नवीन, प्रयोगशील, हट के करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असंच काही नवीन करू पाहण्याचा तरुणांचा प्रयत्न सध्या मराठी सिनेसृष्टीतही दिसतोय. या क्षेत्रात तरुण दिग्दर्शकांची संख्या वाढतेय. त्यांनी केलेले प्रयोग, प्रयत्न सिनेवर्तुळातील अनुभवी, दिग्गजांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवून जाताहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ६२ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा. या सोहळ्यात मराठी झेंडा रोवणारे सिनेमे हे तरुण दिग्दर्शकांचेच. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’, अविनाश अरुणचा ‘किल्ला’, भाऊराव कऱ्हाडेने दिग्दर्शन केलेला ‘ख्वाडा’ आणि परेश मोकाशी याचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हे चारही सिनेमे राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेत. तरुण दिग्दर्शक मराठी सिनेमांना वेगळा चेहरा देऊ पाहताहेत.
आताच्या काळात मिळणाऱ्या संधी हे मराठी सिनेमांकडे येणाऱ्या तरुण दिग्दर्शकांची संख्या वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. मुळात नवनवीन विषय घेऊन येण्याची त्यांची क्षमता बघूनच त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक मोठे निर्माते तयार होतात. संधी आणि आर्थिक आधार या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होत असल्यामुळे तरुणाईही प्रोत्साहित होते. तरुण दिग्दर्शकांची नव्या दृष्टिकोनासह सिनेसृष्टीकडे वळण्याची इच्छा आणि निर्मात्यांची गुंतवणूक करण्याची तयारी या दोन गोष्टी परस्परपूरक आहेत. म्हणूनच अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासारखे बॉलीवूड स्टार्स मराठी सिनेमांमध्ये गुंतवणूक करू लागले. याचं वैशिष्टय़ म्हणजे यांनी निर्मिती केलेले सिनेमे प्रयोगशीलतेच्या पातळीवर फिट बसत होते. बिग बींनी ‘विहीर’या सिनेमाची निर्मिती केली तर अजय देवगणने ‘विटी दांडू’ हा सिनेमा तयार केला. या सिनेमाचं बजेट जवळपास आठ कोटींपर्यंत गेलंय, अशी चर्चा आहे. ‘बालक पालक’, ‘यलो’ असे वेगळ्या धाटणीचे सिनेमे रितेश देशमुखने निर्माण केले. ‘७२ मैल एक प्रवास’ या सिनेमाची निर्मिती अक्षय कुमारने केली. ही गोष्ट केवळ हिंदी निर्मात्यांपर्यंत मर्यादित राहिली असं नाही. तर मराठीतल्याही काही बडय़ा निर्मात्यांनी विविध प्रयोगांसाठी गुंतवणूक केली.
‘फँड्री’मधून नागराज मंजुळेने बाजी मारली तर सुजय डहाकेने ‘शाळा’ सिनेमा करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘लग्न पाहावं करून’ हा विवाहसंस्थेवर भाष्य करणारा सिनेमा अजय नाईक या तरुणाने केला. ही तरुणांची साखळी मोठी होताना दिसतेय. या वर्षीच्या सुरुवातीला दिग्दर्शक ओम राऊत ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा सिनेमा घेऊन आला तर निखिल महाजनने ‘बाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘नारबाची वाडी’, ‘सतरंगी रे’, ‘क्लासमेट्स’ असे युथफुल आणि निखळ मनोरंजन करणारे सिनेमे घेऊन आला आदित्य सरपोतदार. आगामी काही सिनेमांमध्येही हा युथफुल जोश दिसून येणार आहे. प्रकाश कुंटेचा ‘कॉफी आणि बरंच काही’, अविनाश अरुणचा ‘किल्ला’ हा सिनेमा येतोय. तर सवरेत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘कोर्ट’ हा सिनेमा चैतन्य ताम्हाणे घेऊन येतोय. भाऊराव कऱ्हाडेचा ‘ख्वाडा’, नागराज मंजुळेचा ‘सैराट’ आणि सुजय डहाकेचा ‘फुंतरु’ हे सिनेमे येताहेत. आत्तापर्यंत आलेल्या तरुणांच्या सगळ्या सिनेमांना पूर्णपणे यश मिळालंच आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण, विविधांगी सिनेमे देऊन येत्या काळात तरुण पिढीच मराठी सिनेमाला आशयसंपन्न करु पाहतेय, हे मात्र नक्की.

lp15कलाकृती चांगली हवीच
‘किल्ला’ या सिनेमाची कथा माझ्या खूप जवळची आहे. सिनेमात दाखवलेल्या काही अनुभवांतून मी गेलोय. एफटीआयमध्ये सिनेमाचे प्रशिक्षण घेतानाच या सिनेमाची कथा माझ्या डोक्यात होती. नंतर त्यावर खूप काम केले, अभ्यास केला आणि सिनेमा तयार झाला. या चित्रपटासाठी माझ्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय पुरस्कार देऊन आमचे कौतुक झाले याचा निश्चितच आनंद आहे. विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आल्यामुळे अधिकाधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळते. मराठी सिनेमांच्या यशाचे श्रेय मी मराठी प्रेक्षकांना देतो. प्रेक्षक सुजाण आहेत. बरे-वाईट त्यांना कळते. सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यासाठी मोठा बॅनर असावा ही समजूतही अगदीच चुकीची नाही; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती सिनेमाची कथा. कलाकृती चांगली असेल तर ती गाजतेच. अलीकडच्या काळात सिनेमांमध्ये वैविध्य येतेय. याचे कारण प्रेक्षकही तेच तेच बघून कंटाळले आहेत. त्यांना साधेच, पण काही तरी वेगळे बघायचे आहे. त्यांना बघायचेय म्हणून विविध धाटणीचे सिनेमे येताहेत. हे सिनेमे प्रेक्षक उचलून धरताहेत. प्रेक्षकांना आवडतेय म्हणून असे सिनेमे पुन:पुन्हा येताहेत. हे चक्र असेच सुरू राहणार. ओळखीचे चेहरे नसलेलेही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत, हाही एक बदल जाणवतो. फिल्ममेकरचा सिनेमा बनवण्याबाबतचा दृष्टिकोन बदलतोय.
अविनाश अरुण, दिग्दर्शक, किल्ला

lp14गेल्या वर्षभरात एका मराठी सिनेमाचं नाव सतत कानावर पडतंय. जगभरातल्या विविध फेस्टीव्हल्समध्ये या सिनेमाला गौरविण्यात येतंय. या सिनेमाचं नाव ‘किल्ला’. वेगवेगळ्या फेस्टिव्हल्स, पुरस्कार सोहळ्यांमधून या सिनेमाचं भरभरुन कौतुक होतंय. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाबरोबरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेत ‘कोर्ट’, ‘ख्वाडा’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ हे सिनेमे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांची संख्या वर्षांगणिक वाढताना दिसतेय. यात झपाटय़ाने वाढ झाली ती ‘श्वास’ या मराठी सिनेमानंतर. ‘जोगवा’, ‘बाबू बँड बाजा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘इनव्हेस्टमेंट’, ‘शाळा’, ‘देऊळ’, ‘संहिता’, ‘बालगंधर्व’, ‘अनुमती’, ‘’, ‘धग’, ‘अस्तु’, ‘फँड्री’, ‘यलो’ हे सिनेमे वेगवेगळ्या विभागांसाठी राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यंदाही मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. ‘कोर्ट’, ‘किल्ला’, ‘ख्वाडा’, ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटांना गौरविण्यात आलं. राष्ट्रीय पुरस्कारांसह इतर अनेक फेस्टिव्हल्समध्ये मराठी सिनेमांची संख्या वाढताना दिसतेय. केवळ संख्या वाढताना दिसत नाही तर चांगल्या आशय-विषयांचे सिनेमे मराठीत येऊ लागले आहेत. हे सिनेमे बॉक्स ऑफीसवर हिट ठरत नसतीलही पण, विषयांचं वैविध्य, साधेपणा, उत्कृष्ट मांडणी यासाठी त्यांना गौरविण्यात येत आहे. सगळेच सिनेमे उत्कृष्ट दर्जाचे नसले तरी मराठी सिनेमांमध्ये पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत, हेही नसे थोडके. यात सिंहाचा वाटा तरुण दिग्दर्शकांचा आहे असं म्हणता येईल. आताच्या मराठी सिनेमांच्या विषयांमध्ये वैविध्य येतंय. पण, याची सुरुवात गेल्या दशकापासून झाली असं म्हणता येईल. मराठी सिनेमांना पर्याय उपलध झाले आणि म्हणूनच नवनवीन विषय हाताळण्याची इच्छाही ठळक होत गेली.
यंदाचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘ख्वाडा’ हे सिनेमे येत्या चारेक महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. आत्तापर्यंत तीसेक फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेला आणि १४-१५ पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘किल्ला’ हा एका लहान मुलाचे भावविश्व रेखाटणारा सिनेमा. आईच्या बदलीमुळे दुसऱ्या गावात पोहोचलेला मुलगा नव्या ठिकाणी कसे सारावतो, ते करताना येणाऱ्या अडचणी, आनंद याचे चित्र अविनाश या दिग्दर्शकाने उत्तम रेखाटले आहे. शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. पण, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे मात्र ही पायरी त्याच्या ‘कोर्ट’ या सिनेमातून प्रेक्षकांना दाखवतो. कोर्टाचा ढिसाळपणा, तारीख पे तारीख असा दृष्टिकोन, असे सारे काही या सिनेमात मांडलेय. तर ‘ख्वाडा’ सिनेमातून धनगरी समाजाचे चित्र रेखाटलेय.
मनोरंजन क्षेत्रात बदल हे होतच असतात. ते व्हायलाच हवेत. काही बदल प्रयोगशील असतात तर काही नकळत झालेले. हे बदल काही वेळा फायद्याचे ठरतात तर काही वेळा नुकसानही करतात. मराठी सिनेमा डबाघाईला आला असे साधारण अकरा-बारा वर्षांपूर्वी म्हटले जात होते. त्या दरम्यान मराठी सिनेमांची निर्मिती होत नव्हती असे नाही. पण, तुलनेने सिनेमांचा दर्जा, संख्या कमी होती. मराठी सिनेमांचे काय होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. पण, याच काळात संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ या सिनेमाने हे चित्र पालटून टाकले. मराठी सिनेसृष्टीसाठी हा सिनेमा माइलस्टोन ठरला असे म्हणायला हरकत नाही. कथा, विषय, मांडणी सर्वार्थाने तो सिनेमा उत्कृष्ट ठरला. अशा प्रकारचे सिनेमे प्रेक्षक स्वीकारतो यावर शिक्कामोर्तब झाले. ‘श्वास’ने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आणि ऑस्करसाठी निवड होईपर्यंतही मजल मारली. यानंतर मराठी सिनेमांची रेलचेल सुरू झाली. केवळ रेलचेल सुरू झाली नाही तर येणाऱ्या सिनेमांमध्ये विषयांचे वैविध्य आले. कथेत प्रयोगशीलता बघता आली. याच काळात काही तद्दन सिनेमेही आले पण, ते आले तसे गेलेही. गेल्या दहा-अकरा वर्षांत मराठी सिनेमांनी व्यवसाय किती केला हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. या प्रश्नाचे ‘काहीच व्यवसाय केला नाही’ असे किंवा ‘अमुक अमुक इतका व्यवसाय केला’ असे ठाम उत्तर देता येणार नाही. पण, हिंदीप्रमाणे मराठी सिनेमांमध्ये पर्याय उपलब्ध झाले, हे मात्र ठामपणे सांगता येईल.

सिक्वेलची परंपरा मराठीतही
‘चांगले ते घ्यायचेच’ हे धोरण मराठी सिनेमावाल्यांना पक्कं ठाऊक. आता एखाद्या सिनेमाचा सिक्वेल म्हणजे दुसरा भाग करणे चांगले की वाईट हे त्या-त्या सिनेमांवर अवलंबून आहे. हिंदीतली सिक्वेलची परंपरा मराठीकडे सरकताना दिसतेय. ‘झपाटलेला’ या लोकप्रिय सिनेमाचा दुसरा भाग म्हणजे ‘झपाटलेला २’ तितकासा चालला नाही. थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर हे सिनेमाचे आकर्षण होतं. ‘चिंटू २’ हा ‘चिंटू’ या सिनेमाचा दुसरा भाग. दोन्ही सिनेमे लहान मुलांसाठीचे. त्यामुळे लहानग्यांना आवडतील अशाच कथा त्यात होत्या. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा सिनेमा राजकारणावर भाष्य करणारा असल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळणे स्वाभाविक होते. तसा तो मिळालाही. पण, त्याच्या दुसऱ्या भागाची म्हणजे ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ या सिनेमाची म्हणावी तितकी चर्चा झाली नाही. या वर्षी या सिक्वेलच्या रांगेत तीन सिनेमे आहेत. ‘टाइमपास २’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ असे सिक्वेल या वर्षीची आकर्षणे आहेत. यापैकी ‘टाइमपास’ने बॉक्स ऑफीसवर कमाल केली होती. तर ‘अगं बाई अरेच्चा’ने निखळ मनोरंजन केले होते. ‘मुंबई-पुणे-मुंबई’मुळे तरुणांना त्यांच्या भाषेतला सिनेमा बघायला मिळाला होता. थोडक्यात, हे तिन्ही सिनेमे आपापल्या बाजात हिट होते. आता त्यांचे सिक्वेलही तशीच कमाल करताहेत का ते बघणे उत्सुकतेचे ठरेल.

lp19‘श्वास’नंतर ‘अगं बाई अरेच्चा’, ‘सातच्या आत घरात’ अशा काही सिनेमांमुळे एकूणच चित्रपटांचा लुक हळूहळू बदलत होता. ‘अगं बाई अरेच्चा’ या सिनेमातला विषय मजेशीर होता. प्रेक्षकांनी सिनेमाचा आनंद घेतला. आजही त्या सिनेमाची लोकप्रियता कमी झाली नाही. ‘सातच्या आत घरात’ सिनेमात तरुणाईचा उथळपणा, प्रॅक्टिकल स्वभाव, रोखठोक बोलणे अशा गोष्टींवर भाष्य केले होते. या दोन्ही सिनेमांचे विषय वेगवेगळे असूनही दोन्ही सिनेमांना तितकाच प्रतिसाद मिळाला. याच वेळी ‘उत्तरायण’सारखी प्रेमकथाही प्रेक्षकांच्या भेटीस आली. हळूहळू विषयांमध्ये वैविध्य दिसू लागले. निशिकांत कामतचा ‘डोंबिवली फास्ट’ हा सिनेमा लक्षवेधी ठरला. मुंबईतल्या सामान्य माणसाचे आयुष्य, खाचखळगे, अडचणी, प्रतिकार करण्याची क्षमता या सगळ्याचं चित्रण करून दिग्दर्शक मध्यमवर्गीय माणसाच्या घरात डोकावला. कालांतराने वर्षभरात येणाऱ्या सिनेमांची संख्या वाढत चालली होती. मराठी सिनेमांचा आवाका वाढत चालला होता. मराठी सिनेसृष्टी प्रस्थापित होत होती. काही तद्दन सिनेमांसह वैशिष्टय़पूर्ण सिनेमेही येऊ लागले. ‘जोगवा’ हा त्यापैकी एक. दिग्दर्शक राजीव पाटील यांनी सामजिक विषय घेऊन त्यातली प्रेमकथा दाखवण्याचे धाडस केले. या धाडसाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यातही आले. राष्ट्रीय पुरस्कारांची परंपरा ‘श्वास’नंतर सुरूच राहिली. ‘जोगवा’नंतर ‘देऊळ’, ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पूर्वी विनोदी, कौटुंबिक सिनेमांमध्ये अडकून पडलेला मराठी प्रेक्षक ‘देऊळ’, ‘बाबू बँड बाजा’ या सिनेमांमुळे बाहेर पडला. जागतिकीकरणामुळे छोटय़ा गावांवर होणारा परिणाम, विविध अडचणींना सामोरे जावे लागणारे गावकरी याची विनोदी अंगाने भाष्य करणारा ‘देऊळ’ प्रेक्षकांनी उचलून धरला. ‘बाबू बँड बाजा’ची कथा अगदी साधी. सिनेमातल्या वडिलांना त्याच्या मुलाने त्यांच्यासारखेच बँडमध्ये वाजवावे असे वाटत असते, तर आईला मुलाने शिकून मोठे व्हावेसे वाटत असते; यावर आधारित सिनेमा आहे. पण, उत्तम मांडणीमुळे तो अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला. बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी अशा मांडणीचा विषय येणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी जमेची बाजू होती. ‘श्वास’ या चित्रपटाला सुवर्णकमळ आणि ऑस्करसाठी त्या सिनेमाची झालेली निवड, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’चीही ऑस्करसाठी झालेली निवड, ‘देऊळ’ला सुवर्णकमळ, अशी मराठी सिनेमाला प्रतिष्ठा मिळू लागली. तर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘नटरंग’, ‘दे धक्का’, ‘काकस्पर्श’ या सिनेमांसाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागू लागला. अशा सकारात्मक वातावरणाने निर्मात्यांची संख्या वाढली. वेगही वाढला. नंतर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘दुनियादारी’, ‘लय भारी’ अशा काही सिनेमांसाठीही लागले.

lp16दृष्टिकोन बदलतोय
मी मुंबईत आलो तेव्हा इतर अनेकांप्रमाणे माझाही स्ट्रगल सुरू झाला. तिथे फिरताना माझ्या लक्षात आले की, इथे बरेच लोक स्थलांतर करून येतात. त्या वेळीच या स्थलांतर या विषयावर सिनेमा काढायचे ठरवले, पण नंतर पुन्हा गावाला गेल्यावर धनगर जमातीचे तर रोज स्थलांतर होत असते हा मुद्दा लक्षात आला. त्यांचे राहणीमान, विचार वेगळे असतात. तेव्हा या जमातीवर सिनेमा काढायचे ठरवले. ‘ख्वाडा’ या माझ्या पहिल्याच प्रयत्नासाठी मानाचा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मी स्वत:ला नशीबवान समजतो. सिनेमा करताना व्यावसायिक गणिताचा भाग महत्त्वाचा असतो. मार्केटिंगची बाजू भक्कम असावीच लागते. त्यामुळे एखाद्या चांगल्या सिनेमासाठी मोठा बॅनर असेल तर तो फायदेशीर ठरतो. तसेच ओळखीचे चेहरे सिनेमात असण्याचाही सिनेमाला निश्चितच फायदा होतो, पण नावाजलेला कलाकार हवाच, हा दृष्टिकोन आता बदलताना दिसतोय. चांगला विषय चांगली मांडणी करून मांडला आणि त्यात नावाजलेले कलाकार नसतील तरी तो सिनेमा सरस ठरतोच. सिनेमा ही कला आहे; त्याकडे एक कला म्हणूनच बघितले पाहिजे. उत्तम कथेचा उत्तम कलात्मक सिनेमा बनवून उत्तम व्यवसायही करता आला पाहिजे.
भाऊराव कऱ्हाडे, दिग्दर्शक, ख्वाडा

मधल्या काळात पौगंडावस्थेत असलेल्या मुलांचे भावविश्व यांवर थेट भाष्य करणारा ‘बालक पालक’ प्रेक्षकांना महत्त्वाचा वाटला. संघर्ष बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. मग तो जुन्या सिनेमांप्रमाणे सुनेचा असो किंवा सत्याच्या बाजूने लढणाऱ्या नायकाचा. हाच संघर्ष दाखवला ‘झेंडा’, ‘मोरया’ आणि अलीकडच्या ‘कँडल मार्च’ या सिनेमांमधून. तिन्हीच्या कथा वेगळ्या असल्या तरी संघर्ष हा त्यांच्यातला समान धागा होता. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा आणखी एक वैशिष्टय़पूर्ण सिनेमा ठरला. प्रेक्षक वेगवेगळ्या आशय-विषयांना प्रतिसाद देताहेत हे बघता सिनेवर्तुळातील मंडळीही नवनवीन विषयांना हात घालू लागले. विषयांमध्ये नावीन्य नसले तरी त्याच्या मांडणीत वेगळेपण शोधूू लागले आणि म्हणूनच प्रेक्षकही त्याकडे आकर्षिले जाऊ लागले. साधेपणा हे याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणता येईल. ‘धग’, ‘फँड्री’, ‘विहीर’, ‘झिंग चिक झिंग’, ‘टपाल’, ‘वळू’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘एक हजाराची नोट’ हे सिनेमे ग्रामीण विभागातले असल्यामुळेच त्यांच्यात साधेपणा होता. शहरी भागांतल्या प्रेक्षकांनीही हे ग्रामीण भागातले सिनेमे स्वीकारले. ‘आजचा दिवस माझा’ हा राजकीय धर्तीवरचा सिनेमाही लक्षवेधी ठरला. ‘तुकाराम’, ‘रमा माधव’ हे अनुक्रमे संत व्यक्तीवर आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित सिनेमे येऊन गेले. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आध्यात्मिक, lp20पौराणिक, राजकीय इतिहास विशाल आहे. मराठी साहित्याची परंपराही आहे. अशा समृद्ध ठेव्याचा वापर करत एखादी कलाकृती करणे हे खरे तर धाडस. भूतकाळात असे ऐतिहासिक, पौराणिक विषयांवरचे सिनेमे गाजलेही; पण सध्याच्या काळात अशा विषयांवर सिनेमे करणे आव्हानात्मक. साहित्य जपणारी संस्कृती मराठी मनामध्ये रुजलेली असल्यामुळे ‘रमा माधव’, ‘तुकाराम’, ‘नटरंग’ यांसारखे सिनेमे होऊ शकले.
ऑफ बीट सिनेमे करावे अशी काही दिग्दर्शकांची इच्छा असते. काही प्रयत्नही करतात. असाच एक प्रयत्न होता दिग्दर्शक राजेंद्र तलक यांचा. ‘अ रेनी डे’ हा सिनेमा ऑफ बीट म्हणचा येईल. रसुल पुक्कुटी या ऑस्कर विजेत्या साऊंड डिझायनरचे या सिनेमाला संगीत होते. सिनेमात अखंड पाऊस पडताना दाखवला आहे; पण रसुल यांनी त्यांची कामगिरी चोख केली आहे. कथा तशी साधीच, पण मांडणीत नावीन्य असल्यामुळे तो ऑफ बीट विभागात मोडतो. नामवंत कलाकार असूनही हा सिनेमा तितकासा बाजी मारू शकला नाही; पण ‘अ रेनी डे’चा प्रयत्न बघता येत्या काळात अशा प्रकारचे सिनेमे बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. सुमित्रा भावे-सुनील सुखठनकर यांचा ‘अस्तु’ हाही एक लक्षवेधी सिनेमा ठरला. या जोडीच्या अनेक सिनेमांप्रमाणे हाही एक वेगळा सिनेमा ठरला. डिमेन्शिया हा आजार असलेल्या एका वृद्ध माणसाची ही कथा. सिनेमात एका दिवसाची कथा आहे; पण भूतकाळातल्या अनेक गोष्टींचा संदर्भ लावत ती चांगल्या प्रकारे रंगवली आहे. दुर्दैवाने हा सिनेमा पुणेव्यतिरिक्त कुठेही प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापासून तो वंचित राहिला. एका गतिमंद मुलीची यशोगाथा मांडण्याचा विचार हेच एक धाडस आहे. ते करून दाखवले सिनेमाटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांनी. मनोरंजनासह एक संदेश दिल्याने ‘यलो’ हा आशयपूर्ण सिनेमा ठरला.

lp17मार्केटिंगचे नियोजन हवे
शॉर्टफिल्म हे सोपे माध्यम आहे. मनात एखादा विषय असेल तर लगेच मोबाइलवरही शूट करून शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मांडता येतो. मी कधीच शॉर्टफिल्म केली नव्हती; पण शॉर्टफिल्म एकदा करून बघायची होती. ‘मित्रा’च्या निमित्ताने या क्षेत्राकडे वळलो. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ही सुखाची बाब आहे. समलैंगिक संबंध असलेल्या काही लोकांना मी ओळखतो. ते मनाने चांगले असतात. तरी त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जाते. त्यांना जगायचा हक्कच नाही असाही विचार पुढे येतो. पण, हे योग्य नाही. त्यांनाही जगायचा हक्क आहे. या विषयावर मी बरेच दिवस विचार करत होतो. दरम्यान ‘बायोस्कोप’चे प्रोजेक्ट आले. कवितांवर शॉर्टफिल्म करूया अशी अनोखी कल्पना त्यातून आली. संदीप खरेची ‘उदासीत या कोणता रंगा’ ही कविता आवडली. संदीपशी या कवितेबाबत चर्चा केली. विजय तेंडुलकरांची ‘मित्रा’ ही लघुकथा वाचनात आली. ही लघुकथा आणि ‘उदासीत या’ ही कविता या दोन्ही एकत्र बांधून मी कथा-पटकथा लिहिली. ‘श्वास’ या सिनेमाने सिनेसृष्टीत प्रचंड बदल घडवून आणला. या सिनेमानंतर अनेक दिग्दर्शक प्रभावित झाले आणि इंडस्ट्रीत येण्याचा विचार करू लागले. त्यातलाच मीही एक होतो. नवीन आलेले दिग्दर्शक आपापली गोष्ट आणू पाहताय. त्यांच्या मातीतल्या गोष्टी ते घेऊन येताना दिसताहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त सिनेमा करून ते थांबत नाहीत, तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मार्केटिंगमध्ये स्वत: पुढाकार घेतात. मला हे चित्र सकारात्मक वाटतं. ‘ओळखीचा, प्रस्थापित चेहराच हवा’ असा हट्ट आता धूसर होताना दिसतोय, कारण कथा, मांडणी, संवाद यांचा दर्जा उत्तम असेल तर प्रेक्षक सिनेमाशी नक्की जोडला जातो. तसेच प्रस्थापित कलाकारही आता वेगळ्या विषयांच्या सिनेमांकडे वळतील, कारण कलाकाराला सतत प्रयोग करण्यात समाधान वाटते. त्यामुळे वेगळे काही करू पाहण्याचा तेही प्रयत्न करतील. चित्रपट करून झाल्यावर त्याच्या मार्केटिंगचेही नियोजन करायला हवे. हे नियोजन चोख असेल, कलाकृती उत्तम असेल तर मोठय़ा बॅनरची तितकीशी गरज भासणार नाही.
रवी जाधव, दिग्दर्शक, मित्रा (लघुपट)

नातेसंबंधांवर आधारित सिनेमांनाही परंपरा आहे. बहीण-भावाच्या नात्यावर तर जुन्या काळात अनेक गाणीही येऊन गेली. ती लोकप्रियही झाली; पण मधल्या काळात सिनेमांमधलं हे नाते पुसट होताना दिसत होते. त्यातच सचिन कुंडलकर या दिग्दर्शकाने बहीण-भावाच्या नातेसंबंधांवर ‘हॅपी जर्नी’ हा सिनेमा केला. गोष्ट साधी-सरळ न दाखवता त्याला वेगळे वळण देऊन सिनेमा रोड मुव्ही केला. ही कल्पना अनोखी असल्यामुळे हा सिनेमा बघणे उत्सुकतेचे ठरले. याही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तितकी कमाल दाखवली नाही; पण प्रयोग स्तुत्य होता. रहस्य, थ्रिलर या बाजात मराठी सिनेमाने आजही म्हणावी तशी मजल मारलेली नाही. प्रयत्न झालेच नाहीत असे नाही; पण त्यात सुधारणा करणे हे महत्त्वाचे आहे. ‘हॅलो नंदन’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘आजोबा’, ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘अनवट’ अशा सिनेमांमधून प्रयत्न दिसला; पण अप टू द मार्क नव्हता असे म्हणावे लागेल.
‘लय भारी’ हा सिनेमा हिंदीसारखा पॅकेज होता. डबल रोल, बदला घेणे, अ‍ॅक्शन, गाणी, भव्य सेट असे सगळे काही बॉलीवूडकडे झुकणारे होते. कथेत फारसा दम नव्हता तरी तो प्रेक्षकांनी स्वीकारला, कारण मराठीमध्ये हिंदीसारखे असे पॅकेज बघायला मिळाले नव्हते. ‘रेगे’ हा सिनेमा सर्वार्थाने उत्तम ठरला. कथा, मांडणी, सादरीकरण, छायांकन, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या साऱ्यांत तो सरस ठरला. ‘पोश्टर बॉइज’ निखळ मनोरंजन करणारा ठरला; पण त्यातूनही बोध मिळाला. तसेच दादा कोंडके यांच्या द्वयर्थी संवादाच्या चित्रपटाची संस्कृती जागवली. प्रेमकथेवर असलेले प्रेक्षकांचे प्रेम न संपणारे आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ फारसा यशस्वी ठरला नसला तरी अगदीच सुमार होता असे नाही. ‘दुनियादारी’चा त्यावर प्रचंड प्रभाव असल्यामुळे त्यात नावीन्य दिसून आले नाही. अशाच काही प्रेमकथा ‘तुझी माझी लव्हस्टोरी’, ‘प्रेमसूत्र’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मितवा’, ‘प्रियतमा’, ‘इश्कवाला लव्ह’, ‘मिसमॅच’, ‘सनई चौघडे’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘लग्न पहावं करून’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ अशा सिनेमांमधून दिसल्या. यापैकी सगळ्याच यशस्वी झाल्या नसल्या तरी काही आवर्जून लक्षात राहतील अशाच आहेत. चरित्रपटात मराठी सिनेमा सरस ठरतोय. ‘बालगंधर्व’, ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘७२ मैल एक प्रवास’ हे सिनेमे लोकप्रिय झाले.

lp18चित्रभाषा महत्त्वाची
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. आपण केलेल्या मेहनतीचे कौतुक केले जाते तेव्हा आनंद वाटतो. ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाला अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार असावा ही अभिमानाची गोष्ट आहे. अलीकडे वेगवेगळे सिनेमे येऊ लागले आहेत याचे कारण म्हणजे सिनेमा करू पाहणारे वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळा दृष्टिकोन घेऊन येताहेत. त्यामुळे सिनेमांच्या विषयांमध्ये वैविध्य दिसून येतेय. गेल्या काही वर्षांपासून आलेल्या काही डिजिटल माध्यमांमुळे सिनेमा चटकन स्वीकारला जातोय. पूर्वी त्याचे फार अप्रूप होते. विशेष कला वाटायची. आता तंत्रज्ञान खूप गोष्टी सहज शिकवून जाते. या सकारात्मक बदलांमुळे ग्रामीण भागांतील तरुण मंडळीही सिनेमा करण्याचे धाडस करू लागली आहेत. सिनेमा हे माध्यम ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार कधी, कसे, तिथे स्वीकारतील का, त्याविषयीची त्यांची भीड चेपणार कधी, असे अनेक प्रश्न पूर्वी असायचे; पण आता हे चित्र पालटलेय. प्रचंड वेगाने ही पिढी या क्षेत्रात प्रवेश करतेय. इथले वातावरणही खुले होऊ लागलेय. पूर्वीसारखे बंदिस्त राहिले नाही. सिनेमा करताना नफा-तोटय़ाचा मी विचार करत नाही. सिनेमात नावाजलेला, ओळखीचा चेहरा असल्याचा त्याचा फायदा होतो, इंडस्ट्रीत हा समज आहे, हे खरे, पण मुळात सिनेमातल्या आशयावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. एखादा लोकप्रिय, हुशार कलाकार सिनेमात घेतला तरी सिनेमा चालेलच ही खात्री देता येत नाही, कारण सिनेमाचा विषय तितकाच महत्त्वाचा असतो. चित्रभाषा महत्त्वाची ठरते. सिनेमात कोण आहे किंवा नाही यावर गुणवत्ता किंवा सिनेमाचा व्यवसाय ठरवता कामा नये.
परेश मोकाशी, दिग्दर्शक, एलिझाबेथ एकादशी

मराठी रंगभूमीला जुनी परंपरा आहे. ही परंपरा चित्रपटातूनही जपण्याचे काम काही दिग्दर्शकांनी केले. नाटय़कृतीवर आधारित असे सिनेमे आले. ‘गाढवाचं लग्न’ हे नव्या काळातले उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकावर ‘टाइमप्लीज’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकावर ‘श्रीमंत दामोदर पंत’ आणि ‘सही रे सही’ या नाटकावर आधारित ‘गलेगले निघाले’ हे सिनेमे आले. हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नाही. क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टाइमप्लीज’ या सिनेमाला त्यांचा पहिला प्रयत्न म्हणून दाद द्यावी लागेल. ‘एक डाव धोबीपछाड’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘नारबाची वाडी’, ‘एकुलती एक’, ‘आयना का बायना’ असे काही मनोरंजन करणारे सिनेमेही लक्षात राहिले, तर ‘शाळा’ या सिनेमामुळे सुजय डहाके या दिग्दर्शकाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या. ‘पुणे ५२’, ‘बाजी’, ‘भाकरखाडी ७ किमी’, ‘विटीदांडू’ या सिनेमांचेही विषय वैविध्यपूर्ण होते. काही वेगळे करू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकांना लवकर संधी मिळते. त्यासह काही वेगळे व चांगले विषयही येऊ लागलेत.

lp21
विविध प्रयोगांना उत्तम प्रतिसाद

सिनेमांमध्ये येणाऱ्या वैविध्याचं एक प्रमुख कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतून येणारे लोक आणि त्यांचा दृष्टिकोन. महाराष्ट्राच्या विविध विभागांतून आलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाणिवा आहेत, अनुभव आहेत. ते या माध्यमात दिसून येताहेत. मुळात पूर्वीपेक्षा आता चित्रपट हे माध्यम खुले झाले आहे, कारण पूर्वी एखादा सिनेमा खेडय़ापाडय़ांतला लोकांपर्यंत कसा पोहोचेल, हा प्रश्न असायचा; पण आता त्यात सहजता आली आहे. हा बदल सिनेमासाठी निश्चितच पोषक आहे. म्हणूनच सिनेसृष्टी समृद्ध होत आहे. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यामध्येही सातत्य आहे. ‘देऊळ’, ‘बाबू बँड बाजा’, ‘फँड्री’, ‘धग’, ‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘ख्वाडा’ अशा प्रकारच्या सिनेमांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षी व्यावसायिक आणि कलात्मक अशा दोन्ही प्रकारचे अनेक सिनेमे बघायला मिळाले. या दोन्ही प्रकारच्या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘लय भारी’, ‘टाइमपास’ हे मनोरंजक सिनेमे सुपरहिट होताहेत, तर दुसरीकडे प्रेक्षक ‘फँड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’ अशा सिनेमांनाही उचलून धरताहेत, ही जमेची बाजू आहे. काही वेळा सिनेमाचा विषय चांगला असूनही तो फारसा चालत नाही. तसे सिनेमे बघण्याची प्रेक्षकांची अभिरुची नसते, हे त्यामागचे कारण असू शकेल किंवा काही वेळा मार्केटिंगचे तंत्र मागे पडत असावे. काही सिनेमांचे विषय साधे असतात; पण त्यांच्या मांडणी, धाटणीमुळे ते वैशिष्टय़पूर्ण ठरतात. याच्या उलटही विचार केला पाहिजे. ते वैशिष्टय़पूर्ण ठरावेत म्हणून त्यात ओढूनताणून साधेपणा आणला तर मात्र गणित फसते. चित्रपट ही खर्चीक अभिव्यक्ती आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्टय़ा त्याचा विचार करणे महत्त्वाचे आहेच; पण ‘पैसा कमवणे’ केवळ हाच हेतू नसावा. सिनेमांमध्ये विविध प्रयोग होत असलेल्या या काळात महिला दिग्दर्शकांनीही यायला हवे. केवळ स्त्रीवादी विचारसरणी न दाखवता इतर काही विषयांवर सिनेमे करावे.
नागराज मंजुळे, लेखक-दिग्दर्शक

साधारण पन्नास वर्षांपूर्वी कालखंड ‘जगाच्या पाठीवर’, ‘प्रपंच’, ‘अवघाचि संसार’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मानिनी’ अशा सिनेमांनी गाजवला. हे चित्रपट आशयघन होते. याच काळात निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांचा एक प्रेक्षक होता. तोच प्रेक्षक आशयघन सिनेमांकडेही वळू लागला होता. असाच प्रेक्षक आताच्या काळात तयार होताना दिसतोय. ‘लय भारी’, ‘टाइमपास’, ‘दुनियादारी’ अशा सिनेमांच्या काळात प्रेक्षक lp22‘एलिझाबेथ एकादशी’, ‘फँड्री’, ‘धग’, ‘किल्ला’ अशा सिनेमांनाही जवळ करतोय. प्रेक्षकांच्या विचारांमधली प्रगल्भता अलीकडच्या काळात प्रकर्षांने जाणवू लागली आहे. आणि म्हणूनच हे प्रयोगशील सिनेमे आता बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत नसले तरी ते व्यवसाय करण्याच्या वाटेवर नक्कीच पुढे सरसावले आहेत. इथेही श्रेय जातं ते तरुण दिग्दर्शकांना. सिनेमांच्या विषय, आशयाच्या बदलप्रक्रियेत निश्चितच तरुणाईचा वाटा मोठा आहे. ही फेज काही काळापूर्वी हिंदीमध्ये दिसली होती. प्रयोगशील सिनेमे आणि व्यवसायिक सिनेमे असे दोन वेगवेगळे प्रकार होते. पण, आता तिथेही प्रयोगशील सिनेमे चांगला व्यवसाय करु लागले आहेत. ‘इक्बाल’ हे त्यातलं ठळक उदाहरण म्हणता येईल. या सिनेमात गुंतवणूक करणारे सुभाष घई, सिनेमाचा विषय, व्यवसायिकदृष्टय़ा पोषक असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी अशा सगळ्यांचा समावेश असल्यामुळे तो सिनेमा चर्चिला गेला. असाच बदल आता मराठीत होईल का, हा मुद्दा आहे.
सारांश, मराठी सिनेसृष्टी आता ‘इंडस्ट्री’ होऊ पाहतेय. इंडस्ट्रीमध्ये चढ-उतार हे येतातच. तसेच इथेही आहेत. त्यात प्रयोगशीलताही अलीकडच्या काळात बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पूर्वीसारखे ठरावीक बाजात न अडकता दिग्दर्शक, लेखक चौकटीबाहेरचा विचार करू लागलेत. विविध फेस्टिव्हलला मराठी सिनेमे आपले स्थान प्रस्थापित करताहेत. यात तरुणांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. याची दुसरी व्यावसायिक बाजू लक्षात घेतली तर ती अजून शंभर टक्के भक्कम नाही हे खरे, पण किमान सिनेमांच्या विषयांमध्ये वैविध्य दिसून येतेय. त्यापैकी सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालतात असे नाही, पण मराठी सिनेमांमध्ये पर्याय आले आहेत. मराठीच नाही तर हिंदी सिनेमांनाही पर्याय म्हणून मराठी नवनवीन सिनेमांकडे प्रेक्षक वळू लागला आहे. मराठी सिनेमांना नवं वळण देणाऱ्या या तरुणाईकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
चैताली जोशी