साहित्य अकादमीच्या ‘नवोदय’ मालिकेअंतर्गत युवा कवी मिहिर चित्रे याचा ‘हायफनेटेड’ हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्याला पुरस्कारही मिळाला आहे. त्याविषयी त्याच्याशी झालेल्या या गप्पा.

‘हायफनेटेड’ची कल्पना कशी सुचली, हे सांगताना मिहिर अगदी सुरुवातीपासून त्याच्या लेखनाविषयी बोलू लागला. ‘‘स्वत:चं एखादं पुस्तक असावं असं खूप वाटायचं. कविता लिहिण्याअगोदर मी कथा लिहायचो. वयाच्या १८-१९ वर्षांपासून मी लिहायला सुरुवात केली, मात्र अगोदरच्या काळात केलेलं ते लेखन सुमार दर्जाचं होतं याची जाणीव होती. तरीदेखील मी नेटाने लिहीत होतो. आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करत होतो. अनेक मासिकांना कथा पाठवायच्या, पण त्या साभार परतायच्या. अशातच ‘क्रित्या’ आणि ‘एन्चँटिंग वर्सेस्’ या मासिकांत काही लेखन छापून आलं. कवितेकडे नंतर वळलो. गेल्या पाच वर्षांच्या काळात जे अनुभव आले, जे पाहिलं, जे सुचलं त्याचा संग्रह म्हणजेच ‘हायफनेटेड’ होय.’’
मिहिरच्या या संग्रहात ‘वॉललेस सिटी’, ‘द फुल-हार्टेड डेज्’, ‘क्राय-लाय-व्हाय’ यांसारख्या वेगवेगळ्या शीर्षकांतर्गत ६४ कविता समाविष्ट केल्या आहेत. खरं तर या कवितांमध्ये कोणतेच समान सूत्र नाही. २००९-२०१४ या कालावधीत या कविता लिहिलेल्या आहेत. तरीही त्या एका अदृश्य धाग्यात गुंफल्या गेल्या आहेत. तो धागा म्हणजेच मिहिरला अपेक्षित असलेला ‘हायफन’ (-) आणि म्हणूनच या संग्रहाचं नाव ‘हायफनेटेड’. त्याच्या काही कवितांतून आपल्याला दृश्यात्मकता जाणवते. उदाहरणार्थ ‘वॉललेस सिटी’मधील कविता. या कवितांतील शहर हे अर्थातच ‘मुंबई’. त्यात पानवाले, रिक्षावाले, चहावाले, हिजडे, वेश्या, दारुडे, देवभोळे असे विविध लोक आहेत. प्रवाशांच्या लोंढय़ांनी गजबजलेली रेल्वे स्टेशन्स् आहेत, समुद्रकिनारा आहे. या सगळ्या कवितांतून त्याने केलेलं अचूक निरीक्षण जाणवत राहतं.
गप्पांच्या या ओघात मिहिरने त्याचा साहित्य अकादमीशी कसा संबंध आला ते सांगितलं. २०१२ आणि २०१४ साली साहित्य अकादमीच्या युवा साहित्यिकांच्या राष्ट्रीय संमेलनात त्याने आमंत्रणावरून काव्यवाचन केले. शिवाय त्याने पाठवलेली एक कथा साहित्य अकादमीच्या अंकात छापून आली. तिथूनच त्याची साहित्य अकादमीतील काही अधिकाऱ्यांशी चांगली ओळख झाली. पुढे त्याने ‘हायफनेटेड’चं हस्तलिखित पाठवलं, मात्र दीड-दोन वर्षे काहीच गती मिळाली नाही. मग फॉलोअपचा खेळ सुरू झाला. साहित्य अकादमी हा खूप मोठा ब्रँड असला तरी शेवटी ती सरकारी संस्थाच आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारी संस्थेचा येतो तसा संथ कारभाराचा अनुभव आल्याचं मिहिर सांगतो, मात्र आपला संग्रह छापण्याविषयी ते अनुकूल होते, हेदेखील तो नमूद करतो.
कवितेविषयी मिहिरची मते खूप स्पष्ट आणि ऐकण्यासारखी आहेत. त्याच्या मते कविता ही कधीच साचेबद्ध नसते तर ती लेयर्ड असते. इट इज प्रोफाउंड एक्सप्रेशन. काही गोष्टी, अनुभव हे कवितेतच मांडता येतात. एकंदरच काव्यलेखन मला विशुद्ध कलाच वाटते आणि तीच माझी विशुद्ध, अमीट ओळख असावी. त्याचं दुसरं एक मत म्हणजे काव्याच्या क्षेत्रात कवींसाठी स्त्रीवादी, दलित असे टॅग्ज नसावेत. कवी एवढीच ओळख पुरे.
मिहिरच्या घरचेदेखील काव्यशास्त्रविनोदात रमणारे. बोलण्याच्या ओघात कळलं की तो मराठीतील सुप्रसिद्ध ‘अभिरुची’ मासिकाचे संपादक पुरुषोत्तम चित्रे यांचा नातू, तर प्रख्यात कवी दिलीप चित्रे यांचा पुतण्या. आपल्या आजोबांना तो ‘बा’ म्हणायचा. ते त्याला दर दुपारी महाभारत वाचून दाखवायचे. आपल्या दादाकाकाबद्दलही (कवी दिलीप चित्रे) तो आपुलकीने बोलतो. मिहिरला त्या दोघांच्या कामाबद्दल आदर आहे, या दोघांच्याही साहित्यिक कर्तृत्वाची त्याला विनम्र जाणीव आहे आणि त्याच वेळी स्वत:च्या निर्मितीविषयी जाणीव. त्याच्या मते काव्यलेखन हे क्रिकेटमधील बॅटिंगसारखंच असतं. बॅटिंगचा फॉर्म जसा हळूहळू सुधारत जातो तसंच माझ्या कवितेचं आहे. कवितेतून मिळणारा आनंद हा जिभेवर रेंगाळणाऱ्या ‘पापलेट फ्राय’च्या चवीसारखं असल्याचं मिहिर सांगतो.
लेखनाव्यतिरिक्त मिहिर काव्यवाचनातही तितकाच रमतो. फर्नाडो पेसोआ, मक्र्वेझ, पाब्लो नेरुदा, रिल्के, इलियट, एडगर पो, रेमण्ड काव्हर यांच्या कविता त्याला भावतात. अरुण कोलटकर यांच्या ‘काला घोडा पोएम्स’ त्याला विशेष आवडतात. इंग्रजी साहित्याकडे त्याचा लहानपणापासूनच कल होता. घरात मराठीइतकंच इंग्रजीमध्ये बोलणं, चर्चा सुरू असायचं. शिवाय त्याचे मित्रमंडळीही बहुभाषिक. त्यामुळे मराठीच्या जोडीने इंग्रजीही सफाईदार झालं.
जाहिरात क्षेत्रात कॉपीराइटर म्हणून काम करणाऱ्या मिहिरला काही ठोस संकल्पनांवर लिखाण करायचंय.