zr01खगोलशास्त्रातल्या नऊ ग्रहांच्या आधारावर निर्माण केलेले फलज्योतिषशास्त्र एकविसाव्या शतकातही तितकेच लोकप्रिय आहे. दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला सामोरे जाताना मनात एक अनामिक भीती नकारात्मक विचारांना घट्ट पकडून बसलेली असते. शिक्षण, उद्योगधंदा, विवाह या आनंदमय घटनांकडे आपण भीतीच्या नजरेतून पाहात असतो त्यामुळे अतिहळव्या मनाच्या लोकांचे जगणेच मुश्कील होऊन बसते. पण या सर्वावर एक आधार आणि मार्गदर्शन म्हणून ज्योतिषशास्त्राची हवी तितकी मदत घेतली तर निश्चितच एक आत्मविश्वास आणि दिलासा मिळतो.
फलज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रह आणि संख्याशास्त्र यांचा एक उत्तम मेळ घातला तर फलादेश वर्तवताना चांगली सूक्ष्मता लाभते. याचा अभ्यास केला असता मिळालेला निष्कर्ष खूपच आशादायी आणि प्रेरणादायी वाटला. विशेषत: निर्भय आणि सकारात्मक जगण्यासाठी फलज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्राचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो आणि यातूनच  सकारात्मक विचार करण्याची सवय लागते. कारण आपल्या मनातील सूक्ष्म संवेदना आपलं भविष्य घडवण्यात नकळतपणे हातभार लावीत असतात.
भविष्य निदानात आपण जो वाईट कालाचा उल्लेख वाचतो त्यामागेही एक सकारात्मक विचार असतो. एक तर त्यातून आपल्याला आधीच त्या संकटाची चाहूल लागते. त्यातून आपल्या मनाची तयारी करण्यासाठी अवधी मिळतो. पण त्यापेक्षाही त्या संकटावर मात करण्यासाठी आपले मन तयार राहते आणि त्या येणाऱ्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो. तसेच शुभ घटनेच्या वेळीही आपण मनात रुजलेला सकारात्मक विचार आपल्याला खूप काही मदत करतो. विशेषत: त्या काळात सुचलेल्या कल्पना आपल्या जीवनात खूप फायदेशीर ठरतात. मात्र भविष्य वाचून आळशी न बनता उद्योगी बनण्याचा विचार सतत मनात ठेवावा. म्हणजे वाचलेले भविष्य आपल्याला खूप आशादायी आणि प्रेरणादायी ठरेल. त्यातून झाला तर नक्कीच फायदाच होईल.
२०१५ हे साल सर्वाना कसे जाईल ते पाहू.
२०१५ = २+०+१+५= ८ हा अंक शनी ग्रहाच्या अमलाखाली येतो. २०१५ हे साल शनीच्या अमलाखाली येते. त्यामुळे पूर्ण जगावर शनी या ग्रहाचा अंमल राहणार आहे. विशेषत: भारत देशाला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ साली मिळाले. १५= १+५=६ हा अंक ८ चा उत्तम मित्रांक आहे. हा ६ अंक शुक्राच्या अमलाखाली येतो आणि शुक्र आणि शनी तसे मित्रग्रह आहेत. त्यामुळे शुक्राच्या अमलाखाली असलेल्या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना हे वर्ष सुखदायी जाईल. ज्या नाटय़-सिनेमा कलाकारांच्या जन्मतारखा ३, १२, २१ व ३० तसेच ६, १५ व २४ असतील अशा कलाकारांना हे वर्ष सुखदायी जाईल.
तसेच १५-८-१९४७ सालचा भाग्यांक १+५+८+१+९+४+७ = ३५=३+५=८ येतो त्यामुळे हे वर्ष भारताला समाधानकारक जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्म तारीख १७ सप्टेंबर १९५० आहे. या जन्म तारखेचा मूलांकही १+७= ८ येतो. त्यामुळे हे वर्ष त्यांना यशदायक जाईल. विशेषत: जगात त्यांच्या विचारांचे कौतुक होईल. मात्र स्वत:च्या देशात कठोर निर्णय घेताना त्यांना खूप कटकटींना सामोरे जावे लागेल. विशेषत: २१ मार्च ते १९ एप्रिल हा काळ त्रासदायक जाईल. एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर समाधानकारक जातील.
शनीच्या अमलाखाली येणारा ८ हा अंक सिनेनाटय़ जगताला भरभरून यश देईल. क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती होईल. राजकारणात गेल्या दहा वर्षांत ज्यांनी लोकांची फसवणूक केली त्या नेत्यांना न्यायालयातून मिळणारा न्याय कठोर स्वरूपाचा असेल. कारण शनी हा न्याय देणारा ग्रह आहे. त्यामुळे हा ग्रह न्यायदेवतेचा सन्मान करील. या वर्षांत न्यायालयातील येणारे निकाल नेत्यांसाठी कठोर ठरतील.

नवीन संधी,    यशदायक वर्ष
lk66आपला जन्म २१ मार्च ते १९ एप्रिलदरम्यान झाला असेल तर आपल्यावर नऊ अंकांचा म्हणजे मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त असेल. विशेष करून या महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती जास्त करून पोलीस खात्यात तसेच संरक्षण खात्यात असतात. तसेच विविध खेळात खेळाडू म्हणून या लोकांची संख्या जास्त असते. शरीरापेक्षा ही माणसे मनाने खूपच बळकट असतात. कठोर निर्णय घेणे, साहसी वृत्ती यामुळे लोकांमध्ये यांची एक वेगळीच प्रतिमा निर्माण होते. राजकारणात प्रशासकीय कामे करण्यात, निर्णय घेण्यात यांची मानसिकता यांना उत्तम साथ देते. यांच्या अतिस्पष्ट स्वभावामुळे यांच्या विरोधकांच्या संख्येत भर पडत असते. आयुष्यभर संघर्ष करणे, न्याय मिळवण्यासाठी लढणे चालू असते, पण धैर्य, साहस आणि शौर्य यांच्या जोरावर ही माणसे नेहमीच यश मिळवतात.
जानेवारी २०१५- नोकरी उद्योगधंद्यात उत्तम प्रगती, मात्र घरातील वातावरण शांत ठेवा. आरोग्य चांगले राहील. अतितापटपणे वागू नका. मानसिक संतुलन जपा. महत्त्वाची कामे, बोलणी जरूर करा. सरकारी कामकाजात यश मिळेल.
फेब्रुवारी २०१५- हा महिना अतिशय शुभ घटकांचा आहे. मन प्रसन्न राहील, लहान-मोठे प्रवास घडतील. नवे परिचय, नव्या ओळखी यातून आनंद मिळेल. नोकरी-उद्योग धंद्यात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. खेळात, राजकारणात यश लाभेल.
मार्च २०१५- प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. दगदग टाळा. अति विश्वास ठेवून व्यवहार करू नका. कागदपत्रे तपासून निर्णय घ्या. सिनेनाटय़ क्षेत्रातील व्यक्तींना यश आणि विशेष मान-सन्मान लाभेल. वाहने सांभाळून चालवा. शक्य तो रात्रीचा प्रवास टाळा.
एप्रिल २०१५- जमीन घरे आदी कोर्टकचेरीच्या कामात मनासारखे निर्णय होतील. उद्योगधंद्यात नवीन भागीदार आणि नवीन कल्पना यामुळे विशेष प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. राजकारणी लोकांनी विशेष सावधपूर्ण निर्णय घ्यावेत.
मे २०१५ – हा महिना खूपच आनंदी जाईल. लग्नसमारंभ, सत्कार समारंभ यात विशेष उपस्थिती. पथ्य, आरोग्य सांभाळा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. शब्द-वचने देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. महिलांकडून विशेष खरेदी.
जून २०१५-  नोकरीधंद्यात वरिष्ठांशी वादविवाद टाळा. महत्त्वाचे निर्णय त्वरित घेऊ नका. धंद्यात नफ्या-तोटय़ाचे गणित लक्षात घेऊन व्यवहार करा. जुनी येणी येतील. आरोग्य चांगले राहील. घरातील नातेसंबंध जपा. जुने मित्र, नातेवाईक यांच्या भेटीगाठीत आनंद मिळेल.
जुलै २०१५ –  घरातील वातावरण आनंदी, खेळीमेळीचे राहील. सामाजिक कार्यात नवीन ओळखी परिचय होतील. एखादी चांगली योजना आखण्यात आपला विशेष सहभाग राहील. आर्थिक बाजू चांगली राहील. कामात विशेष उत्साह व आनंद लाभेल. बाहेरचे खाणे टाळा. खाण्याचा अतिरेक नको. अपचन, पोटाचे विकार यापासून दूर राहा.
ऑगस्ट २०१५ –  कोर्ट कचेरीची कामे होतील. मनाला त्रास देणाऱ्या घटनांचा फार विचार करू नका. गैरसमज टाळा. उद्योगधंद्यात येणाऱ्या कामाचा उरक लवकर आटपत जा. मानसिक रेंगाळणे थांबवा. शक्य झाल्यास नाटक-सिनेमा करमणुकीच्या कार्यक्रमात वेळ घालवा. पण वेळेचे भान राखून. प्रकृतीची काळजी घ्या.
सप्टेंबर २०१५- आपली घोडदौड प्रगतिपथावरून जोरदार चालू राहील. अधूनमधून येणाऱ्या किरकोळ अडचणी सहज दूर करू शकाल. घरात मंगल कार्ये ठरतील. पाहुणे नातेवाईक यांच्या विशेष गाठीभेटीत आनंद लाभेल. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
ऑक्टोबर २०१५-  नवीन विचार, नवीन कल्पना आनंदी जगण्यासाठी खूपच मदत करतील. नेहमीच्या स्वभावात फरक घडवून आणा. अतितापटपणा शरीराला त्रासदायक असतो. दुसऱ्याच्या व्यथा, दु:ख समजून घ्या. प्रवासात प्रेमप्रकरणात विशेष सावधतेने वागा. वचने, शब्द देऊन स्वत:ची कोंडी करू नका.
नोव्हेंबर २०१५- उद्योगधंद्यात झालेले गैरसमज दूर होतील. नवीन जागा घेताना कागदपत्रे आणि कायद्याची चौकटी सांभाळा. आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरीत बढतीचे योग येतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. सणवार साजरे करताना विशेष आनंद लाभेल.
डिसेंबर २०१५- गैरसमज, अहंभाव यातून होणारे वाद त्वरित मिटवा. उदासीन वातावरणापासून दूर राहा. आपल्या शब्दाला खूप किंमत आहे. शब्द जपून वापरा. आपल्या आवडत्या माणसात मन रमवा. उद्योगधंद्यात नवीन संधी येतील. महिन्याअखेर महत्त्वाचे निर्णय जरूर घ्या.
तुमच्यातील आत्मविश्वास तुमचा खरा मार्गदर्शक आहे. फक्त राग, क्रोध, साहस, शूरता यांचा उपयोग मोजूनमापून केलात आणि हे तुम्हाला जमले तर पुढील आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

कर्तृत्व दाखवाल
lk67जगण्यातला खरा आनंद घेणारी माणसे वृषभ राशीची असतात. या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि याच राशीत चंद्र उच्च राशीत असतो. शुक्र आणि चंद्र हे दोन्ही ग्रह आनंद, उत्साह, मजा यांचे द्योतक आहेत. दुसऱ्याच्या दु:खातही सुख शोधून त्याला आनंदी ठेवण्याची कला तुमच्यापाशी आहे. आयुष्यात येणारा अपयशाचा भाग पुरता विसरून तिथे यशाचा शोध घेण्यात आणि ते शोधताना सदैव आनंदी राहण्याचे कसब यांच्यापाशी असते. या महिन्याचा शुभांक ६ येतो आणि हा सहा या वर्षांचा येणारा एकांक २०१५=८ चा उत्तम मित्रांक आहे. या ६ ला ८ ची सतत वर्षभर साथ लाभणार आहे. त्यामुळे या जोडीची वृषभ राशीला खूप चांगली मदत होणार आहे.
जानेवारी २०१५-  या महिन्यात पैशाची आवक आणि खर्च यांचा ताळमेळ बसणार नाही. तेव्हा पैशाची उधळपट्टी न करता पैसा जरूर तिथे अवश्य खर्च करा. घरी वा प्रवासात मौल्यवान वस्तूंची जपणूक करा. मित्रमंडळीत आश्वासने वा शब्द देऊन संकटात येऊ नका. जरुरीपुरते प्रवास अवश्य करा. स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
फेब्रुवारी २०१५- उद्योगधंद्यात नवीन बदल करण्यापूर्वी वरिष्ठ मित्रमंडळीचा सल्ला अवश्य घ्या. नव्या ओळखीतून नवीन योजना जन्म घेतील. कार्य सफलतेसाठी मेहनत आणि वेळ याचा उपयोग करून निर्णय घ्यावेत. नातेसंबंधात भावनात्मक गुंतवणूक मनस्ताप देईल. तेव्हा संयमाने निर्णय घ्या. आपल्या स्वभावाचा गैरफायदा कोणालाही घेऊ देऊ नका.
मार्च २०१५- घरात किंवा घराबाहेर निर्माण झालेल्या पेच-प्रसंगांना उत्तम प्रकारे सामोरे जाल. बुद्धी आणि व्यवहारचातुर्याच्या साह्यने उद्योगधंद्यात पुढे जाल. अतिकामामुळे मन, शरीर थकल्यासारखे होईल. दगदग कमी करा. आराम करा.
एप्रिल २०१५- या महिन्यात तब्यतेची विशेष काळजी घ्या. हट्टीपणा, अहंभाव यापासून दूर राहा. वडीलधारी मंडळीने दिलेला सल्ला मोठय़ा मनाने स्वीकारा. उद्योगधंद्यात नोकरीत येणारे कटू अनुभव पुढील आयुष्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील. आर्थिक समस्या दूर होतील.
मे २०१५- या महिन्यातले आपले ग्रहमान थोडेसे रुसून बसले आहेत. त्यामुळे मनाची चलबिचल होईल. मन स्थिर ठेवा. मनाची ताकद खूप मोठी असते. अधूनमधून मेडिटेशन, ध्यानधारणा अवश्य करा. यामुळे मनाला शांतता लाभेल.
जून २०१५ – आर्थिक गुंतवणूक करताना विचापूर्वक करा. नको तो खर्च, बुद्धी आणि कर्तृत्व यांचा चांगला समन्वय साधून येणाऱ्या कामांना सामोरे जा. अडचणीच्या काळातच महान यशाची सुरुवात होत असते.
जुलै २०१५- या महिन्यात शुक्र ग्रहाची उत्तम मर्जी आपल्यावर होत आहे. घरातील वातावरण आनंदी, मंगलमय राहील. अनेक कठीण समस्या दूर होतील. उद्योगधंद्यात नवीन परिचय कामास येतील. धार्मिक कामात सहभागी व्हाल. यशदायक घटनांची सुरुवात होईल.
ऑगस्ट २०१५- अतिशय उत्तम काळ. सामाजिक कार्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरातील भावविश्व आनंदी राहील. उत्तम अर्थप्राप्ती होईल. आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास खूप चांगले काम करील. निर्भयपणे वावरताना मनाला खूप हलके हलके वाटेल.
सप्टेंबर २०१५- या महिन्यात खूप धावपळ वाढेल. जीवन काहीसे यांत्रिक झाल्यासारखे वाटेल. भावनेच्या भरात रागाने केलेल्या चुका पुन:पुन्हा आठवत बसू नका. कामांना क्रम देऊन कामासाठी वेळ द्या. पण घडय़ाळाच्या काटय़ाला टांगल्यासारखे जगू नका. वेळेचे गणित सांभाळून मनही आनंदी ठेवा.
ऑक्टोबर २०१५- अचानक खर्चाचे योग येतील. दिलेला शब्द पाळा. त्याची किंमत पुढे चांगल्या रूपात मिळेल. मनाचे आरोग्य जपा. फार हळवे होऊ नका. जीवनातल्या प्रत्येक समस्येला उपाय आहे. मात्र तो शोधण्यासाठी तुमच्या बुद्धीचा वापर करा. शाब्दिक चकमकींना फारशी किंमत देऊ नका.
नोव्हेंबर २०१५- लाभदायक घटना घडतील, पण घरात अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. घरातील वडील मंडळीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मन स्थिर ठेऊन परिस्थिती हाताळा. मित्रांमध्ये थट्टा-विनोदातून गैरसमज करून घेऊ नका. तो आनंदाचा एक भाग आहे. त्यात तुम्हीही पोटभर हसून सामील व्हा.
डिसेंबर २०१५- वर्ष संपत आलंय. उद्योगधंदा, घरातील समस्या यामुळे मन थकल्यासारखे होईल, पण थोडीशी विश्रांती घेऊन आलेली मरगळ झटकून टाका. मनात नवीन नवीन योजना तयार ठेवा. पुढील वर्षांत तुम्हाला तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी चालून येणार आहे. तेव्हा स्थिर मनाने हे आव्हान स्वीकारा.
उत्तम जगण्याची कला तुमच्यापाशी आहे. किती जगलात यापेक्षा कसे जगलात या विचाराला प्राधान्य देऊन भूतकाळातल्या स्मरणांपेक्षा उद्याच्या मंगलमय दिवसांचे स्वागत करा.

निर्णय घेण्याची उत्तम क्षमता
lk68आपला जन्म २१ मे ते २० जून दरम्यान झाला असेल तर आपल्यावरती ५ अंकाचा म्हणजे बुध ग्रहाचा प्रभाव जास्त आहे. बुध हा ग्रह इतर ग्रहाच्या तुलनेने बुद्धिमान ग्रह मानला जातो. यांचे बोलताना विशिष्ट हावभाव आवाजातील विशिष्ट चढउतार उत्स्फूर्त असतात. ते ठरवून किंवा पाठ करून ते करता येत नाही तर त्यापाठीमागे मनातील वैश्विक सुप्त शक्तीचा तो आविष्कार त्या व्यक्तीच्या माध्यमातून होत असतो. विशेषत: ५ अंकाच्या प्रभुत्वाखाली येणाऱ्या लोकांमध्ये या वरील गुणांचा भाग जास्त प्रमाणात आढळतो. इतकेच नव्हे तर समोरील माणसाच्या मन:स्थितीचा अभ्यास करून ही माणसे त्याचं मन वाचू शकतात.
या वर्षांचा येणारा २०१५= ८ अंक आणि बुधाचा ५ हे दोन्ही मित्रांक यावर्षी आपल्या आयुष्यातले फार महत्त्वाचे निर्णय घेतील. याच्या वैश्विक बुद्धीला निसर्गत:च एक वेगळे वलय प्राप्त होईल. जेणेकरून न्याय-अन्यायाच्या शब्दाचे खरे अर्थ उलगडण्यास यांचा मोठा हातभार लागेल. विशेषत: या राशीच्या वकील-न्यायाधीश मंडळीमध्ये खऱ्या अर्थाने समाजमंथन घडविण्याची ताकद निर्माण होईल.
जानेवारी २०१५- जुन्या नातेवाईक मित्रमंडळीच्या गाठीभेटीचा आनंद मिळेल. मानसन्मानाचे प्रसंग येतील. पाय, गुडघेदुखी ही दुखणी त्रास देतील. काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी वर्गाला उत्तम काळ. पैशाची आवक वाढेल.
फेब्रुवारी २०१५- या महिन्यामध्ये सारे ग्रह आपसातील मतभेद विसरून मिथुन राशीच्या मदतीला धावणार आहेत. तेव्हा जमीन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील. जवळचे, दूरचे प्रवास घडतील.
मार्च २०१५- उद्योगधंद्यात, राजकारणात यशदायक काळ. स्थावर इस्टेटीचा हिस्सा मिळेल. समजूतदारपणा, साधेपणा हे गुण तुमचे सद्गुण ठरतील. मध्यस्थी म्हणून आपला सन्मान होईल. सामाजिक कार्यातील सहभाग भूषणावह ठरेल.
एप्रिल २०१५- आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. अतिभावनिक राहू नका. घरातील मतभेद फार काळ टिकणार नाहीत. आपला सल्ला लोक ऐकतील. तरुण मंडळीना नोकरीधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील.
मे २०१५- उत्तम काळ. प्रयत्नास उत्तम साथ लाभेल. नवीन योजना प्रत्यक्षात आकार घेतील. बोलण्या-वागण्यातील नम्रता आपल्या कामात नकळत मदत करील. शक्य तो राजकारणापासून दूर राहा. संयम आणि शांतपणे निर्णय घ्या.
 जून २०१५- हा लाभदायक घटनांचा काळ आहे. उद्योग, नोकरीत धन लाभाचे योग आहेत. सरकारी कामकाजात यश लाभेल. मान-सन्मानाचे योग येतील. कलाकार साहित्यिकांना पुरस्कार प्राप्त होतील. कलेचे कौतुक होईल. मुलांना शिक्षणात यश लाभेल. घरात मंगलकार्ये ठरतील.
जुलै २०१५- मनासारखी कामे होतील. उदासीन वातावरणापासून दूर राहा. आपल्या आवडत्या माणसात मन रमवा. मित्र मंडळीच्या गाठी-भेटीत निर्भेळ आनंद लाभेल. गैरसमजुतीतून होणारे वादविवाद त्वरित मिटवा. कुणालाही झालेल्या अपराधाबद्दल शिक्षा करू नका. क्षमा करा.
ऑगस्ट २०१५- अतिभावनावश होऊन निर्णय घेऊ नका. पैशाची आवक वाढेल. नवीन कामे येतील. मात्र वेळेचे बंधन पाळा. आपला अमूल्य वेळ कुठे फुकट जातो ते शोधा. टीव्ही मालिकांच्या खोटय़ा कहाण्यांत मन गुंतवू नका. स्वत:ला प्रोत्साहन देण्याची कला आत्मसात करा.
सप्टेंबर २०१५- सुरुवातीचे पंधरा दिवस खूप अनकूल आहेत. येणारी प्रत्येक संधी तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करणारी आहे. त्या संधीचे सोने करा. कौटुंबिक जिव्हाळय़ाचे प्रश्न सुटतील.
ऑक्टोबर २०१५- सामाजिक कार्यात आनंद मिळेल. दूरचे प्रवास घडतील. अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी होतील. एकूण हा महिना खूपच उत्तम जाईल. प्रसंगावधान दाखवाल. मनोबल वाढेल. आरोग्य चांगले राहील.
नोव्हेंबर २०१५- आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. सामाजिक कार्यात राजकारणात भाग घ्याल. सामंजस्याने प्रश्न सोडवा. संयम, सावधानता या गोष्टी हिताच्या ठरतील. निर्णयात स्पष्टता ठेवा. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका.
डिसेंबर २०१५- शुभ ग्रहाचे पाठबळ घेऊन पुढील प्रवास करीत आहात. वैयक्तिक जीवनात जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो, त्याचे हित बघतो तेव्हा तो ईश्वर सेवेचा एक लहानसा भाग होतो. सामाजिक जीवनात निर्णय घेताना खूप काळजी घ्या. सत्याची बाजू ठामपणे मांडा.
बुद्धी आणि मन या दोन्ही गोष्टींचा सन्मान करा, पण मनात येईल तसा बुद्धीचा वापर करू नका आणि मनातल्या नाजूक गोष्टींना बुद्धीच्या पारडय़ात टाकून बुद्धीला भावविवशतेच्या गोठय़ात बांधू नका. या दोन्ही गोष्टी परस्पर आपापल्या परीने खूप उच्च स्तरावर आहेत.

अतिहळवेपणा टाळा
lk69आपला जन्म २१ जून ते २० जुलैदरम्यान झाला असेल तर आपल्यावरती चंद्रगहाचे वर्चस्व असेल. चंद्रग्रहाचा अंक २ येतो आणि २०१५ चा वर्षांचा अंक ८ येतो. २ आणि ८ चंद्र आणि शनी. या दोन ग्रहांचा प्रभाव या वर्षी आपल्या कर्क राशीवर वर्षभर राहणार आहे. चंद्र आणि शनी जरी कुयोग असला तरी याच राशीत गुरू ग्रहाचे अस्तित्व असल्यामुळे लेखक शास्त्रज्ञ आणि काही राजकारणी मंडळी यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक पूर्ण जगाला चकित करणारी ठरेल.
सहृदय, स्नेहशील, स्वप्नाळू, संवेदनशील भावुक, मधुर ही चंद्रग्रहाची लक्षणे कर्क राशीच्या वागण्या-बोलण्यात चांगलीच दिसून येतात. पण जगात वावरताना वरील शब्द फक्त लोकांची करमणूक ठरतात. खरेखुरे जगताना ठामपणा, निश्चय, स्वाभिमान, चिकाटी या गुणांची खूप आवश्यकता असते. चंद्र प्रभावाखाली जगणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.
जानेवारी २०१५- आपल्या राशीत स्थानापन्न झालेला गुरू खूप मोठा आधार ठरेल. आपली प्रगतिपथावरील घोडदौड चालू राहील. मानसिक ताण वाढेल. भावुक होणे टाळा. सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे निर्णय घेताना विशेष काळजी घ्या. वरिष्ठांशी होणाऱ्या गाठीभेटी फलद्रूप होतील.
फेब्रुवारी २०१५- घरात मंगलकार्ये ठरतील. जमिनी, घराचे व्यवहार सुरळीत होतील. घरातील मुलांना विद्याभ्यासात विशेष यश लाभेल. तरुणांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पैशाची आवक वाढेल.
मार्च २०१५- बऱ्याच नवीन जबाबदाऱ्या वाढतील. अचानक पैशाचे प्रमाण वाढेल. उद्योगधंद्यात गैरसमज दूर होतील. पेचप्रसंगांना उत्तम प्रकारे सामोरे जाल. शक्यतो नात्यात होणारे वादविवाद टाळा. सलोख्याने गैरसमज दूर करा.
एप्रिल २०१५- परिस्थितीत उत्तम बदल घडेल. नवीन परिचयातून होणारी मैत्री फायदेशीर ठरेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्रास करून घेऊ नका. धीराने वागा. निर्णय घेतांना मनाचा गोंधळ टाळा. ठाम निर्णय घ्या. परत परत नको ते विचार डोक्यातून काढून टाका.
मे २०१५- या महिन्यातील शुक्राचा प्रवास खूप शुभदायक ठरेल. प्रेमप्रकरणातून विवाह जमतील. उद्योगधंद्यात दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा. नातेवाईक मित्रमंडळीच्या भेटीत आनंद मिळेल. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घेणे फायद्याचे ठरेल.
जून २०१५- घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. जुन्या परिचयाची व्यक्ती आपल्याला महत्त्वाच्या कामात मदत करील. पोटाच्या किरकोळ तक्रारी त्रास देतील. प्रेमप्रकरणातील भावुक प्रसंगात स्थिर राहून निर्णय घ्या.
जुलै २०१५ – घरातील वातावरण आनंदी राहील. तरुणांना नोकरी निमित्त परदेश प्रवास घडेल. बुद्धी आणि कर्तृत्व यांचा उपयोग वेळेवर केलात तर नोकरी उद्योगधंद्यात तुमची विशेष प्रगती होईल. राजकारणी, पुढारी लोकांपासून मात्र दूर राहा.
ऑगस्ट २०१५- तुम्ही आखलेल्या नवीन योजना पुऱ्या होतील. धंद्यात नफ्याचे प्रमाण वाढेल त्यामुळे अचानक धनलाभ होईल. नव्या ओळखीतून नवीन उद्योगधंद्याच्या कल्पना सुचतील. कोर्ट प्रकरणांत उगाचच मनस्ताप होईल.
सप्टेंबर २०१५-  तुमच्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. अचानक मिळालेल्या संधीचे सोने कराल. महिलांना उत्तम आरोग्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात विशेष सहभाग घडेल.
ऑक्टोबर २०१५-  लाभदायक घटना घडतील. उद्योग-नोकरीतून पैशाची आवक वाढेल. आरोग्य चांगले राहील. नोकरीधंद्यात नवीन योजना फलदायक ठरतील. विद्याभ्यासात मुलांची विशेष प्रगती, प्रवासाचे योग येतील. प्रवासातील परिचयाचे मैत्रीत रूपांतर होईल.
नोव्हेंबर २०१५- आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घ्याल. त्यात मान-सन्मानाचे योग येतील. एखाद्या उच्च पदावर नेमणूक होण्याची दाट शक्यता. आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास खूप चांगले काम करील.
डिसेंबर २०१५- अर्थप्राप्ती चांगली होईल. खर्चही तितकाच वाढेल. द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेण्यात मागेपुढे होईल. पण तूर्त निर्णय घेण्याची घाई नको. वादविवाद टाळून सुसंवाद साधा. त्यातून येणारा सकारात्मक विचार एक चांगली दिशा देईल.
या हळव्या मनाच्या राशीने खूप अपमान पचवले. द्वेषाने, कपटाने केलेले आरोप स्वीकारले. कर्क रास ही जलतत्त्वाची रास आहे. भावुक मनाची माणसे या राशीत जन्म घेतात. यांचा साधेपणा, यांचं सरळ जगणं, लाघवी बोलणं खूपच परिणामकारक असतं. ही माणसं दुसऱ्या माणसांनाही माणुसकीने जगवत असतात. हा सद्गुण त्यांना एक वेगळे संतत्व प्राप्त करून देत असतो.

उत्तम बुद्धिमत्ता लाभेल
lk70यशस्वी लोकांमध्ये बरेच गुण असतात. खूप साधेपणा, अतिशय विनम्र, आनंदी वृत्ती आणि स्वत:विषयी कमी बोलणे, पण याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर ही माणसे साहसी, शक्तिशाली आणि धैर्यशील असतात आणि हे सारे सद्गुण सिंह राशीत पाहायला मिळतात. या सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि रवीचा अंक १ येतो. तर वर्षांचा येणारा अंक २०१५ =८ येतो.
रवी आणि शनी यांचे तसे सख्यत्व नाही. तसेच दोघांचे एकत्र असणेही फारसे चांगले नाही, त्यामुळे यावर्षी सिंह राशीला खूप साहसी, आक्रमक असून चालणार नाही. नम्रतेमुळे अधिक मोठेपण प्राप्त होते आणि याच विचाराचा अवलंब जर सिंह राशीच्या लोकांनी या वर्षांत केला तर या नवीन वर्षांचा जीवन प्रवास त्यांना फारसा कष्टदायक जाणार नाही.
जानेवारी २०१५- आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केलात तर खूप काही चांगल्या गोष्टी आपल्या जवळ येतील. बदल म्हणजे आपल्या कामात मेहनत घेणे. दिलेल्या वेळेचे बंधन पाळणे. जास्तीत जास्त यशस्वी लोकांच्या सहवासात राहणे. या महिन्यात तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. नव्या योजना हाताशी येतील. तुम्हाला त्वरित निर्णय घेण्याची सवय लागेल.
फेब्रुवारी २०१५- गैरसमजुतीतून होणारे वाद रेंगाळत न ठेवता त्वरित मिटवा. जवळच्या लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. एखाद्या कृत्यामुळे पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही असे वागा. उद्योगधंद्यातील नव्याने केलेले विचार यशस्वी ठरतील.
मार्च २०१५- उद्योग क्षेत्रात तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. वरिष्ठांशी समजुतीचे धोरण ठेवणे हिताचे ठरेल. मानसिक ताण वाढेल. विचारांवर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वासातून बळ मिळेल.
एप्रिल २०१५-  कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. नवीन परिचय, नवीन ओळखी यातून कार्याची व्याप्ती मोठी होईल. राजकारणात सामाजिक कार्यात आपला प्रभाव राहील.
मे २०१५- दूरचे प्रवास होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्यातील किरकोळ तक्रारी दूर होतील. सामाजिक जीवनात वेगळे काही करण्याची संधी प्राप्त होईल. घरात मंगलकार्ये ठरतील.
जून २०१५-  जगण्यातला खरा आनंद या महिन्यात लाभेल. कामातील उत्साह वाढेल. काही जुनी येणी वसूल होतील. नवीन कामाला गती मिळेल. शाब्दिक वाद टाळा. समजूतदारपणे हाताखालील लोकांच्या सूचना समजून घ्या.

जुलै २०१५- हाती घेतलेली कामे पार पडतील. नवीन ओळखी, नवीन परिचयातून कामे होतील. आत्मविश्वास वाढेल. उद्योगधंद्यातील वाढत्या कामात मग्न राहाल, त्यातून वेगळा आनंद मिळेल. घाईगडबडीतही मन:स्वास्थ्य चांगले राहील.
ऑगस्ट २०१५- लाभदायक घटना घडतील. प्रवास सुखाचे होतील. घरात अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. घरातील वृद्ध माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मन स्थिर ठेवा. महत्त्वाचे निर्णय तातडीने घेऊ नका.
सप्टेंबर २०१५- मतभेद मिटतील. घरातील वातावरण आनंदी राहील. आपल्या धंद्यातील कामाचे कौतुक होईल. सामाजिक कार्यात मानसन्मान प्राप्त होईल. धार्मिक कार्यात विशेष आनंद मिळेल.
ऑक्टोबर २०१५- नवीन घर घेण्यासाठी उत्तम काळ. कोर्ट-कचेरीच्या कामात यश. नातेसंबंधांत अतिभावनावश होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका अथवा सक्ती लादू नका. प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रा जरूर करा.
नोव्हेंबर २०१५- घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्यात सुधारणा होईल. संयमाने वागा. कुणालाही शब्द, आश्वासने देऊ नका. शब्द जपून वापरा. धार्मिक कार्यात विशेष आनंद मिळेल.
डिसेंबर २०१५- घरात आर्थिक सुबत्ता येईल. घरातील महत्त्वाचा निर्णय घरातील लोकांना विश्वासात घेऊन करावेत, मात्र दरम्यान वादविवाद टाळा. पायाची दुखणी वाढतील. स्त्रियांना देवधर्मात विशेष आनंद मिळेल.
या राशीची माणसे मनाने उदार असतात. स्वाभिमानी, तेजस्वी, सहृदय यामुळे वागण्या-बोलण्यातही ही माणसे मर्यादा राखून असतात. दया, प्रेमळ, लाघवी स्वभावामुळे यांच्याशी जोडला गेलेला माणूस यांचाच बनतो. रवीच्या अमलाखाली येणारी ही रास जगातल्या बुद्धिमान लोकांच्या पत्रिकेत रवीचे स्थान जर उच्च स्थानी असेल तर त्या लोकांचे जीवन प्रकाशमय यशस्वी बनते. तसेच यावर्षी जरी सिंह राशीचा प्रवास खडतर असला तरी या राशीचा स्वामी रवी या राशीला खूप मोठी साथ देईल.
भावनेपेक्षा व्यवहार सांभाळा
lk71मिथुन राशीनंतर येणारी ही कन्या रास बुधाच्या अमलाखाली येते. आज पूर्ण जगाचा कारभार मूठभर बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेवर चालला आहे. जगाच्या पाठीवर बुधाच्या शुभस्थितीवरून पत्रिकेनुसार त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची उंची शोधता येते, तर बुधाच्या अशुभ स्थितीवरून बुद्धीचे वाजलेले तीन तेराही पाहता येतात. असा बुद्धीशी निगडित असलेला ग्रह कुठल्या तरी एका विषयात खूप स्कॉलर बनवतो.
या वर्षी बुधाच्या अमलाखाली येणारा ५ अंक आणि वर्षांचा २०१५=८ अंक या दोघांच्या मिश्रणातून होणारा वार्षिक प्रवास कोर्ट-कचेरी, राजकारण, शिक्षण या क्षेत्रांमध्ये फार मोठे बदल घडवून आणेल. या दोन्ही ग्रहांत असलेली बुद्धिमत्ता आणि चिकाटी यांचा संगम एक आदर्शवत चित्र निर्माण करेल. कन्या राशीच्या लोकांना ही शनी ग्रहाची मित्रसाथ खूपच फायदेशीर ठरेल.
जानेवारी २०१५- हाती घेतलेल्या कामात आपल्याला यश मिळेल. उद्योग धंद्यातले नफ्याचे गणित यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. आपल्याला आरोग्य व मानसिक सौख्य लाभेल. नोकरीत प्रमोशन, बढती मिळेल.
फेब्रुवारी २०१५- आपण मनात बांधलेले आडाखे खऱ्या स्वरूपात आलेले पाहण्याचे तुम्हाला भाग्य लाभेल. संघर्षांचे प्रसंग फार सोप्या रीतीने हाताळाल. आपल्या कामाचा, कर्तृत्वाचा गौरव होईल. खाण्यापिण्यात पथ्य पाळा.
मार्च २०१५- जमीन, जागा आणि उद्योगधंद्यातले खरेदी-विक्रीचे आपले व्यवहार चांगलेच यशस्वी होतील. तुमच्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. अनपेक्षितपणे जुने मित्र भेटतील. त्यांच्या भेटीत आनंद मिळेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी ठरतील.
एप्रिल २०१५- तुमच्यासाठी हा महिना तसा संमिश्र स्वरूपाचा आहे. पण इतर ग्रहांची उत्तम साथ तुम्हाला भरपूर आनंद देईल. मात्र नोकरी-धंद्यात सावधानता बाळगा. त्वरित निर्णय घेऊ नका. थोडा विचार करून निर्णय घ्या. पैशाची आवक वाढेल. त्यामुळे फायद्याचे अंदाज खरे ठरतील.
मे २०१५-  घरातील वातावरण मंगलमय राहील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. एखादी योजना आपण निर्माण कराल आणि ती यशस्वी होईल. सिने-नाटय़ कलाकारांना नावलौकिक प्राप्त होईल.
जून २०१५- आपल्याला या महिन्यात आर्थिक लाभ संभवतात. घरातील नातेवाईकांसोबत प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. घरातील वातावरण आनंदी राहील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मात्र पोटाची विशेष काळजी घ्यावी.
जुलै २०१५- कोर्टकचेरीचे खटले, त्यांचे निकाल आपल्याला लाभदायक ठरतील. त्याबरोबरच महिलांना विशेष आनंदाच्या बातम्या मिळतील. सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. उद्योगधंदा-नोकरीत पैशाची आवक वाढेल.
ऑगस्ट २०१५- कोर्ट कचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. मात्र उद्योगधंद्यात लहानसहान अडचणी निर्माण होतील. त्या सोडवताना भावनांवर नियंत्रण ठेवा. महिनाअखेर शुभ घटना घडतील.
सप्टेंबर २०१५- अतिशय उत्तम काळ. सामाजिक जीवनात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. खेळ, संगीत, सिनेमा, नाटय़ या विषयांत भाग घेणारे खऱ्या अर्थाने मनोरंजन, स्वत:चे आणि दुसऱ्या लोकांचे करतील. मित्रवर्गाकडून विद्याभ्यासात मार्गदर्शन.
ऑक्टोबर २०१५- आपल्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. आपण हाती घेतलेली योजना यशस्वी होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास खूप चांगले काम करील.
नोव्हेंबर २०१५- प्रवासाचे योग येतील. खूप धावपळ वाढेल. कामाचा व्याप वाढेल पण कामातील यशामुळे आनंद मिळेल. सहनशीलता आणि संयम यामुळे आपली एक वेगळीच प्रतिमा तयार होईल.
डिसेंबर २०१५- आलेल्या प्रसंगांना सामोरे जा. धमक्या-अरेरावीला दाद देऊ नका. स्थिर राहा. परिस्थिती संयमाने हाताळा. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण यशस्वी व्हाल. विरोधक माघार घेतील.
अतिशय सुज्ञ संवेदना जपणारा हा बुध ग्रह माणसांना निर्णय घेण्याचे विशेष बळ देतो. बुध हा बुद्धीला चालना देणारा ग्रह आहे. तो फारसा मनाच्या कोमल कोशात शिरत नाही. कारण भावनेपेक्षा व्यवहारी जगण्याचे खरे गणित तो मांडत असतो. त्याला प्रेम, मन, हळवेपणा या भावनिक गुंत्यात गुंतण्यात बिलकूल रस नसतो.

आनंदी जीवनप्रवास
lk72शरीराच्या आरोग्यात अन्नाला आहे तसेच मनाच्या आरोग्यात मानसिक सुखाला महत्त्व आहे.  मनाची भूक म्हणजे निसर्ग, सौंदर्य, संगीत आणि प्रेम यांची उपासना आहे. पावित्र्य, सात्त्विकता, शुद्धता, आकर्षण, भूतदया, क्षमाशीलता या सद्गुणाचा आविष्कार या राशीत होत असतो. संसारात राहूनही साधुत्वाचे मन जपणारी ही रास अतिशय न्यायी आणि निर्भीड आहे. कुठल्याही संकोच्याच्या जाळय़ात न अडकणारी सुख-दु:खाच्या परिघ क्षेत्रात आपलं मध्यबिंदुत्व स्थिर जपणारी ही रास आहे. या वर्षांचा २०१५= ८ हा अंक आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र त्याच्या अमलाखाली असणारा ६ अंक यांचे सख्यत्व खूपच वेगळे आहे. संख्याशास्त्रात ८ हा ६ अंकाचा उपासक आहे. तूळ राशीमध्ये शनीचे स्थान उच्च आहे. तर तूळ राशीतील शुक्र स्वगृहीचा मानला जातो. अशा एका कोमल नाते बंधात शुक्र-शनीचा हा या वर्षांचा आनंदी प्रवास खूप सुखदायक ठरणार आहे.
जानेवारी  २०१५- नोकरीत प्रमोशन तर उद्योग-धंद्यात नवीन योजना सफल होतील. एकंदरीत सत्कारसमारंभात आपल्या समाजातील कामाचे खूप कौतुक होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. सिने-नाटय़ कलाकारांना उत्तम प्रसिद्धी लाभेल.
फेब्रुवारी २०१५- घरातील तरुण मंडळींना नोकरीनिमित्त परदेश प्रवास घडतील. प्रमोशन- बदलीचा योग संभवतो. नोकरी-धंद्यात नवीन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. आर्थिक प्रश्न सुटतील. तरुणांनी प्रेमप्रकरणात जपून पावले टाकावीत. वचन, शब्द देऊन अडकू नका.
मार्च २०१५- हाती कामे घेतलेली पार पडतील. नवीन परिचय, नवीन ओळखी कामात खूपच मदत करतील. नोकरीत सवरेत्कृष्ट कामगिरी आपल्या हातून पार पडेल. त्यामुळे नवीन जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या.
एप्रिल २०१५- मनात ठरवलेल्या योजना पार पडतील. घरात अतिउत्साही वातावरण राहील. समाजकार्यात नवीन माणसांना दिलासा द्याल. व्यवहारात लाभदायक घटना घडतील. संयमाने आणि शांततेने अडचणींवर मात कराल.
मे २०१५- आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. अतिभावनिक राहू नका. संसारातील वाद विसरून जा. तब्येतीची काळजी घ्या. अति दगदग, मेहनतीची कामे टाळा. शांत आणि संयमाने, धीराने परिस्थिती हाताळा.
जून २०१५- मानसिक स्वास्थ्य काहीसे बिघडेल. रेंगाळलेले निर्णय घ्यावे लागतील. मानसिक दडपणाखाली राहू नका. मोकळेपणाने विचार करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नोकरी-धंद्यात मनासारख्या घटना घडतील. धार्मिक कार्यात सहभाग.
जुलै २०१५- घरात काहीसे वादविवाद, गैरसमज आदी घटना घडतील. नोकरी-धंद्यात नवीन जबाबदाऱ्या वाढतील. मनाची चलबिचल वाढेल, पण यावर मात करा. धीटपणे परिस्थिती हाताळा. संघर्ष वाढू देऊ नका. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली म्हणजे आर्थिक प्रश्न सुटतील.
ऑगस्ट २०१५- कोर्ट-कचेरीची कामे लांबतील. जमीन-जागेचे वाद पुढे येतील. आपल्यापाशी असलेला संयम या ठिकाणी नक्कीच उपयोगी येईल. आरोग्यात सुधारणा होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामात सतर्क राहा. अखेर गैरसमज दूर होतील.
सप्टेंबर २०१५- वरिष्ठांशी सुसंवाद साधाल. उद्योग-धंद्यातील कामाचे स्वरूप बदलेल. अडचणींचे निवारण होईल. सुसंवाद साधून कामे मार्गी लावाल. विशेष म्हणजे कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आनंदी राहाल.
ऑक्टोबर २०१५- आपण ठरवलेल्या गोष्टींची पूर्तता होऊ लागेल. आनंददायक घटना घडतील. मान-सन्मानाचे योग येतील. सहनशील आणि संयमाने हाताळलेल्या घटनांचे कौतुक होईल. आरोग्य चांगले राहील.

नोव्हेंबर २०१५ – अतिश्रम आणि दगदग करू नका. पैशाची आवक वाढेल. नवीन कामे येतील, ती वेळेवर करून द्या. हाताखालील माणसाकडून काम करून घेण्याचे कसब आपल्यापाशी आहे त्याचा उपयोग करा.
डिसेंबर २०१५- शुभग्रहाचे पाठबळ चांगले लाभेल. विद्यार्थ्यांना विद्याअभ्यासात सतर्क राहून मेहनत घेऊन अभ्यास करावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रातील कामात लोकांच्या अपेक्षा वाढतील. महत्त्वाची कामे शांतचित्ताने, संयमाने करा.
ही न्यायी रास न्यायदानात कुठेही कसूर करत नाही. प्रसंगी कठोर तर कधी मृदू अशा मातृ अंत:करणाने ही रास सज्जनाचा आदर करते, तर दुर्जनांना त्यांच्यातील न्यूनता दाखवून सन्मार्गाला लावते. ही रास वर्षभरात शनीचा संयम आणि शुक्राचे औदार्य जपत प्रवास करणार आहे.

धैर्य आणि संयमाची साथ लाभेल
lk73वृश्चिक ही जलरास आहे. यातील मंगळ आणि मेष या अग्नी राशीतील मंगळ यात बराचसा फरक आहे. वृश्चिक राशीतील मंगळ हा काहीसा विचारी आणि जबाबदारीने वागणारा असतो. त्यामुळे राजकारण, समाजकारण यात ही माणसे चांगल्या तऱ्हेने यशस्वी होतात. साहस व शौर्याच्या जोडीला उत्तम बुद्धिमत्ता असल्यामुळे यांना आपल्या कार्यक्षेत्रात फार उंचीवरचे यश गाठता येते. विशेषत: उच्च सरकारी अधिकारी, पोलीस, लष्कर खात्यातील अधिकारी या राशीत जन्मलेले आढळतात.
या वर्षांचा २०१५ सालचा अंक ८ येतो. तर वृश्चिक राशीचा मंगळचा अंक ९ येतो. ८ आणि ९ तसे एकमेकांचे शत्रू अंक आहेत पण कर्क राशीतील गुरुबळ उत्तम आहे. त्यामुळे ही रास गुरू ग्रहाची साथ घेऊन यशस्वी होईल.
जानेवारी २०१५- घरातील वातावरण आनंदी राहील. आप्तांतील गैरसमज दूर होतील. राजकीय बौद्धिक क्षेत्रांतील मंडळींशी संबंध येईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या मागण्या पुऱ्या कराव्या लागतील. महिलांना त्यांच्या क्षेत्रात यश लाभेल. संसार संभाळून समाजकार्यात भाग घ्यावा.
फेब्रुवारी  २०१५- कोणतीही संशयास्पद कृती करू नका. आपल्या सामंजस्याचा चांगला उपयोग करा. संयम- सावधानता ठेवा. निर्णय विचारपूर्वक घ्या. कामात सतर्क रहा.
मार्च २०१५- शुभग्रहाचे चांगले पाठबळ लाभेल. विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन अभ्यास करावा. सार्वजनिक क्षेत्रात, राजकारणात आपले नेतृत्व मान्य होईल. माघार घेऊ नका. संयम आणि धीराने घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.
एप्रिल २०१५- उद्योगधंद्यात राजकारणात नोकरीत यशदायक काळ. जुनी येणी वसूल होतील. विशेष आर्थिक लाभ संभवतो. गुप्त शत्रूंचा त्रास काहीसा त्रासदायक ठरेल. नव्या ओळखीतून कामाचे स्वरूप बदलण्यास मदत होईल.
मे २०१५- मनात ठरलेल्या योजना पार पडतील. संत-सज्जनाच्या सहवास लाभेल. दूरचे प्रवास होतील. शासकीय कोर्ट कचेरीचे तंटे सामोपचाराने मिटवा. अर्थप्राप्तीचे योग येतील.
जून २०१५-  या महिन्याची सुरुवात खूपच शुभदायक होईल. पण खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. दिलेला शब्द पाळा. त्याची किंमत पुढे चांगल्या रूपात मिळेल. तरुणांनी सावधतेने वागावे. परिचयातून लग्न असा पेमप्रवास घडेल. शाब्दिक चकमकी होतील. पण ते सर्व मनात ठेवू नका. द्वेषाने वागू नका.
जुलै २०१५- यशदायक शुभ घटनांचा काळ. आर्थिक उलाढालीत फायदा होईल. परदेशगमनाची घरातील मुलांना संधी लाभेल. मानसिक संतुलन चांगले राहील. काही नवे-जुने मित्र भेटतील वेळ आनंदात जाईल.
ऑगस्ट २०१५- घरातील वयोवृद्धांची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपण आखलेले बेत सफल होतील. आर्थिक व्यवहाराचे गणित उत्तम जमेल. महत्त्वाची कामे पार पडतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.
सप्टेंबर २०१५- परिचयातून तरुणांचे प्रेमविवाह जमण्याची दाट शक्यता. व्यवसायात उत्तम प्रगती. जुनी येणी वसूल होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मानाचे योग जुळून येतील. आपल्या परोपकारी त्यागी वृत्तीचे दानशूरतेचे समाजात कौतुक होईल.
ऑक्टोबर २०१५- महत्त्वाच्या कामांना वेग येईल. उद्योग-धंद्यात नोकरी. आपल्या नवीन योजनांचे उत्स्फूर्त स्वागत होईल. आपला मानसिक ताण वाढू देऊ नका. विचारांवर नियंत्रण ठेवा. नको ते विचार काढून टाका. धार्मिक कार्यात विशेष भाग घ्याल.
नोव्हेंबर २०१५- मानसिक संतुलन चांगले राहील. नफा-तोटय़ाचे गणित सारखे होईल. फायद्याप्रमाणेच खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी आपण निर्माण केलेली योजना फार पुढे जाईल. त्यातून अर्थप्राप्तीचे योग येतील.
डिसेंबर २०१५- हा महिना काहीसा समतोल राहील. सुख दु:खाच्या परिस्थितीत संयमी माणूस हलत नाही. काहीसे असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतील. मानसिक ताण आणि आनंद या दोघांचाही समान अनुभव घ्याल. महिलांना-भजन कीर्तनांत खूप आनंद लाभेल.
या वर्षी वृश्चिक राशीत शनी ग्रहाची उपस्थिती आहे आणि या वर्षांचा एकांकही ८ येतो. एकूण शनी या ग्रहाचा प्रभाव मंगळाच्या या वृश्चिक राशीत फारसा शुभकारक जरी नसला तरी कर्क राशीतील उच्चीचा गुरू या परिस्थितीला खूपच सावरून घेईल. या वर्षी वृश्चिक राशीच्या लोकांना साडेसातीलाही सामोरे जावे लागणार आहे. सत्य सचाोटी आणि धैर्य या गोष्टी घेऊन हा प्रवास पार पाडा. गुरूचे उत्तम बळ तुम्हाला खूप मोठा आधार देईल.उत्तम नावलौकिक लाभेल
lk74ज्यांचा जन्म २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान झालेला असेल तर अशा लोकांवर तीन अंकाचा म्हणजेच गुरू ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. २०१५ या वर्षांचा एकांक ८ येतो. हा शनी ग्रहाचा अंक आहे तर गुरू ग्रहाचा ३ अंक आहे. या दोघांचे संख्याशास्त्रानुसार खूपच चांगले सख्य आहे.
नम्रता, साधेपणा, मनमिळाऊ, आनंदी, दानशूर, विनयशील अशा अनेक सद्गुणांचा ठेवा गुरू या ग्रहापाशी असतो. त्यात जर शनीचे योजनाबद्ध सावधानता, नम्र, शिस्तप्रिय, चिंतनशील, दीघरेद्योगी, धीरगंभीर हे सद्गुण मिळाले तर अशा व्यक्ती खूप महान ठरतात. अशा लोकांना कीर्ती, सांपत्तिक उत्कर्ष अशा तऱ्हेचे लाभ होतात. दु:खातही संयमाने वागणारी आणि सुखातही स्वत:ला तोलामोलाने जपणारी अशी गरुप्रधान व्यक्ती त्यांना हे २०१५ साल कसे जाईल ते पाहू.
जानेवारी  २०१५- आर्थिक बाजू चांगली राहील. नफा-तोटय़ाचे गणित चांगले जमेल. आरोग्य चांगले राहील. न्यायबुद्धीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. मानसिक स्थिरता उत्तम लाभेल.
फेब्रुवारी २०१५- आपण बांधलेले आडाखे खरे ठरतील. मतभेद मिटतील. गैरसमज दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मार्च २०१५- नोकरी-उद्योग-धंद्यात मोठे लाभ होतील. गुरुदेव खरोखरच प्रसन्न होतील. नवीन व्यवसाय, उद्योग-धंद्याची सुरुवात करा. शैक्षणिक धंद्यात उत्तम प्रगती. खाद्यपदार्थाच्या धंद्यात जम बसेल.
एप्रिल २०१५ – सावधानता बाळगा. घरातील तरुणाची जर धनू रास असेल तर अशा मुलांनी व्यसनांपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात दाट फसवणुकीचे प्रकार घडतील. उधार उसने पैसे देऊ नयेत व घेऊसुद्धा नयेत.
मे २०१५- नोकरी-धंद्यात उत्तम काळ पण घरात वृद्ध माणसाचे आजारपण चालू राहील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. साहित्य, विज्ञान क्षेत्रात उत्तम नावलौकिक होईल.
जून २०१५- नवीन नवीन कामे येतील. तसेच सामाजिक जीवनात समाजसेवेची उत्तम संधी लाभेल. घरात धार्मिक कामे होतील. आरोग्य चांगले राहील.
जुलै २०१५- अतिशय उत्तम काळ. गुरू सिंह राशीत येईल. तो भाग्यशाली ठरेल. सामाजिक जीवनात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरातील भावविश्व आनंदी राहील.
ऑगस्ट १०२५- हाती घेतलेले काम व्यवस्थित पार पडेल. नोकरीत अनपेक्षित यश. विद्याभ्यासात घरातील विद्यार्थ्यांना चांगले यश. मानसिक बळ वाढेल. नवीन योजना नवीन पद्धतीचा उपयोग वेळेची बचत होईल.
सप्टेंबर २०१५- पैशांची आवक वाढेल. नवीन कल्पना, नवीन योजना यांमधून उद्योग-धंदा वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. कामाचा उरक चांगला राहील. बौद्धिक आणि राजकीय क्षेत्रांतील लोकांशी नव्याने परिचय होतील.
ऑक्टोबर २०१५- विवाह जमतील. धार्मिक कामात भाग घ्या. अडलेल्यांना जरूर मदत करा. पण अतिभावनिक राहू नका. घरातील वादविवाद स्वत:हून मिटवा. गैरसमज दूर करा.
नोव्हेंबर २०१५- आपल्यापाशी असलेल्या चौफेर दृष्टीचा उपयोग करा. समाजिक कार्यात आपल्या सूचना आपली मते यांचा आदर केला जाईल. तब्येतीची काळजी घ्या. साथीच्या आजारापासून जपा.
डिसेंबर २०१५- शुभग्रहाची मालिका तुमच्या पाठीशी आहे. नोकरी-धंद्यात वादविवाद टाळा. गैरसमज दूर करा. धार्मिक कार्यात भाग घ्या. मौल्यवान वस्तूची काळजी घ्या.
या वर्षी शनी आणि गुरू या दोन ग्रहांचा प्रभाव धनू राशीवर असणार आहे. लोकमान्यता, उत्तम लौकिक, कीर्ती, आर्थिक उत्कर्ष अशा काही शुभ फलदायी गोष्टी या युतिमुळे होतील. तर गुरू, शनीच्या या एकत्र असण्यामुळे कायदेशास्त्र, समाजशास्त्र, साहित्य आदी विषयांतील लोकांशी खूप जवळचा संबंध येईल. वृश्चिक राशीतील शनीचे आगमन त्यामुळे धनु राशीला साडेसातीची सुरुवात काहीशी त्रासदायक जरी ठरली तरी सिंह राशीतील गुरुचे आगमन धनु राशीला खूप मोठा आधार ठरणार आहे. एखादा जवळचा मित्र अथवा नातेवाईत्क मदतीचा हात देईल. नोकरीधंद्यातील चढउतारातही भागीदाराचे धीर देणे खूप मोलाचे ठरेल. थोडक्यात साडेसातीच्या प्रवासात गुरुचे पाठबळ खूपच मोलाचे ठरेल. मात्र धनु राशीच्या घमेंडखोर, तऱ्हेवाइक, विक्षिप्तपणा अवगुणांना काही काळ मागे ठेवून यावर्षीचा जीवनप्रवास निश्चित सुखदायक होईल.

शुभग्रहांचे पाठबळ
lk75आयुष्यातील वादविवाद, समस्या, नात्यामधील दुरावा यांना तात्पुरती मलमपट्टी करून जगण्यात काहीच अर्थ नसतो. खूप लोकांना शरण येण्यात, लाचारीने जगण्यात समाधान वाटत असतं कारण ही माणसे स्वत:च्या मनाने जगतच नसतात. सगळ यांचं जगणं दुसऱ्याच्या मनमानी मतावर अवलंबून असतं. त्यामुळे ही माणसे त्रास संपवण्यापेक्षा त्रास वाढवण्याचे काम अधिक करीत असतात.
शनी हा एक असा ग्रह आहे की तो निर्णयाची वाट पाहात नाही. निर्णय घेऊन टाकतो. न्याय-अन्याय या बाबतीत ही माणसे तडजोड करीत बसत नाहीत. ती खिशात पैसे नसले तरी लाचारी पत्करणार नाहीत. जबाबदारी, कर्तव्याची जाणीव, चिकाटी या गुणांच्या जोरावर ही माणसे मोठी होतात. स्वप्ने पाहात बसत नाहीत. तर स्वप्ने साकारतात. त्यामुळे याच्यातील या सच्चाईला जगण्याचे एक वेगळे भान आलेले असते.
आपला जन्म २१ डिसेंबर ते २० जानेवारी दरम्यान झाला आहे. आपल्या या कालावर शनी ग्रहाचा अंमल आहे. तसेच या वर्षी २०१५ साल त्या वर्षांचा एकांकही ८ येतो. एकंदरीत शनीचा हा वाढत्या प्रभावाचा प्रवास खूपच बाणेदार आणि प्रभावी आहे.
जानेवारी २०१५- आर्थिक घडामोडी मनासारख्या घडतील. उद्योगधंद्यातील किरकोळ अडचणी दूर कराल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. लग्न नोकरी याबाबतची बोलणी सुरू होतील. मुलांनी शिक्षणाला अधिक वेळ द्यावा. सध्या टीव्ही करमणूक कमी करावी.
फेब्रुवारी २०१५- उत्सव-समारंभात सहभाग. घरातील वातावरण मंगलमय राहील. मौल्यवान वस्तूची खरेदी, नोकरी-धंद्यात उत्तम प्रगती. घरातील तरुण मुला-मुलीचे विवाह जमतील. आरोग्य उत्तम राहील.
मार्च २०१५- महत्त्वाचे निर्णय फायद्याचे ठरतील. महत्त्वाची कामे होतील. मानसिक दडपण दूर होईल. तुमच्या शब्दाला एक वेगळीच किंमत प्राप्त होईल. व्यवसायातल्या अडचणी दूर होतील. मात्र स्थावर मालमत्तेसंबंधी प्रकरणात दोन पावले मागे या. महिनाअखेर मित्रांकडून महत्त्वाची मदत लाभेल.
एप्रिल २०१५- हा महिना तसा काहीसा काळजी निर्माण करणारा ठरेल. घरात गैरसमज आणि त्यातून वाद निर्माण होतील. अतिभावनिक राहू नका. संसारातील वादविवादाची कारणे हास्यास्पद ठरतील. खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. घरातील वृद्ध माणसाचे आरोग्य जपा.
मे २०१५- घरातील वादविवाद मिटतील. पाहुणे मंडळींची वर्दळ वाढेल. घरात मौल्यवान वस्तूची खरेदी. नोकरी-धंद्यात संघर्षांचा काळ, पण लक्षात ठेवा प्रत्येक संधी सफलतेचा मार्ग मोकळा करीत असते, विशेषत: स्त्रिया धार्मिक कार्यात भाग घेतील.
जून २०१५- वैवाहिक जीवनाची काही सूत्रे पाळा. आपल्या जोडीदाराला काही वेगळे जीवन आहे. त्यालाही त्याची काही ठाम मतं आहेत. त्या मताचा आदर करा. समाजात वावरताना त्यांना त्यांच्या आवडींना प्रोत्साहन द्या. त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नका. या महिन्यातील हा मंत्र आयुष्यभर वापरा. घरातील वातावरण नक्कीच चांगले राहील.
जुलै २०१५- नोकरी- उद्योग-धंद्यात चांगले दिवस, नवे अधिकार प्राप्त होतील. नवीन जागेसंबंधीची बोलणी यशस्वी होतील. राजकीय मंडळींचा सहवास लाभेल. न्यायबुद्धीने चुकीची कामे, कायदेविरोधात कामे करू नका. फसवणूक होण्याची दाट शक्यता.
ऑगस्ट २०१५- गुंतवलेल्या पैशातून तसेच अचानक पगारवाढ किंवा उद्योग-धंद्यात मोठी ऑर्डर अशा अनपेक्षित घटनेतून लक्ष्मी घरात येईल. शुभग्रहाचे पाठबळ चांगले लाभले आहे. मात्र उधळपट्टी करू नका. जपून पैसा वापरा.
सप्टेंबर २०१५ – अचानक कटकटी उत्पन्न होतील. त्या शांत होतील. ओळखी परिचयातून महत्त्वाच्या कामाची सुरुवात होईल. घरात लग्नाच्या चर्चेतून वादविवाद, पण अखेर सारे शांत होऊन शेवट शुभ घटना घडतील.

ऑक्टोबर २०१५- जागेची कामे होतील. नवीन घर घेण्याच्या बाबतीत शुभदायक घटना घडतील. त्यातून मनासारखी वास्तू खरेदी कराल. खूप नातेवाईक मंडळी एकत्र येतील. आनंदी वातावरणात सुखावून जाल.
नोव्हेंबर २०१५- शुभ घटनांतून हळवेपणा भावविवशपणा वाढेल. जुन्या आठवणी, जुनी माणसं, जुनी वास्तू यात मन गुंतेल. पण अतिभावनिक राहू नका. स्वत:साठी वेळ देऊन दिवसातून १०/१५ मिनिटे शांतपणे निर्विकार बसा.
डिसेंबर २०१५- आर्थिक बाबतीत थोडीशी ओढाताण भासेल, पण अखेरच्या आठवडय़ात जुनी येणी येतील. आपल्या सचोटी स्वभावामुळे धंद्यातील माणसे अधिक जवळ येतील. विश्वासाची देवाणघेवाण धंद्यात खूप मोलाची ठरते. त्यामुळे आपली पात्रता सिद्ध होईल.
मकर राशीचा स्वामी शनी. ही रास पृथ्वी तत्त्वाची. शुक्र, बुध हे शनीचे मित्रग्रह आहेत. उच्च श्रीमंतीचे योग या तीन ग्रहांच्या स्थितीवरून कळतात. मफतलाल, जे.आर.डी. टाटा, धीरूभाई अंबानी, आबासाहेब गरवारे यांच्या पत्रिकेत शनीची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे यांची श्रीमंती बराच काळ टिकली.

सज्जनांचा सहवास
lk76आपला जन्म २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या दरम्यान झाला असेल तर आपल्या कालवधीवर शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. मकर राशीप्रमाणेच आपल्यावरती मूलांक ८ चा अंमल असतो. या २०१५ सालचा एकांकही ८ येतो. एकूण या वर्षी ८ अंकाचा प्रवास कुंभ राशीबरोबर वर्षभर चालणार आहे. मकर राशीच्या स्वभावाचे हे विरुद्ध टोक आहे. ही रास बुद्धिमान आहे. पण तितकीच हळवी आहे. दुसऱ्याची दु:खं आपल्या गळ्यात अडकवून घेण्याची सवय अशा लोकांना फार असते. आपल्या बुद्धीचा आणि भावनेचा चांगला उपयोग केला तर ही माणसे स्वत:चं आयुष्य फार सुंदर बनवू शकतील. उत्तम वाचन, उत्तम विचार, उत्तम बोलण्याचे कसब आणि नम्र स्वभाव यामुळे यांच्या आजूबाजूला सज्जनांची वर्दळ जास्त असते.
जानेवारी २०१५- उत्तम ग्रहाची साथ वर्षांच्या सुरुवातीला लाभत आहे. एखाद्या सुखद स्वप्नातून जागे व्हावे आणि प्रत्यक्षात कुठे आहोत असा प्रश्न स्वत:लाच विचारावा लागेल. स्थिर मनाने, आस्थेने घरातील मंडळींची विचारपूस करा. विशेषत: त्यांच्या अडचणी जाणून घ्या. तुमच्या सल्ल्याची त्यांना गरज भासेल. उद्योग-धंद्यात नवीन कामे येतील. पैशाची आवक वाढेल.
फेब्रुवारी २०१५- वास्तू खरेदी-विक्रीचे योग येतील. मुलांना शिक्षणासाठी परदेशगमन योग. राजकारण, समाजकारण यात विशेष सहभाग. उद्योग-धंद्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
मार्च २०१५- नोकरीत, उद्योग-धंद्यात वातावरण उल्हसित राहील. कामात दिवसभरात संघर्षांचे प्रसंग येतील. वादविवाद टाळा. स्पर्धेत राहू नका. महत्त्वाची माणसे भेटतील. नवीन योजनांच्या बाबतीत विचार करा.
एप्रिल २०१५- सतत मानसिक दडपणाखाली वावरत आहोत असा भास होईल. आपण निर्भय आहात, पण भावनेच्या भरात रागाने केलेले वादविवाद, तुटलेली नाती पुन्हा पुन्हा आठवत बसू नका. आपला हळवेपणा आपल्या मनाचाच गैरफायदा घेतोय. त्वरित हे चक्र बंद करा.
मे २०१५- महत्त्वाचे निर्णय घ्या. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. जागेसंबंधी वादात थोडीशी माघार घ्या. अटीतटीने निर्णय घेऊ नका. आलेल्या परिस्थितीवर मात कराल.
जून २०१५- प्रवासात मौल्यवान वस्तू जपा. नोकरी-धंद्यात लाभदायक घटना घडतील. अर्थप्राप्ती होईल. प्रकृती ठीक राहील. मित्रांपाशी मन मोकळे करा. आनंदी राहा. मोकळेपणाने वागा.
जुलै २०१५- आपली मानसिक अवस्था चांगली राहील. नवीन कल्पना, नवीन योजना पुढे येतील. आपल्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. एखादी सुंदर योजना आपल्या हातून पूर्ण होईल. सिनेनाटय़ कलाकारांना नावलौकिक प्राप्त होईल.
ऑगस्ट २०१५- सारे ग्रह शुभ अवस्थेत आहेत. नवीन परिचय, नवीन ओळखी यातून खूप चांगल्या संधी चालून येतील. मित्रवर्गाचे उत्तम सहकार्य लाभेल. नवे अधिकार प्राप्त होतील. राजकीय मंडळींचा सहवास लाभेल, पण चुकीची माणसे भेटली हे लक्षात येईल. या चुकीच्या माणसांपासून दूर राहा. प्रलेभनांना फसू नका.
सप्टेंबर २०१५- नोकरी-धंद्यात उत्कर्षांचा काळ. हाती घेतलेली कामे, जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडा. विशेषत: विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात उत्तम यश, सार्वजनिक क्षेत्रातल्या राजकारणाचा कंटाळा येईल. धीराने, संयमाने घेतलेले निर्णय यशदायक ठरतील.
ऑक्टोबर २०१५- शक्यतो आनंदी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आवडत्या क्षेत्राशी एकरूप व्हा. प्रवास जरूर करा. वेळीची किंमत ओळखा. सामाजिक कार्यात भाग घ्या. महत्त्वाचे निर्णय महिनाअखेरीस घ्यावेत.
नोव्हेंबर २०१५- नवीन विचार, नवीन कल्पनांचे स्वागत करा. हा महिना संमिश्र असा आहे. तेव्हा येणारी कोणतीही गोष्ट सकारात्मक मनाने स्वीकारा. व्यवसायात नफा-तोटय़ाचे अनुभव येतील. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. धीराने आणि ठाम राहा.
डिसेंबर २०१५- हा या राशीचा अखेरचा महिना. ग्रहयोग उत्तम आहेत. आलेल्या परिस्थितीवर सहजपणे मात कराल. महत्त्वाचे निर्णय घ्याल. जागेसंबंधीचे वाद कोर्टात जाऊ देऊ नका. वेळ आणि पैशाचा व्यय होईल. महिन्याच्या अखेरच्या दिवसात यशदायक घटना घडतील. महिला धार्मिक कार्यात भाग घेतील.
अशा तऱ्हेने कुंभ राशीचा वर्षभराचा प्रवास संपला. ही कुंभ रास शनीच्या अधिपत्याखाली येणारी. शनीचा एकांत जपून आपल्या भोवतालची नाती जपणारी. आध्यात्मिकात बुद्धिजीवी वर्गात या राशीची धावपळ जास्त असते. एखाद्या विषयातील संशोधन चिकाटीने करून त्यातला यशस्वी भाग जगाला दाखवतानाही ही माणसे आपल्या कर्तृत्वाचा डंका पिटत नाहीत. सत्कार, समारंभ, मानसन्मान यांपासून दूर जाऊन साधेपणाने जगण्यात आनंद मानतात. माणुसकीच्या वाटेवर उभी राहून मदत करणारी ही कुंभ रास आधुनिक संतांच्या भूमिकेत रमलेली वाटते.

आनंदी आणि आशावादी राहा
lk77आपला जन्म २० फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान झाला असेल तर आपल्या कालावर गुरू ग्रहाचा प्रभाव राहील आणि गुरू ग्रहाचा अंमल ३ अंकावर असतो. तसेच या वर्षीचा २०१५ चा एकांकही ८ येतो. हा ८ या अंकावर शनी ग्रहाचा अंमल असतो. पण हे ३ आणि ८ हे एकमेकांचे उत्तम मित्र आहेत. त्यामुळे हा मीन राशीचा वर्षप्रवास सुखाचा, आनंदाचा असणार आहे.
या मीन राशीवर संत नामदेव, संत तुकाराम यांचा जन्म झाला आहे. तुकारामांचे जन्मपत्रिकेतील लग्न आणि रास मीन होती. विशेष म्हणजे पंचमेश चंद्र लग्नात तर नवमेश मंगळ लग्नात. म्हणून तर त्यांच्याकडून समाजासाठी परखड लिखाण झाले. त्यांचा एक अभंग आहे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’. निंदक शेजारी असला की आपल्या चुका कळतात. आपले पाय जमिनीवर राहतात. पण आज परिस्थिती अशी आहे. ‘सज्जनांचे घर असावे शेजारी’. आता दुर्जनाचा सुकाळ झालाय आणि सज्जन शोधावे लागतायत, त्यामुळे घर घेताना शेजारी कोण? या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जाते.
ही रास समाजप्रिय, आनंदी, आशावादी आहे. गुरूसारख्या महान ग्रहाची ही रास ज्याची आहे त्या सर्वाना हे वर्ष आनंदमय सुखाचे जाईल.
जानेवारी २०१५- ग्रहाची उत्तम साथ मिळेल. कामाची व्यापकता वाढेल. नोकरी- उद्योग- धंद्यात नवीन नवीन योजना राबवल्या जातील. कोर्ट-कचेरीची कामे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील.
फेब्रुवारी २०१५- नोकरी-धंद्यात बदल करण्याचा काळ. मानसिक संतुलन ठीक राहील. घरात पाव्हण्यांची वर्दळ वाढेल. घरातील ज्येष्ठ लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद, गैरसमजुतीतून वाद निर्माण होतील.
मार्च २०१५- कोर्टाच्या कामामध्ये यश लाभेल. जागेसंबंधीच्या कामात प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग, जबाबदारी वाढेल. नवीन योजना नवीन कामे यांना प्राधान्य द्या. चांगली अर्थप्राप्ती होईल.
एप्रिल २०१५- हा महिना तसा अडचणी सोडवण्याचा असेल. कामाची व्यापकता वाढेल. घरातील लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घरातील तरुण मुलामुलीचे प्रेमप्रकरणांवरून वादविवाद. शेवटी गोष्टी समजुतीने घ्याव्या लागतील. महिलांना अपेक्षित यश लाभेल.
मे २०१५- आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नोकरी-व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. मुलांना परदेशगमनाची संधी. नोकरी किंवा शिक्षणासाठी अनपेक्षित धनलाभ. कामाच्या पद्धतीत बदल कराल.
जून २०१५- महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अनपेक्षित जुन्या परिचित माणसाच्या भेटीने मन प्रसन्न राहील. बौद्धिक राजकीय क्षेत्रातील लोकांचा नव्याने परिचय होईल.
जुलै २०१५- महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात मनाचा हळवेपणा जास्त वाढेल. कुठल्याही आनंदी प्रसंगात डोळे पाणावतील. मन भरून येईल. नातेवाईक, मित्रमंडळींतून खूप आनंद मिळेल. आरोग्य सांभाळा. पैसा जपून वापरा.
ऑगस्ट २०१५- या महिन्यात गुरुबदलामुळे आपल्याला झाला तर फायदाच होणार आहे. नुकसान होणार नाही. शरीर, मन अतिकामामुळे थकल्यासारखे होईल. विश्रांती घ्या. नोकरी- धंद्यात पैशाची वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
सप्टेंबर २०१५- प्रॉपर्टीसंबंधातील निर्णय खोलवर विचार करून घ्या. आपण मनाशी ठरवलेल्या गोष्टी कृतीत उतरतील. उगाचच घरातील किरकोळ वादावरून चिंता करू नका.
ऑक्टोबर २०१५-  घरात मंगलकार्ये ठरतील. नवीन जमीन खरेदी-विक्रीमध्ये फायदा होईल. सरकारी कामात यश लाभेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कामात लक्ष घाला. पैसा जपून वापरा.
नोव्हेंबर २०१५-  आपल्या त्यागी वृत्तीचे आणि दानशूरतेचे कौतुक होईल. घरात एखादे धार्मिक कार्य करा. कलाकार  साहित्यिकांना पुरस्कार प्राप्त होतील. कलेचे भरभरून कौतुक होईल.
डिसेंबर २०१५- उत्साह वाढेल. नवीन योजना आखा. संयमाने वागा. शक्यतो राजकारणापासून दूर राहा. नवीन परिचयातून घरातील मुलांचे विवाह जमतील. भावनेच्या आहारी जाऊन वचने, शब्द देऊ नका. जागरणे टाळा. तब्येतीची काळजी घ्या.
मीन राशीचा हा वर्षभराचा प्रवास अशा उत्साहाने आनंदाने पार पडणार आहे. अशी ही भावनाप्रधान माणसे आपलं आयुष्य भाबडेपणाने जगत असतात. या व्यक्ती स्वत:मधील सत्त्वशीलपणा कधीच सोडत नाहीत. यांच्या सात्त्विक वागण्यातून समाज यांच्या जास्त जवळ येतो. हे जग भाबडय़ा सरळ मनाच्या माणसाचे नसतानाही माणसाच्या रूपाने यांना देव मदत करीत असतो.