दर वर्षी पावसाळा संपला की लगेचच सुरू होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी परळी वैजनाथ तालुक्यातील मोहा गावचे काही तरुण एकत्र आले. गेल्या काही वर्षांत त्यांनी गावाचा कायापालटच केला आहे.

‘गाव करी ते राव काय करी’ असे म्हणतात ते उगीच नाही. याचा प्रत्यय परळी वैजनाथ तालुक्यातील मोहा या गावात येतो. या गावामध्ये गावातील तरुणच एकत्र येऊन पाणलोट क्षेत्रामध्ये अतिशय भरीव कार्य करीत आहेत. या कार्यातून तरुणांनी इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे. बालाघाटाच्या शेवटच्या डोंगरकुशीत पायथ्याशी वसलेले हे गाव भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ भागात आहे. सुपीक जमिनीपेक्षा खडकाळ व मुरमाड जमिनीचे प्रमाण अधिक. गावात पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी मोठय़ा प्रमाणात वाहून जाते. या पाण्यासोबत शेतजमिनीवरील सुपीक मातीही वाहून जाते. पाऊसकाळ संपला की काही दिवसांतच पाणी संपून जाते. त्यामुळे पाणीटंचाई ही गावच्या पाचवीलाच पुजलेली. या सर्व परिस्थितीत ऊसतोडणीकरिता वा अन्य उत्पन्नाचे साधन मिळविण्याकरिता प्रासंगिक स्थलांतर करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही अधिक. हंगामी पिकावरच या ठिकाणच्या शेतकऱ्यांची मदार. शेती भरपूर असली तरी उत्पन्न मात्र जेमतेमच अशी परिस्थिती. काळ बदलत गेला, पण प्रगती किंवा सुधारणा म्हणावी तशी झाली नाही.
परळीपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेले मोहा गाव स्वातंत्र्य चळवळीपासून माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्यामुळे मराठवाडय़ासह महाराष्ट्रात परिचित आहे. गावातील बहुतेक जणांचा मुख्य व्यवसाय शेतीच. मोहा गावच्या परिसरातून तीन नद्या वाहतात. मात्र कमी होत चाललेला पाऊस व वाढत चाललेला पाण्याचा उपसा आणि वापर यामुळे या नद्यांना फार झाले तर पावसाळ्यातच पाणी दिसते. वर्षांनुवष्रे हाच अनुभव पाठीशी. यामुळे कुटुंब चालवण्याकरिता प्रासंगिक स्थलांतराचे प्रमाण वाढत असल्याचे भीषण चित्र निर्माण होऊ लागले. ज्या नदीमध्ये आपण लहानपणी मित्रांसोबत मनसोक्त डुंबलो त्याच नदीत आता पाय धुण्यासाठीही पाणी राहिलेले दिसत नाही. एके काळी झुळझुळ वाहणारे पाणी पाहून आनंदी होणारे मन नद्यांची दुरवस्था पाहून हेलावले नाही तरच नवल. नद्यांचे हे विदारक आणि केविलवाणे चित्र पाहून युवक बेचैन, अस्वस्थ झाले. खालावलेली पाणी पातळी आणि कमी झालेले पावसाचे प्रमाण अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. तरुणांच्या एका गटाने या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्याकरिता पुढाकार घेतला. तरुणांच्या या गटाने अगदी झपाटल्याप्रमाणे काम सुरू केले. आपल्या गावाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करायचेच या ध्येयाने पाणलोट, वृक्षसंवर्धन आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या क्षेत्रात काम करायचे ठरवून या कामात मार्गदर्शन मिळविण्यासाठी तरुणांनी पाणलोट क्षेत्रात भरीव कार्य करून गावाला पाणीटंचाईपासून मुक्त करणाऱ्या राज्यातील काही गावांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पाणीटंचाई आणि दुष्काळापासून आपल्या गावाची कायम सुटका करण्यासाठी व गावातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा तरुणांचा समूह तन-मन-धनाने सरसावला.
मोहा गावचे संपूर्ण वस्तुनिष्ठ सर्वेक्षण व त्याचा अभ्यास करून परिवर्तनासाठीचे प्रयत्न सुरू केले. गावात कोणतेही काम यशस्वी करायचे असेल तर गावकऱ्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा. म्हणूनच यातील युवकांनी शासनाच्या कोणत्याही योजनेच्या नादी न लागता नोव्हेंबर २०१२ मध्ये अ‍ॅड. अजय बुरांडे यांच्या पुढाकाराने या समस्येसंदर्भात गावातील सामान्य शेतकरी, शेतमजूर, युवक यांची एक व्यापक बठक घेतली. या बठकीत पूर्वीचे गाव आणि आताचे गाव याविषयी चर्चा करण्यात आली. गाव उजाड बनत असल्याबद्दल सर्वानीच चिंता व्यक्त करून यासाठी काही तरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावात बदल करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल पार, ओसरी आदी ठिकाणी सकारात्मक चर्चा घडायला सुरुवात झाली.
याचाच पुढील भाग म्हणून डिसेंबर २०१२ मध्ये मोहा येथील ऐतिहासिक असलेल्या महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणामध्ये डोंगरावरील समपातळीचर, कुऱ्हाडबंदी, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांवर बंदी तसेच जैवविविधता जतन करण्यासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत कॉ. कुमार शिराळकर यांनी ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या साहाय्याने लोकांना मार्गदर्शन केले. या चित्रफितीचा बराच परिणाम झाला आणि याचा फायदा लोकसहभाग वाढण्यात झाला. जानेवारी २०१३ मध्ये महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशन पुणे यांची टीम गावात येऊन पाहणी करण्याचे निश्चित झाले. तरुणांच्या या गटाला कॉ. शिराळकर यांनी महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशनचे नरेंद्र खोत व खैर यांच्यासह प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन मातीचा प्रकार, खनिज संपत्तीचा अभ्यास करून बौद्धिक व रचनात्मक कामाचे नियोजन करून दिले. भविष्यातील पाणी, वृक्ष, पक्षी, मृद या सर्वाचे संरक्षण करण्याची माहिती दिली. योग्य दिशा व मार्गदर्शनामुळे युवकांचा हा गट तंत्रशुद्ध पद्धतीने विविध कामे करीत आहे. डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाने पाणी व माती वाहून जाऊ नये, म्हणून गावाजवळील खंडोबाचा माळ या ३५ एकराच्या डोंगरावर शास्त्रशुद्ध पद्धतीने समतल चर खोदून त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. परिसरात असलेल्या विहिरींची पाणी पातळीची नोंद, पाणी उपसा करण्यापूर्वी व उपसा केल्यानंतरची नोंद, परिसरातील जमिनीखालील पातळीची नोंद, पडणाऱ्या पावसाच्या पर्जन्यमापकाच्या मदतीने दैनंदिन नोंदी, शंभरपेक्षा अधिक एकर शेतजमिनीवर बांधबंदिस्तीचे काम, १०५ हेक्टर क्षेत्राचे नेट प्लॅनिंग आदींसह असंख्य कामे हे तरुण करीत आहेत.
मोहा हे गाव जगाच्या नकाशावर १८’ ५३.६०२ अक्षांश व ०७६’ १८.९८१ रेखांशावर असून समुद्र सपाटीपासून ४९८ मीटर उंचीवर आहे. प्रामुख्याने या गावात रेगुन कृदा या प्रकारची माती अधिक प्रमाणात असून गावच्या तिन्ही दिशेला बालाघाटच्या डोंगररांगा असल्याने खडकाळ व मुरमाड जमीन मोठय़ा प्रमाणावर आहे. गावची लोकसंख्या ५९०० एवढी आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी गाव परिसरात १७१ पारंपरिक विहिरी, १२३ बोअरवेल आहेत. गाव शिवारात दोन लघू तलाव, एक पाझर तलाव व वाहणाऱ्या नद्यांची संख्या तीन. मात्र या तलावात व नद्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांतच पाणी असते. बाकी उन्हाळा व हिवाळा ऋतूत कोरडे पडलेले असतात. या नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
माजी खा. कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने गावात शेतीविषयक आणि जल व पर्यावरण संवर्धनविषयक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आले. या व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोिवद पानसरे, कॉ. कुमार शिराळकर, कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
बौद्धिक रचनात्मक व तंत्रशुद्ध पद्धतीने होत असलेल्या या कामाकरिता या तरुणांच्या समूहातील दोघांनी जालना जिल्ह्य़ातील खारपुडी येथील कृषिविज्ञान केंद्रातून माती, पाणी, जमिनीचा उतार व माती वाहून जाण्याचे प्रमाण व त्याचे संवर्धन याविषयी प्रशिक्षण घेतले आहे. तर पुणे येथील अ‍ॅक्वाडॅम या संस्थेकडून भूजल पातळी व खडकांचा अभ्यास या संदर्भात प्रशिक्षण घेतले आहे. तसेच वेळोवेळी एम.के.सी.एल. व के.व्ही.के. या संस्थेकडून मार्गदर्शन व उपयुक्त साधनसामग्री तरुणांना देण्यात आली आहे. या सर्व कामासाठी तरुण स्वतच खर्च करीत आहेत. तसेच आपआपल्या सोयीने वेळ काढून श्रमदान केले जाते. परिसरातील महाविद्यालयांची शिबिरे घेऊन श्रमदान करून घेतले जाते. गावातील प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत आहे. यामुळे कामाचा परिणाम दिसून येत आहे.
अ‍ॅड. अजय बुरांडे, माजी सरपंच सुदाम िशदे, विशाल देशमुख, प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर पांचाळ, प्रकाश कोकाटे, मनोज स्वामी, विश्वंभर वाघमारे, बाळासाहेब शेप यांच्यासह ३५ जणांचा समूह आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी तन-मन-धनाने हे काम तीन वर्षांपासून करीत आहे. गावातील लोकांनी मिळून सुरू केलेल्या या प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, याचा परिणामही दिसून यायला लागला आहे. वर्षांनुवर्षे हिवाळ्यातच उजाड दिसणारा खंडोबाचा माळ या वर्षी फेब्रुवारीपर्यंत हिरवा दिसत होता. यामुळे आपण केलेल्या कामाचे सार्थक झाले असे समाधान तरुणांना नक्कीच वाटले. या गावचा इतर गावांतील लोकांनी आदर्श घेतला तर महाराष्ट्राचे वाळवंट होण्यापासून रोखण्यास नक्कीच मदत होणार आहे.
आगामी काळात कृषी विभागामार्फत निवडलेल्या लघू पाणलोट क्षेत्राचे एस्टिमेट करून व मंजुरी घेऊन १०० एकरांवर बांधबंदिस्ती करणे, सी.सी.टी.च्या कामांना गती देणे व प्रायोगिक तत्त्वावर निवडलेला खंडोबा डोंगरावरील समतल चर पूर्ण करणे, दगडी बंधारे बांधणे, रेनगेजद्वारे पर्जन्याचे मापन करणे, बाष्पीभवन व आद्र्रतेचे मापन करणे, विहिरीचे जी.पी.एस.द्वारे सर्वेक्षण करणे आदी कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचा निर्धार या युवकांनी व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण गाव वसुंधरा पाणलोट विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करून मंजुरी मिळविण्यासाठी कृषी अधिकाऱ्याकडे प्रयत्न करणे, गावातील भूगर्भातील भूजलधारकांचा सखोल अभ्यास करून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अ‍ॅक्वाडॅम आणि एम.के.एफ.चे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन बंधारे बांधणे, गावातील परिसर व डोंगरात देशी झाडांची लागवड करणे, बोअरवेल न घेण्यासाठी परावृत्त करणे, कुऱ्हाडबंदी व चाराबंदी करणे आदी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
मागील तीन वर्षांपासून तंत्रशुद्ध पद्धतीने करण्यात येत असलेल्या पाणलोट कार्यात जनजागृती, माहिती संकलन पूर्ण, तर काही कामे पूर्णत्वास आहेत. सुरू असलेली कामे पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. भविष्यात या विभागाचा शेतकरी स्वावलंबी बनविण्याचा आमचा मानस आहे. शासनाची कोणतीही मदत न घेता गावकरी व विविध संस्थांच्या माध्यमातून ‘माती वाचवा पाणी जिरवा’ हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. बुरांडे यांनी सांगितले.
ज्ञानोबा सुरवसे