|| रमण रणदिवे

‘प्रत्येक व्यक्तीने आपल्या अस्तित्वावर अंध:काराची झूल पांघरली होती अन् त्यात ते स्वत:ला सुरक्षित भासवीत होते. त्याच्या (म्हणजे काळाच्या) अंगगंधाने त्याच्या आगमनाची सूचना दिलीदेखील; पण एकही खिडकी किंवा दाराची फट किलकिलली नाही तो कडी ठोठावणारच होता, तोच काळाने सगळ्या दारांच्या कड्या, कुलपं तोडून टाकली खिडक्यांवरील तावदाने दूर सारली सारी दारं-खिडक्या सताड उघडली अन् उगवतीच्या कोमल किरणांना तो आर्त स्वरात म्हणाला, ‘सुस्वागतम्’

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

ही कविता आहे डॉ. राम पंडित यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘अनिर्वचनीय’ काव्यसंग्रहातली. मूळ कविता थोडी मोठी आहे. इथे संक्षिप्त स्वरूपात दिली आहे. डॉ. पंडितांचे यापूर्वी ‘ऋतुरंग’, ‘रंग उडून गेले’, ‘गजलिका’ आणि ‘ऋणशेष’ हे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘अनिर्वचनीय’ हा त्यांचा पाचवा गीत-गजलसंग्रह आहे. यशिवाय डॉ. पंडितांचे इतरही अनुवादित कथा/कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

मराठी उर्दू गजलांचा त्यांचा व्यासंग सर्वश्रुत आहे. याशिवाय छंदशास्त्राचे जाणकार, गजल अभ्यासक, समीक्षक म्हणूनही ते सुपरिचित आहेत. मूलत: ते उत्तम गीतकार, गजलकार आहेत. विशेष म्हणजे कथासाहित्यावर त्यांनी पीएच. डी. संपादन केली आहे. ‘अनिर्वचनीय’ या त्यांच्या नव्या संग्रहात एकूण ५४ रचना आहेत. त्यात मुक्तछंद, गीत, गजल, मुक्तके, अभंग असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. वृत्तबद्ध गेय रचनांमध्ये त्यांनी सुमंदारमाला, कलापती, देवांगना, देवराज, व्योमगंगा, वियदगंगा, कलिंदनंदिनी, विभावरी, चंचला, मंदाकिनी, रसना, स्वर्गगंगा, चंद्रकांत, वनहरिणी इ. वृत्ते निर्दोष वापरली आहेत. संग्रहातील अभंगरचना नितांत श्रद्धाभाव अभिव्यक्त करणाऱ्या आहेत. या संग्रहातील ‘स्वागत’ ही मुक्तछंदातील कविता फार छान आहे. सद्य:युगात मानवाच्या ठायी असणाऱ्या षड्रिपूंचा अतिरेक पाहून काळही कमालीचा अस्वस्थ झालाय. या विकारांचा नायनाट व्हावा असे त्याला मनोमन वाटते. म्हणूनच तो आशावादी सद््भावनेने उगवतीच्या कोमल किरणांचे सानंद स्वागत  करतो. या सुंदर रचनेत रूपकात्मक आणि प्रतीकात्मक असा संमिश्र भाव आहे.

वर्तमान वास्तव, प्रेम या संज्ञेची प्रेयस अनुभूती, त्यातील संवेदनशील भावच्छटा, समाजव्यवस्थेतील अन्याय अशा विविध विषयांवर कवीने समरसून लिहिले आहे. त्यातील काही ओळी पाहा. ‘काळी कम्पोजिशन’ या कवितेत कवी म्हणतो-

‘ऐका समकालीन पाखरांनो

अवधी फारच थोडा उरलाय

आता उशीर करू नका

अवतीभवतीचं वातावरण धुळीने

माखलंय… धुकं दाटलंय

सामर्थ्य एकवटून घ्या भरारी

मुक्त आकाशाच्या दिशेने…’

ती भरारीच तुम्हाला तुमच्या ठिकाणाच्या दिशेला नेईल. प्रत्येक क्षण हा मुक्त होण्याचा ऋतू असतो. आजच्या या करोना महामारीच्या काळात कवीने पाखरांची प्रतिमा वापरून समस्त मानवजातीला सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.  किंवा-

‘निघून चालले ऋतू उजाड आत हे

भकास रंग त्यातला पुसायला हवा’

(पृष्ठ ३३)

किंवा-

‘सांत्वनासाठी जगाच्या

दु:ख अपुले विसरूनी

पापण्यांवर आसवांना

थोपवावे लागले’              (पृष्ठ ३४)

पुढील प्रेमभावना पाहा-

‘अजूनही वयात या

अतीत रंग सोहळे

अजून भेटती पहा

सुरेल शब्द कोवळे’         (पृष्ठ २५)

अशा अनेक सुंदर ओळींतून मानवी संवेदनभाव व्यक्त होऊन वाचकाला काव्यानंद देतो. आशयसंपन्नता व प्रासादिकता त्यांच्या बहुतांशी रचनांमधून दृग्गोचर होते.

कवीच्या प्रातिभ फांदीवर साधनेची अध्याहृत फुले आशयाचा सुगंध घेऊन दरवळताहेत हेही जाणवते. कुठल्याही कलेत नितळ प्रामाणिकता आणि उत्कट भावमयता अनिवार्य असते. संग्रहातील अनेक कविता या निकषांवर दर्जेदार आहेत. ‘आयुष्य आज हरले’, ‘ही वर्णग्रस्त दुनिया’, ‘स्वप्नांच्या आरशात’, ‘नाती’, ‘फक्त एवढंच करा’ या कवितांमधून कवीने आशयाचा परीघ विस्तारत नेला आहे. डॉ. राम पंडित यांच्या कविता साधेपणाच्या सौंदर्याने नटलेल्या आहेत. अनाकलनीय, दुर्बोध प्रतिमा-प्रतीकांच्या जटिल अरण्यात ते वाचकांना उगाचच फिरवत नाहीत. तसा त्यांच्या कवितेला सोसही नाही. ही कविता जीवनकेंद्री आहे. माणसांच्या स्वभावातील बारकावे, जगण्याच्या नानाविध तऱ्हा या कवितेने डोळसपणे टिपल्या आहेत. चिंतन-प्रवासात चालत राहण्याची सत्त्वधारा जोपासताना या कवितेने साधनेचा हात सोडलेला नाही. जीवनाच्या उशाला कवितेचा दिवा ठेवून प्रज्ञेच्या प्रकाशात स्वत:ला पारखून घेणारी, सखोल जीवनचिंतन करणारी अशी ही कविता आहे.

‘अनिर्वचनीय’- डॉ. राम पंडित, अभिव्यक्ती प्रकाशन, पृष्ठे- ६६, मूल्य- १०० रुपये.

ranadiveraman2009@gmail.com