अमेरिका या मायावी देशाचे आकर्षण जगभरातील अनेकांना वाटते. तिथली समृद्धी, स्वातंत्र्य आणि प्रगतीची संधी यामुळे अनेकांना अमेरिका हा स्वर्गच वाटतो. अमेरिकेतले न्यूयॉर्क हे शहर तर या स्वर्गसुखाचे शिखरच आहे अशी अनेकांची कल्पना आहे. याच कल्पनेचा शोध घेण्यासाठी प्रवासवर्णनात्मक लेखन करणाऱ्या मीना प्रभूंनी ‘न्यूयॉर्क, न्यूयॉर्क – एका नगरात जग’ हे नवं पुस्तक लिहिलं आहे.
मीना प्रभूंची ‘माझं लंडन’, ‘दक्षिणरंग’, ‘मेक्सिकोपर्व’, ‘चिनीमाती’, ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘गाथा इराणी’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यात प्रवासवर्णनासारखा साहित्यप्रकार समृद्ध करण्यात प्रभू यांचा निश्चितच फार मोठा वाटा आहे. त्यामुळे ‘न्यूयॉर्क, न्यूयॉर्क’ वाचतानाही एका अपेक्षेने आपण पुस्तक वाचायला सुरुवात करतो. पण काही अपवाद वगळले तर स्थळदर्शनाबरोबर तिथले लोकजीवन, संस्कृती, माणसे यांबाबतची उत्सुकता न शमवणारी जंत्रीवजा माहितीच वाचायला मिळते.
४२३ पानांच्या या पुस्तकात न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध चित्रकर्ती बाब्र्रा नेस्मीम, इटालियन कनोली या पदार्थाचा व्यापारी बेबी जॉन आणि लेखिकेला तिथल्या पोलिसांनी स्वत:च्या कामकाजाच्या चौकटीबाहेर केलेली मदत हे दोन-तीन प्रसंग खूप वाचनीय झाले आहेत.
बाब्र्रा नेस्सीम ही प्रसिद्ध चित्रकर्ती कलाकार म्हणून कशी वाढली याचे फार सुंदर वर्णन केले आहे. वडील तुर्की आणि आई ग्रीक अशा कुटुंबातून आलेल्या या स्त्रीला अमेरिकेसारख्या तथाकथित प्रगत समजल्या जाणाऱ्या वातावरणातही सुरुवातीला चित्रकलेच्या आवडीबाबत विरोध पत्करावा लागला होता. तरीही तिने आपल्या कलेचा ध्यास कसा सोडला नाही, स्वत:च्या चित्रांमध्ये कोणकोणते प्रयोग केले, यशाच्या शिखरावरही स्वत:च्या स्वभावातला साधेपणा कसा टिकवून ठेवला हे वाचताना न्यूयॉर्कच्या प्रगतीची दारे उघडणाऱ्या वातावरणाचीही ओळख होते.
कनोली हा इटालियन पदार्थ अमेरिकेत प्रस्थापित करताना बेबी जॉनने कसा संघर्ष केला हा भागही असाच रोचक झाला आहे. कनोली म्हणजे बाहेरून कुरकुरीत बिस्कीट पण आतून चीज, क्रीम आणि साखरेचं पुरण असणारा इटालियन कानवलाच. पण टोपलीतून कनोली विकणाऱ्या आजीकडून हातगाडी चालवण्याची प्रेरणा घेणारा बेबी जॉन आज कनोली विकणारा प्रस्थापित व्यापारी झाला आहे. कष्ट करणाऱ्या कल्पक माणसाला न्यूयॉर्क भरभरून मदत करते हे या उदाहरणावरून सिद्ध होते.
निवेदनाच्या ओघात न्यूयॉर्क पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडवणारा हृद्य प्रसंगही वाचायला मिळतो. सर्वसामान्य स्त्रियांना असुरक्षित ठरेल अशा वातावरणात लेखिकेने आणि तिच्या मैत्रिणीने संध्याकाळच्या वेळेला धोका पत्करून जाऊ नये म्हणून तिथल्या पोलिसांनी स्वत:चे ‘डय़ुटी अवर्स’ संपल्यावरही त्या दोघींना मदत केली. हे वाचून न्यूयॉर्कसारख्या सतत व्यवहाराच्या मागे धावणाऱ्या शहरात टिकून राहिलेली माणुसकी दिसून येते.
पुस्तक वाचत असताना अमेरिकेची प्रत्येक गोष्टीचे शास्त्रशुद्ध ‘मार्केटिंग’ करण्याची वृत्ती जागोजागी दिसून येते. रस्ते, पूल, संग्रहालय, शिक्षण संस्था अशा कोणत्याही ठिकाणी गाईड उपलब्ध असतो. त्या ठिकाणचा इतिहास, त्या गोष्टीच्या निर्मितीमागची मेहनत, त्याचे सौंदर्य याची माहिती तो देतो. शब्दिक निवेदन, फोटो, अगदी हेलिकॉप्टर राईडही तिथे उपलब्ध असते. यावरून कोणतीही गोष्ट सुंदर वेष्टनात गुंडाळून आकर्षक शब्द वापरून ‘प्रेझेंटेबल’ करायची हे अमेरिकी संस्कृतीचे वैशिष्टय़ आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही.
न्यूयॉर्कच्या क्वीन्समधल्या ‘फॉरेस्ट हिल’ या भागात भारतीयांची गजबज आहे. तिथे मिळणारे भारतीय पदार्थ, तिथेही ज्योतिषांनी बसवलेले बस्तान आणि भारतीयांवर कुरघोडी करणारे बांगलादेशी यांची माहिती मिळते. पण अमेरिकेत गेलेले भारतीयही आपली ‘मूळ’ प्रवृत्ती न विसरता कागदी रुमालाचे बोळे, सिगरेटची थोटकं, फळांच्या साली आणि पानांच्या पिचकाऱ्यांनी आपले भारतीयत्व सिद्ध करतात हे वाचून मन अंतर्मुख होते.
सुंदर रंगीत फोटो ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. तिथल्या संग्रहालयातली उत्कृष्ट शिल्पे, वेगवेगळी ठिकाणे, भारतीयांची गजबज असलेली फॉरेस्ट हिल यांची उत्कृष्ट छायाचित्रे या पुस्तकात पाहायला मिळतात.
हे अपवाद वगळले तर संपूर्ण पुस्तक अवतरणांनी भरले आहे. कोणी तरी बिल, कॅथी, ज्यो, किथ, लेझ्ली अशा नावांचा किंवा नावाची गाईड आपल्याला कुठल्या तरी जागेची, ब्रिजची संग्रहालयाची माहिती देतो आणि तीच माहिती असंख्य अवतरणांतून वाचावी लागते. हल्ली ही सर्व माहिती गुगलचे एक बटण दाबल्यावर उपलब्ध असताना ४३२ पानांच्या पुस्तकाचे प्रयोजन काय हे समजत नाही.
या पुस्तकाचे संपादन आणि प्रूफ रीडिंग करताना अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. एका पानावर सुरू झालेला कंसातील मजकूर दुसऱ्या पानावर संपतो. एका ठिकाणी तर कंसातला मजकूर तब्बल २०१, २०२, २०३ अशा तीन पानांवर आहे. तसेच अनेक शुद्धलेखनाच्या चुका आधीच्याच अवतरणयुक्त निवेदनाने बेजार झालेल्या वाचकाला हैराण करतात.
थोडक्यात, ‘माझं लंडन’मुळे मीना प्रभू यांच्याकडून निर्माण झालेल्या अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करत नाही.
‘न्यूयॉर्क, न्यूयॉर्क : एका नगरात जग’ – मीना प्रभू, पुरंदरे प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ४३२, मूल्य – ४५० रुपये.