11 August 2020

News Flash

तो भीषण अनुभव…

आम्ही मग पश्चिमेला तुलसी पाइप रोडवर बाहेर पडलो. एव्हाना पाऊस तुफान येत होताच. छत्रीचा काहीही उपयोग नव्हता.

हायवेवर एका बाजूला पाण्याचा महासागर आणि दुसऱ्या बाजूला उभी असलेली वाहनं यामधून वाट काढत शेकडो माणसं चालत निघाली होती.

डॉ. अपर्णा देशपांडे – draparnadeshpande@yahoo.com

२००५ सालच्या २६ जुलैचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू झाला होता. सकाळी रेल्वेने एलफिन्स्टन रोड स्टेशन गाठून हॉस्पिटलला पोहोचले तोवर कुठेही पाणी तुंबलेले नव्हतं, किंवा आज खूप पाऊस येईल अशी शंका घेण्यासारखं  वातावरणही नव्हतं. कामं आणि ओपीडी संपवून मी परत डिपार्टमेंटला आले तेव्हा मात्र काळंभोर आभाळ भरून आलेलं.. आणि थोडा थोडा पाऊसही सुरू झाला होता. दुपारी एकच्या सुमारास सोबतचे सहकारी सांगू लागले की, आज पुष्कळ पाऊस येणार आहे.. शक्य असल्यास लवकर घरी परत निघालेलं श्रेयस्कर. अतिवृष्टीची शक्यता आहे. परळला तेव्हा पाऊस खूप नसला तरी प्रचंड काळोख झाला होता. आणि हॉस्पिटलमध्ये अडकायला नको म्हणून मीही लगेचच घरी जाण्याचा निर्णय घेतला. याचं मुख्य कारण म्हणजे पाळणाघरात असलेली वय वर्ष सात आणि वय वर्ष दहा महिन्यांची अशी दोन्ही पिल्लं. त्या दिवशी दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे मुलांचा बाबा पाल्र्यातच असणार होता. इतक्यात त्याचाच फोन आला आणि त्याने सांगितलं की, ‘खूपच पाऊस पडत आहे. तू तिथून निघ. मी मुलांना घेऊन घरी येतो.’

केईएमवरून निघून दादर स्टेशन गाठलं. दादरला १.२२ ची लोकल एक-दोन मिनिटेच उशिरा आली असेल. फारशी भरलेली नव्हती. आणि मुख्य म्हणजे कुठलीही अनाऊन्समेंट न होता ट्रेन दादर स्टेशनवरून निघालीसुद्धा. ट्रेनमध्ये चढता चढता लक्षात आलं की, केईएमचा अजून एक सहकारी जेन्ट्स कम्पार्टमेंटला चढत होता. योगायोगाने तो पाल्र्याचाच रहिवासी. आम्ही एकमेकांना एवढंच सांगितलं, की ट्रेनमधून उतरायची वेळ आली तर एकत्रच निघायचं- म्हणजे सोबत राहील. कारण आतापर्यंत ट्रेन्सबद्दल शंका उत्पन्न झाली होती आणि घोषणा काहीच होत नसल्यामुळे खरी परिस्थिती कळायला मार्ग नव्हता. आणि नेमकं तेच झालं. ट्रेन माटुंगा स्टेशनहून निघाली आणि माहीम स्टेशन यायच्या अगोदर १०० मीटपर्यंत येऊन थांबली. आमच्या ट्रेनच्या पुढे लागलेल्या आणखीनही लोकल्स दिसत होत्या. आता ट्रेनमध्येच थांबायला लागणार असं वाटत असतानाच जोरदार पाऊस सुरू झाला. आणि बघता बघता रेल्वेचे रुळ पाण्याखाली जाऊन पाणी वाढू लागलं. समोर माहीम स्टेशन दिसत होतं. पण लहानपणापासूनची शिकवण होती की रुळांवर कधीही उतरायचं नाही. शेवटी मनाचा हिय्या करून इतर काही बायकांबरोबर ट्रेनमधून उतरण्याचा निर्णय घेतला. खाली उतरून माझ्या केईएमच्या सहकाऱ्याला सांगितलं. तोही उतरला. आणि आम्ही माहीम स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला पोहोचलो.

तिथे माहिती मिळाली की, माहीमची खाडी भरल्याने रेल्वेचा पूल पाण्याखाली गेला आहे आणि त्यामुळे ट्रेन्स माहीमच्या पुढे जाणार नाहीत. हे कळल्यावर स्टेशनवर थांबून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्ही मग पश्चिमेला तुलसी पाइप रोडवर बाहेर पडलो. एव्हाना पाऊस तुफान येत होताच. छत्रीचा काहीही उपयोग नव्हता. स्टेशनवरून बाहेर पडताना घराशी शेवटचा कॉन्टॅक्ट झाला होता. मुलं घरी पोहोचली होती. मात्र, आमची मारुती ८०० बाजूच्या गल्लीमध्ये पूर्ण बुडून गेली होती. मुलं घरी आहेत हे ऐकून माझं सर्व टेन्शन दूर झालं. त्यानंतर मात्र मोबाइल नेटवर्क बंद पडलं. आम्हाला अजूनही उत्तरेला झालेल्या प्रचंड पावसाची फारशी कल्पना आली नव्हती किंवा तसा अंदाजही आला नव्हता. मुंबईत वाढलेल्या माणसाला ‘खूप’ पावसाची कसली आलीय भीती? आम्ही चालत घरी जायचं ठरवलं. बांद्य््राापर्यंत चालत जाऊ, मग तिथून बस किंवा काही वाहन मिळेल असा विचार करून आम्ही रहेजा हॉस्पिटलवरून डावीकडे वळून ब्रिजवरून खाली उतरलो. चालत चालत जेव्हा धारावी टी जंक्शनला पोहोचलो तेव्हा मात्र पहिल्यांदा परिस्थितीची थोडीशी जाणीव झाली आणि मघाशी मनात आलेला ‘बस मिळेल’ हा विचार आठवून हसूसुद्धा आलं. हायवेवर एका बाजूला पाण्याचा महासागर आणि दुसऱ्या बाजूला उभी असलेली वाहनं यामधून वाट काढत शेकडो माणसं चालत निघाली होती. बसेस बऱ्याच होत्या. मात्र, हतबल होऊन पाण्यात उभ्या होत्या. ड्रायव्हरच्या बाजूने चालणाऱ्या माणसांच्या प्रवाहात काही गरोदर बायकासुद्धा दिसल्या. त्यांना बघून जीवाची घालमेल झाली. अर्थात त्यांच्याबरोबर मदतीला त्यांचे सहकारी होते. थांबायला मात्र काही स्कोप नव्हता. आम्ही चालत चालत कलानगरच्या सिग्नलवरून पुढे आलो आणि खेरवाडी सिग्नलच्या काही अंतर अगोदर आम्हाला एका सद्गृहस्थांनी त्यांच्या गाडीत लिफ्ट दिली. पाऊस थोडा कमी झाला असला तरी आम्ही गच्च ओले तसेच त्यांच्या गाडीत बसलो. त्या गाडीत ते स्वत:, त्यांची एक सहकारी, ड्रायव्हर आणि आम्ही दोघे. आम्ही त्यांचे खूप आभार मानले आणि वाटलं की, आता सुरळीत प्रवास होईल. हा आनंद एकूण १०-१५ सेकंदच टिकला असेल. कारण थोडी पुढे जाऊन गाडी परत थांबली. पुढे पूर्ण ट्रॅफिक जॅम. परत एकदा वाट बघणं सुरू झालं. १५-२० मिनिटं झाल्यानंतर माझा धीर संपला. बरं, आता गाडीतून उतरताना संकोच. कारण गाडी ओली झालेली आमच्यामुळे. तरीसुद्धा काही वेळाने आम्ही परत गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला. गाडीमध्ये असलेली त्यांची सहकारीसुद्धा पाल्र्याचीच असल्याने तीही आमच्याबरोबर निघाली. आता जरी गाडीतून पार केलेलं ते अंतर ‘फक्त’ २००-२५० मीटर वाटत असलं तरी त्यावेळेस ती लिफ्टसुद्धा खूपच आधाराची वाटली होती. आणि आम्हाला जास्त मदत करता आली नाही म्हणून त्या गृहस्थांनाही खूपच वाईट वाटत होतं. आम्ही तिघं आता चालत चालत वाकोला ब्रिजपाशी पोहोचलो. लांबूनच बघितलं तर सर्वजण ब्रिजच्या वरून पायपीट करताना दिसत होते. त्यावरून ब्रिजखालची परिस्थिती किती वाईट असेल, याची कल्पना नंतर टीव्हीवर पूर्ण बेस्ट बसेस पाण्याखाली गेलेल्या पाहिल्या तेव्हा आली.

वाकोला ब्रिज पूर्णपणे वाहनांनी भरला होता. एकही गाडी जागेवरून हलत नव्हती. ब्रिजच्या पायथ्याशी पोहोचता पोहोचता त्याचं कारण कळलं. समोरचं अचंबित करणारं दृश्य बघून सर्वच जण थबकत होते. ‘मुंबईत कुठे नदी आहे?’ असं विचारणाऱ्यांना मिठी नदीने आपलं रौद्र रूप दाखवायचं ठरवलं होतं.

अत्यंत आक्रमक वेगाने विमानतळाच्या खालून, बाजूच्या वस्त्यांमधून, गल्ल्यांमधून, छोटय़ा नाल्यांमधून सगळीकडून पाणी मीलन सबवेच्या दिशेने वाहत होतं. पाणी हायवेवर खूप खोल नसलं तरी हाताचा आधार घेतल्याशिवाय कुणी चालू शकत नव्हतं. एवढा रुंद हायवे.. पण चालण्यासाठी एक फुटापेक्षा जास्त रुंदीची जागाच नव्हती. सर्व जण एकामागून एक जीव मुठीत घेऊन कसेबसे चालत होते. मीलन सबवेचं पाणी जवळजवळ हायवेच्या पातळीला आलं होतं. आमच्या डोळ्यादेखत बाजूला लावलेल्या एक-दोन गाडय़ा पाण्यामुळे खाली ढकलल्या गेलेल्या आम्ही पाहिल्या.

आता आपलं घर जवळ आल्याची जाणीव व्हायला लागली. पण अजून सर्वात मोठा अडथळा तिथेच असणार, हे मात्र लक्षात आलं नाही. सगळीकडे ब्रिजच्या खाली प्रचंड पाणी. त्याचप्रमाणे सहारा सिग्नलला पाल्र्यात शिरण्यासाठी गळ्यापर्यंत पाणी साठलेलं. अशा परिस्थितीत तिथल्या आजूबाजूच्या वस्तीमधल्या तरुणांनी दोरखंड टाकून मानवी साखळी तयार केली होती. आणि स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता ती मुलं तासन् तास लोकांना हाताला धरून आतल्या सुरक्षित रस्त्यापर्यंत पोहोचवत होती. हे अंतर पार करताना पहिल्यांदाच थोडीशी भीती वाटली असेल. त्या मदत करणाऱ्या माणसांना बघून मन सुन्नही झालं आणि भरूनही आलं. त्या सर्वाच्या घरात पाण्याने काय नुकसान केलं असेल त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.. तरीसुद्धा प्रथम इतरांचा विचार करायचा. संकटसमयी सामान्य व्यक्तीच अशी असामान्य कृती करू धजतात.

एकदा नेहरू रोडला आल्यानंतर मात्र पूर्ण रस्ता रिकामा आणि त्यामानाने कोरडा असा होता. सर्वात आनंदाची बाब म्हणजे आमच्या गल्लीत वीज असलेली एकमेव बिल्डिंग आमची होती. ते बघून जे काही वाटलं त्याचं आज वर्णनही करू शकत नाही. एकंदरीत आमचा हा प्रवास संध्याकाळी ७.३०-८ वाजता एकदाचे घरी पोहोचलो तेव्हा संपला. घरी जाऊन स्वच्छ होऊन मुलांना भेटल्यानंतर जाणवली ती आपण घेतलेली काहीशी रिस्क! अर्थात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने सबंध मुंबईच पाण्याखाली जाईल याची काहीच कल्पना तेव्हा नसल्याने प्रवासात ती रिस्क जाणवली नव्हती.

आज पंधरा वर्षांनी मागे वळून पाहताना जाणवतं की, तेव्हा निसर्गाने त्याच्या विराट रूपानं माणसाला नमवलं होतं. आणि आज २०२० मध्येही त्या आठवणींनीदेखील मनात धस्स होतं. एवढं सारं होऊनही अजूनही अनियंत्रित बांधकामं, रोज उभ्या राहणाऱ्या नवनवीन उंच इमारती, खाडी आणि पाण्याचा निचरा होण्याच्या जागांवर भराव घालणं या गोष्टी सुरूच असल्याचं आपण पाहतोच आहोत. त्यापायी येत्या काळात निसर्गाचा असा भयंकर प्रकोप पुन्हा अनुभवायला लागू नये, एवढीच इच्छा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 2:16 am

Web Title: 26 july 2005 mumbai flood horror experience dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : आकर्षक, निरागस आणि अद्भुत
2 इतिहासाचे चष्मे : प्राचीन धर्म, विज्ञान व आपण
3 सांगतो ऐका : बचपन के दिन भुला न देना..
Just Now!
X