तुमच्या पाली कुत्र्यावर तुमचे खूप प्रेम होते. पाली हरवला तेव्हा तुमचं घरदार अस्वस्थ झालं होतं. एके दिवशी असाच सकाळी तुमच्याकडे आलो तर पाली दिसला नाही. तुम्ही म्हणालात, ‘पाली आपल्याला सोडून गेला.’ ती सकाळ मलाही अस्वस्थ करून गेली. पाली गेल्यानंतर के. ई. एम. हॉस्पिटलच्या आसपास तुम्ही त्याचे अंत्यसंस्कार केले. त्याच्या अस्थी घरी आणल्यात. अंगणात त्या अस्थी पुरल्यात आणि त्यावर अमलताशचे झाड लावलेत. ज्याला भाषा नाही, जो कधी बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यांतून दिसणारी माया तुम्ही जपलीत. हे तुम्हीच करू शकता. संवेदनशील कवी आणि चित्रपटकार गुलजार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुहृदाने लिहिलेले अनावृत पत्र..
प्रिय गुलज़ार
यांना सा. नमस्कार.
१८ ऑगस्टला तुम्ही ८१ व्या वर्षांत पदार्पण करत आहात. खरं तर तुम्हाला समक्ष भेटून शुभेच्छा द्यायला हव्यात. पण मला माहीत आहे, तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत कधी थांबत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसमवेत बाहेरगावी जाता. म्हणून आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. तुमचा स्नेह मला लाभला ही माझ्या आयुष्यातली अत्यंत भाग्याची गोष्ट. १९८८ साली आपली पहिली भेट बासू भट्टाचार्याच्या मुलीच्या लग्नात झाली. त्या सिताऱ्यांच्या झगमगत्या दुनियेत तुमचा पांढराशुभ्र पोशाख उठून दिसत होता. फिल्मी दुनियेत राहूनही तुम्ही फिल्मी वाटला नाहीत. मी तुम्हाला भेटलो. तुम्ही सहजपणे मला तुमच्या घरी सकाळी आठ वाजता भेटायला बोलावले. पाली हिल ऐकून होतो, पण काहीच माहीत नव्हतं. त्या भेटीत तुमच्याबरोबर मी काय बोललो ते आता आठवत नाही. कारण ती वेळ भारावलेपणाची होती. जाताना तुम्ही मला चार पुस्तके भेट दिली. त्या क्षणापासून मी तुमच्याशी जवळिकीने बांधला गेलो.
अधूनमधून मी तुम्हाला फोन करायचो. आपण ऑफिसमध्ये भेटायचो. एकदा असाच तुम्हाला फोन केला. तुम्ही म्हणालात, ‘अरुण, आता ऑफिसमध्ये येत जाऊ नकोस. सकाळी घरी आठ वाजता ये. तुझ्यासाठी वेळ राखून ठेवली आहे.’ त्या दिवशी मला खूप आनंद झाला. माणूस माणसाला मदत करू शकतो, संकटातून वाचवू शकतो; पण आपली व्यक्तिगत वेळ देणे ही सर्वात अवघड गोष्ट असते. सकाळची वेळ ही आपली स्वत:ची असते. तिथून आपला दिवस सुरू होणार असतो. अशावेळी स्वत:च स्वत:साठी वेळ देणे गरजेचे असते. पण तुम्ही मला अपवाद केला. सकाळची आठची वेळ माझ्यासाठी दिली. ही माझ्या आयुष्यातली मला समृद्ध करणारी भेट आहे. त्या भेटीचे ऋण कधीही न फेडता येणारे आहेत.
तुमच्या घरी पहिल्यांदा आलो तेव्हा गॅलरीतून पाली मोठमोठय़ाने भुंकत होता. मी कुत्र्याला फार घाबरतो. भीत भीत जिन्याच्या पायऱ्या कसाबसा चढलो. पाली तुमच्याजवळ येऊन बसला. तुम्ही म्हणालात, ‘अरुण, घाबरू नकोस. आज तुझी त्याच्याशी ओळख झाली आहे. तो काही करणार नाही.’ आपण दोघे तुमचा ग्रीन टी घेत असताना पाली जवळच बसलेला असायचा. तुम्ही त्याला दूध-बिस्किटे द्यायचात. थोडा वेळ झाला की तुम्ही त्याला म्हणायचात, ‘पाली, आता दुसरीकडे बस.’ पाली गुपचूप उठून दुसरीकडे जायचा. ब्रेकफास्टच्या वेळी पुन्हा आपल्या टेबलाजवळ येऊन बसायचा. पालीवर तुमचे खूप प्रेम. पाली हरवला तेव्हा तुमचं घरदार अस्वस्थ झालं होतं. एके दिवशी असाच सकाळी आलो तर पाली दिसला नाही. तुम्ही म्हणालात, ‘पाली आपल्याला सोडून गेला.’ ती सकाळ मलाही अस्वस्थ करून गेली. पाली गेल्यानंतर के. ई. एम. हॉस्पिटलच्या आसपास तुम्ही त्याचे अंत्यसंस्कार केले. त्याच्या अस्थी घरी आणल्यात. अंगणात त्या पुरल्यात आणि त्यावर अमलताशचे झाड लावलेत. ज्याला भाषा नाही, जो कधी बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यांतून दिसणारी माया तुम्ही जपलीत. हे तुम्हीच करू शकता.
कितीतरी आठवणींनी मनात गर्दी केली आहे. तुम्ही पहाटे पाचला उठता. जेव्हा पाली हिलच्या झगमगत्या दुनियेची रात्र संपलेली असते आणि तुमची सकाळ सुरू झालेली असते. ६ ते ८ तुम्ही टेबल टेनिस खेळायला जाता. आठ वाजता घरी आलात की एका कवीचा दिवस सुरू होतो. कितीदा तरी आपण दरवाजाजवळ भेटलेलो आहोत. मी आपल्याशी कुठल्या भाषेत बोलतो याची अनेकांना उत्सुकता आहे. खरं तर मुक्या-बहिऱ्या माणसांवर ‘कोशीश’ चित्रपट काढणाऱ्या माणसाला भाषेची गरजच काय? मी तुमच्यासमोर बसतो आणि बोलायला सुरुवात होते. तुमचा तो घनगर्द आवाज मला बोलताना विचार करायला लावतो. एखादा शब्द सुचला नाही की मी गप्प बसतो. तुम्ही ओळखता. पण ओळख न देता संवादाला सुरुवात करता. तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर दुसऱ्यांदा मला घरी बोलावले नसते. कारण पंडित रविशंकरांची सतार चालू असताना हुतुतूच्या आवाजात बोलणारा माणूस कसा सहन करणार?
पण तुम्ही माणसांवर प्रेम करता. नंतर भाषेवर. माणूस आहे तर भाषा आहे, हे तुम्ही जाणता. भाषेच्या संदर्भात एखादी उलटसुलट बातमी आली की तुम्ही अस्वस्थ होता. कुठलीही भाषा माणसाला घडवत असते. ती भाषा, तिची लय जपली पाहिजे असे तुम्हाला वाटते. अलीकडे तर सतत तुम्ही कवितेच्या अनुवादात गुंतून गेलेले दिसता. भारतातल्या सर्व भाषांतल्या कवींच्या कविता तुम्हाला इंग्रजीतून िहदीत अनुवाद करायच्या आहेत. खरं तर अनेकदा कवी स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. इतरांच्या कविता कधीतरी वाचतात. पण तुमचे तसे नाही. भारतीय भाषांतल्या कवींचा प्रवास तुम्हाला समजून घ्यायचा असतो. मिळतील तिथून तुम्ही कवितांची पुस्तके, कविता जमा करता आणि त्यातल्या आवडलेल्या कवितांचा अनुवाद करत राहता. आयुष्याच्या संध्याकाळच्या वाटेवर तुम्ही उभे आहात. खरं तर अशावेळी एखादा कवी स्वतचे राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यात गढून जातो. पण तुमचे तसे नाही. भारतीय कवितेच्या नदीचा प्रवाह तुम्हाला समजून घ्यायचा असतो. तुम्ही म्हणता, ‘अरुण, तुला जरा बोअर करतो. एक कविता वाचून दाखवतो.’ तुम्ही कविता वाचता, मी ऐकतो. तुम्ही कवी आहात तसेच चित्रपट दिग्दर्शकही आहात. समोरच्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेचच ओळखता. मी अनेक शब्दांना अडून बसलेलो आहे, हे तुम्ही लगेच ओळखता आणि त्या शब्दांचा सरळ साध्या िहदीत अर्थ सांगून पुढे जाता. बऱ्याच भेटींत मला तुमच्याकडून कविता ऐकायला मिळते. अशावेळी मला माझ्या भाग्याचाच हेवा वाटतो. ‘माझी दृष्ट न लागो माझ्याच वैभवाला..’ असे मनातल्या मनात म्हणत असतो.
सकाळी तुम्हाला अनेकांचे फोन येत असतात. कुणी लँडलाइनवर फोन करतो, तर कुणी मोबाइलवर. एखादा माणूस मोबाइलवर तुमच्याशी बोलताना म्हणतो, ‘दोन मिनिटं बोलतो. चालेल ना?’ तुम्ही सभ्यतेने ‘हो’ म्हणता. त्याची दोन मिनिटं संपता संपत नाहीत. अशावेळी मोबाइलचा गरवापर करणाऱ्यांचा तुम्हाला राग येतो. तुमची मोबाइलवर एक कवितासुद्धा आहे. एकदा पुणे विमानतळावर आपण उभे होतो. एक माणूस आला आणि तुमचा फोटो काढू लागला. तुम्हाला ते आवडले नाही. तुम्ही न बोलता त्याच्यापासून दूर झालात. मोबाइल हातात आहे म्हणजे आपल्याजवळ परवानाच आहे असं अनेकांना वाटतं. अशा माणसांपासून तुम्ही दूर राहता. कुणी नम्रतेनं विचारलं, ‘तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे, चालेल का?’ तर तुम्ही लगेच त्याला प्रेमाने जवळ घेऊन फोटो काढू देता.
तुमच्याबरोबर सुरुवातीला ब्रेकफास्ट करताना मला फार संकोच वाटायचा. खाताना आपला आवाज तर होणार नाही ना, याची मी काळजी घ्यायचो. तुमचा खानसामा रामू याच्या हातचे आम्लेट मला खूप आवडायला लागले. तेव्हापासून मी आम्लेटच खात आहे. एकदा असंच रामूच्या हातून आम्लेट बिघडल्याचे तुमच्या लक्षात आले. मला म्हणालात, ‘आम्लेट राहू दे तसेच.’ तुम्ही खुर्चीवरून उठलात आणि शांतपणे रामूला आम्लेट कसे बिघडले, हे सांगून तुमच्यासमक्ष आम्लेट करायला लावलंत. तोपर्यंत माझा जीव वरखाली होत होता. त्या दिवशीच्या आम्लेटची चव निराळीच होती. कारण ती तुमची रेसिपी होती.
तुमच्याविषयी वर्तमानपत्रात एक लेख आला होता. मला तो आवडल्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवत होतो. एक पॅरा सोडून मी वाचायला सुरुवात केली. त्यात तुमच्याविषयी जरा तिरकसपणे लिहिले होते. मी तुम्हाला म्हणालो, ‘असेच काहीतरी लिहिले आहे.’ तुम्ही म्हणालात, ‘वाचून दाखव.’ मी तो तिरकस पॅरा वाचून दाखवला. वाचल्यावर तुम्ही म्हणालात, ‘अरुण, तू एक लक्षात ठेव. मला माझ्याविषयी स्पष्टपणे लिहिले असेल तर मला वाचायला आवडते. मला टीका करणारे, दोष दाखवणारे मित्र आवडतात.’ हे मात्र खरं आहे. तुमच्या घरात तुमचा एकही फोटो नाहीए. पण आर. के. लक्ष्मण आणि इतर चित्रकारांनी तुमची काढलेली व्यंगचित्रे हॉलमध्ये आहेत. तुम्ही जसं बोलता तसं वागता. परवाच बोलता बोलता तुम्ही सहज म्हणालात, ‘मी अनेक गजला लिहिल्यात. पण त्या गजलांचं पुस्तक काढण्यापूर्वी गजला लिहिणाऱ्या एका ज्येष्ठ गजलाकाराला ते वाचायला दिलंय.’ अजूनही तुम्ही स्वत:ला पारखून घेता. हे विलक्षण आहे. सकाळी तुमच्याबरोबर ब्रेकफास्ट करत होतो. आम्लेटचा एखादाच घास आपण घेतला असेल, तोच फोन वाजला. फोनवरून कुणीतरी दु:खद अंत:करणाने बोलत होते. तुमचे डोळे भरून आले. हातातला आम्लेटचा घास तसाच तुम्ही ठेवला आणि एकच वाक्य म्हणालात,     ‘मुझे फसाया.’आणि गप्प बसलात. जगजीतसिंहांच्या निधनाची ती बातमी होती. तुम्ही चष्मा हातात घेतला आणि उठलात. आपण दोघेही ऑफिसमध्ये गेलो. तुमचा तो रडवेला, दु:खी चेहरा पाहवत नव्हता. मला तर काय बोलावे, कळतच नव्हते. थोडय़ाच वेळात तुम्ही काहीही न बोलता गाडीत बसलात आणि जगजीतसिंहांच्या घरी अंत्यदर्शनाला गेलात. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांतल्या कितीतरी मित्रांचे फोन आले. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी होती. तुम्ही काहीच बोलणार नाही, हे मला ठाऊक होते. मी तरी त्यांना काय सांगणार? तुमचा निरोप सांगतो, एवढेच म्हणालो. चार-पाच दिवस तुम्ही कुणालाच प्रतिक्रिया दिली नाही. त्यादरम्यान एका पत्रकाराने तुम्हाला    मेसेज पाठवला- ‘तुम्ही आतादु:खी आहात. बोलण्याची तुमची मन:स्थिती नाही. तुम्हाला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा मला सांगा.’ हा सुसंस्कृतपणा, ही सभ्यता तुम्हाला स्पर्शून गेली. त्यानंतर तुम्ही स्वत: फोन करून त्याला प्रतिक्रिया दिलीत. फिल्मी दुनियेत हे बसत नाही. कितीही दु:ख झाले तरी समोर कुणी माइक धरला की बोलावे लागते. तुम्ही माइकला पाठमोरे होता. तुमचं मन मत्रीच्या दु:खानं नि:शब्द असतं. अशावेळी तुम्ही कसं बोलणार?
तुमच्या वागण्यात निर्मळ असं कवीचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते तुम्ही जपता. तुम्हाला तुमचे अनुभव, तुमचे व्यक्तिमत्त्व जपावेसे वाटतात. तुम्ही एका उपाहारगृहात बसला होता. एक परदेशातून आलेली बंगाली बाई एका वेटरला ऑर्डर सांगत होती. तो वेटर बंगाली होता. भाषेने त्यांच्यात जवळीक साधली होती. तो वेटर प्रेमाने तिला वेगवेगळे माशांचे पदार्थ आणून देत होता. तुम्ही तो संवाद दुरून ऐकत होता. त्या बाईने बिल पेड केले आणि त्या वेटरला बक्षिसी दिली. तो एकच वाक्य बोलला, ‘मी तुम्हाला आई समजत होतो. मला बक्षिसी नको.’ या घटनेवर तुम्ही कविता लिहिली. एकदा नाही, तर तीनदा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली. तुम्ही म्हणालात, तो अनुभव दुसऱ्याचा होता. माझा नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तीनदा कविता लिहिली. पण अजूनही माझे समाधान होत नाहीए. अनेकदा तुमची कवितेची वही मला दिसते. त्यात कवितेबरोबर चित्रही रेखाटलेले असते. तुम्हाला शब्दांतून चित्र दिसते आणि चित्रातूनही शब्द दिसतात. तुम्ही कधीतरी एकदा तुमच्या निर्मितीप्रक्रियेविषयी लिहायला हवे.
 तुमच्याशी बोलत असताना तुमची भाषा, तुमची शैली वेगळी वाटते. एक कवी म्हणून तुमचा स्वत:चा वेगळा शब्दकोश आहे. तो ऐकताना समोरच्या माणसाची दमछाक होते. एकदा सकाळी डॉ. गोखले नेहमीप्रमाणे तुमचा बीपी तपासायला आले होते. त्यांनी तुमचा बीपी तपासला. तुमचा बीपी नॉर्मल होता. डॉ. गोखल्यांनी माझा बीपी तपासला, तर माझा बीपी वाढलेला होता. तुम्ही म्हणालात, ‘अरुण, काळजी घे!’ पण खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या शब्दकोशातले सुंदर सुंदर शब्द ऐकण्याची सवय आमच्यासारख्यांच्या हृदयाला नसते. त्यामुळे हृदयाला वाटते, हे शब्द कोठून आले? आणि मग बीपी वाढत असेल. असे माझे एकटय़ाचेच होत नाही. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाचे हृदय धडधडतच असते. कारण तुमचा सुंदर आवाज, तुमचे सुंदर शब्द, तुमच्या सुंदर कवितेच्या ओळी हृदयाला केव्हातरीच
ऐकायला मिळतात.
तुमच्याशी बोलत असताना मी नि:शब्दच असतो. तुमच्या वयाच्या साठाव्या वर्षी एका पत्रकाराने तुमची मुलाखत घेतली होती.. ‘स्त्री तुम्हाला कशी जाणवते?’ तुम्ही खूप सुंदर बोललात. माझी ती आवडती मुलाखत आहे. त्यासंदर्भात मी तुमच्याशी बोलत होतो, तुमचे ऐकत होतो. तुमच्या घरातून बाहेर पडताना तुमचे शब्द, तुमचा आवाज मनात घुमत होता. बांद्रा स्टेशनजवळ आलो आणि मला ‘पाऊस’ ही कवितामालिका सुचली. तुमच्यामुळेच कवितांची निर्मिती झाली. मालिकेतल्या स्त्रीचे नाव मला ‘पाऊस’च सुचले. तो ‘पाऊस’ कवितासंग्रह तुमच्या वाढदिवसानिमित्त सुदेश िहगलासपूरकरने ग्रंथालीतर्फे प्रसिद्ध केला. तो कवितासंग्रह मी तुम्हालाच अर्पण केला, कारण त्या कवितेवर तुमचा हक्क होता. मी, माधुरी, शर्वरी सकाळीच तुमच्या घरी पुस्तक घेऊन आलो होतो. तुम्ही म्हणालात, ‘अरुण, मलाही तुला पुस्तक द्यायचे आहे, पण प्रकाशकाकडून प्रती आलेल्या नाहीत. दोन-तीन दिवसांत येतील.’ त्यानंतर तुम्ही मला ‘रात, चाँद और मं’ हा कवितासंग्रह दिलात. अर्पणपत्रिका माझ्याच नावे होती. हा योगायोग मला विलक्षण वाटला. एकाच वेळी आपण दोघांनीही एकमेकाला पुस्तक अर्पण केले. हा क्षण आम्ही तिघांनी आमच्या हृदयात जपून ठेवला आहे.
एकदा असंच कुणीतरी मफलीत तुम्हाला एका डॉक्टरविषयी सांगत होते. तुम्ही एवढंच म्हणालात, ‘‘मी आता ऐंशी वर्षांचा आहे. दररोज टेनिस खेळतो. सकाळी दहा ते पाच ऑफिसमध्ये काम करत असतो. रात्री दहाच्या आत झोपतो. असं शिस्तीचं आयुष्य मी जगतो.’’ तुमच्या व्यक्तिमत्त्वातच शिस्त आहे. तुम्हाला तुमचे मित्र भूषण वनमाळीनं एकदा विचारलं होतं, ‘तुमचं सर्वात जास्त कशावर प्रेम आहे?’ तुम्ही क्षणार्धात उत्तरलात, ‘‘माझं माझ्या कामावर सगळ्यात जास्त प्रेम आहे.’’ तुम्ही सतत कामात असता. अवतीभोवतीच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी तुमच्या कवितांचे विषय असतात. एकदा तर मला आठवतं, मी तुमच्या समोर उभा होतो आणि तुम्ही चष्म्याची काडी ओठांजवळ धरून शांतपणे लिहीत होता. नंतर तुमचं माझ्याकडे लक्ष गेलं. काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टींशी तुमचा समन्वय आहे. ‘कजरा रे कजरा रे..’सारखं गाणं त्यामुळेच तुम्ही लिहू शकता. तुम्ही कधीच वृद्ध वाटत नाही. अजूनही तुमच्या हातावरच्या रेषा गुलाबी आहेत. कारण लिहिताना, जगताना तुमच्यासमोर िपपळाचं सळसळणारं झाड सतत उभं असतं.
हे सर्व करत असताना अवतीभोवतीच्या माणसांची तुम्हाला सतत काळजी असते. तुमचे एक मित्र नोकरीतून बाजूला झाले, तर त्याचे आता कसे होईल? त्यासाठी काय करता येईल, याची तुम्हाला किती काळजी वाटत होती. दिलीप चित्रे फोनवर बोलता बोलता सहज तुम्हाला म्हणाले, ‘अरुणची तब्येत बरी नाही.’ लगेचच तुमचा मला फोन आला. ‘अरुण, तू लगेचच ऑफिसमध्ये ये.’ तुम्हाला भेटल्यावर तुम्ही एवढेच म्हणालात, ‘सुंदर तुला घेऊन डॉ. गोखल्यांकडे जाईल. ते माझे जवळचे डॉक्टर आहेत. मी त्यांना फोन करून सांगितले आहे.’ सुंदर मला घेऊन डॉ. गोखल्यांकडे गेला. त्यांनी मला तपासले. मुंबईत असं मायेचं माणूस मिळणं अवघड असतं. ही मुंबई नगरी मोठी
न्यारी आहे. नापास मुलांवर मी ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचा विशेषांक काढला होता. तुम्ही मला म्हणालात, ‘अरुण, याचं तू तुझ्या ऋतुरंग प्रकाशनातर्फे पुस्तक प्रसिद्ध कर.’ पण मला धीर होत नव्हता. तुम्ही म्हणालात, ‘काही अडचण असेल तर सांग. मी मदत करतो.’ तुमच्या प्रेमळ धाकाने मी ‘नापास मुलांची गोष्ट’ पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याच्या २५ व्या आवृत्तीची प्रत तुम्हाला दिली, तेव्हा तुम्ही त्या प्रतीवर लिहिले, ‘अरुण, अब मं पास हो गया.’ तुम्हाला माझी नेहमी काळजी वाटते.
तुमच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘मिर्झा ग़ालिब’ हे त्यांचं पुस्तक ऋतुरंगतर्फे प्रकाशित होत आहे याचा मला खूप आनंद आहे. ऋतुरंग प्रकाशनाची आजवर १३-१४ पुस्तके प्रकाशित झालीत. अर्थात अजूनही पायाभरणीचेच काम सुरू आहे. अशावेळी ‘ग़ालिब’चे चरित्र तुम्ही माझ्या हाती देऊन माझ्या हाती कळसच दिला. अंबरीश मिश्र यांनी त्याचा उत्तम अनुवाद केला आहे. तुम्ही कवी आहात. उत्तम माणूस आहात. तुम्हीच मला सांगा- पायाभरणीचा काळ सुरू असताना हाती कळस मिळण्याचे भाग्य कुणाच्या नशिबी असते? तुम्ही हे भाग्य मला दिलेत. मी काय लिहू? काय म्हणू? तुमच्या आठवणींचा पाऊस माझ्या मनात सतत कोसळतो आहे. खरंच, माझ्याकडे शब्द नाहीत.                                                  
तुमचा
अरुण शेवते

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री