जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन करतात, त्या स्वरसम्राज्ञी      लता मंगेशकर यांनी  २८ सप्टेंबरला ८५व्या वर्षांत पदार्पण केले. संगीत क्षेत्रात चमकणाऱ्या आजच्या पिढीच्या मनात लतादीदींबाबत असणारा आदर आणि कृतज्ञतेचा भाव त्यांच्याच शब्दांत..

केवळ अद्भुत!

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

हानपणी ज्या आवाजाने मला संगीतविश्वाची ओळख करून दिली, नकळत बोट धरून गाण्याकडे नेलं तो आवाज म्हणजे लता मंगेशकर! त्यांच्याविषयी मी जेव्हा विचार करतो तेव्हा केवळ अद्भुत हेच विशेषण सुचतं. आम्ही संगीतकार सहा महिन्यांत एकच चित्रपट करतो, त्यामुळे दीदींनी जे डोंगराएवढं काम करून ठेवलं आहे, ते पाहून थक्क व्हायला होतं. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेतला तर एक गोष्ट माझ्या लक्षात येते व ती म्हणजे काम करत जाणे व मागे वळून न पाहणे हे त्यांचं वैशिष्टय़. या ध्यासानेच त्यांनी काम केलं. दीदींनी कधीच असा विचार केला नाही की मी किती गायले, काय गायले, कोणाकडे गायले.. त्या सतत पुढे जात राहिल्या. भूतकाळात रमणाऱ्या अनेक कलाकारांची खुंटलेली वाढ पाहिल्यानंतर दीदींचं हे वैशिष्टय़ अधोरेखित होतं.

दीदी एवढय़ा मोठय़ा गायिका, मात्र त्यांनी नेहमी त्या-त्या संगीतकाराला अभिप्रेत असणारं गाणं गायलं हे आणखी एक विशेष. स्वत:ची शैली निर्माण करण्यापेक्षा संगीतकारांच्या सूचनेप्रमाणे त्या गायल्या आणि तरीही त्यांनी स्वत:चं अस्तित्व, स्वत:ची ओळख निर्माण केली, ही गोष्ट अचंबित करणारी आहे. मदनमोहन, राहुलदेव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा असंख्य भिन्न शैलीच्या संगीतकारांकडे त्या हजारो गाणी गायल्या, प्रत्येक ठिकाणी वेगळी शैली तरी त्यांचं अस्तित्व आहेच. समíपत वृत्ती असल्याशिवाय हे शक्य नाही. आता त्यांनी गाणं कमी केलं असलं तरी त्या लता मंगेशकरच आहेत. सचिन तेंडुलकरविषयी कोणीतरी शेरेबाजी केली होती, की त्याला अमुकतमुक शॉट पूर्वीसारखा जमत नाही, त्यावर व्हिवियन रिचर्डसने छान प्रतिक्रिया दिली होती, तो म्हणाला होता की ‘असं म्हणणाऱ्यांना क्रिकेटमधलं काही कळत नाही, असं समजा.’ दीदींविषयीही असंच म्हणता येईल.

‘स्ट्रायकर’ नावाच्या चित्रपटाला मी संगीत दिलं होतं त्यातलं एक गाणं ध्वनिमुद्रित झाल्यानंतर मला वाटलं होतं की, हे गाणं दीदींनी गायलं असतं तर त्याचं सोनं झालं असतं.

१९८३ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी दूरदर्शनच्या एका ध्वनिमुद्रणाप्रसंगी मी त्यांची स्वाक्षरी घेतली होती, ती वही मी अद्याप जपून ठेवली आहे. आता कधी त्यांना भेटेन तेव्हा त्या स्वाक्षरीच्या शेजारी पुन्हा त्यांची स्वाक्षरी घेणार आहे, माझ्यासाठी त्यांचा तो आशीर्वादच असेल!
– शैलेंद्र बर्वे,  संगीतकार

 
.. म्हणून जगणं छान आहे!

‘लता मंगेशकरांचा आवाज ऐकत लहानाचे मोठे झालोय आम्ही!’ असे माझे आजोबा सांगत, माझे बाबाही, आणि मीही आता ते म्हणू शकतो. बालपणी पुण्याच्या टिळक स्मारक, भरत  नाटय़, बालगंधर्व अशा सभागृहात मी आई-बाबांबरोबर अनेक गाण्यांचे कार्यक्रम बघितले आहेत. ते मला अजूनही स्पष्ट आठवतात. त्यातील अनेक कार्यक्रम हे फक्त ‘लतादीदींची गाणी’ असेही होते. बाबा कार्यक्रम झाल्यावर म्हणायचा, ‘बाई श्वास कुठे घेतात ते कळतच नाही!’ तेव्हा मला त्याचा अर्थ समजायचा नाही. पण मला त्या कार्यक्रमांना जायला भयंकर आवडायचं, हे मात्र खरं. पुढे जसं संगीत कळत गेलं (किंवा असं वाटायला लागलं की संगीत कळतंय) तसं लता मंगेशकर हा काय सुवर्णस्वर आहे, याची जाणीव व्हायला लागली.

१५ ऑगस्टला आणि २६ जानेवारीला ‘ए मेरे वतन के लोगों’ ऐकल्याशिवाय देशप्रेमाची भावना मनात निर्माण होईल का, असा प्रश्न पडायचा. हळूहळू जशी जुन्या गाण्यांची आवड लागायला लागली, तेव्हा मदनमोहन, एस. डी. अशा संगीतकारांसाठी दीदींनी गायलेली गाणी ऐकू लागलो. आणि मग मला कळलं, बाबा काय म्हणत होता ते- ‘बाई श्वास कुठे घेतात?’

माझ्या पिढीच्या बहुतेक संगीतकारांसारखाच मीही ए. आर. रेहमानमुळे झपाटून गेलो होतो. त्यामुळे रेहमान आणि लताबाई कधी एकत्र काम करतायत याची प्रचंड उत्सुकता होती. ‘दिल से’ मध्ये लतादीदींनी ‘जिया जले’ हे गाणं गायलं, पुढे रेहमानकडे ‘लुक्का छुप्पी’ हे गाणं त्यांनी गायलं. दीदींचा आवाज हा आईचा आवाज आहे. त्यात ममता आहे, हे रेहमानलाच कसं बरोबर कळलं? ‘ओ पालनहारे’ हे पण त्यातलंच एक उदाहरण. मला असा प्रश्न कुणी विचारला की, लतादीदींचं तुझं सर्वात आवडतं गाणं कुठलं, तर बहुतेक लोकांसारखा मीही एक कुठलं गाणं सांगू शकणार नाही. पण ‘पिया तोसे नना लागे रे’, ‘माई री’, ‘लुक्का छुप्पी’ ही गाणी अशी आहेत की ती मनावर कोरली गेली आहेत. अख्खी प्लेलिस्ट इथे लिहिता येणार नाही, कारण अशी शेकडो गाणी आहेत. संगीतकाराच्या मनातलं गाणं गायल्यावर त्याला काय आनंद होत असेल हे ‘माई री’ हे गाणं ऐकल्यावर लक्षात येतं. मदन मोहन यांनीही ते गाणं गायलं आहे. ते ऐकलं की लक्षात येतं की, दीदी या दीदी का आहेत? हे सगळे असताना तेव्हाच्या काळात उपलब्ध असलेली तंत्रसामग्रीही लक्षात घेतली पाहिजे. आतासारखं रेकॉìडग तेव्हा होत नसे. सर्व वादकांबरोबर माइकसमोर एकत्र गाणं रेकॉर्ड करण्यात काय मौज येत असेल? पण त्याचबरोबर एकाच गाण्याचे ४०-५० टेक व्हायचे. आपण जे गाणं ऐकतो तो चाळिसावा टेक आहे. आणि चाळिसाव्यांदाही तितक्याच मनापासून, तितक्याच शुभ्रतेनी, त्याच एक्स्प्रेशनने दीदी गायल्या आहेत. आजच्या कुठल्याही गायक किंवा गायिकेनी ४० वेळा एकच गाणं रेकॉर्ड करून दाखवलं तरी पुष्कळ आहे. आता गायक सुरात गायले नाहीत तरी त्यांना सुरात आणता येतं. त्यामुळे थोडंसं कणसूर झालं तरी ‘तू ते सुरात करून घेशील ना?’ असे संगीतकारालाच गायक सांगतात. आता एखाद्या ओळीतला एखादा शब्दसुद्धा परत वेगळा रेकॉर्ड करता येतो. म्हणजे अख्खं गाणं तर दूरच, एक अख्खी  ओळसुद्धा आजकाल सलग गायली जात नाही. आणि तरीही दीदींच्या गाण्याचा गोडवा काही येत नाही.

‘ॅडऊ छकएर कठ ऊएळअकछर’असं म्हणतात. त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे दीदींचं गाणं. फक्त गायिका म्हणून नव्हे तर संगीतकार म्हणूनही दीदींचं काम थोर आहे . ऐरणीच्या देवा, शूर आम्ही सरदार, रेशमाच्या रेघांनी अशा अजरामर गाण्यांचे संगीत आनंदघनचे आहे, हे विसरता कामा नये. मी पाश्र्वसंगीत दिलेल्या राहुल देशपांडेच्या ‘संगीत मानापमान’चा प्रयोग मागच्या वर्षी लतादीदींसमोर झाला. तेव्हा साक्षात लता मंगेशकर यांच्या पाया पडता आलं. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. साक्षात संगीत देवतेच्या पाया पडणे हे केवढे मोठे भाग्य! असे क्षण वेचण्यासाठी माणूस जगतो. दीदींचे गाणे आहे म्हणून आयुष्य जगण्यात मजा आहे.
– गंधार संगोराम, संगीतकार

 गाण्याचे संस्कार

लतादीदी, आशाताई नसत्या तर आमच्यावर गाण्याचे संस्कारच झाले नसते. प्लेबॅक म्हणजे काय, तन्मयतेनं गाणं कसं गायचं, गाण्याला आपलंसं कसं करायचं या साऱ्या गोष्टी यांचं गाणं ऐकून शिकता आल्या. नाना पाटेकर एकदा म्हणाले होते, ‘या दोघी नसत्या तर हिरॉइनही आवडल्या नसत्या..’ खरंच, यांच्या आवाजातील गाण्यामुळे एखादी अभिनेत्री आवडू लागली होती.

‘अगबाई अरेच्च्या’ या आमच्या चित्रपटातील ‘दुर्गे दुर्घट भारी’ हे गाणं खरं तर आम्ही लतादीदींसाठी संगीतबद्ध केलं होतं. पण त्यांचा आवाज ऐनवेळी खराब झाला.. त्यांच्यासाठी आम्ही सहा महिने थांबलो.. मग ऐनवेळी अजयने हे गाणं म्हटलं. अलीकडेच साक्षात लतादीदींचा फोन आला. आमच्यासोबत त्यांना एक गाणं नव्याने करायचंय. ‘कराल का?’ असं दीदींनी विचारलं, तो क्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं आम्ही मानतो.

लतादीदींचा आवाज दैवी आहे, त्यांच्यावर परमेश्वराची कृपा आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, तर लतादीदींकडून एखादं पवित्र-भक्तिसंगीताशी नातं सांगणारं गाणं गाऊन घ्यावंसं वाटतं.
 अजय – अतुल, संगीतकार

 स्वतंत्र गुरुकुल

लता मंगेशकर ही सात अक्षरे म्हणजे अभिजात संगीतातील सप्तसूरच! चंद्र, सूर्य, तारे अशा काही गोष्टी या ज्याप्रमाणे चिरकाल टिकणाऱ्या आहेत त्याचप्रमाणे लतादीदींचा सूर हा चिरंतन आहे. जणू लतादीदींना आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. हा सूर आपल्याला ऐकायला मिळाला, हे भारतीयांचेच भाग्य म्हणावे लागेल. गेली सात दशके त्यांची गानकारकीर्द सुरू आहे. ती अशीच सुरू राहावी आणि या स्वरांनी आपल्या सर्वाचे जीवन असेच उजळावे, हीच प्रार्थना.

देश-परदेशातील प्रत्येक भारतीय घरामध्ये दिवसाची सुरुवात लतादीदींच्या सुरांनी होते आणि हेच सूर सोबतीला घेऊन भारतीय मन झोपी जातं. मग, मी त्याला अपवाद कशी असेन? लतादीदी म्हणजे एक स्वतंत्र गुरूकुल आहे. महान ग्रंथ आहे. त्यांच्याकडून जेवढे शिकता येईल, तेवढे कमीच आहे. आमच्या घरामध्ये तर लतादीदींचा विषय निघत नाही किंवा त्यांच्या गाण्याविषयी चर्चा होत नाही असा एकही दिवस असा जात नाही. किराणा घराण्याच्या गायिका आणि संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री कुसुम शेंडे ही माझी आजी. वडील डॉ. संजीव शेंडे हे उपशास्त्रीय संगीताचे गायक-गुरू. त्यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेताना चित्रपट संगीत हे दुय्यम आहे, असे त्यांनी कधीच म्हटले नाही. याउलट लतादीदींचे तीन मिनिटांचे गाणे हेदेखील एक तासाच्या रागदारी मैफलीएवढेच अभिजात आहे, असेच बाबा म्हणायचे. एखादं गाणं गात असताना त्यातील भाव, शब्दांचे महत्त्व, संगीतकाराला काय अपेक्षित आहे आणि चित्रपटातील प्रसंग हे सारे गायकाला आपल्या आवाजातून पोहोचवायचे असते हे भान मला लतादीदींच्या गाण्यांनी दिले. हे शिक्षण आणि ती दृष्टी मला कोठून मिळाली असेल तर ती लतादीदींच्या गाण्यातूनच.

लता मंगेशकर यांच्या गायनाचा माझ्यावर प्रभाव नक्कीच आहे. पण, त्यांचे अनुकरण करावे असे कधीच वाटले नाही. देवाने प्रत्येकाला निसर्गदत्त आवाज दिला आहे. प्रत्येक आवाजाची जातकुळी वेगळी आहे. जवाहीर जसा हिऱ्याला पैलू पाडतो त्याप्रमाणे आपण आपला आवाज घडवावा, अशी माझी धारणा आहे. गायक म्हणून मी लतादीदींच्या गाण्यातील चांगल्या गोष्टी जरूर घेतल्या. पण, त्यांची नक्कल करण्याचा मोह कधी झाला नाही. मी माझ्या आवाजामध्ये गायले म्हणून रसिकांना ते आवडले. गायकाने आपल्या वाटा शोधून स्वतंत्र स्थान निर्माण करणे महत्त्वाचे असते. 

प्रवासामध्ये असताना गाडीत आजही मी लतादीदींची गाणी ऐकते. प्रत्येक वेळी ते नव्याने उमजते. त्यातील वेगळे पैलू उलगडतात. अगदी बारकाईने मी हा अभ्यास करते. त्यांच्या गाण्याचा अभ्यास करण्यासाठी एक आयुष्य पुरेल, असे वाटत नाही.

पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मी लतादीदींनी गायलेले संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले होते. मंगेशकर कुटुंबीय आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी समोर बसले होते. माझे ‘वंदे मातरम्’ ऐकून ‘छान गायलीस’ असा अभिप्राय लतादीदींनी दिला. हा त्यांच्या प्रेमाचा आशीर्वाद आहे, असे मी मानते. त्यावेळेस त्यांनी माझ्याशी खूप गप्पा मारल्या. त्यांच्या बोलण्याने मला नवी ऊर्जा मिळाली. हा प्रसंग माझ्या स्मृतीच्या कुपीत साठवला आहे. एका कार्यक्रमात मी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेले लतादीदींचे गीत गात होते. सहज समोर लक्ष गेले तर, प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत दस्तुरखुद्द लतादीदीच होत्या. कार्यक्रमाचा पूर्ण माहोलच बदलून गेला. ते गाणं झाल्यावर ग्रीनरूममध्ये येऊन लतादीदींनी ‘खूपच छान गायलीस’ असे सांगितले तेव्हा मला मनापासून आनंद झाला.

लतादीदींचा आवाज हा परमेश्वराच्या आपण खूप जवळ आहोत, अशीच प्रत्येकाची भावना असते. त्यांच्या आवाजामध्ये सादगी म्हणजेच साधेपण आहे. संगीत हे माणसाला देवाकडे नेणारे सर्वात जवळचे माध्यम आहे असेच वाटते. ही ताकद लतादीदींच्या आवाजामध्ये आहे. लतादीदींची सर्वच गाणी अजरामर आहेत. ही सारी गाणी मला आवडतात. त्यातून ठराविक एक किंवा काही गाण्यांचा उल्लेख करणे अवघड आहे. पण, त्यातही मदनमोहन, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासमवेत लतादीदींची गाणी ही माझ्या खास आवडीची आहेत.

त्यांच्याविषयी मी काय बोलू? तेवढी पात्रता आहे, असेही मला  वाटत नाही. पण, बोलायचेच म्हटले तर, कित्येक दिवसही बोलू शकेन. लतादीदी हा भारत देशाचा मानिबदू आहेत. त्यांचा आवाज अनेक वर्षे, नव्हे अनेक पिढय़ा असाच रुंजी घालत राहील. त्यांची तब्येत अशीच चांगली राहो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांनी असेच गात राहो, याच शुभेच्छा.
– बेला शेंडे,  गायिका

 शब्दांना न्याय

मीचार-पाच वर्षांचा असेन, रेडिओवर ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा संत तुकारामांचा खळेकाकांनी स्वरबद्ध केलेला अभंग ऐकला आणि आईला विचारलं, ‘हा आवाज कोणाचा आहे?’ आई म्हणाली, ‘अरे, लता मंगेशकरांनी गायलंय ते. खूप मोठय़ा गायिका आहेत त्या’. लतादीदींचा मोठेपणा कळण्याचं ते वय नव्हतं, मात्र त्या वयातही तो गोड आवाज भावला होता. आमची पिढी ऐंशीच्या दशकातली, त्यामुळे कानावर प्रथम पडली ती ऐंशी आणि नव्वदच्या दशकांतील त्यांची चित्रपटगीते. या सुरेल गायिकेचं प्रथम दर्शन झालं ते ‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या निमित्ताने.

पुढे झपाटल्यासारखा त्या स्वराचा मागोवा घेऊ लागलो. आमच्या पूर्वसुरींनी दीदींसोबत जी गाणी निर्माण केली आहेत, त्याला तोड नाही. दीदींनी अनिल विश्वास यांच्याकडे गायलेली गाणी मला विशेष आवडतात. मदन मोहन आणि त्यांचं कॉम्बिनेशन तर शब्दांच्या पलीकडचं आहे. राहुलदेव बर्मन यांनीही त्यांना उत्तम गाणी दिली, तर मराठीत श्रीनिवास खळे, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्या गायकीला न्याय देतील अशा रचना केल्या.

ज्याला गाणं कळतं किंवा गाणं आवडतं, त्या प्रत्येकावरच लतादीदींच्या स्वरांची मोहिनी पडते. त्यांचं गाणं लक्षपूर्वक ऐकलं तरी तुम्हाला खूप काही शिकता येतं. चित्रपटगीतांसाठी पाश्र्वगायन कसं करावं, सुगम संगीताचं वेगळेपण कसं जपावं याचा त्या मापदंडच ठरल्या आहेत. त्यांचा आवाज कमालीचा सुरेल आहेच, मात्र आपल्याकडे शब्दप्रधान गायकीचं महत्त्व असल्याने गाण्यांतील शब्दांना कसा न्याय द्यायचा, याचं नेमकं भान त्यांना आहे. यामुळेच त्यांची गाणी अधिक सुरेल ठरली, असं मला वाटतं. गाणं परिणामकारक होण्यासाठी शब्दांत सूर मिसळावे लागतात व सुरात शब्दांना घोळवावं लागतं. त्यांना हे सहज जमलं. स्वच्छ आणि स्पष्ट उच्चार हे त्यांचं आणखी एक वैशिष्टय़. प्रत्येक नवीन गायिकेसाठी या सर्व गोष्टी म्हणजे वस्तुपाठच आहेत.

प्रत्येक पिढीतील संगीतकारांकडे त्यांनी उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. त्यांनी आपलं एखादं गाणं गावं, असं कोणत्याही संगीतकाराला वाटणं स्वाभाविक आहे. मीही त्याला अपवाद नाही, मात्र त्या आपल्याकडे गातील, याची कल्पना करण्याचं धाडसही मी करू शकत नाही. मी एखादी रचना केली आणि त्या गातायंत असा कल्पनाविलास करण्याएवढा मोठा संगीतकार मी स्वतला मानत नाही. त्या माझ्याकडे गायल्या तर आनंदच होईल, मात्र तसा योग सहज जुळून यायला हवा. त्यात अट्टहास नसावा. त्यांच्या गाण्यांतून मिळणारा श्रवणानंदही कमी मोलाचा नाही!
– निलेश मोहरीर,  संगीतकार

 

दैवी सूर

लतादीदींची गाणी ऐकत मोठा झालो आणि संगीत क्षेत्रातला माझा प्रवास सुरू झाला तेव्हाही लतादीदींचंच गाणं या चित्रपटसृष्टीत तळपत होतं. त्यांच्या गाण्याबद्दल, दैवी सुरांबद्दल काही बोलावं, ही माझी कुवत नाही. इतकंच सांगेन. ज्या देशात लता मंगेशकर आहेत, त्या देशात मी जन्माला आलो, हे मी माझं भाग्य समजतो. आजवर लतादीदींसोबत काम करण्याची संधी मला मिळालेली नाही. संगीतकार म्हणून माझ्या कारकिर्दीत त्यांच्यासोबत एकतरी गाणं करावं, अशी माझी मनापासूनची उत्कट इच्छा आहे, ते माझं स्वप्न आहे..

शेखर रावजीयानी,  संगीतकार

शब्दांकन – अनिरूद्ध भातखंडे, सुचिता देशपांडे, विद्याधर कुलकर्णी