|| गणेश मनोहर कुलकर्णी

२१ एप्रिलच्या ‘ईस्टर संडे’ला श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांनी हा चिमुकला देश चांगलाच हादरला. यादरम्यान पर्यटक म्हणून श्रीलंकेत गेलेल्या दाम्पत्यास आलेला या दहशतवादी हल्ल्याचा थरारक अनुभव..

गेल्या आठवडय़ात अचानक श्रीलंका फिरण्याचा योग आला. सोमवारी सकाळी ठरले आणि दुपारी आम्ही पुण्याला रवानाही झालो. पुणे-चेन्नई, चेन्नई-कोलंबो असे विमान मिळाले. जेटच्या डबघाईमुळे इथल्या विमान कंपन्यांची भाडी गगनाला भिडली होती. सगळे बघून शेवटच्या दिवशी कोलंबो शहरातून फिरत फिरत रात्रीचे चेन्नईसाठी परतीचे विमान पकडायचे होते.

आतापर्यंत चाललेल्या वांशिक दंगलीतून हा देश नुकताच सावरतोय. गेल्या दशकभरापूर्वी या देशाने प्रचंड हिंसाचार पाहिला आहे. तब्बल २५-२६ वर्षे तमिळ-सिंहलींच्या वांशिक दंगलीतून हजारो लोकांचे शिरकाण करण्यात आले होते. त्या काळात संचारबंदी, आणीबाणी या अगदी रोजच्या गोष्टी होत्या. नवरा-बायको एकत्र बाहेर पडायचेच नाहीत. अचानक एखादा बॉम्बस्फोट झाला तर घरी उरलेला निदान परिवाराचा सांभाळ करेल, हाच विचार त्यामागे असायचा. प्रभाकरन- शांती सेना- राजीव गांधी हत्या- नंतर प्रभाकरनच्या कोवळ्या मुलाची निर्घृण कत्तल.. असे अनेक कंगोरे श्रीलंका म्हटले की डोळ्यांसमोरून झरकन पसार होतात.

शेवटच्या दिवशी २१ एप्रिलला सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो, तेव्हा वातावरणात कसलाच तणाव वगैरे जाणवत नव्हता. ११ वाजता मोबाइलवर भारतातून आमच्या सहल आयोजकांचा एक संदेश दिसला : ‘घाबरू नका, लवकरात लवकर विमानतळ गाठा.’ आम्हाला काही कळेना. आम्ही का घाबरायचं नाही? किंबहुना आम्ही कुठे घाबरलो होतो? चालक फोनवर त्याच्या अगम्य भाषेत काहीतरी बोलत होता, पण आम्हाला काही पत्ता लागू देत नव्हता. नंतर अचानक दुसरा संदेश आला : ‘कोलंबोला सहा बॉम्बस्फोट झाले आहेत. तुम्ही कोलंबो शहर टाळा आणि शक्यतो लवकरात लवकर विमानतळ गाठा.’ आम्हाला त्या वेळी या सगळ्याचे गांभीर्य जाणवत नव्हते. दरम्यान, आम्ही गाडीचालकाशी संवाद साधण्यात यशस्वी झालो. त्याने मोडक्यातोडक्या इंग्रजीत सांगितले- आमच्या स्थानिक सहल आयोजकाचा त्याला निरोप आहे की, आम्हाला शक्यतो काही कळू न देता विमानतळावर पोचवणे. दरम्यान, आम्ही गॅले फोर्टवर पोहोचलो होतो. तेव्हाही तो कसलीही घाई करत नव्हता. आम्हाला अस्वस्थता येऊ नये याची काळजी घेत होता. त्याला त्या घटनेचे गांभीर्य कळले असावे, पण ते आमच्यापर्यंत पोहोचवावे असे त्याला वाटले नसावे. एव्हाना आम्हाला भूक लागली होती. पुढे एके ठिकाणी भारतीय पद्धतीचं जेवण मिळेल असं ‘धाबा’ नावाचं ठिकाण होतं. त्याने गुगल मॅपवर त्या हॉटेलचं स्थळ खात्री करून मला सहज म्हणाला की, ‘एकदा तुम्ही हॉटेलला फोन करून विचारून घ्या.’ मी फोन लावला तर हॉटेलच्या मॅनेजरचा धास्तावलेला आवाज ऐकून मात्र मी घाबरलो. त्याने नकारच दिला; पण खूप विनंती केल्यावर ‘दोनच माणसं असतील तर काहीतरी करू या’ म्हणाला. दरम्यान, रस्त्यावरचा शुकशुकाट जाणवण्याइतपत वाढला होता. वाहनांची वर्दळ कमी कमी होत चालली. आजूबाजूला रुग्णवाहिका/ पोलिसांच्या गाडय़ांचा वावर वाढलेला जाणवायला लागला. एका क्षणी आम्ही हॉटेलवर पोचलो, तर हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने बाहेरचे गेट बंद करून टाकले होते. कुणालाच आत जाऊ देत नव्हता. अर्थात त्यावेळी तिथे आम्ही फक्त दोघेच होतो. संध्याकाळचे चार वाजत आले होते. काहीतरी पोटात जाणं अतिशय गरजेचं होतं. आत्ताच ही परिस्थिती तर नंतर काय मिळणार.. या सगळ्या  विवंचनेत ते लोखंडी गजांचं दार मी ठोठावत राहिलो. सुरक्षारक्षक त्याच्या भाषेत आम्हाला हाकलवत होता. मी त्याला विनंती केली की, ‘मला मॅनेजरशी बोलू दे.’ शेवटी आमचा आवाज ऐकून एक वेटर डोकावला. त्याने आम्हाला सरळ धुडकावूनच लावलं. आम्ही इंग्रजीतले वाक्य पूर्ण बोलेस्तोवर तो निघूनही गेला. त्याचं फक्त ‘सॉरी’ एवढंच आम्हा दोघांना कळलं. मी मात्र हात जोडत राहिलो. इतक्यात मी ज्याच्याशी फोनवर बोललो, तो बहुधा दरवाजावर आला. त्याचा समजूतदारपणा आम्हाला भावला. त्याने चटकन आम्हाला आत घेतले. एका कोपऱ्यात लपवून बसवले. बाजूच्या दोन टेबलांवर काही माणसे चिंताग्रस्त होऊन बसलेली होती. समोर टीव्हीवर बॉम्बस्फोटाच्या बातम्या, दृश्यं दिसत होती. मॅनेजर नंतर सांगायला लागला की, सहा वाजल्यानंतर संपूर्ण बेटावर आणीबाणी जाहीर झाली असली, तरी आतापासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आणीबाणी/ संचारबंदी असले शब्द आमच्या मागच्या पिढीकडून आम्ही फक्त ऐकले होते. इतक्यात सखीची तब्येत खालावली. काहीतरी थंड मिळेल का, याची चौकशी केल्यावर-  ‘किचन बंद आहे, उपलब्ध असेल ते जेवण पटकन जेवा’ एवढेच उत्तर मिळाले. थोडय़ा वेळानं आम्ही आतले झालो होतो. बाजूच्या टेबलावर मुंबईहून आलेला गुजराथी ग्रुप हिंदीत संवाद साधायला लागला. त्यांचे परतीचे विमान बुधवारचे होते. त्यांनी आम्हाला धीर दिला. ट्विटरवरचा आपल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा संदेश दाखवला व भारतीय दूतावासाचा संपर्क क्रमांकही दिला. एवढय़ात त्या वेटरला माझ्या बायकोची दया आली. त्याने किचनवाल्याची खूप मिनतवारी करून तिथल्या स्थानिक आंब्याचा रस करून आणला. तो पिऊन, थोडेसे खाऊन आम्ही ताजेतवाने झालो. मॅनेजर, हॉटेल कर्मचारी या वातावरणाशी बऱ्यापैकी परिचित होते. मॅनेजर काहीतरी सांगत होता : ‘लवकर जा, अगोदरपासूनच तुम्हाला चालावे लागेल, खूप रांग असेल..’ वगैरे. ते आम्हाला त्यावेळी फारसे कळले नाही. एव्हाना गाडीचालकाचे फोनवर फोन.. लवकर निघा म्हणून!

आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला. आता मात्र रस्ते निर्मनुष्य झाले होते, दुकानं बंद. संपूर्ण देशातच आणीबाणी आणि संचारबंदी लागू केली होती. अजून दोन बॉम्बस्फोट झाले होते. मग सहज बातम्या बघितल्या तर फारच दारुण परिस्थिती होती. एका चर्चमधल्या मदरमेरीचा पुतळाच अध्र्यात तुटून खाली पडला होता. आम्हाला स्थानिक आयोजकांचा ध्वनीमुद्रित संदेश आला. त्यात- ‘गर्दीची ठिकाणं, मंदिरं, चर्च टाळावीत. शहरात न येता परस्पर बाहेरूनच विमानतळ गाठावं’ ही सूचना होती. ‘घाबरायचे कारण नाही, तुम्ही सुखरूप आहात’ या वाक्यावर भर होता. आम्ही स्फोटाच्या जागेपासून दूर होतो. (साधारण ४०-५० कि.मी.)

आम्हाला परिस्थितीचं गांभीर्य जाणवायला लागलं. आपण परदेशात असणे आणि तिथे अशी परिस्थिती उद्भवणे कुणालाही अपेक्षित नव्हतं. दोघंही एकमेकांना धीर देत शांत बसून होतो. कार वेगानं पळत होती. खूप मोठा वळसा घालून नव्यानं बांधलेल्या हायवेवरून चालक कार पळवत होता. अचानक एक टोल आला. पुढच्या दोन-चार गाडय़ा पोलीस थांबवून तपासत होते. चालकही सावध झाला. त्याने आपलं आयकार्ड, आमचं विमानाचं तिकीट आपल्या फोनवर उतरवून घेतले. आमची गाडी त्यांच्यापर्यंत गेली. पोलिसांची आमची नजरानजर झाली. त्यांनी सहजपणे आम्हाला पुढे सरकायला सांगितलं. कसलीही तपासणी न करता जाऊ दिलं. आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. वातावरणात अचानक मळभ दाटून आले. सगळा भोवतालच उदास होत गेला. मग रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

संध्याकाळचे सात वाजून गेले होते. अंधार घनदाट व्हायला लागला. विमानतळ दृष्टिक्षेपात नव्हता. समोरच्या गाडय़ांचा वेग मंदावलेला होता. त्याच वेगानं आम्हीही चाललो होतो. सगळे जण विमानतळाच्या दिशेनंच धावत होते. अचानक एका मोठय़ा रांगेचा भाग होऊन आम्ही उभे राहिलो आहोत असं जाणवलं. चालक म्हणाला, ‘आपण विमानतळाच्या जवळ आहोत. साधारण दोन किमीवर.’ आमचं रात्री १०.४० चं विमान होतं. आम्ही तसे वेळेत होतो. समोर दूर फक्त सैनिकांचे बूट, त्यांचा खाड् खाड् आवाज एवढंच काय ते जाणवत होतं. पुढे काय चालले आहे याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. सगळीकडेच भयाण शांतता होती. पावसाची रिमझिम सुरूच होती. मुंगीच्या पावलाने कार पुढे सरकत होती. अचानक एके ठिकाणी बाजूच्या बसमधून तमाम भेदरलेल्या जपानी वरिष्ठ नागरिकांना आपल्या बॅगांसहित भर पावसात उतरवलेले आम्ही बघितले. त्यांचा म्होरक्या त्यांना धीर देत एक रांग करायला सांगत होता. सगळ्यांच्या हातात ट्रॉली बॅगा, चेहऱ्यावर प्रचंड दडपण, भांबावलेपणा. तरीही शांतपणे, आहे त्या परिस्थितीला तोंड देताना त्या म्हाताऱ्या बायकांना बघून आम्हालाही थोडासा धीर आला.

इतक्यात आमच्या गाडीवर टकटक झाली. एक सैनिक बंदूक रोखून आमच्याशी बोलायला लागला. भारत म्हटल्यावर मला उगाचच त्याचा चेहरा जरा निवळल्यासारखा वाटला. रस्त्यावरच्या लाइटच्या उजेडात तो आमचे पासपोर्ट बघत होता. डिकी उघडून बॅग तपासून त्याने आम्हाला पुढे जायला सांगितलं. फर्लागभर पुढे गेल्यावर दुसऱ्या एका सैनिकानं त्याच्या भाषेत आम्हाला खाली उतरायला सांगितलं. चालक आम्हाला समजावायला लागला की, ‘कार तिकडे जाऊ देत नाही. एखादा किमी तुम्हाला चालत जावे लागणार.’

मग आम्ही त्याचा निरोप घेतला. बॅग हातात घेतली. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे सरकायला लागलो. ‘ते अंदाज कुठले न् अवधान कुठले, कुठे जायचे यायचे भान नाही..’ असं काहीतरी मनात आठवत पुढे सरकत राहिलो. विमानतळ किती दूर आहे, दिशा कुठली, काहीच माहीत नव्हते. पण सगळा जत्था एका शांत लयीत पुढे सरकत होता. थोडं चालल्यावर अचानक विमानतळाचा परिसर दिसायला लागला. सगळीकडे हाहा:कार माजलेला होता. तमाम परदेशी नागरिक तिथे गटागटानं जमा झालेले होते. सकाळच्या स्फोटात ३०० च्या वर माणसे मेली होती. त्यात चाळीसएक विदेशी नागरिक, त्यात चारएक भारतीयदेखील होते. सगळेच भेदरलेले. त्या गर्दीत आताच्या, नंतरच्या, पहाटेच्या विमानांची माणसेदेखील होती. आम्हाला ज्या सूचना होत्या, (‘विमानतळावर लवकरात लवकर पोहचा’) त्याच सूचना त्यांनाही होत्या. त्यामुळे विमानतळाच्या प्रवेशद्वारावर घाऊक गर्दी जमा झालेली होती. तपासणी तर प्रत्येक टप्प्यावर अधिकच कडक होत चालली होती.

इतक्या गर्दीत आम्ही काय करायचं, आत कसं शिरायचं, काहीच कळत नव्हतं. एक तर पुढे सगळी उंच, धिप्पाड माणसे उभी होती. आम्ही दोघं तसे लहानच. त्यामुळे काय चालले आहे, याचा काही अदमासच येत नव्हता. त्याही गर्दीत विमानतळावरच्या कर्मचारी स्त्रिया हातात कर्णे घेऊन जी तातडीची विमानं उडणार होती, त्यांच्या प्रवाशांना नावानिशी शोधत होत्या. बाहेर पाऊस पडतोय, उभं राहायला जागा नाही अशा अवस्थेत आम्ही एका बाजूनं संथपणे पुढे सरकत राहिलो. तिथले कर्मचारी एका टप्प्याच्या पुढे कुणालाच जाऊ देत नव्हते. शांतपणे सगळ्यांना उत्तरं देत होते. ते सर्व जण सकाळपासून सलग काम करत होते. पण कुणाचाही चेहरा कंटाळवाणा, आळसटलेला नव्हता. आपल्या देशावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचा धीरोदात्तपणा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होता. एकच प्रश्न अनेक जण विचारतानाही त्यांचा आवाज चढत नव्हता वा ते कुणाला टाळतही नव्हते.

इतक्यात मला काय वाटलं कोणास ठाऊक, मी तिथल्या कर्मचाऱ्याला माझं तिकीट दाखवलं. एव्हाना ८.३० वाजून गेले होते. त्याने चटकन आमच्याकडे बघितले व आम्हाला पुढच्या रांगेत यायला सांगितलं. साधारण दोन गेटमधून चार रांगा पुढे सरकत होत्या. आम्ही पहिल्याच रांगेत उभे राहिलो. कारण पहिल्या रांगेत स्कॅनिंगचे मशीन होते, तर इतर रांगांतले पोलीस बॅगा उघडून सामान उचकटून तपासत होते. आमचा नंबर आला. पायातले बूटसुद्धा स्कॅन करायला लावले. आता आम्ही व्यवस्थेत आलो होतो. त्यांच्या गतीनं पुढे सरकत होतो. इंडिगोची लाइन शोधत पुढे गेलो, तर तो आमचीच वाट बघत असल्यासारखा निवांतच बसला होता. त्याच्याकडचे प्रवासी पुढे सरकले होते. आम्हाला बोर्डिग पास मिळाला. या अगोदरही आत शिरताना प्रचंड मोठी रांग, स्कॅनिंग या सगळ्या सोपस्कारातून पार पडावेच लागले. या रांगेत आम्ही पहिल्यांदा आमचे शरीरधर्म उरकले. तब्बल सहाएक तासांनंतर आम्ही बाथरुम बघितलं. मग छानशी कॉफी घेतली. त्याने जरा हुरूप आला. कॉफी देणारी कर्मचारी सकाळपासून घरीच गेली नव्हती, पण चेहऱ्यावर तेच हसू होतं. गरोदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव बघून जीव कळवळला. आमच्या चालकाच्या मित्राचे आई-वडील स्फोटात ठार झाले होते, पण शेवटपर्यंत त्यानेही आम्हाला साथ दिली. कुठेही वाऱ्यावर सोडले नाही. आजूबाजूला प्रचंड गर्दी होती. आपण गर्दीत तसे थोडेसे निवांत होतो. ‘जे त्यांचे होईल ते आपलेही’ ही भावना प्रभावी असते. पण एकटेपणाचा ताण तसा वेगळाच असतो. बोर्डिग पास मिळाल्यावर हायसे वाटले. बॅग कागरेत गेल्यामुळे हातही मोकळे झाले होते. आम्हाला वाटलं, झालं सगळं आता. पण बोर्डिग पास देणाऱ्यानंच आम्हाला इमिग्रेशनच्या रांगेत जायला सांगितलं. त्या दुसऱ्या टोकालाही प्रचंड रांग होती. आम्हाला त्या वातावरणातला तणाव जाणवत होता. एक भयानक शांतता आसमंतात पसरलेली होती. रांग हळूहळू पुढे सरकत होती. अचानक आमचा नंबर आला. काही जुजबी प्रश्न-उत्तरं झाली. लगेच त्याने आमच्या पासपोर्टवर शिक्के उठवले. ९.३० होऊन गेले होते. ही सगळी कामं झाल्यावर पोटात भूकेची महाप्रचंड जाणीव झाली. एकच हॉटेल. पण तिथेही भलीमोठी रांग. त्यांच्याकडे इडली होती. आम्ही खूश झालो. गेल्या आठ दिवसांत इडलीचे दर्शनसुद्धा दुर्लभ झालेले होते. खाऊन थोडेसे रिलॅक्स झालो. एव्हाना १० वाजून गेलेले. आम्ही आपले १०.४० चे विमान आहे आणि गेटच्या जवळ आहोत म्हणून अगदी निवांत विण्डो शॉपिंग करत हिंडत होतो. इतक्यात एक महिला कर्मचारी कण्र्यावर कुणाच्या तरी नावाची उद्घोषणा करत होती. नाव ओळखीचं वाटलं म्हणून तिच्या जवळ गेलो, तर ती आम्हा दोघांनाच शोधत बाहेर आली होती. तिथल्या तपासणीत लगेच आम्हाला सगळ्यांच्या पुढे नेऊन तिनं आमच्या विमानापाशी सोडले. आम्ही आमच्या जागेवर स्थिरावलो. दहा वाजून पाच मिनिटे झाली आणि ‘बोर्डिग कम्प्लिट’चा निरोप एअर होस्टेसनं वैमानिकाला दिलादेखील.  पुढच्या पाचच मिनिटांत आमचं विमान हवेत उडण्यासाठी सज्जही झाले! आम्हाला हे अनपेक्षित होतं. विमान तब्बल ३० मिनिटं अगोदर आकाशात झेपावलंदेखील. बाहेरचा पाऊस, मंद होणारे धावपट्टीचे दिवे, विमानातला सुखावणारा गारवा, या सगळ्याचं एक वेगळंच चित्र मनावर उमटत राहिलं. आम्ही मायदेशात यायला निघालो होतो.

आपल्या इथं उतरल्यावर आम्ही पुन्हा एकदा इमिग्रेशनच्या रांगेत उभे राहिलो. तिथले कर्मचारी जरासे सुस्तावलेलेच होते. इतक्यात आतून एक त्यांचा अधिकारी आला. त्यांना आमच्या समोरच त्याने निर्देश दिले की, श्रीलंकेहून आलेल्या प्रवाशांना लवकर मोकळे करा. आम्हालाही बरं वाटलं. नंतर सारेच सोपे होते.

आम्ही आपल्या देशात पोहोचलो होतो!

magnakul@rediffmail.com