दासू वैद्य – dasoovaidya@gmail.com

या मातीतच अप्रूप आहे. म्हणून तर मातीत लपवलेलं बी जमिनीला धडका मारून वर येतं. बियाच्या कवचाचं टोपरं घातलेला अंकुर रानवाऱ्यासोबत थरथरतो. जन्मलेली सर्वच आबरीगोबरी बाळं सारखीच वाटतात, तसं या जन्मलेल्या अंकुरावरून नेमका बोध होत नाही. पण दोन पानावरचं रोप वाढू लागतं. तीन पानांवर, चार पानांवर येतं आणि बोभाटा होतो. ‘जवारी चांगली उगवलीय’, ‘तीळ मस्त फुटलेत’, ‘तूर बंबट आलीए.’ हे सारं काळ्या मातीतलं अप्रूप आहे. अप्रूप कशाचंही असू शकतं. म्हणजे एखादी ढासळलेली जुनाट भिंत रीतसर पाडण्याचं काम सुरू असेल, तर दोन हात पाठीशी बांधून चार लोक निरीक्षण करीत उभे असणारच. जणू काही देखरेखीसाठी त्यांची तिथे नेमणूक झालीय. त्या जुन्या भिंतींच्या रुंदीबद्दल सांगताना, त्या भिंतीवर बाज टाकता आली असती, असं मोजमाप सांगितलं जाई. कमावलेल्या चुन्यात मढवलेल्या रेखीव, चिरेबंदी दगडांचं घोटीव रूप आणि दोन-तीन शतकांवर मांड मारणाऱ्या भिंतीचं टिकाऊपण सांगताना आपसूकच अप्रूप झिरपू लागायचं. उत्सुकतेवर आत्मीयतेचा लेप लावला जायचा. अर्थात हे अप्रूप असण्यासाठी रिकामपणाची पात्रता आवश्यक आहे.

Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Trimbakeshwar taluka, nashik district, water scarcity
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईमुळे स्थिती बिकट
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका

छोटं गाव. कुठंही खुट्ट वाजलं तरी गावभर आवाज होणार. दरवर्षी न चुकता पूर्णेवरून दोघेजण अस्वल घेऊन गावात यायचे. या दोघांच्या मुसलमानी दाढय़ा अस्वलाच्या केसाळ रूपाशी संवादी वाटायच्या. त्यांची वर्षांतून एकदाच चक्कर असली तरी अनेक वर्षांचा शिरस्ता होता. त्यामुळं सारं गाव अस्वलवाल्यांच्या ओळखीचं होतं. मानेच्या पट्टय़ाला बांधलेल्या दोरीला सावरीत, फतल फतल करीत, केसाळ अंग हलवीत अस्वल गावात शिरायचं आणि वाऱ्यासारखी बातमी गावभर व्हायची. अस्वल, उंट, हत्ती प्रत्यक्ष पाहायला मिळणं ही पोरांसाठी दुर्मीळ गोष्ट होती. चेकाळलेली पोरं ‘होऽऽऽ’ करीत अस्वलाच्या मागं मागं गावभर असायची. एखादं चिव्हारी पोट्टं अस्वलाची छेड काढायचा प्रयत्न करायचं, तेव्हा अस्वलवाल्याचा नमाजी चेहरा थोडासा कठोर व्हायचा. प्रसंगी काठीही उगारावी लागायची. पण पोरांच्या घोळक्यामुळं अस्वलाची मिरवणूक रंगतदार होत असे. दरम्यान, घरातले लोक दारात येऊन अस्वलाची वाट पाहत बसलेले असत. अस्वलाची पालखी प्रत्येक दारात थांबणार. पूजा वगैरे होत नसे, पण साधारणपणे भाव तसाच होता. सर्व जण अस्वलाला हात लावून स्पर्श करीत. घरातील लहान मुलांना अस्वलाच्या पाठीवर बसवलं जाई. मागणीनुसार अस्वलाच्या केसांचे ताईत बनवून दिले जायचे. त्या बदल्यात अस्वलवाल्यांना धान्य, पैसे अशी बक्षिसी मिळे. यामागे काही श्रद्धा होत्या, समजुती होत्या. अस्वलाबद्दलच्या लोककथा जगभर प्रसिद्ध आहेत. बऱ्याचदा अस्वलाच्या केसाळ पाठीचा स्पर्श होताच लहान मुलं घाबरून चिरकायची. पण त्यांना जबरदस्ती बसवलं जायचं. त्यामुळं लहान मुलांना बाहेरची बाधा होत नाही असा काहीसा समज होता. हेच सर्व प्रकार प्रत्येक दारासमोर होत. पण न कंटाळता ही अस्वलफेरी पुढे सरकत असे. गावात अस्वल आलंय ही गावाच्या दृष्टीनं मोठीच घडामोड (Happening) असे.

टीव्ही, मोबाइल नसलेला तो काळ. संथ लयीत चालणारं गाव. कुणालाच घाई-गडबड नसे. लोक  निवांतऽऽऽ असत. अख्खी दुपार गिळून गाव अजगरासारखं सुस्त होई. शाळा, पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाना, बाजार, बसस्टँड, पाणवठा, मंदिर या गावातल्या घडामोडींच्या हमखास जागा. तालुक्याला दूध डेअरी होती. पण त्याकाळी प्लास्टिक पिशव्या आलेल्या नसल्यामुळे दुधाच्या वाहतुकीचा आणि साठवून ठेवण्याचा मोठा प्रश्न होता. दुधदुभत्याचं गाव.. पण सकाळी नऊनंतर भाकड गायीसारखं कोरडं होई. कारण सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत गावातलं सगळं दूध डेअरीला जाणार. त्यानंतर दूध पाहिजे असेल तर थेट संध्याकाळीच मिळणार. त्यामुळं दुधाचं अप्रूप असायच्या त्या काळात खवा, पेढा, बासुंदी, श्रीखंड हे तर दुर्लभच. बऱ्याचदा गावातले लोक कामानिमित्त तालुक्याला जात तेव्हा तिथल्या हॉटेलात हमखास बासुंदी, कलाकंद, पेढा खाऊन येत. श्रीखंड होणार म्हणजे घरात आठ दिवस आधीच चर्चा सुरू होई. सदाशिव गवळ्याकडून खास जास्तीचं दही आणलं जाई. एरवी गवळ्याच्या घरची परकरी पोरगी सुटं दही गल्लोगल्ली फिरून विकत असे. पांढऱ्याशुभ्र दह्यसोबत त्या मुलीचा सावळा रंग अधिक उठून दिसे. गवळ्याकडं दही मोजण्यासाठी नारळाच्या करवंटीचं माप होतं. मातीच्या खोलगट परातीत शुभ्र जीवघेणं घट्ट दही एकसारखं पसरलेलं असे. एखाद्या चित्रकाराला मोहवून टाकावा असा त्याचा पांढरा, चमकता पृष्ठभाग असे. त्या पांढऱ्या पृष्ठभागात मापासाठीची वाटीसारखी चपटी करवंटी घुसे तेव्हा पांढऱ्याशुभ्र पृष्ठभागावर एक भगदाड पडे. करवंटीने दह्यच्या पृष्ठभागाचा टवका काढलेला असे. तयार झालेल्या खड्डय़ात दह्यतलं फिकट पिवळसर पाणी गोळा होई. करवंटीच्या देशी मापावर कुणी कधी शंका घेतली नाही. आणि दही देणाऱ्या हातानं दही मोजून टाकल्यावर पस्तुरी (जास्तीचं दही) टाकताना कंजुषीही केली नाही. चक्का बनवण्यासाठी आणलेलं भरपूर दही पंच्यात बांधून छताला लटकवलं जाणार. त्या लटकवलेल्या दह्यतून थेंब थेंब पाणी खालच्या परातीत टपकत असे. ज्या खोलीत ही श्रीखंड साधना सुरू असे तिकडे सारखं लक्ष ठेवावं लागे. कारण पंच्यात लटकवलेल्या आंबूस गंधाच्या ऐवजावर मांजर कधीही उडी मारण्याची शक्यता असे. तो अनर्थ टाळण्यासाठी त्या थेंबाच्या टपटप आवाजाशी रामनामाची सम साधत एखादी आजीबाई ते राखत बसलेली असे. दरम्यान, घरातली लेकरं त्या खोलीत उगीचच चकरा टाकत. त्या टपटप आवाजाने त्यांचा उत्साह वाढलेला असे. मग भेटेल त्याला ‘आमच्याकलं श्लीखंऽऽऽड कलणाऽऽऽल ’ असं सांगत सुटत. पांढऱ्या आभाळात सोनिया प्रकाशात मिसळावा तसा स्निग्ध पांढऱ्या चक्क्यात अलगद केशरी रंग मिसळणारी आई मला चित्रकार वाटे. श्रीखंड खाण्याची कल्पना प्रत्यक्ष श्रीखंड खाण्याच्या कृतीपेक्षा मोहक होती. श्रीखंडासारखा पदार्थ तेव्हा फक्त सणाला- म्हणजे बहुधा पाडव्याला करीत. नंतर वर्षभर दह्यचा लटकवलेला पांढराशुभ्र पंचा आणि दह्यतून टपकणाऱ्या थेंबाचा टपटप आवाज एवढंच दृक्श्राव्य आठवत राही. पण यामुळं श्रीखंडाचं अप्रूप होतं. आज आपण मनात आलं की श्रीखंडाचा तयार पॅक आणू शकतो. आणतो. बऱ्याचदा श्रीखंडाचे असे पॅक बेवारशासारखे फ्रिजमध्ये पडून असतात. लताबाईंचं हवं असलेलं गाणं ऐकण्यासाठी तेव्हा खूप तरसावं लागे. मग कधीतरी अचानक रेडिओवर ते गाणं लागे तेव्हा स्वत:च्याच भाग्याचा हेवा वाटे. याउलट, मागे लताबाईंच्या ३०० गाण्यांची सीडी फुटपाथवरून मी घेऊन आलो. पण ती गाणी ऐकण्याचा अजून योग आलेला नाही. पाठलागाविना झालेल्या प्राप्तीचं अप्रूप राहत नाही, हेच खरं.

गावाकडे वैयक्तिक गोष्टीही दखलपात्र असतात. कुणी तीर्थयात्रेला जाऊन आलं तर मावंद्याच्या नावाखाली गावात जेवण दिलं जाई. वर्षांतून एकदाच नवे कपडे मिळत. बहुधा दसऱ्याला मायंदाळ कपडय़ांचं भारी कौतुक असे. पोलीस स्टेशनवर नवा फौजदार बदलून आला की त्याच्याबद्दलच्या खऱ्या-खोटय़ा पराक्रमी सुरस कथा गावभर रंगत. पाणवठय़ावर गळक्या पोहऱ्यातून बायकांचं दु:ख पाण्यापेक्षा जास्त गळत असे. सार्वजनिक नळ आले नि तिथं भांडणंच जास्त रंगली.   ग्रामदेवतेच्या मंदिरात दर्शनाला म्हणून गेलेले भाविक चांगले चौफेर गप्पांचे फड रंगवत. गावातलं सगळ्यात जाज्ज्वल्य आणि जिवंत ठिकाण म्हणजे शाळा! शाळेत जाणाऱ्या घरोघरच्या मुलांमुळे शाळेचं ‘कनेक्शन’ अवघ्या गावाशी जोडलेलं असे. त्यामुळे गावकऱ्यांचाही शाळेवर जीव जडलेला. मारकुटय़ा मास्तराची दहशत, प्रेमळ गुरुजनांची माया, कामचुकार मास्तराची टाळमटाळी, मास्तरीणबाईंची हुशारी आणि नटणं-थटणं असे काय काय गुणविशेष गुलाल उधळल्यासारखे पोरं गावभर उधळून देत. शाळेमुळं गावात चांगलीच हालचाल असे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीची प्रभातफेरी गावातून जाताना गणवेशातील पोरं-पोरी घोषणा देत. ‘एक रुपीया चांदी का, देश हमारा गांधी का, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम..’ त्या प्रभातफेरीत घरोघरी दरवाजांत उभ्या माय-बापांना आपलं लेकरू लवकर ओळखूच यायचं नाही. घोषणा देताना गणवेशातलं लेकरू दिसलं की त्यांना अधिकच भरून येई. मुलामुलींचा आपापल्या घरासमोर जोश आणि आवाज वाढलेला असे. बापूजींनी दिलेला स्वातंत्र्याचा खाऊ गावभर वाटायची जबाबदारी असल्यासारखी लेकरं भारावून जात. उंच उडी, लांब उडी किंवा हस्ताक्षर वा भाषण अशा कुठल्या तरी स्पर्धेत बक्षीस मिळालेली पेन्सिल ऑस्करपेक्षा तेव्हा कमी नसे. गुरुजींचे ‘सर’ झाले तरी सरांबद्दलचा आदर उदबत्तीच्या धुरासारखा भोवताली पसरलेला असे. तालुक्याच्या गावाहून चोळी शिवून आणणे असो की पत्र लिहून देणं असो, अथवा गावासंबंधी महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो; मास्तरशिवाय पान हलणारच नाही, हे व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’तील मास्तराचं चित्रण थोडय़ाफार फरकानं प्रातिनिधिकच म्हणायला हवं. सामूहिक प्रार्थना, घंटेचा आवाज, शाळा सुटतानाचा पोरांचा चिवचिवाट, परीक्षेतली शांतता, निकालाचा दिवस.. असं करता करता शाळेला सुट्टय़ा लागत.

ऊन तापू लागे. गाव चांगलाच गरम होई. गुलमोहर, बहाव्याचा अशा उन्हात लाल-पिवळा रंग अधिकच चमके. मामाच्या गावाला न गेलेली पोरं घरातच धुडगूस घालायची. विहिरी पोहून आणि आमराई चोखून टाकायच्या. ऊन तापता तापता वारं वावधान सुटायचं, अन् हवेत वेगळाच गंध यायचा. मृगाची चाहूल लागायची. त्याबरोबरीने शाळेचा पहिला दिवस जवळ आलेला असे. पावसाची सुरुवात आणि शाळेची सुरुवात जवळपास एकत्रच होई. दोन्हीमध्ये नवसर्जनाचं आश्वासन असे. पास होऊन नव्या वर्गात जाताना एक वेगळाच आनंद वाटे. नवा वर्ग, नवे सर, नवी पुस्तकं, वह्य. बरोबरीला नवे मित्र, नवा गणवेश अशी मौज असे. ज्यांचे भाऊ-बहीण नेमके पुढच्या वर्गात असत, त्यांना मात्र जुनीच पुस्तकं वापरावी लागत. पण ज्यांना नवीन पुस्तकं मिळत त्यांची मज्जा काही वेगळीच असे. नव्या पुस्तकांचा गठ्ठा उघडला की नवेपणाचा वास येई. मी आधी अधाशासारखा मराठीचं पुस्तक हातात घेई. हिरव्यागार गालिच्यासारखा मराठीच्या पुस्तकाचा स्पर्श असे. अधाशासारखी चित्रं पाहायची, धडे, कविता वाचायच्या..

‘या बालांनो या रे या

मजा करा रे मजा करा

आज दिवस तुमचा समजा..’

खरंच, तो दिवस माझाच असे. खरं तर पुस्तकांना कव्हर लावणं मला आवडायचं नाही. करोनाच्या भीतीनं चेहरा झाकलेल्या आजच्या माणसांसारखी कव्हरं लावलेली पुस्तकं दिसायची. चित्रांचा, रंगांचा, हिरव्या गालिचाचा स्पर्श जाऊन खाकी कागदाचा रुक्ष स्पर्श सहन करावा लागे. त्या नव्या पुस्तकांवर घोटीव अक्षरात नाव टाकायचं. सुरुवातीला नवा वर्ग लिहिताना शहारून जायला व्हायचं. मी तर बहिणीचीही नवी पुस्तकं हावरटपणे पाहायचो. रंगीबेरंगी कव्हरच्या वह्य खूप आवडायच्या. पण आमच्याकडं सोसायटीच्या साध्या वह्य सर्व भावंडांसाठी एकदाच आणल्या जात. नव्या वर्गात जायला उत्सुक असणारे आम्ही अधाशीपणे शाळेत जायचो. नव्या वर्गात, नव्या वर्गशिक्षकासोबत, नव्या पुस्तक- वह्यंसह खिडकीतून दिसणारी नवी हिरवळ अधिकच लोभस वाटायची.

आंबे, चिंचं, बोरं, पेरूच्या या भूतकाळात आपण भटकत राहिलो म्हणून पायाखालची वर्तमानाची वाट टाळता येणार नाही. या वर्षी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद आपल्याला घेता येणार नाही. गुलाबाची फुलं देऊन आपलं कुणी स्वागत करणार नाही. कारण करोनाच्या जागतिक महामारीमुळं सारं जग ठप्प झालंय. शाळा उघडतील की नाही, उघडल्या तर कधी उघडतील, याबद्दल अनिश्चितता आहे. नव्या वर्गात पहिल्या दिवशी नव्या सॅकसह जाऊन धडकण्याचा विचार कदाचित आपल्याला या वर्षी बाजूला ठेवावा लागेल. नवा पर्याय शोधावा लागेल. ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. अर्थात त्यात अनेक अडचणी आहेत. खेडय़ापाडय़ांतल्या मुलांकडे आधुनिक मोबाइल असू शकतील का? खुर्द-बुद्रुक गावांत नेटवर्कची अडचण आहे. भिंतीवर, झाडावर गेल्याशिवाय नेटवर्क येत नाही. अशा वेळी ऑनलाइन शिक्षणाचं भवितव्य काय असेल? काहींच्या मते, ज्यांना शक्य आहे त्यांना ऑनलाइन शिकू द्यावं. काही ऑनलाइन, तर काही ऑफलाइन असं शक्य आहे. पण त्यातून पुन्हा एकदा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ ठळक होतील. निर्गुणी भजनं ऐकायला अप्रतिम असतात, पण निर्गुण भक्ती करताना आपली दमछाक होते. म्हणूनच सगुण भक्ती बरी वाटते. एरवीही सवाई गंधर्व महोत्सवात गाणं ‘ऐकताना’ गायकासमोर आपण बसतोच ना! काहीतरी तोडगा निघेल. यथावकाश सर्व काही सुरू होईल. तूर्त शाळेच्या पहिल्या दिवसाचं अप्रूप आपण पुढच्या वर्षीसाठी जपून ठेवू या.