News Flash

आम अ‍ॅडमी

शा लिवाहन शके १९३४ च्या वैशाख मासात अ‍ॅडमसेन नावाचा एक नॉर्वेसुपुत्र भारतात येऊन गेला. नॉर्वेकराची पहिलीच भारतभेट. यापूर्वी त्यानं यूरोपच्या बाहेरही पाऊल टाकलेलं नव्हतं. पहिल्या दिवशीच्या

| February 3, 2013 12:04 pm

शा लिवाहन शके १९३४ च्या वैशाख मासात अ‍ॅडमसेन नावाचा एक नॉर्वेसुपुत्र भारतात येऊन गेला.
नॉर्वेकराची पहिलीच भारतभेट. यापूर्वी त्यानं यूरोपच्या बाहेरही पाऊल टाकलेलं नव्हतं. पहिल्या दिवशीच्या स्वागत भोजनसमयी त्याच्या भारतीय यजमानानं आग्रह करून त्याला फ्रेश मँगो विथ व्हॅनिला आइसक्रीम खाऊ घातलं. तोवर त्यानं मँगो हे नाव ऐकलं होतं. ते उच्चभ्रू म्हणजेच धनदांडग्यांच्या अल्पस्वल्प लज्जारक्षणार्थ स्थापन केलेल्या एका स्पॅनिश रेडीमेड कपडय़ांच्या कंपनीचं ब्रँडनेम आहे, हेही माहीत असण्याइतपत त्याचं सामान्य ज्ञान अप्रतिम होतं. ते एका फळाचंसुद्धा नाव आहे, ही बातमी कानात पडताच त्याला शालेय शिक्षणाची आठवण झाली.
‘‘हो, हो. पाठय़पुस्तकात वाचल्याचं आठवतंय. हे फळ दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आशिया या प्रदेशांमध्ये उगवतं.’’ यजमानानं भारतीय घोडं पुढं दामटलं, ‘‘भारत हा जगातला सर्वात मोठा आंबा उत्पादक आहे. आपल्यासमोर जो आलाय तो सुप्रसिद्ध आल्फोन्सो या जातीचा आंबा.’’
‘‘पण आल्फोन्सो हे तर मूळ पोर्तुगीज नाव आहे. स्पेनचा शेजारी देश.’’
‘‘या आंब्याचं खरं नाव हापूस. आल्फोन्सो का म्हणतात, देव जाणे.’’
‘‘ते स्पॅनिश-पोर्तुगीज जॉइंट व्हेंचर असणार.’’ नॉर्वेकर युरोपिअन कनेक्शन सोडायला तयार नव्हता.
त्याची जीभ पहिल्या घासालाच स्वर्गसुखात डुंबायला लागली. आइस्क्रीम कॅन्सल करून त्यानं आंब्याच्या छोटय़ा- छोटय़ा चौकोनी तुकडय़ांचा फडशा पाडायला सुरुवात केली. तीन प्लेटींनंतर यजमानानं त्याची घोडदौड रोखली. डायरिया-बियरिया सुरू झाला असता तर ज्या कामासाठी तो आला होता, तेच बारगळलं असतं. पण नॉर्वेकरानं राहिलेले चार दिवस सकाळ-संध्याकाळ आंब्याचा रतीब लावला. जाताना या स्वर्गीय फळाचे एक डझन नग आपल्या कुटुंबकबिल्यासाठी घेऊन गेला.
यजमानाला दुसऱ्या दिवशी रात्री अ‍ॅडमसेनचा नॉर्वेहून फोन आला, ‘‘बॉक्समध्ये आंब्यांऐवजी दुसरीच कुठलीतरी फळं आहेत.’’
यजमान गडबडला, ‘‘असं कसं होईल? मी स्वतच बॉक्स उघडून खात्री करून घेतली होती.’’
‘‘भारतीय आंब्यांचा स्वाद आणि सुवास अद्वितीय असतो, असं बायकापोरांना सांगितलं. िलडानं पटकन एक फळ उचलून चावलं आणि थू थू करून फेकून दिलं. चावलं तिथं बोट लावून चाखून पाहिलं तर शॉकच बसला. ऑफ व्हाइट कलरचा चिकचिकीत आंबट गर आहे.’’
भारतपुत्र म्हणाला, ‘‘कच्चे आहेत आंबे. लगेच कापू नका. वरची साल हिरवीगार आहे. ती तुमच्याकडच्या संत्र्याच्या रंगाची झाली की मगच कापा.’’
दोन दिवसांनी अ‍ॅडमबाबाचा परत फोन आला, ‘‘अजून रंग तसाच आहे. हे नक्की आंबेच आहेत ना?’’
‘‘तिथं सध्या तापमान किती आहे?’’
‘‘दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस.’’
‘‘इतक्या थंडीत आंबा पिकणार नाही.’’
‘‘ही थंडी नाही. हा उन्हाळा आहे. थंडीत तापमान शून्याखाली कितीतरी डिग्री असतं.’’
‘‘आंब्याला ३० डिग्री तापमान लागतं.’’
‘‘ठीक आहे. आमच्या तळघरात रेड वाइनच्या खोलीत तितकं तापमान असतं. तिथं ठेवतो.’’
चार दिवसांनी परत फोन आला, ‘‘अभिनंदन. फळांचा रंग बदलला. तळघरात घमघमाट सुटलाय.’’
‘‘याचा अर्थ आंबे आता पिकले आहेत. कापून खा. एन्जॉय द किंग ऑफ फ्रूट्स!’’
मध्यरात्री विचारणा झाली, ‘‘फळ कापायचं कसं?’’
यजमान अर्धवट झोपेत बरळला, ‘‘कसं म्हणजे? सफरचंद, टोमॅटो वगरे कसं कापता? तसंच.’’
‘‘सफरचंदासारखं की टोमॅटोसारखं?’’
‘‘काय फरक पडतो?’’
‘‘सफरचंद उभं कापतात. टोमॅटो आडवा.’’
‘‘आंबा उभा कापा.’’
फोन क्रमांक पाच -‘‘पण नक्की कसं कापायचं? सविस्तर प्रोसिजर सांगा.’’
‘‘प्रोसिजर कसली आली आहे डोंबलाची? सुरी घ्यायची आणि फळात खुपसायची. फिनिश!’’
‘‘खुपसली जात नाही म्हणून तर फोन केला. मध्ये काहीतरी आडवं येतंय. हे आंबेच आहेत ना?’’
‘‘भोसका जोरात. जे काय वाटेत येतंय ते कापून काढा.’’
फोन क्रमांक सहा – ‘‘कापून काढलं. घट्ट वस्तूच्या आत पांढरट गर आहे. तो अजून पिकायचा आहे असं वाटतं. तो खायचा की त्याच्या बाहेरचा केशरी रंगाचा गर खायचा? यापकी आंबा नक्की कोणता?’’
‘‘मिस्टर अ‍ॅडमसेन, तुम्ही जी घट्ट वस्तू कापून काढलीत ती आंब्याची कोय. म्हणजे बी. सीड!’’
‘‘एवढी मोठी? सफरचंद-टोमॅटोसारखं फळ आहे ना? त्यात तर इवल्या इवल्या बिया असतात. हे नक्की आंबेच आहेत ना?’’
‘‘आता हा आंबा फेकून द्या. दुसरा सफरचंदासारखाच उभा कापा. पण एकदा सीडच्या उजव्या बाजूनं आणि मग डाव्या बाजूनं कापा. तीन भाग होतील. मधली ती सीड. ती कापायच्या भानगडीत पडू नका. पहिला आणि तिसरा भाग खाऊन टाका. एन्जॉय द किंग ऑफ फ्रूट्स!’’
फोन क्रमांक सात – ‘‘काहीतरी घोटाळा होतोय. मार्टनिचं बोट कापलं. त्याचं रक्त लागल्यामुळे आणखी दोन आंबे फुकट गेले. इनग्रिड म्हणतेय की, हे जे काही विचित्र फळ मी भारतातून घेऊन आलोय ते केळ्यासारखं मऊ झालंय. तर ते सोलून खाल्लं तर चालेल का?’’
‘‘चालेल. पण केळ्याच्या आत घट्ट कोय नसते, हे लक्षात ठेवा. नाहीतर दात तुटतील.’’
फोन क्रमांक आठ – ‘‘दोन फळं सोलली. पण एक माझ्या हातातून निसटलं. काप्रेटवर पडलं. काप्रेटचे धागे बुळबुळीत पिवळ्या गराला चिकटले. ते बघून इनग्रिडनं तिच्याकडचं सोललेलं फळ घट्ट पकडून धरलं. तर फळाचा रस टपाटपा काप्रेटवर पडला. हातात फक्त सीड राहिली. कपडय़ांवर पिवळे डाग पडले.’’
भारतातून फक्त घोरण्याचाच आवाज आला.
त्यानंतरचा दिवस शांततेत पार पडला. भारतपुत्राला चुकल्याचुकल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून रात्री त्यानंच अ‍ॅडमसेनला फोन केला, ‘‘आंब्याचं जमलं का शेवटी?’’
‘‘जमलं की. कुटुंब खूश झालं. इतकं सुमधुर आणि सुवासिक फळ त्यांनी जन्मात प्रथमच चाखलं.’’
‘‘चला, मी सुटलो. शेवटी आंबा कापायचं तंत्र जमलं म्हणायचं?’’
‘‘कापायचं? छे छे! ते नाही जमलं. मग मी एक शक्कल लढवली. कपडे उतरवून आम्ही बाथटबमध्ये बसलो. एकेक आंबा सोलला. हळूहळू चाटून पुसून खाऊन टाकला. अंगावर हा इतका रस सांडला. आंबे खाऊन झाल्यावर अंघोळ करून टाकली. हे इतकं सोपं आहे, हे आधी कळलं असतं तर बारातले पाच आंबे फुकट नसते गेले.’’
भारतपुत्रानं कपाळावर हात मारून फोन ठेवला. आंब्याच्या नावानं अंघोळ करणारं हे कदाचित पहिलं आणि एकमेव कुटुंब.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 12:04 pm

Web Title: aam admesen
Next Stories
1 ट्रिंग ट्रिंग..
2 बोलगप्पा : कामापुरता
Just Now!
X