पुस्तकाच्या नावापासून कुतूहल जागृत व्हावे असा प्रकार ज्या थोडय़ा पुस्तकांच्या बाबतीत घडतो त्यापैकी एक- असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. नाव हे त्याचे एकमेव वैशिष्टय़ मात्र नव्हे. न. चिं. केळकरांनी lok06प्रथम ती कादंबरी आहे असं समजून वाचायला सुरुवात केली; पण ‘बालमानसशास्त्र मुख्यत: मनात धरून तद् अनुरोधाने शिक्षण कसे द्यावे, याची चर्चा पुस्तकात चांगली साधली आहे,’ असे त्यांच्या लक्षात आले. (अभिप्राय पृष्ठ ७) तर आचार्य अत्र्यांना ती कादंबरीच वाटते. ‘‘माझे मित्र श्री. नाना पटवर्धन यांनी लिहिलेले ‘आमच्या इंदूचे शिक्षण’ हे मराठी भाषेतील एक अपूर्व पुस्तक म्हणून ठरणार आहे. ही एक शिक्षणशास्त्रातील हृदयंगम कादंबरीच आहे म्हणा ना.’ (पृष्ठ ८)
लेखकाने प्रथमपुरुषी एकवचनात आपल्या मुलीच्या जन्मापासून ती शाळेत जायला लागून पौगंडावस्थेत पोहोचेपर्यंतची हकिकत एका गोष्टीसारख्या आकृतिबंधात सांगितली आहे. ती २७ प्रकरणांत विभागली आहे. शीर्षके देताना ‘ती तान्ही इंदू’, ‘खेळकर इंदू’, ‘इंदूच्या बौद्धिक शक्तीचा विकास’ अशी देऊन विषय कंटाळवाणा होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे.
मुलगी जन्माला आल्यापासून रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांत सामान्यपणे घडणाऱ्या आई-बापांच्या प्रतिक्रिया आणि आई-बापांच्या रोजच्या जीवनात वागण्याच्या पद्धतीचा मुलांच्या मनावर होणारा परिणाम, असा परस्पर परिणामप्रवाह कोणत्या मानसशास्त्रीय तत्त्वांवर आधारित असतो, आणि तो प्रवास मुलांच्या मानसिक व त्या परिणामस्वरूप शारीरिक कसा अनुकूल करता येईल, याची मांडणी कथेच्या फॉर्ममध्ये केली आहे.
हे विवेचन ७५ वर्षांपूर्वी केले गेले होते हे लक्षात घेतले की त्याचे महत्त्व मनावर ठसते. त्यावेळी मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबांत तीन ते चार मुले असत. कर्त्यां पुरुषाचे उत्पन्न फार नसे. आणि मुलांना शिस्तीत वाढवायचे असते, हे तत्त्व सर्वमान्य होते. स्त्रियांचा मुलांच्या घडणीत मोठा सहभाग असला तरी घरात पुरुषांचा शब्दच अखेरचा असे. अशा परिस्थितीत मुलांच्या कलाने घेऊन त्यांना निरोगी विचारसरणी देण्याचा प्रयत्न पालकांना करायला सांगायचे हे तसे धाडसाचे काम होते. शिवाय, हे मार्ग बदलण्याचे सुचविणे म्हणजे पालकांनी आपल्या स्वत:च्या वर्तनातसुद्धा बदल करायला हवा, हे ओघाने आलेच. म्हणजे परंपराप्रिय lr19व्यक्तींचा रोष ओढवण्याची खात्रीच. या दोन्ही गोष्टी लेखकाने साध्या भाषेत व उदाहरणे देऊन सांगितल्या आहेत. लेखकाची मुलगी शालेय शिक्षण संपवून मुंबईला वसतिगृहात राहून कॉलेजला जाते. त्यामुळे शेवटची पाच प्रकरणे ही पत्ररूपाने आहेत.
बालमानसशास्त्र व वर्तणूकशास्त्र यांतील महत्त्वाची तत्त्वे मनाशी निश्चित करून त्या- त्या भोवती प्रकरणे रचली आहेत. उदा. ‘दोष दाखविण्याच्या काकवृत्तीपेक्षा गुण घेण्याची हंसवृत्ती किती तरी चांगली. या हंसवृत्तीचा शील- संवर्धनासाठी चांगला उपयोग होतो. हल्लीच्या प्रमुख शिक्षणतज्ज्ञ माँटेसरीबाईही असली बक्षिसे देण्याच्या पद्धतीविरुद्ध असून, करायचे कामच इतके चांगले असावे व ते करण्याची पद्धत इतकी आनंददायी असावी, की दुसरे काही बक्षीस मिळाले नाही तरी काम करण्यातच सुख व्हावे,’ या तत्त्वाभोवती शिक्षणाला सुरुवात हे प्रकरण रचले आहे.
संपूर्ण पुस्तकात कुठेही एकांगीपणा येणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. विरुद्ध मताचा नुसताच उल्लेख नाही, तर त्यात असलेला वास्तवाचा भाग (कमी/अधिक) यांची कबुलीसुद्धा आहे. विनोदाचा वापर करून काही ठिकाणी ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आह
े.
‘बाप म्हणजे कोण गं?’ असे लेखकाच्या मुलीला विचारल्यावर ती उत्तरते, ‘घलात आईच्या बलोबल नसतो का एक मोथा मानूस? तो बाप.’ (पृष्ठ ५०)
‘ते घरी येऊन गेल्यावर इंदू आमच्याकडे धावत धावत आली व मोठय़ा गंभीर व आश्चर्ययुक्त स्वरात म्हणाली, ‘ते किती पुण्यवान असले पाहिजेत नाही?’ ‘कशावरून गं?’ विचारता ती म्हणाली, ‘कशावरून काय विचारता? त्यांची ती पांढरीशुभ्र दाढी व त्यांचा पांढराशुभ्र पोशाख पाहिला नाही का तुम्ही? पापी माणसं अशी नाही दिसत.’ (पृष्ठ ७८)
बालमानसशास्त्रावरील गोष्टीरूपाने सांगितलेले काहीसे स्वैर, पण तरीही खूप विचारपूर्वक बेतलेलं हे लेखन ७५ वर्षांपूर्वीचं असलं तरी आजही तितकंच महत्त्वाचं वाटतं. कारण परिसर, नाटय़स्वरूप बदललं तरी कुठल्याही काळात मानसशास्त्राची तत्त्वे तीच राहतात.                   
‘आमच्या इंदूचे शिक्षण’- ना. म. पटवर्धन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन- १९३६, पुनर्मुद्रण- १९४२/४८.
पृष्ठे : १७६, किंमत : २ रु.  
 (यशोदा चिंतामणी ट्रस्ट पुरस्कृत गं्रथमाला- ग्रंथ ५)